अहमदनगर ते गोवा सायकल सफर - Ahmednagar to Goa Cycle Journey

                                 अहमदनगर ते गोवा सायकल सफर 

                                                                                                                     अंकुश आवारे 

                                                                                                                              नोव्हेंबर २०२०  

    मागील वर्षीच्या अहमदनगर दांडी सायकल यात्रेच्या रोमांचक अनुभवानंतर ठरविले होते की दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये परराज्यात सायकलवर जायचे. दांडीला एकटाच गेल्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. सायकल प्रवासात येणारे अनुभव, होणारे चिंतन, आणि  या सर्वांचा एकंदरित दैनंदिन जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम यांमुळे दूरच्या सायकल प्रवासाची आवडच निर्माण झाली. दीर्घपल्ल्याचा सायकल प्रवास अनेक प्रकारे फायदेशीर ठरला होता. अहमदनगर-दांडी सायकल प्रवासानंतर वर्षभर कंटाळाच निघून गेला होता. सतत कार्यक्षम राहण्यासाठीचा आत्मविश्वास आणि उर्जा त्या सायकल प्रवासाने दिली. त्यामुळे मागील वर्षीच ठरविले होते की कोणी येवो अथवा न येवो आपण मात्र २०२० मध्ये जायचे. मात्र २०२० तशा अर्थाने नियमित वर्ष राहिले नाही. करोना महामारीमुळे सर्वच व्यवहार विस्कळीत झाले. अर्थात या वर्षीची सायकल सफरही ढळमळीत होती. त्यातच दिवाळीची सुट्टी पाचच दिवस असल्याने जाणे शक्य होणार नाही, असेच वाटत होते. काही मित्रांना राजस्थानला जाण्याबाबत विचारले. त्यांनी येण्याची असर्थता दाखविल्याने सायकलवर जाण्याचा निर्धार पक्का केला. दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी गोव्याला जायचे ठरविले. गोव्यालाच का तर तेथून परत येण्यासाठी बसेस उपलब्ध होतात.


त्यानंतर मग दांडी यात्रेतील उणीवांचा विचार करू लागलो. दीर्घपल्ल्याच्या प्रवासासाठी काय तयारी करायला पाहिजे याची चौकशी करू लागलो. रविवार दि. १५ नोव्हेंबर २०२० रोजी आगडगावला सायकलवर गेलो होतो. तिथे अचानक विजय फलके नावाचे सद् गृहस्थ भेटले. त्यांनी अनेक सायकल स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याकडे गोव्याला जाण्याचा मनोदय व्यक्त केला. दिवसभर सायकल चालविण्यासाठी काय-काय तयारी केली पाहिजे याची चौकशी केली. त्यांनी शरीरातील मिठाचे, पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले. खजूर, चिक्की यांसारख्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. आणखी सोबत कोण येणार आहेत  असे त्यांनी विचारले असता पुण्यातून मित्र येणार आहेत अशी खोटी थाप मारून दिली. एकटाच जातोय असे म्हटले तर जरा विचित्र वाटते. त्यामुळे सर्वांना सांगितले की मित्रांसोबत जात आहे. अर्थात गोव्याला जात आहे हे मी मात्र मला एकट्यालाच सांगितले होते. घरीदेखील पुण्याला जात आहे, असेच सांगितले होते. विजय भेटल्यानंतर रविवारी सायंकाळी संकल्प थोरात या राष्ट्रीय पातळीवरील सायकलपट्टूकडे मी गेलो. खाद्यपदार्थ आणि सायकलबाबत माहिती घेण्यासाठी त्याच्याकडे गेलो. त्यानेही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सोबत GEL नावाचे Energy Gel आणि Fast Up Reload या मिठाच्या गोळ्या दिल्या. दिवसा जेवन करायचे नाही, द्रवरूप पदार्थ खायच्या सूचना त्याने केल्या.

दुसऱ्या दिवशी लवकर जायचे होते तरी रात्री लवकर  झोपच आली नाही. मध्यरात्री एकदा जाग आली तेव्हा शरीरात थकवा जाणवत होता. विजयने सांगितले की दीर्घप्रवासाला जाण्यापूर्वी १० दिवस कोणत्याही प्रकारचा थकवा आणणारा शारिरीक व्यायाम करायचा नसतो. मी मात्र शनिवारी ८० कीलोमीटर आणि रविवारी ५० कीलोमीटर सायकल चालविली होती. आपले चुकलेच, गोव्याला निघण्यापूर्वी आपण आराम करायला पाहिजे होता. विनाकारण शनिवार आणि रविवारी सायकल चालविली. या विचाराच्या चक्रामुळे गोव्याला जाण्याचा निर्धार डळमळीत होत होता. मग मात्र मनाला समजावले की हे दोन दिवसही आपण आपल्या दीर्घ यात्रेचे समजुयात म्हणजे काही फरक पडणार नाही. हा विचार मनात आल्या सरशी सर्व थकवा निघून गेला. सोमवारी सकाळी ६.१५ वा. गोवा सफर सुरू झाली.

इतर दिवशी मी सकाळी ५.३० वाजताच सायकलिंगला जातो. आज मात्र तासभर उशीर झाला होता. वाटले हा तासभराचा उशीर शेवटी त्रासदायक ठरेल आणि झालेही तसेच. आज मी पहिल्यांदा पुणे-नगर रोडवर सायकल चालवित होतो. या रोडवर नेहमी गर्दी असते. त्यामुळे सायकलिंगसाठी काहीसा धोकादायक रस्ता. मात्र आज भाऊबीज असल्याने रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. मनात सहज विचार आला आरे आपल्यासाठीच आज गर्दी कमी दिसते. हा आपल्या प्रवासासाठी शुभ संकेत मानून मी चालू लागलो. अशा अनेक सकारात्मक बाबी पुढील प्रवासात घडणार होत्या. मागे सांगितल्या प्रमाणे विजय फलके भेटणे, संकल्पसोबत चर्चेची गरज वाटणे या गोष्टी जशा घडत गेल्या तसे सुप्याजवळ मला सायकलिंगचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अचानक भेटले. सायकल चालविणाऱ्यांची एक जमात तयार झाली आहे. त्यामुळे रस्त्याने जाताने ते एकमेकांना शुभेच्छा देतात. तशीच शुभेच्छा मीही त्यांना दिली. आणि त्यांच्यापुढे निघून गेलो. काही वेळाने त्यांनी मला मागे सोडले. जाताना मला म्हणाले तुमच्या सायकलच्या मागील चाकात हवा कमी आहे. मी उतरून हवा चेक केली. त्यांनाही तपासायला लावली. त्यानंतर आमची चर्चा सुरू झाली. त्यांना मी दिवसभर सायकल चालविताना कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती विचारली. त्यांच्याकडून Stretching च्या कसरती शिकून घेतल्या. सायकल थांबविल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबतची माहिती घेतली. त्यांनी सांगितलेल्या व्यायाम प्रकारामुळे मला फारच बरे वाटू लागले. शरीराचा पूर्ण थकवा निघून गेला. पुढील प्रवास अत्यंत सुखकर झाला. मला सहज वाटून गेले की सुमेरसिंग भेटणे हा नियतीचाच योग असावा. मी त्यांना म्हटलोही की तुम्ही मला अगदी देवदूतासारखे भेटलात. त्यांनी सांगितलेल्या व्यायाम प्रकारामुळे मला गोव्यापर्यत कोणत्याही प्रकारचे Cramp आले नाहीत. मागे म्हटल्याप्रमाणे सुमेरसिंग सर भेटणे हा एक प्रकारे दैवी योगायोगच होता. (अर्थात मी नास्तिक असून देवावर किंवा दैवी चमत्कारांवर माझा विश्वास नाही. तरीही सकारात्मक काही करावयास आपण गेलो तर अनुकूल गोष्टी घडत जातात. याचा प्रत्येय मला यावेळी आणि वेळोवेळी आलेला आहे.)

सुमेरसिंग सर भेटल्यानंतर मी सुप्याला मी लिंबू शरबतची बाटली घेऊन शिरूरकडे निघालो. रस्त्याने केळी, चिक्की आणि खजूर खात खात मी शिरूर सहज ओलांडले. रांजणगावजवळील कावेरी डेअरीजवळ मी सकाळी ११.२० वाजता पोहचलो. तिथे ताक पिलो. पुण्यात १२ पर्यत पोहचण्याचा निर्धार होता. सकाळी निघण्यास उशीर झाल्याने ते आता शक्य वाटत नव्हते. थंड पाणी आणि ताक पिल्यामुळे नव्याने तरतरी आली होती. पावणे एकच्या सुमारास वाघोलीजवळ खाण्यासाठी थांबलो. तिथे मी घरून आणलेली अंडी आणि दाळ व ब्रेड खाल्ले.

वाघोलीनंतर खराडी बायपासने मी हडपसर मार्गे केके मार्केटजवळ मी कात्रजला पोहचलो. दुपारी ३.३० वाजता मी कात्रजच्या घाटात पोहचलो. घाटात तीव्र चढ असल्याने दमछाक होत होती. मात्र आज कोणत्याही परिस्थितीत वाईला पोहचायचेच हा निर्धार मी केल्याने थकव्याला मी शरीरावर प्रभुत्व मिळू दिले नाही. तसेच अशोक सोनवणे या  साठीतील गृहस्थाने एका दिवसात २०० किलोमीटर पूर्ण केल्याचा आदर्श समोर ठेऊन आज वाईपर्यत पोहचायचेच असे ठरविले होते. त्यामुळे सातत्यपूर्ण चालत राहणे एवढा एकच ध्यास ठेऊन मी चालू लागलो. प्रचंड थकवा आला होता. मात्र घाट चढल्यानंतर उतार येणार आहे, हा विचार घाट चढण्यासाठी प्रेरणा देत होता. त्यातून कशीबशी घाटाची चढाई पूर्ण झाली. कात्रजचा बोगदा पार केल्यानंतरच्या उताराने सर्व थकवा घालविला. मात्र वाई अद्यापही दूरच होती. सायंकाळ वेगाने येत होती. भोर पार केल्यानंतर कुठेतरी काहीतरी खाल्ले पाहिजे असा विचार केला. सायंकाळी पाच वाजता निरा नदीच्या अलीकडे थांबून मिसळ पाव खाल्ला. पुन्हा एकदा बरे वाटू लागले. पुन्हा ताकत आल्यासारखे वाटू लागले. सायंकाळी सहाच्या दरम्यान शिरवळला पोहचलो. तेथून मुक्कामाचे ठिकाण २५ कीलोमीटर दूर होते. अंधार वेगाने पसरत होता. खंडाळ्याजवळील एक घाट पार केला. फोनवरून देशमुख सर सातत्याने माझ्या ठिकाणाबाबत विचारत होते. खंडाळा घाट संपल्यानंतर लगेचच वेळे गाव येईल आणि मला तिथे थांबायचे आहे असे त्यांनी मला सांगितले. मी खंडाळ्याजवळील एक घाट पार केला, मला वाटले तोच खंडाळा घाट आहे. ती मात्र खंबाटकी घाटामागील टेकडी होती. ती संपल्यानंतर मी पाणी पिण्यासाठी एका हॉटेलवर थांबलो. तेव्हा तिथे कळले की घाट अजून १० ते १२ किलोमीटर आहे. क्षणभर विचार केला तिथेच थांबावे. त्याच वेळी देशमुख सर वेळे येथे येऊन थांबले होते. मी एक Energy Gel घेतले आणि घाट चढून जाण्याचे ठरविले. संकल्पने दिलेल्या Gel ने त्वरित उर्जा मिळाली. उत्साह निर्माण झाला.  घाटात एकेरी वाहतूक होती. त्यामुळे फारशी भीती वाटली नाही. सायकलला एक छोटीशी बॅटरी जोडली होती. तिच्या प्रकाशात मी घाटाची चढाई करू लागलो. घाटाचा चढ अत्यंत तीव्र होता. खूप दमछाक होत होती. घाट काही केल्या संपत नव्हता. प्रत्येक वळणावर वाटत होते, घाट आता संपेल मग संपेल. मात्र घाट संपण्याचा काही ठावच लागत नव्हता. आतापर्यंत मी तेरा तासाहून अधिक सायकल चालविली होती. शरीर पूर्णपणे गलितगात्र झाले होते. केवळ मन शरीराला पुढे ढकलत होते. काहीही होवो आपल्याला आज वेळे येथे पोहचायचेच आहे असे मन शरीराला सातत्याने सांगत होते. त्यामुळे मला केवळ घाटाच्या उताराचीच अपेक्षा होती. त्याच क्षणी मनात विचार येऊन गेला जर आपण अशीच मेहनत करत राहिलो तर आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च शिखर गाठणे अशक्य नाही. सायकलमुळे आपण किती मेहनत घेऊ शकतो याची कल्पना आली. ती मेहनत अभ्यासासाठी घेतली तर काहीच अडचण येणार नाही, याची जाणीव झाली.

    प्रचंड दमछाक करणारा खंबाटकी घाट उतरल्यानंतर मात्र प्रसन्न वाटू लागले होते. वेळे गावला सर वाट पाहत होते. सायकल वेळे फाट्यावर ठेवून आम्ही गावात जाणार होतो. त्यांच्या मेहुण्याच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मी त्यांना म्हणत होतो मी बाहेर थांबतो. विनाकारण अडचण नको. ते म्हणाले अडचण असती तर मी १०० कारणे सांगून तुम्हाला टाळले असते. बिनधास्त राहा. तिथे रात्री सांबर भाताचे जेवन होते. मी पाटील सरांना फोन लावला. सायकलवरून आल्याचे ऐकून ते अवाकच झाले. ते म्हणाले मी येतो. आपण जेवायला बाहेर जाऊयात. त्यांचे ठिकाण १५ किमी लांब होते. मी होय-नाही म्हणत त्यांना बोलविले. मुक्कामाच्या ठिकाणी सांभर भात होता. मी दिवसभर जेवन केले नसल्याने मला प्रथिनयुक्त मांसाहार करणे गरजेचे वाटत होते. तशी कल्पना मी देशमुख सरांना दिली. मी तिथे जेवायची टाळाटाळ करत होतो. ते म्हणाले इथे थोडे खा. तुम्हाला कोण पाहतंय तुम्ही किती खाता म्हणून. त्यांचा हा सल्ला योग्य वाटला. आणि क्षणभर वाटून गेले अरे आपण सदैव आपला विचार सर्व करत असतील अशा भूमिकेत राहतो. वास्तव मात्र त्याहून वेगळेच असते. त्या एका वाक्याने स्वतःची आत्मकेंद्रितता कमी होण्यास मदत झाली. देशमुख सर म्हणाले ते अगदी खरे झाले. मी कमी जेवलो हे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्या दिवशी खूप मोलाचा धडा मिळाला.

पाटील सर आल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत जेवायला गेलो. जाऊन येऊन ५० कीलोमीटर झाले असेल. मध्यमवर्गीय असूनही अशा अवेळी जेवायला घेऊन गेले, याने मी खूप भारावून गेलो. मांसाहार केल्याने फार बरे वाटू लागले होते. रात्री झोपायला ११ वाजले. देशमुख सर आणि पाटील सरांच्या आदरतिथ्याने मी भारावून गेलो. रात्री आंघोळ करताना जांघेत आणि पृष्ठभागावर जखमा झाल्याचे जाणवले. क्षणभर घाबरलो. त्यानंतर मात्र दुखणे विसरून गेलो. रात्री फार छान झोप लागली.

साडेचारला जाग आल्यानंतर प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झाला. सकाळी नाष्टा केल्यानंतर प्रयाण सुरू झाले. सकाळी फारच प्रसन्न वाटत होते. सकाळी ६.१५ वा. वाईजवळून निघालो. कालचा थकवा पूर्णपणे निघून गेला होता. सकाळी नऊच्या दरम्यान सातारा येथे नाष्ट्यासाठी थांबलो. या रस्त्यावरून जाताना २०१६ मध्ये कोल्हापूर सायकलवरून गेल्याची सारखी आठवण होत होती. त्यावेळी या ठिकाणी मी साधारणतः सायंकाळी पाचच्या दरम्यान पोहचलो होतो. त्यावेळी पहिल्यांदाच एवढा लांब सायकलवर आल्याने पृष्ठभागावर जखमा झाल्या होत्या. पायाला गोळेही आले होते. अंधार पडू लागला होता. कऱ्हाड १७ किलोमीटर असताना अंधार पडू लागला होता. रस्त्यावर लॉजही नव्हते. त्यामुळे थांबणे शक्य नव्हते. त्यावेळी कसाबसा कऱ्हाडला पोहचलो. सायकल मारणेही जमत नव्हते. त्या वेळेचा अनुभव आज पुन्हा आठवत होता. आज मात्र त्यावेळेसारखा त्रास होत नव्हता. दुपारी १२.३० वा. कराडला पोहचलो. तिथपर्यत ८६ किलोमीटर अंतर आज पार केले होते. सायंकाळी ५.३० वा कोल्हापूरला पोहचलो. तिथे विकास सरनाईक उकडलेले बटाटे घेऊन आला होता. तिथे त्याच्यासोबत नाष्टा करून कोल्हापूर सोडले. कोल्हापूर-कागल-निपाणी असा २०-२० किलोमीटरचा टप्पा होता. सुरूवातीला कागलला थांबूयात असे ठरविले. कागलला ७ वाजेपर्यत पोहचलो. पुन्हा उत्साह वाटू लागला. रस्ता चांगला होता. मात्र अंधार पडू लागला होता. त्यामुळे रात्री थांबावे की पुढे हा प्रश्न पडला. थांबण्यापेक्षा निपाणीला राहणेच पुढील प्रवासासाठी योग्य राहील, असे वाटले आणि पुढील प्रवास सुरू केला. आज जास्त त्रास घेतल्यास उद्याचा त्रास कमी होईल कमी होईल असा विचार करून निपाणीला थांबायचे ठरविले. तो निर्णय अगदी योग्य ठरला. रस्ता चांगला असल्याने विशेष काही जाणवले नाही. छोट्या बॅटरीच्या उजेडात अंधाराशी सामना करत करत शेवटी ७.४५ वा. निपाणीला पोहोचलो. निपाणीला थांबायचा निर्णय योग्य ठरला. त्या दिवशी नवा मंत्र सापडला. आज जास्त काम केले तर उद्याचा त्रास कमी होतो किंवा पुढील दिवस अतिरिक्त राहतो.

निपाणीला शोधाशोध केल्यानंतर एक हॉटेल मिळाले. हॉटेल चांगले होते. त्यांनी १००० रूपये सांगितले. विचार केला पाच-सहा तासांसाठी कशाला एवढे पैसे द्यायचे. गांधीबाबा आठवत होते. Comfort नेहमी महागडा असतो आणि त्याच्या लालसेनेच आपण सतत पैशाचा हव्यास धरत असतो. Comfort ला रामराम केल्यास पैशाची गरज कमी होते आणि स्वातंत्र्य वाढते. ५०० रू. पर्यत रूम भेटावी अशी अपेक्षा होती मात्र ३०० रूपयांमध्येच रूम मिळाली. चांगला लॉज आधी पाहिल्याने ती रूम फारशी आवडली नाही. मात्र ७०० रूपये वाचतायेत, आपण केवळ सहाच तास झोपणार आहोत, आणि आल्हादायक जीवनाचा सोस कमी करण्याचा एक प्रयत्न म्हणून मी ती रूम घेतली.  आंघोळ करून जेवन करून येईपर्यत १०.३० वाजले. रूमबाबतची तुलना नंतर संपली. मनाला फार महत्त्व दिले की ते जास्तच आराम मागते. त्यामुळे स्वस्तातील रूम घेण्याचा निर्णय शेवटी योग्य वाटला.  रात्री खूप गाढ झोप लागली. सकाळी ४.३० वा. जाग आली. ५.१५ वा हॉटेल सोडले. निपाणी बसस्टॅडवर चहा घेतला आणि निघालो अंतिम टप्प्यातील प्रवासाला. आजचा दिवस सर्वात रोमहर्षक असणार होता. पहिले दोन दिवस फार काही विशेष विचार येत नव्हते. आजचा दिवस मात्र १८ नोव्हेंबर २०२० कायम स्मरणात राहणार होता. मंगळवारी रात्री पुण्याहून आलेले दोन सायकल स्वार मला हॉटेलमध्ये भेटले होते. तेही गोव्याला जाणार होते. ते आंबा घाटमार्गे गोव्याला जाणार होते. सकाळी रस्त्याने तेही भेटले. त्यांच्यासोबत जावे की एकट्याने जावे असा पेच निर्माण झाला. सायकल दुरूस्त करण्याची गरज होती. त्यामुळे बेळगावला जाऊन सायकल दुरूस्त करून पुढे जाऊयात असे मी ठरविले. कर्नाटकचा भागही पाहता येईल आणि तो रस्ताही चांगला होता. त्यामुळे बेळगाव मार्गे एकट्याने जाण्याचा निर्णय मी घेतला. रस्ता आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर होता. सायकलवरचा तिसरा दिवस असूनही खूप ताजे वाटत होते. थकवा कुठेही जाणवत नव्हता. कर्नाटकातील एका गावात पोटभर नाष्टा केला. तिथून बेळगाव ४० किलोमीटर असेल. नाष्टा केल्यानंतर पुन्हा चांगले वाटू लागले. १२.३० वाजता बेळगावला पोहचलो. तिथे गेल्यावर लक्षात आले की मागचे चाक आऊट झाले आहे. सायकल दुरूस्त करणाऱ्यांना विचारले मात्र सर्वांनी नकार दिला. ब्रेक ढिले करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी एक दुकानदार ती दुरूस्त करायला तयार झाला. मात्र सायकलच्या मापाचा स्पोक मिळत नव्हता. त्या कारागीराने अक्कलहुशारीने सायकल दुरूस्त केली. दरम्यानच्या काळात मी बेळगावची प्रसिध्द नियाझ बिर्याणी खाऊन आलो. बिर्याणी अत्यंत चवदार होती. ती खाल्ल्यावर पूर्ण थकवा गेला. सायकल दुरूस्त झाल्याचाही आनंद वाटत होता. सायकल खराब झाल्यामुळे बेळगावहून परत यावे लागणार असे वाटत होते मात्र अडचणींवर मार्ग निघत गेले. दुपारी २ च्या सुमारास बेळगाव सोडले. बेळगाव सोडल्यानंतर अर्धे डोके दुखू लागले. खूप वेदना होत होत्या. थांबायचे नाही असे ठरवून बेळगाव सोडले. ती वेळ भर ऊन्हाची असल्याने तर अधिकच त्रास होत होता. ४.३० च्या सुमारास खानापूरला पोहचलो. खानापूरपासून जंगल सुरू होत होते. तिथपासून पुढे ३६ किमी अंतरावर अनमोड या ठिकाणी राहण्याची सोय आहे, असे कळले. रस्ता खूपच खराब होता. त्यात सायंकाळ होत होती. अंधार पडायला सुरूवात झाली. अनमोडला पोहचणे शक्य होणार नाही, असे वाटू लागले. रस्त्यात शिरोळी येथे वन विभागाचे विश्रामगृह असल्याचे कळले. तिथे थांबावे असे एकाने सुचविले. तिथे गेल्यावर गार्डने सांगितले की  येथे थांबण्यासाठी पूर्वपरवानगी लागते. तिथे नाहक अर्धातास गेला. तिथून अनमोड २० किलोमीटर होते. अंधार कधीही पडणार होता. सायंकाळी ६ नंतर त्या मार्गावरील वाहतूक बंद होते. त्यामुळे जेवढ्या वेगाने सायकल चालविणे शक्य होते तेवढ्या वेगात सायकल चालवित होतो. अंधार पडू लागला. सोबत बॅटरी नाही. मागील चाकात हवा कमी. आता काय करायचे या विचारात असतानाच अचानक चांगला रस्ता सुरू झाला. चंद्रोदय झाल्याने चंद्राच्या प्रकाशात स्पष्ट दिसू लागले. शेवटी पुन्हा अलकेमिस्टची आठवण झाली. वाटले आपल्या प्रवासाला सर्व बाबी अनुकूल घडत आहेत. भावनेच्या भरात चंद्राचे आभार मानले. नंतर मनात विचार आला आपल्यासाठी अनुकूल गोष्टी घडत आहेत. त्यानंतर वाटले जर काही दैवी शक्ती असेल तर आधीच परिस्थिती प्रतिकूल का बनवेल? मग जाणवले या सर्व मनाच्या धारणा आहेत. मी भीमगड अभयारण्यातून जात होतो. त्यानंतर अचानक एक कमान दिसली. वाटले आले अनमोड. मात्र ती कमान दंडेली व्याघ्र अभयारण्याची होती. पाहून मनात कचरलोच. व्याघ्र प्रकल्पातून जात आहोत याचे भय आणि थरारकता दोन्ही अनुभवत होतो. माहित नाही का परंतु मनात अजिबात भीती निर्माण झाली नाही. डोळ्यापुढे एकमेव उद्दिष्ट्ये होते अनमोडला पोहचायचे. बाकी इतर कोणतेही विचार मनात येत नव्हते. वाटेत एका कारवाल्याने थांबून विचारले की भीती नाही का वाटत? मला उशीर झाल्याने मी काही उत्तर दिले नाही. स्वतःला प्रश्न विचारला अरे मला भीती वाटते की नाही? उत्तर मिळाले आपल्याला भीतीच वाटत नाहीये.  क्षणभर खूप उत्साह निर्माण झाला. दांडीच्या वेळी आळस गेला. यावेळी भीतीही निघून गेली. दैनंदिन जीवनात सतत कोणत्या ना कोणत्या भयाने आपल्याला ग्रासलेले असते. ते भयच आपली क्षमता, उत्पादकता, आनंद, समाधान हिरावून घेत असते. आज मात्र त्या भीतीने आपणावर मात केली नाही हा विचार मनाला उभारी देत होता. त्यामुळे आत्मविश्वास वाढला होता. त्यामुळे या सायकल सफरीने आपल्यातील भीती कमी केली. या भावनेने मी निवांतपणे जंगलातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत चाललो होतो. सर्व प्रकारच्या Anxiety निघून गेल्या होत्या. अनमोड चार किलोमीटरचा बोर्ड पाहिल्यावर खूपच बरे वाटले. शेवटी आपण थांबण्याची जागी पोहचलो असा सुखद विचार करत असतानाच अनमोडला थांबण्यासाठी कोणतेही ठिकाण नाही असे मला सांगण्यात आले. अनमोड रिसॉर्ट मागे ४ किलोमीटर राहिले असे कळले. दोनच पर्याय होते. मागे जाणे अथवा पुढे ३० किमी अंतर जाऊन गोव्यात प्रवेश करणे. मी तिसऱ्या पर्यायाचीही चाचपणी करत होतो. एखाद्या टपरीबाहेर रात्र काढून पुढे जायचे.

रात्री ८ वाजता अनमोड फाट्यावर चहा घेतला आणि थोडे खाल्ले. एक टेम्पोवाला म्हटला सामान नसते तर टपावर टाकून नेले असते. मी त्याला धन्यवाद दिले. काही काळ एखाद्या ट्रकमध्ये सायकल टाकून नेण्याचा विचार करू लागलो. तो व्यक्ती मला म्हणाला अंधारात उजेडाशिवाय सायकल चालविणे धोक्याचे आहे. एखादी बॅटरी सोबत ठेवावी. मग मी शेजारील दुकानातून दोन चांगल्या बॅटऱ्या विकत घेतल्या. पुढील प्रवासासाठी सज्ज झालो. मागे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. विचार केला पुढे ३० किमी गेल्यावर मिलॉन-गोवा आहे. तिथेय जाऊयात. थकवा आला तर चालत जाऊयात. काहीही झाले तरी अनमोडला थांबायचे नाही, असे ठरविले. बॅटरी, पाणी घेऊन निघालो. माझ्या सुदैवाने संपूर्ण रस्ता सिमेंटचा, खड्डेविरहीत आणि तीव्र उताराचा होता. त्यामुळे सायकल चालवायला कोणतेही कष्ट पडले नाहीत. अलगद मी गोव्याला पोहचलो. जेव्हा वेलकम टू गोवा हा फलक मी पाहिला तेव्हा अत्यानंद झाला. कसे का होईना आपण तिसऱ्या दिवशी गोव्यात पोहचलो याचे समाधान होत होते. रात्री मिलॉन येथे रूम मिळाली. रात्री ११ वाजता खाऊन अत्यंत समाधानाने झोपलो. उद्या सकाळी लवकर उठायचे नव्हते तरीही पहाटेच जाग आली. एक-दोन दिवस गोव्यात राहण्याचा विचार होता. मात्र तो विचार टाळला. गुरूवारी दि. १९ नोव्हेंबरला पुन्हा अहमदनगरसाठी ट्रॅव्हेलमध्ये बसण्याचे ठरविले.

खूपच समृध्द करणारा अनुभव होता. घरातून निघण्यापूर्वी कंटाळा येत होता. मात्र रस्त्यात कुठेही परत जावे असे वाटले नाही. जांघेत, पृष्ठभागावर जखमा होऊनही गोव्यापर्यत गेलो. खूपच बरे वाटले. या प्रवासात भीतीची भीती कमी झाली. तीच सर्वात मोठी उपलब्धी या सायकल सफरीची आहे, असे मला वाटते. शेवटच्या दिवशी मी सकाळी ५.३० ते रात्री ९.३० अशी सलग सोळा तास सायकल चालविली. आपण एवढा वेळ सायकल चालवू शकतो तर त्यापेक्षा अधिक वेळ निश्चितच अभ्यास करू शकतो, असा विश्वास वाटू लागला. या विचाराचा पुढील काळात निश्चितच फायदा होईल, असे वाटते.