अहमदनगर ते श्रीनगर सायकल प्रवास : Ahmednagar to Srinagar ( Jammu and Kashmir) Cycle Journey

 अहमदनगर ते श्रीनगर सायकल प्रवास 

(या लेखात मी दि. १८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये अहमदनगर ते श्रीनगर केलेल्या सायकल प्रवासाचे वर्णन आहे.)
दल लेक श्रीनगर ( काश्मिर) 


या प्रवासा दरम्यान आलेले अनुभव, भेटलेल्या व्यक्ती, ठिकाणं तसेच दैनंदिन प्रवासातील घटना यांचा ऊहापोह यामध्ये केलेला आहे. 
सायकल प्रवासाचा मार्ग (मॅप)

दिवस पहिला -१८ नोव्हेंबर २०२३ अहमदनगर ते मालेगाव (१८० किमी)  

        २०२१ मध्ये अहमदनगर ते नौखाली ( बांगलादेश) अशी ४००० किलोमीटरची सायकल यात्रा पूर्ण केल्यानंतर आडवा भारत पाहून झाला. त्यानंतर २०२२ मध्ये कन्याकुमारीला जाऊन आल्यानंतर दक्षिण भारतातही सायकल चालविण्याची संधी मिळाली. २०२३ मध्ये पुन्हा दक्षिण भारतात रामेश्वरपर्यत सायकलवर अचानक जाण्याची संधी मिळाली. आता केवळ उत्तर भारतात सायकल चालविणे बाकी होते. २०२३ मधील दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये उत्तर भारतात जाण्याचा मनोमन निर्धार केला होता. स्वत:चे अनेक निर्धार इतर अनेक बाह्य घटकांवर आधारित असतात. आमच्या महाविद्यालयाचे NAAC निर्धारीत वेळेनुसार ऑक्टोबर २०२३ मध्ये होणार होते. ते झाल्यावर आपण निघुयात असे मनोरथ मी रचत असताना अचानक कळले की नॅकची भेट नोव्हेंबर च्या १६ आणि १७ तारखेला होणार आहे. विद्यापीठाने दिलेल्या सुट्ट्या २१ तारखेला संपणार होत्या. त्याचवेळी प्रथम वर्षाच्या परिक्षाही 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार होत्या. त्यामुळे उत्तरेत सायकलवर जाण्याची संधी यावर्षी हुकणार हे जवळपास निश्चित झाले होते.  

        मात्र अचानक १७ नोव्हेंबरला आमच्या प्राचार्यांनी दहा दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या. उत्तरेत जाण्याची हिच योग्य संधी आहे, असे जाणवले. चोर पावलांनी आणि अचानक आलेली संधी सोडायची नाही हे ठरविले. आपण १८ नोव्हेंबरला निघायचे असा बेत ठरविला. त्यात अचानक मला नॅकच्या एका सदस्याला पुणे विमानतळावर रात्री सोडून यायला नियुक्त केले. उद्या निघण्याची तयारी संध्याकाळी करायची होती मात्र ती वेळ मिळणार नाही हे समजले. महाविद्यालयाने जबाबदारी दिली असल्याने ती टाळावी असे वाटत नव्हते. त्यामुळे विचार केला की आपण पुढील दहा दिवस स्वत:ला त्रास करून घेण्यासाठीच जात आहोत तर त्यात अजून थोडा त्रास वाढला तर काय फरक पडणार. असा सकारात्मक विचार केल्याने अचानक आलेल्या जबाबदारीचे ओझे एकदम कमी झाले. पुण्याहून घरी पोहचण्यास रात्रीचे एक वाजले.  

        १८ नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता उठून बॅग भरली.  घरच्यांना सांगितले की नंदूरबारला चाललो आहे. माझी बॅग भरत असताना आई भाऊक झाल्याचे जाणवत होते. तिचा आवाज बदलला होता. कसेबसे रडू दाबून ती बोलत होती. कशाला अशा नसत्या उठाठेवी आपण करतो असा विचार तिच्या मनामध्ये असावा. सकाळी सहा वाजता घर सोडले. सातपर्यत विळदपर्यत पोहचलो. तेथून पुढे नगर-मनमाड रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. त्यावर सायकल चालविणे धोकादायक होते. त्यामुळे कोल्हारपर्यत सायकल टेम्पोत टाकावी का असा विचार करून एका टेम्पोला हात केला. तो टेम्पो रिकामाच होता. त्याने मला आणि सायकललाही टेम्पोत घेतले. त्या टेम्पो चालकाचे नाव जलाराम होते. तो कर्नाटकातून परत घरी अहमदाबादला चालला होता. त्याच्या आईचे निधन झाल्याचे वृत्त त्याला पहाटे पाच वाजता मिळाले होते. तो घरापासून जवळपास १२०० किलोमीटर दूर अंतरावर होता. त्याला भाडे विचारल्यावर तो म्हणाला काय द्यायचे ते द्या. त्याने आम्हाला (सायकल आणि मला) कोल्हारला सोडले. सकाळी आठपासून आमचा उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू झाला.  

        कोल्हार नंतरचाही बराचसा रस्ता खराब होता. पण कसेबसे सकाळी दहा वाजता शिर्डीत पोहचलो. शिर्डीत साईबाबांचे हवाई दर्शन घेऊन पुढे निघालो. एका ठिकाणी उसाचा रस घेत असताना अचानक आठवले की कोपरगावला एनसीसीचे कॅप्टन देवकर राहतात. त्यांना जाता जाता भेटावे असे वाटले. त्यांना फोन केल्यानंतर ते घरीच असल्याचे कळले. त्यांच्या घरीच दुपारचे जेवन झाले. त्यांच्या पत्नी एतद्देशीय शहाणपण असलेल्या व्यक्ती वाटल्या. त्यांनी मी घरून आणलेला डबा पुढे न नेता त्यांच्याकडील ताजे अन्न सायंकाळच्या जेवनासाठी सोबत न्यावे असा आग्रह केला. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत विचार करण्याच्या सवयीने मी चकित आणि प्रभावित झालो. त्यांच्याकडील पाहुणचार घेऊन पुढील प्रवास सुरू झाला. दुपारचे एक वाजत आले होते. जेवल्यामुळे आणि ऊन्हामुळे सायकलचा वेग कमी झाला होता. येवल्याच्या अलीकडे एका शेतात थंडगार जागा पाहून आराम करण्याचा निर्णय घेतला. बांधावरील चिक्कूच्या झाडांखाली एक बाज होती त्यावर आराम करू का अशी विचारणा तेथील शेतमालकाला केली. त्याने होकार दिला. त्यांच्या शेतात कांद्याची लागवड केलेली होती. या वर्षी पाऊस कमी पडल्याने कांद्याचे पीकाला पुरेसे पाणी मिळेल की नाही याची त्यांना खात्री नव्हती. त्यांच्या विहीराला पाणी असल्याने ते पाणी ते टँकरने मनमाड विकत होते. त्यांच्या कुटुंबातील मुलांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले होते. ते बाहेर कोठेही नोकरी न करता शेतातच काम करत होते. सध्या बाहेर रोजगाराच्या संधी कशा कमी होत आहेत याचे वर्णन त्यांनी केले.  

        दुपारी तीनच्या सुमारास पुढील प्रवासाला सुरुवात केली.  जाताना त्यांनी चहा पाजून पाठविले. पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. त्याच ठिकाणी सायकलला शिर्डी ते श्रीनगर असा फलक लावून घेतला. आता उत्तरेतील अंतिम ठिकाण निश्चित झाले होते. थोड्याच वेळात येवल्यातून बाहेर पडलो. रस्त्याने आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळी भेटली. त्यांच्याशी भेट झाल्यावर मनमाड आले. मनमाडमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिष्य आहे. ते ठिकाण रेल्वेचे मोठे जंक्शन असल्याने प्रसिद्ध आहे. पाचच्या सुमारास मनमाड पार झाल्यानंतर अंधार पडू लागला. आज मालेगावपर्यत जाण्याचा विचार होता. रस्ता एकेरी होता मात्र चांगला होता. त्याचबरोबर हवेतील गारव्यामुळे सायकल चालवायचा उत्साह वाढला होता. अंधार असल्याने आपण विना अपघात मालेगावपर्यत पोहचू की नाही याची खात्री नव्हती. अशातच साडेसात वाजता मालेगावला पोहचलो.  

        सचिन चव्हाण या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणाऱ्या मित्राने मालेगावच्या सरकारी आरामगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली होती. तिथे पोहचल्यावर बसस्टँडवर जाऊन जेवण केले. रास्त दरात आणि चांगल्या दर्जाचे मासे तिथे खाण्यास मिळाले. आज दिवस भराच्या प्रवासाने समाधान झाले होते. रात्री लवकर झोपून पहाटेच निघण्याचा मनोदय रचला होता. विश्रामगृहाजवळ येताच अचानक सायकलच्या मागील चाकातील हवा झपाट्याने कमी होऊ लागली. सायकल पंक्चर झाली होती. रात्रीचे दहा वाजल्याने पंक्चर काढणारी सर्व दुकाने बंद झालेली होती. पहाटे लवकर निघण्याच्या मनोदयावर पाणी फेरले गेले. विश्रामगृहामध्ये जाऊन पुन्हा एकदा सायकलमध्ये हवा भरून पाहूयात असा विचार केला. सोबत एक छोटा पंप होता. प्रवासामध्ये नेण्यास सोपा म्हणून तो अनेक वर्षापूर्वी घेतला होता. मात्र त्याचा वापर कधीही केला नव्हता. हवा भरण्याचा प्रयत्न केला तर त्या पंपाने हवाच भरता येईना. स्वत:च्या अज्ञानाचा खूपच राग आला. आपण तो एकदाही का हाताळला नाही याचे शल्य जाणवू लागले. आता सकाळी दहाशिवाय निघणे शक्य होणार नाही, हे निश्चित झाले.  

        पहाटे पाचला उठून सर्व आवरून पुन्हा एकदा हवा भरता येते की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला. यूट्यूबर व्हिडीओ पाहून त्यातून हवा कशी भरायची हे शिकलो. सोबत एक अतिरिक्त ट्यूब होती. मात्र यापूर्वी कधीही ट्यूब स्वत: बदललेली नसल्याने ती बदलणे किती अवघड असते हे जाणवू लागले. एखादा व्यक्ती त्या कामात सराईत असेल तर तो ते काम अत्यंत लिलया पार पाडतो मात्र एखादे सोपे वाटणारे कामही प्रत्यक्षात कधीही केलेले नसेल तर ते करताना प्रचंड यातना होतात. ती ट्यूब काढून नवीन टाकताना अक्षरक्ष: घाम फुटला. एक काढून दुसरी ट्यूब टाकण्यात जवळपास तासभर गेला. त्यावेळी लक्षात आले आपण एखादी गोष्ट सहज करू शकतो असे जरी वाटत असले तरी ती प्रत्यक्षात करूनच पाहीली पाहिजे. अन्यथा ऐनवेळी फजिती होते.  

दिवस दुसरा १९ नोव्हेंबर २०२३ मालेगाव ते सेंधवा (१५४ किमी)  

        साधारणत: सहाच्या सुमारास मालेगावमधून बाहेर पडलो. मुंबई-आग्रा महामार्ग सुरू झाल्याने रस्त्याचा दर्जा उत्तम होता. सकाळच्या वातावरणात प्रवास आल्हादायक वाटत होता. नऊच्या सुमारास धुळ्याजवळ नाष्टा केला. साधारणत: अकराच्या सुमारास धुळे शहरात पोहचलो. सकाळी बसवलेली ट्यूबला अनेक पंक्चर होत्या. त्यामुळे एक नवीन अतिरिक्त ट्युब घ्यावा आणि सायकलची चेन स्वच्छ करून घ्यावी असा विचार करत चाललो होतो. तोच स्कूटरवर जाणारा एक व्यक्ती माझ्याजवळ येऊन थांबला. सायकलवरील बोर्ड पाहून तो विचारपूस करू लागला. त्याला धुळ्यातील सायकल दुकानाबाबत विचारले. त्याने मला दुकानाचा पत्ता न सांगता त्याच्या मागे येण्यास सांगितले. तो व्यक्ती मला त्याच्या घरी घेऊन गेला. विक्रम राठोड हे धुळ्यातील एक सायकलिस्ट आहेत. त्यांच्या मुलाने मला घरी नेले. तिथेच धुळ्यातील सायकल दुकानाचे मालक बडगुजर सायकलवाले आले होते. त्यांनी सोबत सायकलची एक ट्यूब आणि मेकॅनिक आणला होता. त्यांनी सायकलची दुरूस्ती करून दिली. त्याचे कोणतेही पैसे घ्यायला त्यांनी नकार दिला. सोबत प्रवासात खाण्यासाठी सुक्यामेव्याची मिठाईपण दिली. त्यांच्या कृतीने माझा ह्रदय भरून आले. भारतात सायकल चालविणाऱ्यांची एक नवी जात तयार झाली आहे हे प्रकर्षाने जाणवले. ही जात एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर असते, हेही अनेकदा अनुभवले.  

विक्रम राठोड आणि धुळ्यातील इतर सायकलिस्ट ज्यांनी सायकल दुरूस्त करण्यासाठी मदत केली.  

        राठोड कुटुंबियांच्या पाहुणचाराने आणि मदतीने कृतकृत होत पुढील प्रवासाला सुरुवात केली. दुपारचे बारा वाजले होते. उन्हाची तीव्रता वाढू लागली. दुपारी थोडा आराम करून पुढील प्रवास करावा असा विचार करून धुळ्यात राहणारा भाऊ लहुच्या घरी गेलो. तो नगरला असल्याने शेजाऱ्यांकडून चावी घेऊन तिथे थोडा वेळ आराम केला. गादीवर पडल्यापडल्या अत्यंत सुखद भावना शरीरामध्ये निर्माण झाली. सायकल चालविल्यामुळे गादीवरील काही क्षणांची झोपही स्वर्ग सुख देणारी वाटू लागली. सुख किंवा आराम ही बाब तुलनात्मक असते हे त्यावेळी जाणवले. काही वेळेनंतर शेजारी राहणाऱ्यांनी जेवनासाठी ताठ आणून दिले. पोटात भूख नाही असे वाटत होते. त्यांना तसे म्हटलोही. मात्र घरचे जेवण मिळत आहे तर कशाला नाकारायचे असा विचार करून ते खाण्याचे ठरविले. नंतर लक्षात आले की आपण अजूनही बरेच खाऊ शकलो असतो. साधारणत: दोन वाजता पुढील प्रवासाला सुरुवात केली. धुळ्याच्या बाहेर पडल्यानंतर शिरपूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. धुळ्यापासून बिजासन माता मंदीर साधारणत: ८५ किलोमीटर दूर होते. तिथे रात्रीचा मुक्काम करूयात असा विचार करून पुढील प्रवासाला सुरुवात केली.  

        धुळ्याच्या बाहेर पडत असताना एका रिक्षावाल्याने थांबवून विचारले की चहा घेणार का? त्याच्या त्या शब्दांनी मला प्रचंड उत्साह आला. त्याला नम्रपणे नकार देऊन पुढे गेलो. महाराष्ट्रापासून दूर जात असल्याचे जाणवत होते. सभोवतालचे पिके, जमिनीचे स्वरूप बदलत होते. भाषेची शैली, पेहराव यांमध्ये बदल जाणवू लागले होते. तापी नदीचे विशाल पात्र शिरपूरजवळ पाहिले. हिंदीचा प्रभाव वाढला होता. नव्या परिसरात आल्याचे जाणवू लागले होते.  

तापी नदीवरील पुलावर  


सायंकाळी एका ठिकाणी चहा पिण्यासाठी धाब्यावर थांबलो. तिथे चहा घेतल्यानंतर तेथील मालकाने चहाचे पैसे घेण्यास नकार दिला.  

या अनोळखी व्यक्तींना मला चहापाणी आणि आशिर्वाद दिले  

        मी एखाद्या तीर्थयात्रेला जात आहे अशी त्यांची वागणूक होती. त्यामुळे मनाला बरे वाटत होते. आता अंधार पडू लागला होता. मुक्कामाचे ठिकाण शोधायला हवे या भावनेने पुढील प्रवास चालला होता. कोणीतरी सांगितले की महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर बिजासन देवीचे मंदिर आहे. तिथे राहण्याची सोय होऊ शकते. त्या ठिकाणी जाईपर्यत आठ वाजले होते. मंदिरात राहण्याची सोय होती. विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की हॉलमध्ये झोपू शकता. ते मला गादी आणि चादर देणार होते. मात्र सायकल बाहेर लावण्यास सांगितले. राहण्याची मोफत सोय होईल परंतु सायकल सुरक्षित राहील की नाही याची खात्री वाटेना. तिथे बरीच गर्दी होती. त्यामुळे तिथे मुक्काम न करण्याचा निर्णय घेतला. तेथून बाहेर आल्यानंतर लगेचच घाट सुरू होत होता. वाटले घाट संपल्यानंतर एखादा लॉज मिळेल. परंतु जवळपास पंधरा किलोमीटर घाटच होता. रात्रीचे नऊ वाजून गेले होते. घाटाच्या चढाईने शरीरातील त्राण गेले होते. कधी एखादे ठिकाण मिळते असे झाले. काही वेळानंतर घाटाचा ऊतार सुरू झाला. त्यामुळे सायकलचा वेग वाढला. अशातच एका ठिकाणी राहण्यासाठी लॉज मिळाला. तेथे ८०० रूपये भरून खोली भाड्याने घेतली. दिवसभर भरपूर खाल्ल्याने रात्री भूक नव्हती आणि खाण्याची ईच्छा पण नव्हती. थकव्यामुळे कधी झोप लागली ते कळले देखील नाही. प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी ३५० किलोमीटरचा पल्ला पार पडला होता. शेवटचे वीस किलोमीटर मध्ये तर इच्छेच्या विरोधात सायकल चालवावी लागली होती. मात्र एवढा पल्ला गाठल्याने मनोमन समाधानी होतो.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

तिसरा दिवस- २० नोव्हेंबर २०२३- सेंधवा ते बडनावर ( १८६ किमी)  

        सेंधव्यातून सकाळी पाच वाजता निघालो. आता उत्तर भारत जाणवू लागला होता. लोकसंख्या विरळ होती. रस्त्याने फारशी रहदारी नव्हती. सकाळच्या थंड हवेत सायकल चालविण्याचा उत्साह चांगलाच वाढला होता. महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ मिळणे आता बंद झाले होते. बडवानीजवळ एका राजस्थानी धाब्यावर आलू का पराठा आणि दूध घेतले. महामार्ग चांगला होता. बाराच्या सुमारास नर्मदा नदीचे विशाल पात्र नजरेस पडले. रस्त्यावर जवळपास एक किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा नदीवर पूल होता. नदीवर अनेक भाविक थांबून तिचे दर्शन घेत होते आणि त्यानंतर त्यांच्याकडील वस्तू ( कचरा) तिच्यात टाकत होते.  

नर्मदा नदीकाठी

    नदीमध्ये घाण टाकू नये एवढा साधा विवेक त्या भक्तांना नव्हता. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, त्यासाठी नदीपात्रांमध्ये कचरा टाकू नये याची जाणीव सर्वांना करून देणे गरजेचे आहे. नर्मदा नदीची भव्यता आणि तिच्यातील पाणी पाहून फार बरे वाटत होते. काही अंतरानंतर इंदोरकडे जाणारा आणि रतलामकडे जाणारे रस्ते वेगवेगळे होत होते. इंदोरकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होता. मात्र रतलामकडे जाणारा रस्ता राज्य महामार्ग होता. तो अंतर्गत भागातून जात होता. तो रस्ता सिमेंटचा होता. दुपारचे बारा वाजले होते. फारशी भूक नव्हती. पुढे रस्त्याने काहीतरी खाऊ असा विचार केला. हा रस्ता जंगलातून जात होता. रस्त्याने खाद्यपदार्थांचे दुकाने आढळली नाहीत. पुढे काहीतरी भेटेल असा विचार करत करत तारापूर घाटातून जात धमनोद गावात पोहचलो.  


रतलामकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका नदीचे पात्र  

    वेफर्स, कुरकुरे सोडून रस्ताने इतर कोणतेही खाद्यपदार्थ नव्हते. पुढे काहीतरी मिळेल अशा आशेवर चालत राहिलो. काही स्थानिकांना विचारले एखादे हॉटेल आहे का जेवनासाठी पुढे? त्यांनी सांगितले की दहा किलोमीटरवर धाबे मिळतील. दुपारी उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवू लागला होता. भूकही लागली होती. आता सायकलवर डोंगराळ भागातून अजून दहा किलोमीटर भरउन्हात जाणे अशक्यप्राय वाटत होते. कदाचित आपल्याला उष्माघात होईल की काय अशी भीती मनात निर्माण होऊ लागली.  

    त्यामुळे एका दुकानात थांबण्याचे ठरविले. तिथे पुन्हा तेच वेफर्स, कुरकुरे हेच पदार्थ खायला होते. तिथे काही शाळकरी मुले जमली होती. ते दुकानही एक सातवीमध्ये शिकणारा मुलगा चालवित होता. त्यांना विचारले की इथे थोडा वेळ आराम करू का? त्या बालदुकानदाराने परवानगी दिली. ते दुकान आणि घर एकच होते. मातीचे घर आणि पाल्यापाचोळ्याने शाकारलेले ते दुकान-घर एका झाडाखाली असल्याने तिथे गारवा होता. तसेच तिथे एक बाजही होती. त्यावर थोडावेळ आराम केला. तिथे जमलेल्या मुलांशी गप्पा मारल्या असता कळले की ते सर्वजण आदिवासी आहेत. जवळच एका आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत ते शिकत होती. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने ते घरी आले होते. त्यांच्या घरचे शेतात कामाला गेली होती. त्या सर्व मुलांना दुकानातील वेफर्स आणि इतर पदार्थ घेऊन दिल्याने ते माझ्याशी बोलू लागले होते. त्यानंतर तिथे बादलीमध्ये पाणी दिसले. थकवा घालविण्यासाठी आंघोळ करणे आवश्यक वाटल्याने त्या बालदुकानदाराची परवानगी घेऊन तिथेच आंघोळ केली. थकवा गायब झाला परंतु भुकेने तोंड वर काढले. प्रचंड भूक लागली. त्या बालदुकानदार आणि त्याच्या बहिणीला विचारले खायला देता का काही तर त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे खायला काही मिळत नाही. त्यांना म्हणाले काही तरी बनवून द्या तर त्यांनी नकार दिला. आता मात्र परिस्थिती अवघड झाली होती. भूकही प्रचंड लागलेली आणि पुढील प्रवास उन्हात करणे अवघड असल्याने थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर त्या मुलांना काही खायला देता का विचारले? तर बहुदा त्यांना ते कळाले नसावे. त्यानंतर माझ्याकडील चटणी काढली आणि त्यासोबत खाण्यासाठी चपाती मिळेल का असे विचारल्यानंतर त्यांनी मला दोन चपात्या आणि पालक भाजी दिली. ते जेवण मला त्यावेळी जगातील सर्वात चविष्ट जेवण लागले. एवढी चवदार खाणे मी पहिल्यांदाच खात आहे, असे वाटू लागले. त्या अन्नाने अक्षरक्ष: मला तृप्त केले. त्यामुळे त्या अन्नाचा फोटो मी व्हॉटस् अपवर टाकल्यावर त्याला Today’s Manna असे नाव दिले. काहींना वाटले मन्ना म्हणजे काहीतरी खाण्याचा पदार्थ असेल. इंग्रजीतील मन्ना या शब्दांचा मूळ अर्थ असा आहे की जेव्हा ज्यू लोक वाळवंटात चाळीस दिवस प्रवासाला जात होते तेव्हा त्यांना देव अन्न पुरवत असे त्याला मन्ना म्हणतात. मलाही त्या दोन आदिवासी मुलांनी दिलेले अन्न मन्नासमानच वाटले. खरोखरच देवाने आपल्यासाठीच ते पाठविले की काय असा विश्वास वाटू लागला. ते काही का असेना पण त्या अन्नाचे सेवन केल्याने खूपच बरे वाटले. शरिरात नवी उर्जा निर्माण झाली. सकाळचा सर्व थकवा निघून गेला. नव्या जोमाने दुपारी तीन वाजता सायकलिंगला सुरुवात केली.  

 

हाच तो मन्ना  



*हिच ती मुले ज्यांनी त्या दिवशी माझी उपासमार टाळली* 

    काही अंतर गेल्यानंतर सायकलवरील बॅग सावरण्यासाठी जेव्हा थांबलो तेव्हा जवळचा एक मुलगा माझ्याकडे पळत पळत आला आणि मला दोन सिताफळ देऊन पुन्हा जंगलात पळून गेला. पुन्हा वाटले अरे पुन्हा एकदा देवाने आपल्याला मन्ना पाठविला की काय. अशा येणाऱ्या सुखद अनुभवांनी आणि सभोवतालच्या निसर्ग सौदर्याचा मनमुराद आनंद घेत चाललो होतो. तो घाटाचा प्रदेश संपल्यावर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. पेट्रोलपंपावरील एका व्यक्तीला पैसे ऑनलाईन देऊन त्याच्याकडून रोख पैसे घेतले. त्यानंतर धार या शहरात साडे सहाच्या सुमारास पोहचलो. तिथे एका अंड्याच्या गाडीवर उकडलेली अंडी आणि भुर्जी खाल्ली. त्यानंतर अजून वीसेक किलोमीटर जाण्याचा विचार होता. पुढील गावात मुक्काम करूयात असे ठरविले. त्यानंतर पुढील प्रवास सुरू केला. हा रस्ता जिल्हा मार्ग असल्याने त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे त्या रस्त्यावर बऱ्याचदा मी एकटाच होतो. 

    साधारणत: पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर नालदा या गावात पोहचलो. तिथे राष्ट्रीय महामार्ग सुरू होत होता. तिथे चहापाणासाठी थांबलो. तिथेच कटींगचे दुकान असल्याने कटींग करून घ्यावी असा विचार केला. शेजारी जाणार तोच चहावाला म्हणाला वरच त्याचे कटींगचे दुकान आहे. कटींग करत असताना त्याच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. त्याचे नाव नारायण होते. त्याचा मित्र त्यावेळी तिथे आला होता. त्याने त्याच्या मुलाला गाडी घेऊन दिली होती. ती खराब निघाल्यान ती तो परत देऊन आला होता. त्यात त्याला बराच तोटा झाला होता. ही गोष्ट तो त्या नारायणला सांगत होता. तो त्याला म्हणाला तू मुलाचे फारच लाड करतोस. त्याने मागितलेली प्रत्येक गोष्ट त्याला सहजासहजी द्यायची नसते. त्याला कालच त्याच्या मुलीने वेफर्स मागितले होते परंतु त्याने ते तिला दिले नाही. त्याऐवजी तिला मिठाई दिली होती. तो ती गोष्ट तिला देऊ शकत नाही असे नाही मात्र मुलांनी मागितलेल्या गोष्टी त्यांना सहजासहजी दिल्या तर त्यांना कष्टाचे आणि पैशाचे मूल्य राहत नाही. त्यांना जीवनात संघर्ष करण्याची सवय राहत नाही. लहाणपणी मनासारख्या गोष्टी भेटल्या तर भविष्यात मात्र सर्वच तसे होईल याची खात्री नसते. त्यामुळे त्यांना नकार पचवायची सवय लावायला पाहिजे असे, तो त्या मित्राला सांगत होता. त्याचा मित्र फारसा शिकलेला नव्हता. मात्र नारायण हा उच्चशिक्षित होता. त्याने अहिल्याबाई होळकर विद्यापीठातून समाजशास्त्रामध्ये एमए केले होते. त्याच्या बोलण्यातून तो एक समजदार व्यक्ती वाटत होता. त्याला शिक्षणामुळे नोकरी जरी मिळाली नसली तरी जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन विकसित झाला होता. तो जे काम करत होता त्याच्यात त्याला शिक्षणाचा फायदा होत होता. शिक्षण घेऊन जरी नोकरी मिळाली नाही तरी व्यक्तिमत्त्व विकास निश्चितच होतो आणि त्याचा फायदा दैनंदिन जीवन जगताना निश्चितच होतो, हे त्याच्याकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवले. शिकून नोकऱ्या कुठे मिळतात असा उपहासात्मक विचार अनेकजण बोलून दाखवितात. त्यांना शिक्षणामुळे मिळणाऱ्या जीवनविषयक दृष्चीकोनाची जाणीव नसते.   

    नारायणशी गप्पा मारल्यानंतर पुन्हा उत्साह संचारला. मीही शिक्षण क्षेत्रात असल्याने आजूबाजूचे सर्वच जण शिकून काय फायदा? असा प्रश्न सातत्याने विचारत असतात. शिकून नोकऱ्या कुठे आहेत? असे प्रश्न त्यांना पडत असतात. शिक्षण आणि नोकरीचा प्रत्यक्ष संबंध जोडल्याने शिक्षणाचे फलनिष्पती काहीच दिसत नाही. विशेषत: सामाजिक शास्त्रांमध्ये तर हे प्रकर्षाने जाणवते. मात्र शिक्षण घेणारे, देणारे, त्याच्याशी संबंधित घटकांना ही जाणीव नसते की शिक्षणामुळे व्यक्ती शहाणा होण्याची प्रक्रिया गतिमान होत असते. व्यक्ती साधकबाधक विचार करू शकतो. त्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बनण्यास मदत होते. तो विवेकी बनू शकतो आणि त्याचा एकंदरित फायदा समाजाच्या स्वास्थ्यासाठी होत असतो. शिक्षणाकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून पाहिले की व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया खुंटते. मग एखादा उच्चशिक्षित व्यक्तीला महागड्या कारमधून पाण्याची बाटली किंवा कचरा काच खाली करून रस्त्यावर टाकून देण्याचे काहीही वावगे वाटत नाही. कारण त्याला तांत्रिक शिक्षण देऊन केवळ जीवनात पैसेच मिळविले पाहिजे असे शिकविले जाते. समृद्ध जगण्यासाठी विचार करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आदि गोष्टी त्याला सांगितल्या जात नाहीत. नारायण मात्र शिक्षणाने नोकरी जरी दिली नसली तरी जगण्याचा एक दृष्टीकोन दिला. त्यामुळे तो विचार करू लागला होता. योग्य-अयोग्य काय आहे हे त्याला कळत होते. त्याच्याशी बोलून बरे वाटले आणि  नकळत शरिरात उत्साह संचारला. सायकल अधिक वेगाने पळू लागली.  

    नालदा गेल्यानंतर बराच वेळ कोणतेही गाव लागले नाही. रस्त्याने लॉजही दिसत नव्हते. त्यामुळे राहायचे कुठे असा प्रश्न पडला. गडद अंधार पडला होता. राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहतूक रस्त्याने होती. मात्र अचानक असे वाटू लागले की एखाद्या गाडीवाल्याला आपण दिसलो नाही तर काय करायचे? तो अचानक अंगावर आला तर काय? नेमका त्याच दिवशी माझा वाढदिवस होता. मनात विचार आला की आजच आपला जन्मदिन आणि मृत्यूदिन होतो की काय? असे अनेक विचार चालू असताना अचानक एके ठिकाणी शासकीय विश्रामगृह बडनावर असा फलक दिसला. सायकल वळवून तिकडे गेलो. सहज वाटले विचारून बघायला काय हरकत आहे. राहण्यास दिले तर दिले नाही तर  नकार देतील. विश्रामगृहात गेल्यानंतर तिथे पंकज जयस्वाल हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भेटले. त्यांनी कुठून आलास, कुठे चाललास अशी चौकशी केली. एकटाच आहे म्हटल्यानंतर त्यांना विशेष वाटले. त्यांनी तेथील कर्मचाऱ्याला मला तिथे राहू देण्यास सांगितले. तसेच जेवनाची व्यवस्था करायची का अशी आस्थेने चौकशी केली. मला भूक नसल्याचे सांगितले. त्यांनी तिथे राहण्यास परवानगी दिली. मला काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचे तेथील कर्मचाऱ्याला सांगितले.  

पंकज जयस्वाल यांच्यासोबत बडनावर विश्रामगृहामध्ये 

    मागील वर्षी केरळमध्येही अचानक पाऊस सुरू झाल्याने एका सरकारी विश्रामगृहाजवळ थांबलो होते. तिथे स्टुंडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची बैठक चालू होती. त्यांनी तिथे राहण्याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की मला ऑनलाईन बुकींग करावे लागेल. मी त्या वेबसाईटवर जाऊन नाव नोंदविले. आणि काही क्षणांतच मला राहण्याची परवानगी मिळाली. मला ना कोणाची शिफारस लागली ना शासकीय कर्मचारी असल्याचे सांगावे लागले. कोणताही भारतीय नागरिक त्या विश्रामगृहांत जागा शिल्लक असेल तर राहू शकत होता. महाराष्ट्रातील विश्रामगृहांत केवळ शासकीय कर्मचारी राहू शकतात किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांच्या शिफारशींवर त्यांचे मित्र, जसे मी मालेगावला राहू शकलो. मध्यप्रदेशातही भाजपच्या कार्यकर्त्यांने सांगितल्यावर मला तिथे राहण्याची परवानगी मिळाली. 

    केरळ मधील कारभार लोकाभिमुख असल्याने तेथील सार्वजनिक संस्थांचा वापर सर्वसामान्य करू शकतात आणि त्यासाठी त्यांनी नियमावर आधारित यंत्रणा उभी केलेली आहे. याउलट महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात मात्र सार्वजनिक संस्थांचा फायदा केवळ राज्यसंस्थेचा भाग असलेल्या  आणि तिच्या जवळ असणाऱ्या व्यक्तींनाच होतो. सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा काहीही फायदा होत नाही. आणि या संस्थांतील कारभारही व्यक्तीच्या इच्छेवर आधारित असतो. तिथे नियमांना दुय्यम स्थान असते. राजकीय संस्कृती विकसित असेल आणि नागरी समाज जागृत असेल तर राज्य हे नागरिकांना सन्मानाने वागविते. हे केरळमध्ये जाणवले तर मध्यप्रदेश असो किंवा महाराष्ट्र इथे सार्वजनिक संस्था प्रजा आणि राजा या तत्त्वावरच वागतात. सर्वसामान्यांना कोणतेही स्थान नसते. सत्ता असणाऱ्या व्यक्तींना मनमानीपणे वागता येते. त्यांच्यावर कोणत्याही नियमांचे वा संकेतांचे बंधन नसते. त्यामुळेच कदाचित अशा समाजातून सर्वानाच राजकारणात किंवा प्रशासनात जाण्याची तीव्र इच्छा असते. संरजामीवृत्तीमुळे आपण कोणापेक्षा तरी वरचढ आहोत ही भावना त्यांना सुखावणारी असते. याउलट लोकशाहीकरण झालेल्या समाजात सर्वसामान्य नागरिक आणि अधिकारसंपन्न व्यक्ती यांमध्ये फार अंतर आहे असे मानले जात नाही. या दोन्ही प्रवृत्ती केरळ आणि मध्यप्रदेशातील विश्रामगृह मिळण्याच्या पद्धतीवरून लक्षात येतात. मध्यप्रदेशातील नियमावर आधारित नसलेल्या व्यवस्थेचा मी जरी प्रत्यक्षात लाभार्थी असलो (तेही केवळ सायकलने श्रीनगरला जात असल्याने) तरी ही यंत्रणा नागरिकाभिमुख नाही हे जाणवले. आपल्या समाजात विशेषाधिकार सोडण्यास फारसे कोणी तयार नसते.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

चौथा दिवस- २१ नोव्हेंबर २०२३-  बडनावर ते निमच ( १८७ किमी)  

    बडनावर विश्रामगृह पहाटे पाचलाच सोडले. रस्त्याने अंधार होता मात्र वाहने फारसे नव्हते. आठ वाजेपर्यत रतलाम या ठिकाणी पोहचलो. तिथे एका ठिकाणी नाष्टा केला. मध्यप्रदेशात प्रवेश केल्यापासून सातत्याने खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्ये अनेक बालकामगार काम करताना दिसत होते. चहा देणे, भांडे घासणे अशा प्रकारची कामे ही बारा तेरा वर्षांची मुले करताना दिसत होती. शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण सक्तीचे केले असून आणि बालकामगार विरोधी कायदा अस्तित्त्वात असूनही बालमजुरी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तित्त्वात होती.  

    सकाळी जयस्वाल यांना मदत केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी फोन केला असता त्यांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.  त्यावेळी लक्षात आले आपण जर एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर समोरचा व्यक्तीही त्याची कदर करतो आणि त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांना नम्र नकार देऊन मी खाईल काही तरी असे त्यांना सांगितले. मध्यप्रदेशच्या या भागात शेती हा मुख्य व्यवसाय असल्याचे दिसत होते. शेतीशी निगडीत अर्थव्यवस्था या भागात होती. उद्योगधंद्याचा फारसा विकास या भागात झालेला नव्हता. मंदसौर हे ठिकाण शेतकऱ्यांवरील गोळीबारानंतर चर्चेत आले होते. त्या भागातून आज जात होतो. दुपारी एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो. तिथे दुधामध्ये शिजवलेली शेवभाजी त्यांनी खायला दिली. भाजी चविष्ट होती. त्यासोबत मक्याच्या रोट्याही त्यांनी दिल्या. वेगळ्या पद्धतीचे जेवण तिथे खायला मिळाले. जेवण झाल्यावर तिथेच बाजावर आराम केला. ऊन कमी झाल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला.  

    मल्हारगढ सोडल्यानंतर रस्त्याच्या दोन्हीं बाजूंनी देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची घरे दिसू लागली. या प्रकारची वस्ती निमचपर्यत होती. महाराष्ट्रात जशी कोल्हाटी ही जमात आहे तशीच मध्यप्रदेशात बाछडा ही जमात आहे. देहविक्रय करणे हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. या समाजातील पुरूष महिलांसाठी ग्राहक शोधून आणतात. त्यांच्या घरातच  हा व्यवसाय चालतो. त्याठिकाणी बऱ्याचसे ट्रक थांबलेले होते. या महिलांच्या पुनर्वसनासाठी अनेक सेवाभावी संस्था काम करत असल्या तरी त्यात फारशा काही फरक पडलेला दिसला नाही. या गावातील एक दुकानदार म्हणाला की ही व्यवस्था समाजाच्या स्वास्थ्यासाठी चांगली आहे. पठाणकोटमध्ये एक ट्रक ड्रायव्हर भेटला होता. त्याला मी आलेला मार्ग सांगितल्यावर त्याने निमच येथे देहविक्रय चालतो असे सांगितले होते. हा परिसर अनेकांना माहित असल्याचे दिसत होते.   

    निमच हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथेही विश्रामगृह असण्याची शक्यता होती. स्थानिकांना विचारल्यावर त्यांनी पत्ता सांगितला. तिथे गेल्यावर त्यांनी मला थांबू देण्यास नकार दिला. त्यांच्या साहेबांशी बोलावे लागेल असे सांगितले. प्रयत्न करायला काय जाते असा विचार करून त्यांच्या साहेबांशी बोललो. त्यांना सांगितले की मी महाराष्ट्रात शासकीय कर्मचारी असून सायकलवर एकटा श्रीनगरला जात आहे. त्यांनी मला आयकार्डचा फोटो पाठवायला सांगितले. त्यानंतर परवानगी मिळाली. प्रयत्न केलेच नाही तर काहीच होणार नाही याची १०० टक्के खात्री असते मात्र प्रयत्न केले तर काहीतरी घडू शकते हे पुन्हा एकदा जाणवले. त्यामुळे पेहेल करना जरूरी है, याचा अनुभव आला. निमच येथील विश्रामगृहात जागा मिळाल्यानंतर आवरून जेवणासाठी बाहेर पडलो. तेथील वाहनचालक म्हणाला की मी चारचाकी गाडी घेतो, माझ्यासोबत चला. त्याला नकार देऊन  सायकलनेच शहरात फेरफटका मारला. स्थानिकांना जेवणासाठी चांगले हॉटेल कोणते ते विचारले असता त्यांनी एका रेस्टॉरंटचे नाव सांगितले. तिथे पनीर आणि रोट्या खाऊन खूप पश्चाताप झाला. वारंवार चुका होऊनही अशाच ठिकाणी आपण का जेवतो याचे उत्तर काही मिळेना. रात्री निवांत झोपलो.  

पाचवा दिवस- २२ नोव्हेंबर २०२३-  निमच ते बिजेनगर  ( १८९ किमी)  

    आज प्रवासात तिसऱ्य़ा राज्यात म्हणजेच राजस्थानमध्ये प्रवेश होणार होता. निंबाहेडा येथून राजस्थान राज्याची सीमा चालू होते. राजस्थान सुरू झाल्यावर जमिनीतील फरक जाणवू लागला होता. सगळीकडे वाळवंटात आढळणारी रेत दिसत होती. पिवळसर रंगाच्या या मातीमुळे हा परिसर वेगळाच दिसत होता. या ठिकाणापासून चितोडगड जवळच होते. या ठिकाणी सिमेंटचे आणि झिंकचे कारखाने असल्याने अवतीभोवतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालेले होते. या ठिकाणी खाणकाम मोठ्या प्रमाणात चालले होते. त्यातून धुळीचा एक मोठा थर वातावरणात पसरलेला दिसत होता. श्वास घेण्यासाठी त्रासदायक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्याने खाणीमधील खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सगळीकडे धूळच धूळच पसरलेली होती. तो परिसर अत्यंत प्रदूषित होता.  

    चितोडगडला प्राध्यापक महावर राहतात. त्यांची आणि माझी ओळख सुरत मधील एका कोर्समध्ये झाली होती. त्यांनी नाष्टा करण्यासाठी त्यांच्या घरी बोलविले होते. त्यांच्याकडे नाष्टा झाल्यानंतर निघणार तोच त्यांनी जेवणही करून जा असे सांगितले. मी तर घरचा आहे म्हणून पोटभर नाष्टा केला होता. जेवणाचा नकार दिला तरी त्या ऐकेनात त्यामुळे जेवणाचे ठरविले. आश्चर्य म्हणजे पुन्हा पोटभर जेवलो. उंटासारखे पोटात भरून घेऊ म्हणजे पुढे भूक लागणार या भावनेने गरज नसताना जेवण केले. त्यांनी वेगळ्याच भाज्या केल्या होत्या. आवळा, हळद यांची भाजी आणि चपात्या त्यांनी केल्या होत्या. प्रदेशानुसार भिन्न असे खाद्यपदार्थ खायला मिळाले. बऱ्याच दिवसांनी घरचे जेवण घेण्याचा योग आला. त्यामुळे भुकेचा विचार न करता अन्नाचा अतिरिक्त साठा पोटात भरून घेतला. त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. अकराच्या सुमारास ऊनही वाढले होते आणि थकवाही जाणवू लागला होता. त्यामुळे एका धाब्यावर आरामासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे आराम केल्यानंतर दोन वाजता पुढील प्रवासाला सुरुवात केली. लोकसंख्या विरळ होती. रस्त्याने फारशी गावे लागत नव्हती. अवतीभोवतीच्या डोंगरांवर मात्र मोठ्या प्रमाणात खोदकाम चालले होते. त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे तेथील वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण दिसत होते.  

 

प्रा. महावार यांच्या घरी चित्तोडगड येथे  

 

    दुपारी भिलवाड्याजवळ दोन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी गाडीवरून जात असताना माझ्याजवळ थांबले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्यानंतर त्यांनी सांगितले त्यांच्यातील एक जण ब्राम्हण आहे आणि दुसरा सिसोदिया आहे, तो डायरेक्ट महाराणा प्रतापांच्या वंशज आहे. मलाही त्यांनी माझी जात विचारली. मध्ययुगीन हिरोंचा वारसा सांगून त्याला आपली प्रतिष्ठा जोडण्याची महाराष्ट्रात आढळणारी प्रवृत्ती राजस्थानातही असल्याचे जाणवत होते. नारायण समाजशास्त्र शिकून विवेकी झाला होता मात्र ही दोन मुले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेऊनही विवेकी झाले नव्हते. मध्ययुगीन मानसिकतेतच ते रमलेले दिसले.  

    चारच्या सुमारास एके ठिकाणी थांबून चहा घेतला. पुढे तीस किलोमीटर कोणतेही गाव नसल्याचे चहावाल्याने सांगितले होते. एके ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबलो असता एक दुधवाला जवळ येऊन थांबला. त्याने दूध पिणार का असे विचारले? त्याला नकार दिला तरी तो पिशवीत दूध घेण्याचा आग्रह करू लागला. गीर गाईचे दूध असल्याचे त्याने सांगितले. महाराष्ट्रात गीर गाईचे दुध आणि तुप खाण्याचे फारच फॅड आहे.  चला आपणही या गाईचे दूध पिऊन पहावे असा विचार करून मी कपात दूध घेतले. तीन चार कप दूध पिलो. त्या शेतकऱ्याने काहीही संबंध नसताना दूध पिता का विचारल्याने खूपच बरे वाटले. त्यातून सायकल चालविण्याचा उत्साह वाढला होता.  अंधार पडू लागला होता. मुक्काम करायला पाहिजे असे वाटत होते मात्र पाय थांबण्यास अजिबात तयार नव्हते. त्यामुळे पुढील गाव येईपर्यत सायकल चालवित राहायचे ठरविले. थकवा काही येत नव्हता. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. शेवटी बिजेनगरला एक लॉज पाहून थांबलो. थोडी घासाघीस आणि सायकलचे कारण सांगून ६५० रूपयांत खोली मिळविली. भूक फारशी नव्हती. त्यामुळे केवळ दूध घेऊन झोपलो.  


मुक्कामाचे ठिकाण बिजेनगर  


----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

सहावा दिवस- २३नोव्हेंबर २०२३-  बिजेनगर ते पर्बतसार   ( १३५ किमी)  

    आजपर्यतच्या प्रवासात जवळपास ९०० किलोमीटरचे अंतर पार केले होते. अजमेर जवळ आले होते. एकूण प्रवासातील अर्धे अंतर पूर्ण होण्याची आज शक्यता होती. नसीराबाद हे अजमेरच्या अलीकडील एक मोठे शहर होते. त्या शहरापासून जात असताना एक मोटारसायकलवाला माझ्या जवळ येऊन थांबला. तो मला नसीराबाद येथे घेऊन गेला. तिथे त्याने चहा पाजला. तो राजस्थानी होता मात्र काही वर्षापूर्वी तो मिझोरमला काम करून आला होता. तिथे असलेली मातृप्रधान संस्कृती आणि तेथील खाणे त्याला न पचल्याने त्याने तेथील काम संपवून पुन्हा आपल्या राज्यात परत आला होता. मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ज्या प्रमाणात महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात महिला आणि तरूण मुली दुचाकी चालविताना दिसतात त्याप्रमाणात या दोन्ही राज्यांमध्ये दिसल्या नाहीत. स्त्रियांनी घराबाहेर पडण्याचे प्रमाण दोन्ही राज्यांमध्ये कमी दिसले. दक्षिण भारतात अनेक भोजनालये महिला चालविताना दिसत होत्या मात्र या दोन्ही राज्यांमध्ये मात्र एकाही ठिकाणी महिला अशा स्वरूपाची भोजनालये चालविताना दिसल्या नाहीत. या राज्यांमध्ये मध्ययुगीन संरजामी व्यवस्थेचा प्रभाव कमी न झाल्याने स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातील वावर अल्पप्रमाणात असावा. तसेच मी प्रवास केलेला बहुतांशी भाग स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानिकांच्या ताब्यातील प्रदेश होता. त्यामुळेही कदाचित या भागात आधुनिकीकरणाची प्रक्रिया उशीरा सुरू झाली असावी. शिवाय स्वातंत्र्य चळवळीचा आणि इतर सामाजित सुधारणेच्या चळवळींच्या अभावानेही या भागातील सुधारणा रखडल्या असाव्यात. या भागातील व्यक्ती भेटल्यावर पहिल्यांदा नाव विचारतात. नावातून हिंदू आहे याची खात्री झाल्यावर जात जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. तुमची जात विचारण्याआधी ते स्वत:ची जात सांगतात. त्यानंतर तुम्हाला विचारतात. अगदी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थीही हे विचारण्यास संकोच करत नाहीत. या प्रदेशातून फिरत असताना दुसरी एक बाब जाणवली की या प्रदेशांतील संस्थाने ब्रिटीशांनी तशीच ठेवली असावित कारण हा प्रदेश फारसा सुपीक नसल्याने आर्थिकदृष्ट्या त्यांना फायदेशीर नसावा. त्यामुळे या भागाला ब्रिटीशांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला नसावा. त्यापेक्षा संस्थानिकांनाच त्याचा कारभार पाहू देऊन केवळ त्यांच्याकडे आयते भाडे घेण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला असावा.  

    नसीराबाद शहरात गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध असलेली कचोरा खावी असा सल्ला काहींनी दिला. चवन्नीलाल यांचे कचोऱ्याचे दुकान जवळच होते. तिथे जाऊन पाहिले तर कचोरा अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचा होता. त्या कचोऱ्याला घ्यायला मोठी गर्दी दुकानाबाहेर होती. मी त्याच्याकडून पावशेर कचोरा घेतला. तो खाल्ल्यानंतर दुपारच्या जेवनाची गरजच राहिली नाही. राजस्थानमध्ये मिठाईचे भरपूर  दुकाने होती. त्यांमध्ये गोड पदार्थांचा भरणा भरपूर होता. कचोरी तर सगळीकडे आढळणारा पदार्थ होता. नसीराबादहून अजमेर शहर जवळच होते. अजमेर शहर वाळवंटातील भकास वातावरणात मनाला शितलता देणारे ठिकाण वाटत होते. शहरातील रस्ते मोठे आणि चांगले होते. तिथे चांगल्या शैक्षणिक संस्था असाव्यात असे वाटत होते. शहरात अनेक ऐतिहासिक वास्तूही दिसल्या. अजमेर शरीफ दर्ग्यावर जाण्याचा विचार होता मात्र तिथे फार गर्दी असल्याने तिथे जाणे टाळले. त्यानंतर पुष्करमार्गे राजस्थानच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. रुपानगड येथे पोहचल्यानंतर अंधार पडायला सुरुवात झाली. रस्ताही खराब होता. तो रस्ता जिल्हा रस्ता होता. अनेक छोट्या छोट्या गावांतून तो रस्ता जात होता.  

    त्या भागातून जात असताना बारावीमध्ये शिकणारे तीन विद्यार्थी अजमेरहून त्यांच्या घरी चालले होते. ते गाडी चालवित चालवित माझ्याशी बोलत होते. त्यांनीही मी न विचारताच त्यांची जात सांगितली. शिवाय मलाही माझी जात विचारली. राज्यातील महिलांच्या कमी संख्येमुळे अनेक युवक अविवाहित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या भागात केवळ सरकारी नोकरी असणाऱ्यांनाच लग्नासाठी मुली मिळतात. अशा मुलांना लग्नात प्रचंड हुंडा मिळतो. बाकीच्यांना मात्र बिहार, झारखंडमधून लग्नासाठी मुली आणाव्या लागतात. त्या मुली काही दिवसांनी पळून जातात. अशी माहिती त्यांनी दिली. त्यांचा आणि माझा रस्ता वेगळा झाल्यानंतर अंधार पडू लागला. गुगल मॅपने आज पुन्हा फसविले. चांगला रस्ता न दाखविता जवळचा म्हणून गावागावांतून जाणारा रस्ता दाखविला. काही वेळा हा जिल्हा रस्ता आहे की गल्लीतील रस्ता अशी अवस्था होत होती.  त्या रस्त्यांनी माझ्याखेरीज इतर कोणीही प्रवासी नव्हता. तुरळक एखादी दुचाकी जाताना दिसत असे. आपण राजस्थानमध्ये चुकलो आता काही महामार्ग दिसत नाही असेच वाटू लागले. तेवढ्यात एक छोटेसे गाव दिसले. तिथे विचारल्यावर त्यांनी सांगितले की अजून वीस किलोमीटर अंतरावर पर्बतसार नावाचे तालुक्याचे ठिकाण आहे. तिथे माझ्या राहण्याची व्यवस्था  लॉजमध्ये होऊ शकते. काही वेळानंतर चांगला जिल्हामार्ग दिसला. तेथील एका पेट्रोलपंपावर पिण्याचे पाणी भरण्यासाठी थांबलो. त्यांनी बाहेरील पाणी भरू न देता ते जे पितात त्यातून मला पाणी दिले. त्यांच्या कृतीने मला फारच बरे वाटले. सायकलवर आल्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक चांगले पाणी देण्याचा प्रयत्न मला केला. आता पर्बतसार आठ किलोमीटरच होते. त्या ठिकाणी गेल्यावर शासकीय विश्रामगृह शोधले. राजस्थानमध्ये निवडणुका होणार असल्याने तेथील सर्व खोल्या आरक्षित केलेल्या होत्या. त्यामुळे बाहेर लॉजमध्ये राहावे लागले. एका ठिकाणी आठशे रूपये देऊन खोली घेतली. त्याच हॉटेलमध्ये जेवन केले. तिथेही शेवभाजीच खाल्ली. आजचा दिवस भयंकर होता. एकतर खूपच कमी अंतर पार पडले होते. दुसरे म्हणजे आजचे रस्ते भयंकर खराब होते. आज जाणवले की देशभर फक्त राष्ट्रीय महामार्गच चांगले आहेत. जिल्हा आणि राज्यमहामार्गांची अवस्था दयनीय आहे. शेवटी पुढच्या ठिकाणापर्यत पोहचलो याचे समाधान मानून गपचिप झोपलो.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

सातवा दिवस- २४ नोव्हेंबर २०२३-  पर्बतसार ते फतेपूर    (१७८ किमी)  

    पर्बतसारचे हॉटेल सकाळी लवकरच सोडले. राजस्थानमधील थंडीची तीव्रता वाढत चालली होती. त्यामुळे गरम कपडे घेण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. रस्ताने जाताना दिडवाना हे शहर लागत होते. या शहरात थर्मल आणि कानटोपी घेतली. तिथेच एका ठिकाणी सायकलची चैन स्वच्छ करून घेतली. डिडवानातील बसस्थानकावर शाकाहारी भोजन केले. जेवण साधे होते परंतु समाधानकारक होते. भरपूर फुलके खाल्लानंतर झोप येऊ लागली. काही अंतरावर सायकल चालविल्यावर एका पेट्रोल पंपावर थोडा वेळ आराम केला. तो पेट्रोलपंप अद्याप सुरू झालेला नव्हता. मात्र तेथील बाथरूम सुरू होते. अजमेरहून काही पर्यटकांनी तेथील स्वच्छतागृहाचा वापर केला. ते गेल्यानंतर तिथे गेलो असता त्यांनी पाण्याचा वापरच केलेला नव्हता. सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यानंतर त्यामध्ये पुरेसे पाणी टाकण्याची तसदी अनेकजण घेत नाहीत. त्यामुळे अनेकदा सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहांमध्ये असह्य अशी घाण असते.  

    डिडवाना शहराच्या बाहेर स्क्रॅपची अनेक दुकाने आढळली. शहरातील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्याठिकाणी होत होता. दुपारचे दोन वाजले असावेत. एक टोलनाका आल्यानंतर चहासाठी  थांबलो. त्याच्या दुकानामागे शेतात क्रॉंक्रिटची एक मोठी रचना होती. त्याला ते काय आहे हे विचारले असता त्याने सांगितले की त्याला कुंडा म्हणतात. त्यामध्ये पावसाचे पाणी साचते. ती रचना जवळून पाहिली. एखाद्या गुठ्यांमध्ये क्रॉँक्रिटची चौकोणी रचना करून त्यामध्ये एक खोल हौद असतो. त्यात त्याठिकाणी पावसाचे पडलेले पाणी साचविले जाते. ते पाणी वर्षभर पिण्यासाठी वापरलेले जाते. या भागात भूजल खारे असल्याने आणि बाहेरून पाण्याचा पुरवठा नसल्याने स्थानिक पातळीवर अशा पद्धतीने पाणी साचविण्याची पद्धत आहे. त्याला राजस्थान सरकारचे दीड लाख रूपये अनुदानही मिळते. तो व्यक्ती सांगत होता की पूर्वी गावात एक किंवा दोन कुंडे असत त्यावर सर्व गावाची तहान भागत असे. आता जवळपास प्रत्येकजण ते बनवितो.  


राजस्थानमधील  पाणी साठविण्यासाठी बनविण्यात आलेली रचना ‘कुंडा’

 

    चहा वाल्याकडे चहा पिण्यापूर्वी आणि या कुंडाची माहिती घेण्यापूर्वी मी पाणी पिलो होतो. तेथील तांब्यात मधमाशी बसल्याने ते तांब्याभर पाणी मी फेकून दिले होते. पाणी पिल्यावर त्या पाण्याची चव खूपच वेगळी आणि छान लागली. परंतु जेव्हा कळले की ते पाणी वर्षभर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे आहे आणि आपण त्यातील अर्धा लीटर पाणी फेकून दिले, याचे खूप वाईट वाटले. आपण मोठे पातक केल्याची भावनाच तेव्हा निर्माण झाली. त्या पाण्याचे मूल्य रूपयांमध्ये काढणे केवळ अशक्य होते. किंबहुना अशा पद्धतीने निसर्गातील संसाधनांची नासाडी आपण किती सहजरित्या करतो याची जाणीव त्यावेळी प्रकर्षाने झाली.  

    रस्त्याच्या दुतर्फा वालुकामय माती होती. त्यामध्ये शेळ्यांना खाण्यासाठी लावलेली मोठी झाडे होती. त्या झाडांना येणारी फुलांची भाजी केली जाते. ती खूप महाग असते, असे एका शेतकऱ्याने सांगितले. राजस्थानमध्ये शेतात मोठ्या प्रमाणात झाडांचे जतन केले होते. महाराष्ट्रात जसा शेतकरी शेतात अजिबात झाडे वाढू देत नाहीत तसा प्रकार तिथे आढळला नाही. शेताच्या मध्ये असूनही झाडे तोडली जात नव्हती. त्यांचे जतन करण्यावरच भर होता. महाराष्ट्रात जेसीबी कंपनीच्या अर्थ मुव्हर्सनी सर्व बांध आणि त्यावरील झाडे यांना नामशेष केलेले दिसते. याउलट राजस्थानमधील नागरिकांनी झाडांचे जतन केलेले दिसले. कदाचित तेथील निसर्ग प्रतिकूल असल्याने त्यांना वृक्षांचे जतन करणे आवश्यक वाटले असावे.  

    सहाच्या सुमारास एका चहाच्या टपरीवर चहासाठी थांबलो. तो व्यक्ती पूर्वी वाहनचालक असल्याने त्याला उत्तरेतील बरेचशे रस्ते आणि ठिकाणे माहित होते. त्याला श्रीनगरचा रस्ता विचारल्यावर त्याने काही मार्ग सांगितले. त्याला विचारलेली माहिती न सांगता त्याला जे जे माहिती होते ते तो सांगत होता. त्याच्याशी बोलताना जाणवले की आपण काय विचारतो हे सांगण्यापेक्षा त्याला त्याभागाची कशी इत्यंभूत माहिती आहे हे तो दाखविण्याचा तो प्रयत्न करत होता. अशा प्रकारची माणसं अनेक ठिकाणी आढळतात. त्यांना काय विचारले आहे त्याचे उत्तर न देता त्यांना काय माहित आहे आणि त्यांनाच कशी ती माहिती आहे याचा टेंभा समोरचा कंटाळला तरी त्यांना मिरवायचा असतो. त्याच्याशी गप्पा मारल्यामुळे नाहक वेळ वाया गेला. शिवाय त्याने सांगितलेल्या रस्ता पुढे खूप खराब निघाला.   

    अंधार खूप पडला होता. दुहेरी वाहतुकीचा रस्ता होता. कुठे तरी थांबायला पाहिजे असे वाटत होते. मात्र त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची मनुष्यवस्ती किंवा हॉटेल नव्हते. त्यामुळे सायकलवर पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आठच्या सुमारास एक कार अचानक पुढे येऊन थांबली. त्यातील एकाने हात करून थांबायला सांगितले. तो भाग निर्जन होता. आमच्याशिवाय तिथे इतर कोणीही नव्हते. क्षणभर वाटले आता आपल्याला थांबून हे लुटतात की काय? त्यामुळे थांबावे की न थांबावे असा विचार केला. शेवटी म्हटले आपल्याकडे मोबाईल सोडून नेण्यासारखे दुसरे आहे तरी काय? त्यामुळे थोडा पुढे जाऊन थांबलो. त्या गाडीतून तो व्यक्ती उतरला. त्याने माझी विचारपूस करून चहापाण्याचे विचारले. मी थोड्या वेळापूर्वीच घेतला असल्याने मी त्याला नकार दिला.  तोही सायकलिस्ट होता. त्यानेही उदयपूर ते शिमला अशी सायकलिंग केली होती. थोडक्यात तो सायकलच्या जातीचा होता. त्यामुळे त्याने थांबून चौकशी केली होती.  त्याला जवळपास कुठे राहण्याची काही मिळेल का असे विचारले. त्याने फतेहपूर शहरातच राहायला मिळेल असे सांगितले. त्यानंतर आम्ही एकमेकांचे फोन नंबर घेऊन निघालो. सायकल प्रवासात मी नेहमी जर कोणी स्वत:हून आपली विचारपूस केली तर त्याचा फोन नंबर घेतो. जेणेकरून त्या परिसरात काही अडचण आली किंवा काही माहिती मिळवायची असेल तर त्यांना विचारता येते.  

    काही वेळेनंतर त्याचा फोन आला की त्याने माझी एका ढाब्यावर थांबण्याची व्यवस्था केली आहे. त्याने मला लोकेशन पाठविले. मात्र मी त्या ठिकाणापासून तीन किलोमीटर पुढे आल्याने मला पुन्हा मागे वळून त्या ठिकाणी पुन्हा जावे  असे वाटेना. त्याने देऊ केलेल्या मदतीचे आभार मानून मी त्याला पुढे जात आहे असे सांगितले आणि तिथे राहण्यास नम्र नकार दिला. तिथे न राहणे पुढे महागात पडणार हे दोन तासांनीच मला कळले. त्या ठिकाणाहून फतेहपूर साधारणत: वीस किलोमीटर दूर होते. साधारण साडेनऊच्या सुमारास फतेपूरला पोहचलो. गुगल मॅपवर विश्रामगृह टाकल्यावर त्याने मला दिशा दाखवत दाखवत शहराबाहेर नेले. तिथे पोहचल्यावर दिसले की ती जागा पडक्या वाड्यांची आणि मंदिरांची होती. तिथे माणसांचा वावर नव्हता. त्यामुळे रात्री दहा वाजता पुन्हा मागे पाच किलोमीटर यावे लागले. स्वत:च्या मूर्खपणाची चीड आली. आपण कोणाला का नाही विचारले. असे म्हणत म्हणत शेवटी पुन्ही उलट्या दिशेने प्रवास केला. राहण्याची सोय पाहू लागलो. अकरा वाजत आले होते.  

    राजस्थान विधानसभेची निवडणूक दुसऱ्या दिवशी असल्याने बरीचशी दुकाने बंद होती. पोलीस बऱ्याच ठिकाणी गाड्यांची झडती घेत होते. रस्त्याने एक धर्मशाळा दिसली. तिथे चौकशी केली असता त्यांनी खोली मिळेल असे सांगितले. मात्र त्या ठिकाणी आंघोळीची सोय बाहेर असल्याने ते ठिकाण फारसे पसंद पडले नाही. त्यांना जेवण करून येतो असे सांगितले. त्यानंतर एक भोजनालय मिळाले. तेथील बऱ्याचशा भाज्या संपल्या होत्या. तो मालक म्हणाला केवळ चपाती आणि एकच भाजी मिळेल. आजूबाजूची दुकाने बंद झालेली होती. त्यामुळे जे मिळते आहे ते गपचूप खाल्ले पाहिजे असा विचार करून त्याच्याकडील पदार्थ खाल्ले. जेवण रूचकर होते. पोट भरल्याचे समाधान मिळाले. दिवसभराच्या प्रवासाने शरिरावर धूळ जमली होती. तसेच थकवाही आला होता. त्यामुळे राहण्याचे ठिकाण लवकर शोधायला पाहिजे होते. स्थानिकांना विचारले की लॉजेस कुठे आहेत? त्यांनी सांगितले की राष्ट्रीय महामार्गावर आहेत. हा मार्ग तेथून जवळच आहे असे त्या भोजनालवाल्याने सांगितले. जवळ होता मात्र तिथे जाताना अगदी नको नको झाले होते. रस्ता खूपच खराब होता. खड्डे आणि धुळीचे साम्राज्य तिथे पसरलेले होते. त्यानंतर बाराच्या सुमारास एक लॉज मिळाला. तिथे पोहचल्यानंतर वाटू लागले की आपण काय मूर्खपणा केला. विनाकारण त्या ढाब्यावर होणारी राहण्याची सोय नाकारली. त्यानंतर धर्मशाळाही सोडली. उदयपूरच्या सायकलिस्टने न मागता  देऊ केलेली मदत नाकारल्यानेच पुढील त्रासदायक प्रवासाच्या रूपाने शिक्षा मिळाली असावी. मागेच थांबलो असतो तर वेळ, श्रम आणि पैसा तिन्हीही वाचले असते. परंतु मूर्खपणाला हद्द नसते हेच पुन्हा जाणवले.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

आठवा दिवस- २५ नोव्हेंबर २०२३-  फतेपूर ते राजगड   (१०६ किमी)  

    पहाटे पाचलाच फतेपूरमधील लॉज सोडले. त्याने रात्रीचे भाडे एक हजार रूपये घेतले होते. रात्री त्याच्या पिण्यासाठी एक पाण्याची बॉटल घेतली होती. या प्रवासात अद्याप एकही पाण्याची बॉटल विकत घेतलेली नव्हती. त्याने पहाटे निघताना च्याचे पैसे मागितले. त्याला म्हटले पिण्याचे पाणी देणे ही हॉटेल चालकाची जबाबदारी असते. मात्र तो काही ऐकेना. त्याचे पैसे देऊन तिथून निघालो. आतापर्यतच्या प्रवासात हाच केवळ एक त्रासदायक प्रसंग उद्भवला होता. त्या व्यक्तीचे वागणे अत्यंत उद्धटपणाचे वाटले. तेथून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर एका ठिकाणी पहाटे चहा घेतला. या भागात राजस्थानचा प्रभाव कमी होऊन हरियाणाचा प्रभाव वाढू लागला होता. सकाळी एके ठिकाणी नाष्ट्याला पराठा खायला मिळाला. राजस्थानमध्ये नाष्ट्याचे फारसे काही वेगळे पदार्थ मिळाले नव्हते. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात खाण्याची मात्र चंगळ होती. त्यामध्ये विविधताही होती. जिल्हा बदलला की खाण्याचे पदार्थ बदलत होते. राजस्थान आणि मध्यप्रदेशात सार्वजनिक ठिकाणी मिळाणाऱ्या खाद्यपदार्थात मात्र विविधता आढळली नाही. दक्षिण भारतात सार्वजनिक भोजनालयांतही ही खाद्यपदार्थातील विविधता सहजरित्या अनुभवता येत होती. कदाचित उत्तरेतील राज्यांमध्ये घरगुती खाण्यामध्ये ही विविधता असावी मात्र सार्वजनिक ठिकाणी ती काही फारशी आढळली नाही.  

    कालच्या चुकलेल्या निर्णयांनी आज दिवसभर थकवा जाणवत होता. त्यामुळे दुपारी अकराच्या सुमारास एका राजस्थानी धाब्यावर जेवणासाठी थांबलो. तिथे पुन्हा दुधातील शेवभाजी आणि चपात्या घेतल्या. जेवण झाल्यावर त्याच बाजेवर आराम केला. उत्तर भारतात महामार्गांवरील धाब्यांवर साधारणत: बाजा टाकलेल्या असतात.  



राजस्थानी धाब्यावर दुपारी जेवणासाठी

    त्यावरच फळी टाकून जेवण दिले जाते. जेवण झाले की त्यावरच तुम्ही झोपू शकता. ही रचना ट्रकचालकांना आराम करण्यासाठी निर्माण झाली असावी. मीही त्या रचनेचा फायदा घेऊन दोनएक तास झोप काढली. त्यानंतर दुपारी प्रवासाला सुरुवात केली. थोडे अंतर पार केल्यानंतर रस्त्याचे काम चालू झालेले दिसले. या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती तरी पण त्या ठिकाणी चारपदरी रस्ता निर्माण केला जात होता. आतापर्यतच्या प्रवासात सगळीकडे दुहेरी रस्ता असेल तर चारपदरी करणे, चारपदरी असेल तर सहापदरी करणे अशाच स्वरूपाची कामे चाललेली होती. बाकी जिल्हा आणि राज्यमार्गाची अवस्था मात्र दयनीय होती. त्यामध्ये सुधारणा केल्या जात नव्हत्या. एके ठिकाणी एकजण म्हणालाही की राज्यकर्ते केवळ मोठे मोठे महामार्गच बांधत आहेत. रस्ते बांधण्याचे मोठं मोठे करार करून त्यात राजमार्गाने पैसे मिळविण्याच शाश्वत मार्ग राज्यकर्त्यांना सापडलेला आहे. या महामार्गानी रस्तेवाहतूक वाढते त्यातून ऑटो क्षेत्राला गती मिळते मात्र यातून होणारी पर्यावरणाची नासाडी याचा विचार मात्र केला जात नाही. महाराष्ट्रात बांधलेल्या समृद्धी महामार्गाने कमी प्रमाणात वाहतूक होते. एवढ्या पैशात राज्यातील अनेक छोटे रस्त्यांची अवस्था सुधारली असते. मात्र तसे न करता एकाच मार्गावर ते खर्चिले असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तरही मिळाले. रस्त्यातून राज्यकर्त्यांना हमखास वाटा मिळतोच. त्याखेरीज चांगले रस्ते असतील अधिक मोठी चारचाकी गाडी घेण्याची लालसा ग्राहकामध्ये निर्माण होते.  

    माझा स्टेट बँक ऑफ इडियात काम करणारा निवृत्ती जरे हा मित्र आहे. त्याच्याकडे नेक्सॉन गाडी आहे. समृद्धीवरून प्रवास केल्यावर त्याला वाटू लागले की आपल्याकडे हॅरिअर किंवा त्यापेक्षा अजून मोठी गाडी असावी. नंतर त्याच्या हेही लक्षात आले की नागपूरहून आपण वर्षातून पाच सहा वेळाच येणार, त्यासाठी कशाला एवढी मोठी गाडी घ्यायची. मात्र या रस्त्याने मोठी आणि अधिक सुविधा असलेली गाडी घेतली पाहिजे, ही लालसा त्याच्या आणि त्यावर चालणाऱ्या इतर अनेकांच्या मनात निर्माण केली असावी. समृद्धी मार्ग बांधणे हे अव्यवहार्य असे जरी वाटत असले तरी भांडवलशाही तुमच्या सवयी आणि विचार करण्याच्या पद्धती कशा नकळत बदलवितात याचा जवळून आलेला हा अनुभव आहे. एखाद्या गोष्टीची गरज नसताना गरज निर्माण करून ती मिळविण्यासाठी व्यक्तींना रात्रंदिवस कष्ट करायला लावायची भांडवलशाहीची क्षमता अमर्याद आहे. भांडवलशाहीच्या सापळ्यात आपण न कळत अडकत जातो. आणि आपल्यावर लादलेल्या सवयींची पूर्तता करण्यासाठी पैसा मिळविण्यासाठी आयुष्यभर केविलवाणी धडपड करावी लागते. त्या प्रक्रियेत जीवनातील इतर आनंद घेण्याची उसंतही मिळत नाही.  

    सायंकाळी सहाच्या सुमारास एका धाब्यावर चहा पिण्यासाठी थांबलो. आज दिवसभरात शंभर किलोमीटरही अंतर पार झाले नव्हते. चहा घेऊन राजस्थानच्या बाहेर पडण्याचा विचार होता. मात्र चहाला थांबल्यावर त्या धाब्याच्या मालकाने मला म्हटले की रात्री मुक्काम करायचा असेल तर येथे करू शकतो. अजून सायकल चालविता येणे शक्य होते आणि दिवसाचे लक्ष्यही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे त्याला म्हटले विचार करून सांगतो. तो म्हणाला रस्त्याचे काम चालू आहे. रात्री पुढे नको जाऊस. त्यानंतर कालचा प्रकार आठवला. देऊ केलेली मदत नाकारल्याने खूप मनस्ताप झाला होता. आज त्याची पुनरावृत्ती नको व्हायला नको म्हणून तिथे राहण्यास त्याला होकार दिला.  

    त्या मालकाने त्याच्या वेटरला सांगून माझ्यासाठी आंघोळीला गरम पाणी करून द्यायला सांगितले. त्याच्याशी गप्पा मारल्यानंतर त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केली. तो हरियाणाचा होता. राजस्थानमध्ये त्याने धाबा टाकला होता. त्याच्याकडे दोन कामगार होते. एक हरियाणातील आणि दुसरा राजस्थानचा होता. त्याला अनेक व्यसने होती. सायंकाळ झाली की त्याला दारूशिवाय जमत नसे. दारूशिवाय तो नशिले पदार्थही घेत असे. महिन्याचे त्याला व्यसनासाठी वीस हजार रूपये लागायचे. त्याचे वय तेहतीस होते. गेल्या तीन वर्षांपासून तो व्यसनाधीनतेच्या गर्तेत अडकला होता. त्याला त्याच्यातून बाहेर पडायचे होते मात्र मार्ग सापडत नव्हता. दिवसेंदिवस तो अजून खोलात चालला होता. हरियाणा राज्यात मुलींचे प्रमाण कमी असल्याने युवकांच्या लग्नाचा भीषण सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. मला भेटलेल्या व्यक्तीलाही योग्य वेळी प्रेम करणारे कोणीही न भेटल्याने तो नशेच्या मार्गाकडे वाहवत गेला. त्याचे आयुष्य दिवसेंदिवस खोलात चालले असल्याचे त्याला जाणवत होते. तो जरी धाबा चालवत असला तरी त्याचे धंद्याकडे काहीच लक्ष नव्हते. अंधार पडला की दारू आणि ड्रग्स घेणे, हुक्का पिणे हाच त्याचा दिनक्रम झाला होता. त्याला यातून बाहेर पडायचे होते मात्र मार्ग सापडत नव्हता. त्याचे शिक्षण बारावीपर्यत झाले होते. मात्र शिक्षणाचे महत्त्व तो जाणत होता. शिक्षण असते तर अशा मार्गात अडकला नसता असे मत त्याने मांडले.  

    आतापर्यत पंजाबमध्ये नशिल्यापदार्थाचा गंभीर प्रश्न आहे हे ऐकले होते, वाचले होते. उडता पंजाब या चित्रपटातून पाहिले होते. आज मात्र प्रत्यक्षात याचा बळी ठरलेल्या व्यक्तीला भेटला होता. नशिले पदार्थ एखाद्याचे आयुष्य कसे उद्धवस्त करू शकतात याचे तो एक उदाहरण होता. त्याला आपण करतोय या गोष्टी चुकीच्या आहेत हे कळत होते मात्र तरीही त्याला त्या थांबविता येत नव्हत्या. तो अत्यंत हतबल आणि अगतित झाला होता. व्यसनाधीनतेने त्याच्या वर्तमान नासवून त्याचा भविष्यकाळ अं:धकारमय केला होता. सर्वकाही कळत असूनही व्यसनांनी त्याच्या जीवनावर ताबा मिळविला होता. त्याच्याबद्दल फारच वाईट वाटले.  

नववा दिवस- २६ नोव्हेंबर २०२३-  राजगड ते तोहाना  (१४० किमी)  

    पहाटे लवकर आवरून तो धाबा सोडला. थंडीची तीव्रता वाढत चालली होती. थर्मल घालूनसुद्धा थंडी वाजत होती.  थोडा वेळ सायकल चालविल्यानंतर एके ठिकाणी चहासाठी थांबलो. त्या धाब्यावर थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी शेकोटी पेटवलेली होती. तेथील कुक हा नैनीतालचा होता. मालक हरियाणाचा होता. तेथून पुढे गेल्यानंतर काही वेळाने हरियाणामध्ये प्रवेश झाला. राजस्थान संपले होते. त्याबरोबर सभोवलतालचा परिसरही हळूहळू बदलू लागला होता. बागायती शेती दिसू लागली होती. राजस्थानप्रमाणे दिसणाऱ्या रेतीचे प्रमाण कमी झाले होते. हिरवीगार पिके दिसू लागली होती. राजस्थानमध्ये ज्यापद्धतीने वृक्षांचे जतन केले होते त्याप्रमाणे येथे वृक्ष आढळत नव्हती. शेती कसण्यासाठी सगळीकडे सपाट भूप्रदेश होता. त्यामध्ये अपवादाने झाडे दिसत होती.   

    नऊच्या सुमारास हरियाणातील एका धाब्यावर नाष्टा करण्यासाठी थांबलो. तेथे स्वच्छ अशी स्वच्छतागृहे होती. राजस्थानच्या तुलनेत हरियाणामध्ये धाब्यांवर स्वच्छतागृह हमखास दिसत असे. शिवाय त्याचा वापरही होत होता. काल दुपारी राजस्थानमधील एका धाब्यावर स्वच्छतागृहाबाबत विचारले असता तो मालक म्हणला बाहेर उघड्यावर जाऊ शकता. येथे मात्र तशी परिस्थिती नव्हती. नाष्ट्यासाठी पुन्हा पराठाच मिळाला. दुपारी बाराच्या सुमारास बरवाला येथील एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो. हिंदी चित्रपटांनी पंजाबमधील खाणे म्हणजे सरसो का साग आणि मक्केकी रोटी असे चित्र निर्माण केले होते. त्याची विचारणा केली. मात्र ती भाजी फार काही आवडली नाही. मात्र तिच्यामध्ये पोषणमूल्य अधिक असावीत. त्या ढाब्यावाल्याने सोबत एक मोठा ग्लास लस्सीचाही दिला होता. त्यानंतर थोडा वेळ तिथे आराम केल्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला. जलसिंचनाच्या सुविधांमध्ये सुपीक झालेला परिसर सगळीकडे दिसत होता. रस्त्यांवरील वर्दळही राजस्थानच्या तुलनेत वाढली होती. आज पुन्हा गुगलने रस्ता दाखविताना चुकविले होते. हिसार शहरात न जाता बाह्यवळण रस्त्यानेच शहराबाहेर पडलो.  

सरसो का साग मिळाला पण मक्केकी रोटी नव्हती ! 

    एकाला रस्ता विचारल्यावर त्याने तोहाना मार्गे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार गेल्यानंतर जिल्हा रोड लागला. त्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. उगीचच आपण मुख्य रस्ता सोडला असे वाटू लागले. त्या रस्त्याने अनेक विटांच्या भट्ट्या होत्या. तसेच माती वाहणारे अनेक ट्रक तेथून जात होते. रस्ता खराब, त्यात हवेमध्ये धूळ आणि गाड्यांचा धुराडा यांमुळे सायकल चालविणे जिकीरीचे झाले होते. अंधार पडायला सुरुवात झाली होती. एके ठिकाणी थांबून चहा घेतला. त्यामुळे थोडी तरतरी आली. तोहानामध्ये पोहचल्यावर एका अंड्याच्या गाडीवर उकडलेली अंडी खात असताना तिथे एक हरियाणाचा युवक आला. त्याने आज राहण्याची काही सोय झाली आहे ते विचारले. मी त्याला म्हटले पुढे जाणार आहे. तर त्याने तिथेच मुक्काम करण्याचा सल्ला दिला. त्याला होकार दिल्यानंतर त्याने एके ठिकाणी धर्मशाळेत मला नेले. सुरुवातीला धर्मशाळा म्हणजे एखादी जुनीपाणी इमारत असेल अशी धारणा होती. मात्र तिथे गेल्यावर पाहिले तर ती एक मोठी नवी इमारत होती. त्यातील खोल्याही चांगल्या सुसज्ज होत्या. त्या धर्मशाळेने केवळ शंभर रूपये घेतले. माझ्याशी बोलणारा तरूण बारावी शिकलेला होता. त्याने पुढील शिक्षण घेतलेले नव्हते. त्याला इंग्लडमध्ये कामासाठी जायचे होते. त्याचा भाऊ तिथे आहे. त्याने मला खोली मिळेपर्यत माझी सोबत केली. त्यानंतर तो गेला. रात्री फारशी भूक नव्हती. काहीतरी गोड खाऊन झोपावे अशा विचाराने एका मिठाईच्या दुकानात गेलो. तेथे एक युवक ते दुकान चालवित होता. त्याच्याशी बोलताना तो जास्तच सलगी दाखवू लागला. त्याच्या कृतीमधीन वेगळेच संकेत मिळत होते. त्यामुळे पटकन तेथून काढता पाय घेतला. आणि धर्मशाळेत येऊन झोपलो.  

तोहानातील मुक्कामाचे ठिकाण- धर्मशाळा  

---------------------------------------------------------------------------------------------------------------- 

दहावा दिवस- २७ नोव्हेंबर २०२३-  तोहाना ते  लुधियाना (१७७ किमी) 

    हरियाणात प्रवेश केल्यापासून अनेकांच्या स्वत:हून मदत करायच्या सवयीमुळे खूपच छान वाटत होते. कालचा मुलगाही काही कारण नसताना मला धर्मशाळेत घेऊन गेला होता. राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यासाठी धडपड करत होता. प्रवासात स्वत:हून बोलणाऱ्यांमध्ये बरेच तरूण होते. त्यातही प्रामुख्याने ज्यांनी बाहेरच्या राज्यांमध्ये प्रवास केलेला आहे, असे बरेचजण होते. तसेच ज्यांना देशाबाहेर जायचे आहे तेही प्रामुख्याने चौकशी करत होते. तोहानाचा परिसराला धान्याचे कोठार म्हटले जाते. तिथे अनेक ठिकाणी मोठी मोठी धान्याची कोठारे होती. ठिकठिकाणी वजनकाटे होती. गव्हाने भरलेली ट्रँकरांची ये जा चाललेली होती.  

    ती धर्मशाळा पहाटे पाचला उघडली जाते. मात्र पहाटे चारलाच जाग आल्याने साडेचारच्या सुमारास प्रवासाला सुरुवात केली. उजेडण्यापूर्वीच पंजाबच्या हद्दीत आलो होतो. पंजाब सुरू झाल्यानंतर अचानक चांगला रस्ता लागला होता. त्यामुळे कालच्या प्रवासाने आलेला थकवा आज जाणवत नव्हता. सायकलला वेगाने पळत होती. आणि योगायोग म्हणजे मी गुरूनानक जयंतीच्या दिवशी पंजाबमध्ये प्रवेश करत होतो. ठिकठिकाणच्या गुरूद्वारांमध्ये रोषणाई केलेली दिसली. अनेक ठिकाणी प्रार्थनाही केल्या जात होत्या. सकाळी एक भाजीवाला त्याच्या दुचाकीवर भाजीपाला विकण्यासाठी भाजीपाला घेऊन चालला होता. त्याने बराच वेळ माझ्याशी गप्पा मारल्या. तो चांगला गायकही होता. त्यानंतर त्याने गाडी थांबवून मला त्याच्याकडील गाजर आणि मुळे काढून दिले. पुढील प्रवासात खा असे सांगितले. वरून अजून काही मदत करू का असेही विचारले. पंजाबी लोकांच्या मनाच्या मोठेपणाचा अनुभव येऊ लागला होता. नि:स्वार्थवृत्तीने देऊ केलेल्या मदतीने खूपच बरे वाटते याची प्रचीती यावेळी आली.  


या प्रवासात मदत करणारे असे सहप्रवासी अनेकदा भेटले  

    जम्मू आता टप्प्यात आले होते. मन खूपच प्रसन्न झाले होते. त्याचा परिणाम सायकलच्या वेगावर झाला होता. दोन दिवसांत मी जम्मूत पोहचणार होतो. मात्र मनात धाकधूकही होती. दोन मुख्य अडचणी होत्या. त्यातली पहिली अडचण दोन दिवसांपूर्वी सुटली होती. मला एक दिसेंबर पासून सुरू होणाऱ्या एनसीसीच्या कँम्पसाठी नियुक्त केले होते. बटालियनमध्ये पूर्वीच सांगून पाहिले की दुसऱ्या कोणाला तरी पाठवा परंतु त्यांनी काही ऐकले नाही. आमच्या बटालियनमध्ये एकूण अकरा एनसीसी अधिकारी आहेत. त्या सर्वानी यावर्षीचे कँम्प केलेले होते. मीच राहिलो होतो. अनेकांना विचारून पाहिले पण कोणीही कँम्पला जायला तयार नव्हते. अनेकांच्या प्रात्यक्षिक परिक्षा होत्या. काहींना प्राचार्य सोडत नव्हते. जर कोणी तयार नाही झाले तर जम्मूपासून परत येण्याचे ठरविले होते. पण शेवटी लोणीचे कॅप्टन राजेंद्र पवार मदतीला धावून आले. त्यांच्या महाविद्यालयातील लेफ्टनंट दशरथ खेमणारांना त्यांनी कँम्पला जाण्यासाठी तयार केले. खेमणार सर नुकतेच कामटीहून प्रशिक्षण घेऊन आले होते. त्यांची एक शस्त्रक्रियाही झाली होती. तरीही त्यांनी होकार कळविला. एनसीसी कँम्पमध्ये जाण्यास प्राध्यापक फारसे तयार होत नाहीत. तिथे अनेकदा खाण्या-पिण्याचे आणि राहण्याचे खूप हाल होतात. दहा दिवस एखादी शिक्षा भोगत आहोत अशीच भावना असते. त्यामुळे तिथे जाण्यास बहुताशी जण नाखुष असतात. खेमणार सर तयार झाल्यावर एक नवीच समस्य़ा निर्माण झाली. आमच्या ट्रेनिंग अधिकाऱ्याने त्यांचे नाव टाकल्यावर कमांडिंग अधिकारी त्यांच्यावर रागावला. पुन्हा त्यांना फोन करून सांगावे लागले की एवढ्या वेळेस सोडा. पुढील कोणताही कँम्प मी करेल. एनसीसी अधिकाऱ्याला दोन दोन बॉस असतात. एक प्राचार्य आणि दुसरा कमांडिंग अधिकारी. दोघांनीही उत्तरदायी राहावे लागते. त्यामुळे  एनसीसी घेण्यास कोणी प्राध्यापक फारसा तयार होत नाही. त्यांनी शेवटी होकार दिल्यावर एक समस्या सुटली होती.  

    आज आमच्या सुट्टीचा शेवटचा दिवस होता. महाविद्यालय उद्या सुरू होणार होते. त्यामुळे प्राचार्यांची परवानगी मिळणे ही एक समस्या होती. त्यांना फोन करून सुट्टी वाढविण्याबाबत विचारणा करण्याची काही हिंम्मत झाली नाही. नव्या प्राचार्य फार कडक शिस्तीच्या असल्याने त्यांना ऐनवेळी सुट्टी घेतलेले आवडत नाही. असे कोणी केले की त्या लगेचच संबंधित व्यक्तीची सार्वजनिकरित्या खरडपट्टी काढतात. आता आपलेही तसेच होणार अशी भावना होती. त्यामुळे त्यांना फोन न करता सुट्टी वाढवून देण्याची विनंती करणारा संदेश पाठविला. त्यानंतर बराच वेळ फोन पाहण्याची हिंम्मतच नाही झाली. मनात सारखी धाकधूक होती त्यांनी जर सुट्टी नाकारली तर काय करायचे? मात्र कुठेतरी आशा होती की त्या चांगल्या संशोधक आणि अभ्यासक असल्याने त्यांना प्रवासाने दृष्टीकोनात आणि व्यक्तिमत्त्वाचा होणारा विकास आणि बदल याची कल्पना असावी. अन्यथा काही जणांना वाटते का विनाकारण फिरायचे? त्याचा काय फायदा? त्या असा विचार त्या करत नसाव्यात असे वाटले. देशाच्या उत्तर भागात शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत. पवार सर आणि खेमणार सरांच्या मदतीमुळे  श्रीनगरपर्यत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्राचार्याच्या नकाराने ती संधी हातची जाणार होती. मात्र गुरूनानकांच्या कृपेने प्राचार्यांनी सुट्टी वाढवून दिली. खूपच आनंद झाला.  

    आता श्रीनगरला जाणे शक्य होणार होते. सकाळच्या दहा वाजेपर्यत सत्तर किलोमीटर अंतर पार झाले होते. सकाळपासून नाष्ट्यासाठी हॉटेल शोधत होतो. मात्र कोठेही ती दिसली नाहीत. आज गुरूनानक जयंतीमुळे बहुतांशी धाबे बंद होती. पंजाबमध्ये काहीतरी चांगले खायला मिळेल या आशेने दुकाने शोधत होते तर पुरता भ्रमनिरास झाला. मन प्रसन्न होते मात्र पोटात कावळे कोकत होते. खायला काहीही मिळण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यानंतर संगरूर या ठिकाणी एका ठिकाणी पराठा मिळाला. त्याने थोडी उर्जा मिळाली. पुढील प्रवास सुरू झाला. आजपर्यतच्या प्रवासात आज सकाळच्या वेळी सर्वात जास्त टप्पा पार केला होता.  

    मलेरकोटल्याला एक मित्र भेटणार होता. आम्ही पूर्वी कधीही भेटलेले नव्हतो. त्याच्याकडून फार पूर्वी मी एनसीसीचे काही साहित्य मागविले होते. त्यातून एकमेकांचे फोन नंबर दोघांना माहित होते. रस्ते विचारण्यासाठी काल त्याला सहज फोन केला होता. त्याने काही विचारण्यापूर्वीच कुठपर्यत आलास असा प्रश्न विचारला. तो माझे व्हॉटस्अपचे स्टेटस पाहत होता. त्यातून त्याला मी उत्तर भारतात आहे हे कळले होते. तो म्हणाला मी कुठेही असलो तरी तो मला आज भेटायला येईल. काहीही संबंध नसताना आणि कधीही भेटलेलो नसताही तो मला भेटायला येणार होता, या भावनेने खूपच बरे वाटले.  

    नाष्टा केल्यानंतर सायकलचा वेग थोडा मंदावला. अचानक रस्त्यावरील वाहतूक कमी झाल्याचे जाणवू लागले. त्या रस्त्यावर कोणतेही अवजड वाहन दिसत नव्हते. प्रत्येक शंभर फुटांवर पोलीस दोन्ही बाजूंनी उभे होते. एका ठिकाणी अनेक बसेसमधून, कारमधून आलेली माणसे चालली होती. ते एका सभास्थळी चालली होती. त्यातील अनेक जण कामगार होते. त्यांना एका राजकीय सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी आणले असावे. अधिक माहिती घेतल्यावर कळले की आज संगरूरला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सभा होणार होती. त्यासाठी जवळच्या जिल्ह्यातील पोलीसांना बंदोबस्तासाठी बोलाविले होते. पोलीसांचीच संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक होती. जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून जमविलेले नागरिकही बहुसंख्य होते. त्या सभेमुळे रस्त्यावरील जड वाहनांना थांबविण्यात आले होते. अनेक ट्रक रोडच्या बाजूला थांबलेले दिसले. राजकीय पक्षांना गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्याची फार हौस असते. मात्र या प्रक्रियेत प्रशासनाची, पोलीसांचे कामे नाहक वाढतात. आवश्यकता नसताना जमविलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यातच ही उर्जा खर्च होते. शिवाय इतर नागरिकांनाही त्याचा त्रास होतोच. आपसारखा पक्ष जो दिल्लीतील व्हिआयपी संस्कृतीच्या विरोधात भूमिका घेऊन सत्तेत आलेला असतानाही त्या पक्षाला गर्दी जमविण्यात धन्यता वाटू लागते. राजकीय पक्षांना नागरिकांपर्यत संदेश देण्यासाठी अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. मात्र तरीही मोठ्या सभा घेऊन त्यासाठी गर्दी गोळा करण्याच्या प्रक्रियेत नाहक खर्च केला जातो. शिवाय गरज नसताना वाहनांच्या होणाऱ्या प्रवासाने पर्यावरणाचीही हानी होते. सभा ऐकायला येणाऱ्या व्यक्तीला समोरचा काय सांगतोय याच्याशी काही देणे घेणे नसते. कारण त्यातील अनेकजण पैसे देऊन रोजाने आणलेले असतात. त्यामुळे अशा सभांच्या गर्दीतून राजकीय नेत्यांना जरी बरे वाटत असले तरी या सभांचे अंतिम फलित काही नसते. केवळ संसाधनांचीच हानी यातून होते.  

    दुपारी एकच्या सुमारास मलेरकोटल्याला पोहचलो. तिथे मला भेटण्यासाठी हनीफ भाई येणार होते. आमचा केवळ फोनवरच एक दोनदा संपर्क झालेला होता. मात्र मी येवढ्या लांबून सायकलवर आलोय याचे विशेष वाटून हनीफभाई त्यांच्या घरातील लग्न सोडून मला भेटायला आले होते. त्यांनी माझे हार घालून स्वागत केले. त्यानंतर आम्ही जेवायला एका प्रसिद्ध रेस्टारंटमध्ये गेलो. तिथे हनीफ भाईंनी मलेरकोटल्यातील प्रसिद्ध मटनाचा पदार्थ मागविला. प्रवासात पहिल्यांदाच मांसाहारी पदार्थ खायला मिळाल्याने शरिराची झालेली झीज भरून येण्यास मदत झाली. हनीफभाईंनीही लवकरच सायकल घेऊन चालविणार असल्याचे आश्वासन दिले.  

मलेरकोटल्याला भेटलेले हनीफभाई  

    हनीफभाईंचा निरोप देऊन मी लुधियानाच्या दिशेने निघालो. ते अजून पन्नास किलोमीटर दूर होते. रस्त्याने दोन विद्यार्थ्यी भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितले की पंजाबमध्ये बरेचशे युवक नशिल्या पदार्थाच्या अधीन गेलेले आहेत. दहावी बारावीचे अनेक विद्यार्थी नशा करतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ऐरवी सुरक्षित असलेल्या भागांमध्ये लुटमारीच्या घटना वाढत असल्याचे दिसते. त्यामुळे मलाही काहींनी सांगितले की रात्रीच्या वेळी सायकल चालवू नको. बाकी पंजाब सुरक्षित आहे मात्र नशिडे रस्तावर लूटमार करतात किंवा मोबाईल घेतात असे स्थानिकांनी सांगितले होते. व्यसनाधीनता कशी इतर अनेक सामाजिक प्रश्न वाढविते याचे उदाहरण पंजाबमध्ये आढळते. अनेकांनी सांगितले की सरकारने ठरविले तर नशिल्या पदार्थांची विक्री थांबविता येऊ शकते. मात्र पंजाबमध्ये सत्तांतर होऊन हा प्रश्न सोडविण्याची मानसिकता सरकारची झालेली दिसत नाही.  

    किंबहुना ड्र्ग्सच्या व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय साखळीचेही हितसंबंध गुंतलेले आहेत. पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून भारताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी ड्र्ग्सच्या माध्यमातून भारताला सामाजिकदृष्ट्या असुरक्षित करण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसतात. पाकिस्तानच्या सीमेवरील भागांतून मोठ्या प्रमाणात ड्र्ग्सची तस्करी भारतात होते. पंजाबमधील सीमेवर तार कंम्पाऊंड असूनही त्यातून नवनव्या कृप्त्या वापरून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.  

    सायंकाळी सहाच्या सुमारास लुधियानामध्ये पोहचलो. लुधियाना हे शहर पंजाबमधील आर्थिक ऊलाढालीचे मोठे केंद्र आहे. तिथे मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती केली जाते. स्वेटर आणि इतर कपडे याच शहरातून भारतभर पाठविले जातात. मोठ्या शहरांमध्ये प्रवेश केल्यानंतर जे अनुभव येतात तेच अनुभव लुधियानामध्येही येत होते. रस्तावर वाहनांची गर्दी, उड्डानपूल बांधूनही निर्माण झालेली वाहतूक कोंडी, हवेचे आणि ध्वनिचे प्रदूषण या समस्या लुधियानामध्येही होत्या. सोबत मोठ मोठी पंचतारांकित हॉटेल्स, सुपर फुडची दुकाने, मॉल्स् अशा इतर शहरांमध्ये आढळणाऱ्या गोष्टीही लुधियानामध्ये होत्या. सुरुवातीला लुधियानामध्ये मुक्काम करायचा विचार होता. पण त्या शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी पाहून तिथे राहण्याची इच्छा राहिली नाही. त्यामुळे पुढील प्रवासाला सुरुवात केली. सातच्या सुमारास शहराबाहेर पडलो.  

    आठच्या सुमारास एका ठिकाणी बऱ्याचशा ट्रक थांबलेल्या होत्या तिथे चहासाठी थांबलो. त्या ढाबा चालकाला मुक्कासाठी कुठे लॉज मिळेल का ते विचारले. त्यांनी पुढील गावात गोराया येथे धर्मशाळा आहे, तिथे थांबू शकता, असे सांगितले. चहा घेतल्यानंतर निघणार तोच तिथे काम करणारा एक कामगार म्हणाला की तुम्ही इथे राहू शकता. त्याने मला तो झोपत असलेली खोली दाखविली. ती त्याच्या मालकाचे ऑफिस होते. तो ती जागा मला देऊन दुसरीकडे झोपणार होता. तिथे सोफे होते त्यावर तो झोपत होता. ती जागा मला त्याने देऊ केली. मला जागेबद्दल काही त्रास नव्हता परंतु एक अडचण होती. माझ्याकडे पांघरण्यासाठी एका छोट्या शालीखेरीज दुसरे काहीही नव्हते. त्यामुळे थंडीचा प्रश्न होता. परंतु ठरविले की थर्मल आणि जर्किन घालून झोपता येईल. फारच थंडी वाजली तर रात्री प्रवास सुरू करूयात. तिथे राहण्याचा निर्णय घेतला. त्या वेटरने मला सांगितले की रात्रीचे जेवणही इथेच करा. तो जेवणाचे आणि राहण्याचे काहीही पैसे घेणार नव्हता. जेवण झाल्यानंतर त्याला विचारले की किती पैसे द्यायचे. तो काही केल्या पैसे घेत नव्हता.  

    पैसे घेत नाही म्हटल्यावर सुरुवातीला थोडे बरे वाटले. मात्र त्याचवेळी माझा मित्र कर्नल नरेश वाबळे याची मनाचा मोठेपणा कोणी दाखवायचा ही गोष्ट आठवली. एकदा त्याने रस्त्यावर करवंदे विकत घेतली होती. त्या विक्रेत्याकडे त्याला द्यायला सुट्टे पाच रूपये नव्हते. त्याने त्याला दहा रूपये देऊ केले. कर्नलसाहेबांनी ते घेतले नाहीत. त्यांच्यासोबत जी व्यक्ती होती त्याने कर्नलसाहेबांना सांगितले की देतोय तर घे ना. तेव्हा साहेब त्याला म्हणाले मनाचा मोठेपणा कोणी दाखविला पाहिजे. त्याने की करवंदे विकणाऱ्याने? ही गोष्ट त्याने मला सांगितली. त्यानंतर अनेकदा जाणवले की ज्याच्याकडे फारशी संपत्ती नसते, तोच बऱ्याचदा मनाचा मोठेपणा दाखवितो. पैशाचा नियमित आणि अधिक स्त्रोत वाढू लागला की व्यक्तीमध्ये तिच्या अधिक संचयाची प्रवृत्ती वाढते जाते. पैशाच्या श्रीमंतीबरोबर मनाची श्रीमंती वाढेल याची खात्री देता येत नाही. कर्नल साहेबांचे विचार पिच्छा सोडत नाही त्यामुळे त्या वेटरला तो नको म्हणत असतानाही पैसे दिले. त्याचे आभार मानले आणि रात्री झोपी गेलो.  

परमुलखात जाऊनही रोजरोटी मिळविण्यासाठी जाण्यास भाग पडूनही मनाची श्रीमंती असलेला धाब्यावरील कामगार ज्याने माझी राहण्याची आणि खाण्याची सोय केली होती  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------  

अकरावा दिवस- २८ नोव्हेंबर २०२३-   लुधियाना ते पठाणकोट (१५७ किमी) 


    पहाटे तीनलाच जाग आली. आवरून चार वाजता निघालो. आता जम्मू केवळ एक मुक्काम दूर होते. खूपच प्रसन्न वाटत होते. सकाळी नऊच्या सुमारास जालंदर शहराच्या बाहेर पडलो. एके ठिकाणी हवा भरण्यासाठी थांबलो असता त्या व्यक्तीने सांगितले की समोर मंदिरात लंगर चालू आहे, तिथे नाष्टा करू शकतो. त्या मंदिरात गेल्यानंतर तिथे खाण्यासाठी भात आणि दोन भाज्या दिल्या. अकराव्या दिवशी भात खायला मिळाला होता. जाड्या भरड्या रोट्या खाऊन कंटाळा आला होता. भात खाल्ल्याने छान वाटू लागले होते. मंदिरही खूप सुंदर होते. पंजाबमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद म्हणून जेवण दिले जाते.  

    दहा वाजेच्या सुमारास जालंदर शहराच्या बाहेर पडलो. लुधियानानंतर जालंदर हे एक पंजाबमधील मोठे शहर होते. या शहरातही लुधियानासारखीच परिस्थिती होती. बाराच्या सुमारास एका धाब्यावर जेवणासाठी थांबलो. तेथून निघाल्यानंतर आजूबाजूची शेती आता बदललेली होती. या भागात जलसिंचनाच्या सुविधा होत्या. त्यामुळे येथे फळभाज्या, ऊस अशी पिके घेतली जात होती. अनेक ठिकाणी गुळाचे गुऱ्हाळेदेखील होती. रस्त्याने अनेक युवक भेटत होते बोलत होते. त्यांतील बऱ्याच जणांना विदेशात कामासाठी जायचे होते. बारावीनंतर शिक्षण न घेता विदेशात जाऊन काहीतरी करायचे किंवा तिकडे जाण्यासाठी प्रयत्न करायचे असाच या युवकांचा कल होता. दोन पहिलवान चंदीगडहून पठाणकोटकडे चालले होते. ते मला पाहून थांबले. त्यानंतर आम्ही बोलत बोलत प्रवास चालू ठेवला. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रातील अनेक युवक पंजाबमध्ये कुस्तीची तयारी करण्यासाठी आणि तेथील दंगलींमध्ये (कुस्तीचे हंगामे) सहभाग घेण्यासाठी येतात. यावर्षीचा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखहाही त्याच्याच तालमीत तयारी करत होता. त्यांनी सांगितले की एखादा पैलवान तयार करायचा म्हणजे हत्ती पोसण्यासारखे असते. पंजाबमधील युवकांमध्ये वाढत जाणारी व्यसनाधीनता याबाबतही त्यांनी सांगितले. बराच वेळ त्यांनी सोबत दिल्यानंतर ते त्यांच्या गावी गेले.  

    पठाणकोट आता वीसेक किलोमीटर बाकी होते. आमच्या बटालियनच्या कमांडिंग अधिकारी कर्नल सुरेंद्र गुसेन यांना फोन लावला. ते आमच्या बटालियनमध्ये २०१५ ते २०१७ या कालावधीत होते. त्यांनी सांगितले की रात्री प्रवास करू नकोस. आधी कळविले असते तर पठाणकोटमध्ये त्यांनी माझी राहण्याची सोय केली असती. त्यांचे शिक्षण तिथेच झाले होते. त्यांच्याशी बोलण्यानंतर जरा बरे वाटले. रात्रीचे सात वाजले होते. पठाणकोटमध्ये प्रवेश करताना एक मोठा घाट लागला. राजस्थानचा काही भाग वगळता पूर्ण प्रवासात कुठेही घाटाचा रस्ता लागला नाही. रात्र झालेली आणि चढाईचा रस्ता असल्याने बरीच दमछाक झाली होती. शेवटी एकदाचा तो घाट संपला. पठाणकोटमध्ये प्रवेश झाला. पठाणकोट सुरू झाल्याबरोबर दोन्ही बाजूंनी लष्कराच्या छावण्या दिसू लागल्या. पठाणकोटमध्ये लष्कराचे मोठे ठाणे आहे. तिथे पोहचण्यास रात्रीचे नऊ वाजले. राहण्याची सोय पाहत होते. एका व्यक्तीला विचारल्यावर त्याने सांगितले की शहराच्या बाहेर वनविभागाचे विश्रामगृह आहे, तिथे राहण्याची सोय होऊ शकते. त्या विश्रामगृहात प्रवेश केल्यानंतर त्यांनी एक हजार रूपये घेऊन राहण्याची व्यवस्था करून दिली.  

बारावा दिवस-  २९ नोव्हेंबर २०२३-    पठाणकोट ते जम्मू (१११ किमी) 

जम्मू हिमालयाच्या हद्दीत 

    आता जम्मू केवळ शंभर किलोमीटर राहिले होते. आपण शेवटी जम्मूपर्यत पोहचणारच याची आता खात्री वाटू लागली. पठाणकोट सोडल्यानंतर काही दहा-पंधरा किलोमीटर नंतर जम्मू-काश्मिरची हद्द सुरू झाली. हद्दीवर एका ठिकाणी चहा आणि नाष्टा केला. थंडीची तीव्रता वाढू लागली होती. जम्मू केवळ ८० किलोमीटर होते. हिमालयाची शिखरे आता दिसू लागली होती. एक मोठी नदीही दिसली. तिच्या पाणी फारसे नव्हते. हिमालयात आढळणाऱ्या गोल दगड-धोंड्यांनी तीचे पात्र भरलेले होते. तिच्या पात्रता पाणी दिसत नव्हते मात्र प्लास्टिकचे रॅपर्स मात्र होते. वेफर्स, कुरकुरे,पाण्याची रिकाम्या बाटल्या सगळीकडे दिसत होत्या. थंडीची तीव्रताही वाढू लागली होती. गरम कपडे घातल्यामुळे सायकल चालविण्यात थोडी अडचण येत होती.  

    जम्मूत प्रवेश केल्यानंतर एका ट्रक ड्रायवरने थांबवून चहा पाजला. त्याला काश्मिरमधील सुरक्षिततेबाबत विचारले असता त्याने सांगितले की आता काहीही चिंता नाही. फक्त रात्री प्रवास करू नको असा सल्ला दिला. त्याच्या प्रेमळ कृत्याने शरिरात नवा उत्साह संचारला. काही वेळानंतर दोन्ही बाजूंनी रस्त्याचे काम सुरू होते. आजूबाजूचा परिसर सुंदर होता मात्र रस्त्याच्या निर्मितीमुळे सगळीकडे धूळ, राडा पसरलेला होता. त्यामुळे सायकल चालविण्यात अडचणी येत होत्या. पूर्वीचा चार पदरी रस्ता होता. आता त्याचे विस्तारीकरण चालले होते. त्यामुळे प्रवासातील सुलभतेवर त्याचा परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी डोंगर फोडून रस्ता विस्तारण्याचे काम चालले होते.  


जम्मूतील चौकात  

    एके ठिकाणी चहा आणि पनीरवडा घेतला. तेथील चहाची चव फारच उत्कृष्ट होती. त्यामुळे अजून एक चहा पिण्याचा मोह काही आवरता आला नाही. तिथे एक बंगाली मुलगा भेटला. तो जम्मूमध्ये वेगवेगळ्या हॉटेलांना खाण्याचे ब्रेड पुरविण्याचे काम करत होता. गेल्या दहा वर्षापासून तो हे काम करत होता. असेच काम करणारे त्याच्यासारखेच इतर अनेकजण त्या ठिकाणी होते.  जम्मूमध्येही काम रस्त्याचे काम करणारे बहुतांशी मजूर बिहार आणि उत्तरप्रदेशातील होते.  

    मजल दरमजल करत दुपारी तीनच्या आसपास जम्मूत पोहचलो. जम्मू शहर तावी नदीच्या काठी वसलेले आहे. त्यानदीवर अनेक पूल बांधलेले होते. मी ज्यांच्याकडे जाणार होते ते सुभेदार दिपक कांबळे लालेदा बाग या ठिकाणी होते. ते ठिकाण शहरापासून पंधरा किलोमीटर होते. त्यांच्याकडे पोहचेपर्यत चार वाजले. शेवटी एकदाचे त्यांच्या बटालियनमध्ये दाखल झालो. त्यांचे युनिट २२ महार रेजिमेंट हे होते. त्यांनी तिथे गेल्यावर मला आवरून जेवायला यायला सांगितले. फारशी भूक नव्हती. आणि चारवाजता कुठे जेवता असा विचार करून जेवायला नको असा विचार केला. कांबळे साहेबही अद्याप जेवले नव्हते. त्यामुळे त्यांना सोबत करूयात असा विचार करून जेवायला गेलो. थोडे खाऊ असा विचार होता मात्र बघता बघता भरपूर जेवण केले. सायकल चालविताना भूक लागल्याचे जाणवत नाही मात्र तुम्ही कितीही खाऊ शकता. त्याचा प्रत्यय पुन्हा आला. जेवणानंतर थोडा आराम केला. त्यानंतर कांबळे साहेबांसोबत बटालियनमध्ये फिरायला गेलो. ते बटालियनचे सुबेदार मेजर असल्याने त्यांचा बटालियनमध्ये दरारा होता. सुबेदार मेजर ही लष्करातील खूप महत्त्वाची जागा असते. अधिकारी सोडून बटालियनमधील इतर सर्वांचा प्रमुख सुबेदार मेजर असतो. बटालियनचे दैनंदिन कामकाज तोच पाहत असतो. सर्व सैनिकांवर त्याचा वचक आणि नियंत्रण असते.  

            एक बाबीचा येथे विशेष उल्लेख करावा वाटतो ती म्हणजे आमचा एक छात्र गायके सचिन जो सध्या भारतीय सैन्यात आहे तो काही गरम कपडे आणि खाद्यपदार्थ नगरहून जम्मूला घेऊन आला होता. त्याला स्टेशनपासून खूप दूर यावे लागले होते. जम्मूमध्ये सैनिकांना मुक्त फिरण्यावर बंधने आहेत. तरीही तो एवढ्या लांब रिक्षाने गेला होता. त्याने माझ्यासाठी सहन केलेला त्रास मी विसरणे शक्य नाही. त्याने दिलेल्या गरम कपड्यांमुळे काश्मिरमधील थंडीपासून संरक्षण झाले. 


सुभेदार मेजर दिपक कांबळेंसोबत त्यांच्या कार्यालयात  

    कांबळे साहेब मला आर्मीच्या कँन्टीनमध्ये घेऊन गेले. तिथे गरज नसताना आठ हजारांची खरेदी केली. त्यातील एकही वस्तू अत्यावश्यक गरजेची नव्हती. मात्र तरीही घेतल्या. त्यानंतर रात्री सायकल स्वच्छ करून ठेवली. आज बटालियनमध्ये नाईट परेड होती. सगळीकडच्या लाईट बंद करण्यात आल्या होत्या. सैनिकांना अंधारात लष्करी कारवाई करण्याचा सराव देण्यासाठी अशा प्रकारच्या दोन परेड हप्त्यातून दोनदा राबविल्या जातात. त्या परेडला बटालियनचा कमांडिंग अधिकारीही हजर असतो. कांबळे साहेबांना यायला उशीर होणार असल्याने त्यांनी मला जेवून घ्यायला सांगितले होते. मात्र मला फारशी भूक नसल्याने त्यांच्यासोबतच जेवेल असे मेसमधील सैनिकांना सांगितले. कांबळेसाहेब रात्री अकरा वाजता आले. त्यानंतर आम्ही जेवण केले. आज त्यांचे दुपारचे जेवण चार वाजता झाले होते. रात्रीचे अकरा वाजता. त्यानंतर पहाटे पाच वाजता त्यांना पीटी परेडसाठी हजर राहायचे होते. त्यांचा दिनक्रम पाहून चकित झालो. सैन्यात काम करताना वेळा-काळाचे भान राहत नाही. सैन्यात तुम्ही चोवीस तास ऑन ड्युटी असता.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

तेरावा दिवस - ३०  नोव्हेंबर २०२३-    जम्मू ते उधमपूर  (७० किमी) 

    रात्री झोपायला बारा वाजले. पहाटे लवकर जाग आली. आवरून निघणार तोच सकाळपासून चांगलाच पाऊस सुरू झाला. दहा वाजले तरी पाऊस उघण्याची लक्षणे दिसेनात. आता पुढे जाण्याची काही खरे वाटेना. आपला प्रवास येथेच संपतो की काय अशी शंका वाटू लागली. त्यात अनेकजण श्रीनगरला कशाला जातोस तिथे प्रचंड असुरक्षितता आहे. विनाकारण सुखाचा जीव दु:खात कशाला घालतोस असा काळजीवजा ईशारा अनेक सैनिक देत होते. आता काय करायचे हा पेच होता. असे द्वंव्द चालू असतानाच पाऊस कमी झाला. कांबळे साहेबांनी आर्मीचा रेनकोट दिला. जो गोणपाटासारखा असतो ज्यात तुम्ही आणि तुमचे सामान बसू शकते. त्यामुळे मी आणि सायकलवरील बॅग दोन्हींचे पावसापासून संरक्षण होणार होते. पाऊस उघडल्यानंतर बटालियन सोडली.  

    जम्मूपर्यत पठाणकोटचा अपवाद वगळता फारशी चढाई नव्हती. मात्र जम्मू सोडल्यानंतरच श्रीनगरच्या दिशेने प्रवास सुरु केल्यानंतर लगेचच चढाई सुरू झाली. हिमालयाच्या पर्वतरांगा सुरू झाल्या होत्या. जम्मूच्या बसस्टँड बाहेर गेल्या गेल्या दमछाक करणारा चढ सुरू झाला होता. काही ठिकाणी तर चालूनच अंतर कापावे लागले. एका ठिकाणी कच्छी दाबेली सारखा पदार्थ खाल्ला. तो विकणारा व्यक्ती एका टोलनाक्याच्या जवळ डोंगरात गाडीवर तो पदार्थ बनवून विकत होता. तो दहा वर्षापूर्वी बिहारमधून तिथे आला होता. दुचाकीवर गॅस त्यावर पाव आणि कांदा, टॉमॅटो आदि पदार्थ टाकून तो द्यायचा. तिथे अचानक एक तृतीयपंथी व्यक्ती आला. त्याने त्याच्याकडून वीस रूपये घेतले. आणि गेला. जाताना थोडी अश्लिल शेरेबाजी करून गेला. भारतभर एक प्रकारची समानता काही बाबतींमध्ये आढळते. तशी समानता या तृतीयपंथीयांच्याही वागण्यात होती. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून न घेतल्याने त्यांना भिक मागून उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नसतो.  

    काही अंतर गेल्यानंतर जम्मू एनआयटीचा कँम्पस लागला. दोन दिवसांपूर्वीच या कँम्पसमुळे काश्मिरमध्ये गदारोळ निर्माण झाला होता. एका विद्यार्थ्याने मोबाईलवरून प्रेशित मोहंमदांचा अवमान करणारा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे काश्मिरमधील सर्व वर्गांचे नियमित तास बंद करण्यात आले होते. अत्यंत संवेदनशील अशा या राज्यात एखादी किरकोळ वाटणारी गोष्टही नियमित जनजीवन प्रभावित करून टाकते. असाच प्रकार यावेळीही झाला. सर्व शिक्षणसंस्थांनी ऑनलाईन मोडवर शिकविण्याचा आदेश राज्यपालांनी दिला होता. धगधगणारी परिस्थिती काय असते याची एक चुणूक या प्रकाराने जाणवली. अशा अनेक घटना या राज्यात सातत्याने घडत असल्याने येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम होतो आणि अनेकांच्या बाबतीत झालेलाही आहे. सामान्य जीवनाचा अनेकदा कंटाळा येतो मात्र सामान्यपण किती महत्त्वाचे असते हे ते निघून गेल्यावर कळते. काश्मिरच्या बाबतीतही तेच लागू होते. तेथील राजकीय घटनांचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होत असेल याची कल्पना करणे देखील अवघड आहे.  

    साधारणत: तिसेक किलोमीटर गेल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला. झंझार कोटली येथे गेल्यानंतर अचानक जोरात पाऊस सुरू झाला. एका धाब्यावर थांबलो. तिथे चहा घेतला. त्या धाब्यावर १९७२ पासून असा फलक लिहलेला होता. तो धाबा शर्मा नावाच्या व्यक्तीचा होता. त्याच्या वडिलांनी हा धाबा सुरू केला होता. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा तो चालवित होता. त्याने फिजिक्समध्ये एमएस्सी केले होते. नोकरी न करता अत्यंत आवडीने तो धाबा चालवित होता. त्याच्या काम करण्याच्या पद्धतीतून त्याला त्याकामाबद्दल आवड आहे हे जाणवत होते. त्याने चहाचे पैसे घ्यायला नकार दिला. त्यानंतर त्याच्याशी बोलताना तो सांगत होता की सध्याचे केंद्र सरकार खूप चांगले आहे. बोगद्यात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी पंतप्रधानांनी देश-विदेशातून यंत्रणा आणून त्यांचे प्राण वाचविले. तेच २०२३ च्या उत्तराखंडमधील ढगफुटीच्या वेळी केवळ राहुल गांधीच्या हस्ते मदतीचे वाटप करायचे होते म्हणून प्रशासकीय यंत्रणेने कोणतीही मदत बाधितांना दिली नव्हती. त्याच्या उदाहरणावरून त्याला समाजमाध्यमांतून कशा प्रकारे प्रचार केला जातोय याची कल्पना आली. मोरबी पुल दुर्घटनेनंतर ठेकेदार साधी कारवाईही न करणारे सरकार त्याला फार प्रभावी वाटत होते. त्याचवेळी ऐनकेन प्रकारे राहुल गांधींना चित्रात आणून बदनाम करणे हे भाजपची प्रचारयंत्रणा अत्यंत प्रभावीपणे करत होती. त्याचे बळी उच्च शिक्षितांपासून सर्वसामान्यांपर्यत सर्वच जण जात होते. गोबेल्स् नितीचा प्रभावी वापर केला तर खोटेही खरे वाटायला लागते. या तंत्राचा पुरेपूर वापर सध्याचे सत्ताधारी करत होते.  

    पाऊस उघडण्याची काही लक्षणे दिसेनात. त्यामुळे दुपारचे जेवणही तिथे करून घेतले. पनीर भुर्जी आणि रोट्या खायला मिळाल्या. पाऊस उघडण्याची काही लक्षणे दिसेनात त्यामुळे रेनकोट घालून पुढील प्रवास सुरू केला. पावसाची तीव्रता कमी झाली होती. आकाश नीरभ्र दिसत होते. हवाही स्वच्छ होती. त्यामुळे अगदीच प्रसन्न वाटत होते. पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाचे पीक जाळल्यामुळे हवा दूषित होती. श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र जम्मूत प्रवेश केल्यापासून हवेतील फरक जाणवायला लागला होता.  

                                                                                        हिमालयाच्या कुशीत  


 नदीच्या पुलावरून चाललेल्या दोन शाळकरी मुली

    एका नदीच्या पुलावरून दोन शाळकरी मुली चालल्या होत्या. त्यांनी कुठे चालला असे विचारले. त्यांना विचारले आज पाऊस पडेल का? त्यांनी सांगितले की पुढचे तीन दिवस पाऊस पडणार नाही. तुम्हाला कसे कळले तर त्यांनी सांगितले की त्यांनी मोबाईलवर पाहिले. त्या शेळ्या घरी घेऊन चाललेल्या मुली होत्या. मोबाईलमुळे त्यांना दैनंदिन वातावरणाचा अंदाज येत होता. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रतिकूल निसर्ग असलेल्या ठिकाणच्या लोकांना होत होता. शिवाय सर्वच स्तरातील व्यक्तींना हे तंत्रज्ञान सहजरित्या उपलब्ध झालेले आहे. मोबाईलच्या आगमनाने काही प्रमाणात ज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केल्याचे दिसते.  

उधमपूरच्या दिशेने पावसात प्रवास  

    रस्ता एकदम चांगला सुरू झाला होता. मात्र चढाईचा होता. वैष्णवदेवीसाठी प्रसिद्ध असलेल्या कटारा येथे पोहचलो होतो. समोर वैष्णवदेवीचा डोंगर दिसत होता. रस्त्याने जाताना एक कारवाला बाजूला थांबून माझ्याशी बोलू लागला. त्याचा मित्र अहमदनगरचा होता. मीही अहमदगरहून आलोलो असल्याने त्याला फार विशेष वाटत होते. त्याच्या मित्राने त्याला आयुष्यात खूप मदत केल्याने तो आजच्या स्तरावर पोहचला होता. त्याबाबत तो कृतज्ञ होता. मलाही त्याने सांगितले की तो माझ्या मुक्कामाची सोय उधमपूरमध्ये करेल. तिथे गेल्यावर त्याने मला फोन करायला सांगितले.  

    माझा महाराष्ट्रातील फोन नंबर बंद होता. जम्मू काश्मिर राज्यात बाहेरील प्रिपेड सिमकार्ड चालत नाहीत. तेथील सिमकार्ड घ्यावे लागते. मीही तेवढेच आपण निवांत राहू म्हणून गेले दोन दिवस स्थानिक सिमकार्ड घेण्याचे टाळत होतो. कोणीही बोलला की त्याचा हॉटस्पॉट घेऊन इंटरनेट चालू करून काही माहिती मिळवायची ते मिळवायची. नंतर मोबाईलपासून १०० टक्के सुटका असा दिनक्रम चालला होता. इंटरनेटशिवाय मोबाईल हातातही घ्यावासा वाटत नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर केवळ गाणे ऐकण्यासाठीच होत होता. आज मात्र अनेकदा मोबाईलची गरज भासली. त्यामुळे उधमपूरला पोहचण्या आधी एक सिमकार्ड घेतले. शिवाय सायकल चालविताना कधी कधी खूप कंटाळा आणि थकवाही येतो. अशा वेळी कोणाशी बोलले की नकळतपणे अंतर कापले जाते. थकवाही दूर होतो. त्यामुळे नवे सिमकार्ड घेतले. फोनशिवाय जगण्याच्या कल्पनेला पुन्हा सुरूंग लागला.  

    अंधार पडू लागला होता. उधमपूर जवळच होते. एका ठिकाणी चहासाठी थांबलो. त्याने सर्व आवराआवर करून बंद केले होते. मात्र त्या दुकानाच्या मालकाचा मित्राने मला कुठून आला ते विचारले. महाराष्ट्रातून आला आहे हे कळल्यावर त्याने मला थांबवून घेतले. मी चहाचे विचारल्यावर त्याने त्या व्यक्तीला चहा करायला सांगितले. त्याने माझ्यासोबत फोटोही काढले. शेवटी निघताना चहाचे पैसे त्याने देऊ दिले नाहीत. संपूर्ण प्रवासात तर चहा आणि जेवणाची विचारणा तर बऱ्याच जणांनी केली होती. पंजाबमध्ये तर अनेकजण स्वत:हून मला म्हणत की आपकी कुछ सेवा करू का? जेवण, चहा वगैरे काही पाहिजे का? मी अनेकांना नम्रपणे नकार दिला होता. मात्र एका अनोळखी व्यक्तीला ज्या सद्भभावनेने ते विचारत होते ती भावना खूपच सुखावून जाणारी होती. त्यांच्या छोट्याश्या चौकशीने नकळत शरिरातील उत्साह वाढत असे. रस्त्याने शाळेत जाणारी युनिफॉर्ममधील गोंडस मुले तर अनेकदा गाडीतून मला हात हलवून बाय बाय करायची. तेव्हा तर सायकलचा स्पीड अचानक खूप वाढत असे. त्यांची निरागसता आणि कुतूहल पाहून फार छान वाटत असे.  

सायकल पाहून कुतूहलाने जवळ आलेली गोड मुले- एकाने विचारले थोडा नाम क्या है! 

    रात्री नऊच्या सुमारास एका ठिकाणी माफक दरात लॉज मिळाला. तेथून जवळच असलेल्या एका धाब्यावर जेवायला गेलो. तिथे जम्मूची प्रसिद्ध खाद्यपदार्थ राजमा चावल मागविला. त्याने तो अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने बनविला होता. चवही लाजबाब होती. तिथे कामाला एक शाळकरी मुलगा होता. त्याचे वय चौदा वर्षे होते. त्याला सहा हजार रूपये महिना पगार होता. त्याने शिक्षण अर्ध्यातूनच सोडले होते. उत्तर भारतात असे बालमजूर अनेक ठिकाणी कामाला बिनधास्त ठेवले जात होते.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

चौदावा दिवस- १ डिसेंबर  २०२३-   उधमपूर ते अनंतनाग  (१33 किमी) 

    पहाटे लवकरच जाग आली. लॉज सोडला. उधमपूरमध्ये एका ठिकाणी चहा घेतला. त्यानंतर काही वेळाने उधमपूर शहर दिसू लागले. हा भाग डोंगराळ असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकवस्ती होती. काही घरे डोंगरात बांधलेली होती. अनेक ठिकाणी घरापर्यत जाण्याचे रस्ते होते. मात्र ते रस्ते अत्यंत धोकादायक अवस्थेत होते. हिमालय पर्वत हा जगातील सर्वात तरूण पर्वत आहे. नैसर्गिक हालचालींमुळे टेथिस समुद्राचे रूपांतर हिमालय पर्वतात झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी समुद्रातील भूरूपे जमिनीवर पाहता येत होती. तसेच हा पर्वत कठीण खडकांचा नसून भुसभुशीत मातीचा आणि दगडगोट्यांचा आहे. एकदा की तो रस्त्यांसाठी फोडला की त्याचे भूस्खलन रोखणे अवघड होते. डोंगरात जाणारे रस्ते त्यामुळे अत्यंत धोकादायक बनले होते. अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन घरे, हॉटेल्स त्यामध्ये गाडले गेलेले दिसले.  

    सभोवतालचा परिसर मनमोहक होता. बर्फाच्छिदित हिमशिखरे आता दिसू लागली होती. रस्त्याच्या बाजूने खोल दरी होती. त्यातून नदी वाहत होती. दहाच्या सुमारास एका ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबलो. प्रेम दि हट्टी या तेथील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात थांबलो. तिथे वेगवेगळे पदार्थ खाऊन पाहिले. तिथे पुण्याहून आलेले काही तरूण भेटले. त्यांचा ग्रुप कारने लेहपर्यत जाणार होता. ते दहा बाराजण असावेत. त्यांच्या बोलीभाषेवरून आणि हावभावावरून मी तर्क काढला की ते बांधकाम व्यवसायात असावेत. त्यांनी माझी विचारपूस केल्यानंतर त्यांना मी तुम्ही काय करता विचारले. त्यांनी सांगितले की ते बांधकाम व्यवसायात आहेत. माझा अंदाज बरोबर आल्याने बरे वाटले.  

    अनेक नव्याने विकसित होणाऱ्या शहरांजवळील गावात एक नवा बांधकाम व्यावसायिकांचा वर्ग तयार झाला आहे. वडिलोपार्जित जमिनींना सोन्याचे भाव आल्याने त्या शेतजमीन मालकांचे मुलांना भवितव्याची फारशी चिंता नसते. जमीन विकून बक्कळ पैसा मिळणार आहे याची त्यांना खात्री असते. त्यामुळे ते मित्रांसोबत निवांत आयुष्य जगत असतात. निवांत राहिल्याने, कोणताही त्रास न घेतल्याने आणि शिस्त नसल्याने त्यांच्या शरिरांची आडवी-तिवडी वाढ झालेली असते. रात्रंदिवस समूहात राहणे, मित्रांसोबत दूरदूरवर फिरायला जाणे, उपजिविकेची अजिबात चिंता न करणे असा त्यांचा दिनक्रम असतो. मग कोणीतरी त्यांची जमीन बिगरशेती करून देते. त्यावर हे मग घरे बांधून विकण्याचा धंदा करतात. जागा स्वत: ची असल्याने फारसे भांडवल लागत नाही. बांधकाम करताना घरांची आगाऊ बुकिंग करून ते पैसा उभा करतात. शिक्षण फारसे झालेले नसते परंतु पैसे यायला लागतात. मग पैशामुळे त्यांना काही फुलटाईम त्यांची साथ देणारे रिकामटेकडे मित्रही मिळतात. मला भेटलेला हा समूहही त्याच वर्गवारीतील होता.  

    प्रेम दि हट्टी पासून काही किलोमीटर गेल्यानंतर चेनानी या गावाजवळ दहा किलोमीटरचा एक मोठा बोगदा लागला. या बोगद्यामुळे पटनीटॉपला न जाता काश्मिरला जाण्याचा जवळचा मार्ग तयार झाला होता. या बोगद्याने जवळपास जम्मू श्रीनगरमधील अंतर चाळीस किलोमीटरने कमी केले होते. या बोगद्याजवळ आल्यावर तेथील सुरक्षा रक्षकाने मला रोखले. या बोगद्यामध्ये सायकलींना प्रवेश नव्हता. त्याने सायकल गाडीत टाकून घेऊन जा असा सल्ला दिला. गाडी मिळत नसल्याने तिथे बराच वेळ थांबलो. तेथील रस्ते पाहून त्या सुरक्षा रक्षकाला विचारले की येथे राहणे फारच धोकादायक आहे. तो म्हणाला पहाडात राहणे खूपच धोकादायक आहे. कधीही दरडी कोसळतात. त्याने शेजारील उध्वस्त झालेल्या एका वास्तूकडे बोट दाखवून सांगितले की मागील वर्षीच तिथे हॉटेल सुरू झाले होते. या वर्षीच्या पावसात तर ते जमिनीखाली दरड कोसळल्याने गाडले गेले. पहाडातील जीवन आधीच धोकादायक असते आणि त्यात रस्ते रूंदीकरणाचे प्रकल्प राबविल्याने तर ते अधिकच धोकादायक झालेले आहेत. डोंगर पोखरल्याने दरडी कोसळण्याचे थांबतच नाहीत. एका व्यवसायिकाने सांगितले की पावसाळ्यात माती घट्ट असल्याने दरडी कोसळत नाहीत, मात्र उन्हाळ्यात माती खुली झाल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण प्रचंड वाढते. या भागातही पर्यावरणाचा विचार न केल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम केले जात होते. त्यावरही दरडी कोसळून ते गाडले जात होते. संपूर्ण रस्त्यावर बांधकाम रस्ते बांधणाऱ्यांचा दरडी कोसळण्यापासून रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न चालले होते. त्या प्रयत्नांना मात्र यश काही मिळत नव्हते. एक अडाणी चालक म्हणाला की लोकांनी पहाडाशी चेडखाणी केली आहे. त्यामुळे पहाड काही आता शांत बसत नाही. रस्त्यावरील अनेक ठिकाणं दरडी कोसळून व्यक्तींच्या झालेल्या मृत्यूचे साक्षीदार आहेत. एकंदरित रस्ते विस्तारीकरणाच्या एक कलमी कार्यक्रमामुळे हिमालयाता मोठी पर्यावरणाची हानी सुरू असल्याचे दिसते. स्थानिक पर्यावरणीय परिस्थितीचा विचार न करता देशातील इतर भागांमध्ये वापरले जाणारेच पर्याय काश्मिरमध्ये वापरले जात आहेत. त्यामुळे तेथील पर्यावरणाची परिस्थिती भयावह झाली आहे.  

    शेवटी एक गाडी भेटली. हर्षद नावाच्या काश्मिरी व्यक्तीने मला व सायकलला त्याच्या गाडीत घेतले. आम्ही बोगदा पार केला. त्यानंतर त्याला विचारले की मी कधी खाली उतरू तर तो म्हणाला मी बरोबर सोडतो चांगला रस्ता आला की. त्यानंतर रस्त्याची कामे, बोगदे असाच क्रमाने रस्ता होता. बऱ्याच ठिकाणी रस्ता रूंदीकरणाची कामे चाललेली होती. एका बाजूला नदीचे पात्र आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर यांमधून तो रस्ता चालला होता. रस्ता रूद केल्यामुळे दरडी कोसळत होत्या. त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी इंजिनिअर्स  हमखास अयशस्वी ठरणारे पर्याय निर्माण करत होते. हर्षद वाणी म्हणाला हा पहाड आता थांबणार नाही. मग त्याने गेल्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी कसे अपघात झाले याची यादीच सांगायला सुरुवात केली.  


बोगदा पार करून द्यायला मदत करण्यासाठी आलेला काश्मिरी युवक हर्षद  

    हर्षद हा बारावीपर्यत शिकलेला होता. त्याचा गाड्यांच्या खरेदी विक्रीचा धंदा होता. आम्ही बनिहालमध्ये पोहचल्यानंतर त्याच्या गाडीतील पेट्रोलच संपले. त्या गावातील एका मित्राला त्याने पेट्रोल आणायला सांगितले. सर्व जुळवाजुळव झाल्यानंतर आमचा पुढील प्रवास सुरू झाला. त्याचा मित्र आणि आम्ही एका ठिकाणी चहा घेतला. त्याचे शिक्षणही बारावीपर्यतच झाले होते. त्याला पुढे का शिकला नाही हे विचारले तर तो म्हणाला तुम्हाला काश्मिरमधील परिस्थिती माहित नाही. इथे कधी काय होईल आणि शाळा-महाविद्यालये किती दिवस बंद राहतील याचा भरवसा नाही. आम्ही सामान्य परिस्थितीत राहत नाही. हर्षदला काश्मिरमधील परिस्थितीबाबत विचारले असता तो म्हणाला अनेकदा आर्मीच्या गाड्या जाण्यासाठी आम्हाला कितीही वेळ ताळकळत ठेवले जाते. त्यामुळे बऱ्याचदा अपमानित झाल्यासारखे वाटते. ३७० कलम हटविल्यानंतर परिस्थितीत काय बदल झाला का? असे विचारले असता तो म्हणाला राजकीय पक्षांकडे सत्ता नसल्याने आंदोलने होत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा नागरिक आंदोलनांमध्ये जे मरायचे ते प्रमाण कमी झाले मात्र स्थानिक नागरिकांना ते कलम हटविणे फारसे आवडलेले नाही. तो पुढे असेही म्हणाला की भारत-पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्तिश: काहीही वैर नाही. दोन्ही देश जर एकच असते तर जगावर राज्य केले असते. मात्र पाश्चात्य देशांनी या दोन्ही राष्ट्रांमध्ये भांडणे लावली. दोन्ही देशातील राज्यकर्त्यांनाही वाटत नाही की हा संघर्ष सुटावा म्हणून. त्यामुळे हा संघर्ष मिटत नाही. अशी मते त्याने व्यक्त केले. हर्षदने मला बनिहालचा जवाहर बोगदा पार केल्यानंतर काझीगुंडला सोडले. तो मला घरी मुक्काम करायला बोलवित होता. त्याला नम्र नकार देऊन पुढील प्रवास सुरू केला.  

    जवाहर बोगदा पार केल्यानंतर खऱ्या अर्थाने काश्मिरचे खोरे सुरू झाले. आतापर्यत जम्मू आणि काश्मिरमध्ये मोठ्या डोंगररांगा आहेत. मात्र नव्याने केलेल्या बोगद्यांनी काश्मिर आणि जम्मूमधील अंतर कमी झाले आहे. अनंतनागच्या दिशेने प्रवास केल्यानंतर वेगळ्याच प्रदेशात आल्याची भावना होऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विशिष्ट अंतरावर बंदूकधारी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान उभे होते. एखाद्या तुरूंगात असल्याचीच भावना होत होती. कुठेही नजर फिरविली तरी वर्दीवरील व्यक्ती दिसत होत्या. अनेकठिकाणी टेहळणीच्या ठिकाणी बंदूकीवर बोट ठेऊन सैनिक सतत दक्षतेने पहारा देत होते. सैनिकांमध्येही एक प्रकारची अनामिक भीती जाणवत होती.  सगळीकडे एक प्रकारची भयावह शांतता होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जिथे जागा असेल तिथे केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा बलाच्या बटालियनला तैनात करण्यसाठी जागा दिलेल्या होत्या. पाचच्या सुमारास एका ठिकाणी चहा आणि नाष्टा घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. काश्मिरमधील बऱ्याचशा ठिकाणांची नावे वर्तमानपत्रांत दहशतवादी हल्ले किंवा लष्करासोबत दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकींमुळे ऐकली गेली होती. अनंतनागही अशाच रितीने वारंवार ऐकलेले नाव होते. आपण अनंतनागमध्ये चाललेलो आहोत तो परिसर कसा असेल याबाबत कुतूहल होते. शहरात पोहचल्यावर सरकारी विश्रामगृह शोधले. तेथे अत्यंत कडेकोट बंदोबस्त होता. त्या ठिकाणी राहण्याचे अडीच हजार रूपये भाडे होते. एकट्यासाठी एवढे पैसे कुठे देता असा विचार करून तिथून बाहेर पडलो. रस्त्याने जात असताना एका सीआरपीएफच्या जवानाने बोलावून घेतले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याने लवकर खोली घेऊन तिथे राहण्याचा सल्ला दिला. रस्त्यावर जास्त फिरू नकोस असे तो म्हणाला. हा भाग सुरक्षित नाही असे त्याने सांगितले. त्यानंतर एके ठिकाणी हॉटेल मिळाले. त्या आवरून खाली येईपर्यत आठ वाजले होते. काही क्षणापूर्वी असलेली रस्त्यावरील वर्दळ संपलेली होती. तिथे चिटपाखरूही नव्हते. सर्व खाण्याचे दुकाने बंद झाली होती. आता आज आपण उपाशी मरणार असे वाटत असतानाच एके ठिकाणी एक हॉटेलमध्ये स्वच्छता चाललेली दिसली. तिथे गेल्यावर जेवणाविषयी त्यांना विचारले. त्यांचे सर्व आवरले. त्यांनी मांसाहार करतोस असे विचारले. मी खायला काय आहे म्हटल्यावर त्यांनी अंड्यासारखी बीफची गोळे केलेली भाजी दाखविली. बीफ नको म्हटल्यावर त्यांनी राजमा चावल दिला. मी तिथे गेल्यावर एक कामगार मला म्हणाला सायकलने श्रीनगरला चाललात काय? मी तिथे तर  पायीच गेलो होतो. याला कसे कळले मी सायकलने श्रीनगरला चाललोय असा प्रश्न मला पडला. त्या भीतीदायक वातावरणात वाटून गेले की आपल्यावर हे लोक लक्ष तर ठेऊन नाहीत ना? तुला कसे कळले मी तिथे जाणार आहे. तेव्हा तो म्हणाला त्याला मी रस्त्याने विश्रामगृहाचा पत्ता विचारला होता. मग जीवात जीव आला. नाही तर वाटले आता आपल्याला आता पकडतात की काय. आधीच सैन्यात असणाऱ्या अनेकांनी मला काश्मिरमध्ये न जाण्याचा सल्ला काळजीपोटी दिला होता. त्यामुळे पुढे काही धोका होईल की काय अशी भीती मनात कधी कधी निर्माण होत असे. काही क्षणांपूर्वीही अशीच भावना काही क्षण मनात निर्माण झाली होती. मात्र त्यांच्याशी बोलल्यानंततर मनातील भावना कुठल्या कुठे पळून गेली. रूममध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा असेच वाटू लागले की दहशतवाद्यांनी येथे येऊन आपल्याला पकडून नेले तर काय करायचे? नेले तर नेले आता झोपले पाहिजे असा विचार आला आणि कधी झोप लागली ते कळले नाही.  

----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

पंधरावा दिवस- २  डिसेंबर  २०२३-   उधमपूर ते अनंतनाग  (६० किमी) 

पहाटे लवकरच जाग आली मात्र बाहेर खूप थंडी आणि अंधार असल्याने सात वाजेपर्यत झोपलो. सकाळी तिथेच हॉटेलबाहेर चहा घेऊन पुढील प्रवास सुरू केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी थंडीमुळे पानगळती झालेली वृक्षे दिसत होती. पाने नसल्याने एक प्रकारची उदासीनता त्यांच्यामध्ये दिसत होती. झाडांप्रमाणेच दोन्ही बाजूंना वर्दीवरील जवानही दिसत होते. अनंतनागमधून मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठा ट्राफिक जॅम लागला. सायकल असल्याने मी सर्वात पुढे गेलो. तिथे जवानांनी काटेरी तार टाकून रस्ता अडविला होता. जसे रेल्वेला जाण्यासाठी इतर वाहनांना फलाटावर रोखले जाते तसेच काटेरी तारेच्या सहाय्याने आम्हाला रोखले होते. नंतर रेल्वेप्रमाणे विशिष्ट अंतर ठेऊन आर्मीच्या गाड्यांचा काफिला मुख्य रस्त्याने चालला होता. त्यासाठी इतरांना रोखले होते. काश्मिरी लोकांसाठी ही बाब नेहमीचीच असल्याने त्याबद्दल त्यांना मानसिक त्रास होतो, असे अनेकांनी सांगितले होते. दुसऱ्या महायुद्धातील चित्रपटांमध्ये ज्यापद्धतीने लष्करी ताफे, गाड्या, गस्तीवरील सैनिक दाखवितात तशीच भावना एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक पाहिल्यावर होत होती. आपण एखाद्या युद्धाच्या आघाडीवर तर नाही आहोत ना असे सातत्याने वाटत होते. जगातील सर्वात जास्त सैन्य तैनात केलेला प्रदेश म्हणून काश्मिर कुप्रसिद्ध आहे. एखाद्या भागाचे लष्करीकरण होणे म्हणजे काय असते याची जाणीव आता होऊ लागली होती.  

    पंम्पोर येथे काश्मिरी कावा पिण्यासाठी थांबलो. तेथील प्रदेश केसरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेजारीच एक सुक्यामाव्याच्या विक्रीचे दुकान होते. तिथे केसरबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की तीनशे रूपये प्रती ग्रॅम केसरचा दर आहे. केसर एवढे का महाग असते विचारल्यावर त्या दुकानदाराने सांगितले की एका फुलात केसरच्या केवळ तीन काड्या येतात. त्या गोळा करणे अत्यंत जिकीरीचे काम असते. त्यामुळे त्याचा दर महाग असतो.  तिथे शिलाजीतही मिळत होते.  

    श्रीनगर आता वीस किलोमीटरपेक्षाही कमी राहिले होते. येथून मागे जसे रस्त्याने अनेक खाद्यपदार्थांचे दुकाने होती तशी दुकाने आता दिसत नव्हती. नाष्टा न केल्यामुळे भूक लागली होती. कुठेतरी खायला काहीतरी मिळेल अशा आशेवर चाललो होते मात्र श्रीनगर येईपर्यत एकही हॉटेल मिळाले नाही. शहरात प्रवेश केल्यानंतर एका मिठाईच्या दुकानात समोसे खायला मिळाले. श्रीनगर शहरात प्रवेश करतेवेळी दोन्ही बाजूंना लष्करी छावणी होती. दोन्ही बाजूंना विविध बटालियनची मुख्यालये होती. या बटालियनमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन तीन गेट पार करावे लागत होते. हल्ल्याच्या भीतीने लष्करी ठिकाणांना कडेकोट बंदोबस्तात ठेवलेले होते. ते सर्व पाहून वाटू लागले काश्मिर हे एक मोठे तुरूंग आहे. तेथील नागरिक मोठ्या खुल्या तुरूंगात बंदिस्त आहेत तर तेथील सैन्य आणि निमलष्करी दलेही भीतीच्या छायेत सतत वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्या मुक्त संचारावर अनेक बंधने आहेत. कडेकोट बंदोबस्ताशिवाय त्यांना बाहेर पडण्याची परवानगी नाही. पृथ्वीवरील स्वर्ग ज्याला म्हणतात त्या काश्मिरचे स्वर्गातून नरकात रूपांतर झालेले जाणवले. तेथे राहणाऱ्यांच्या आणि बाहेरून येणाऱ्याच्या मनाला भीतीने ग्रासलेले असते.  

    शेवटी एकदाचे श्रीनगरला पोहचलो. तेथे पहिल्यांदा भाजपने जगप्रसिद्ध केलेल्या लाल चौकात गेलो. कधीकाळी या चौकात तिरंगा फडकविण्याचे काम धाडसाचे मानले जात होते. तिथे मोठ्या टॉवरवर तिरंगा फडकाविलेला दिसला. तिथे बाजारपेठ असल्याने खूपच गर्दी होती. बाजूला माननीय पंतप्रधानांचा सेल्फी काढण्यासाठी फोटो लावलेला होता.  


प्रवासातील शेवटची मंजील लाल चौक, श्रीनगर  

 

श्रीनगरमधील लाल चौकात 


    लाल चौकात बरेच दलाल फिरत होते. राहण्यासाठी हॉटेल पाहिजे का विचारत होते. त्यातील एक जण खोली बघण्याचा आग्रह करू लागला. त्याला टाळून परतीच्या प्रवासाची चौकशी करण्यासाठी बसस्थानकावर गेलो. तिथे एक व्यक्ती तो पर्यटन विभागाचा अधिकृत दलाल होता. तो जम्मू काश्मिर पर्यटन विभागाच्या कार्यालयात घेऊन गेला. तेथील खोल्यांचे भाडे तीन हजारांपेक्षा अधिक  होते. एकट्यासाठी एवढ्या महागड्या रूमची गरज काय असा विचार केला. त्यांना सांगितले की कमी दरातील दाखवा. त्यांनी त्या दलालाच सांगितले की यांना हॉटेल मिळवून दे. तो मला झेलम नदीवर उभ्या असलेल्या एका बोटीवर घेऊन गेला. त्याठिकाणी राहण्याचे भाडे हजार रूपये होते. लाकडाची पाण्यात बांधून ठेवलेली ती बोट होती. त्या बोटेमध्ये अजून तीन खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत बेडरूम होते. आंघोळीचीही सोय होती. वापरलेले पाणी तसेच नदीत सोडून दिले जात होते.  


 

श्रीनगरमधील झेलम नदीतील अपघाताने आणि स्वस्तात मिळालेले निवासस्थान  

    खोली मिळाल्यानंतर फ्रेश होऊन सायकलने फिरायला बाहेर पडलो. दल लेकजवळ जाऊन काही फोटो काढले. तिथे पर्यटकांची गर्दी झालेली होती. शिकाऱ्यामध्ये बसून फिरायला अनेकजण येत होते. काही काळ तिथे थांबल्यानंतर तेथून परतीचा प्रवास सुरू केला. पंजाबमधील दोन व्यक्ती तिथे रस्त्यावर गरमीचे कपडे विकत होत्या. काश्मिरमध्ये स्वेटर बनविले जात नाहीत. गरमीचे सर्व कपडे पंजाबमधून मागविले जातात. त्यामुळे तिथे काही न खरेदी करता पुन्हा नदीवरील बोटीत मुक्कामासाठी आलो. काश्मिरमधील प्रसिद्ध चांगले जेवण कुठे मिळते याची माहिती काढली. अनेकांनी सांगितले की हॉटेल मुघल दरबारमध्ये चांगले जेवण मिळते. तिथे रात्रीच्या जेवणासाठी गेलो. तेथील जेवण फार काही विशेष नव्हते. महाग मात्र होते. दरवेळे प्रमाणे याही वेळी प्रसिद्ध हॉटेलमध्ये खाऊन पश्चातापाची वेळ आली. सर्वसाधारण जेवणाला खूप जास्तीचे पैसे द्यावे लागले होते.  

श्रीनगरमधील दल लेकाजवळ  

    रात्री बोट बुडाली तर काय ? असा सहज विचार मनात येत असताना झोप कधी लागली तेच कळले नाही. सकाळी लवकर आवरून बसस्थानकावर गेलो. तिथे एका टेम्पे ट्रव्हलरमध्ये सायकल आणि मी दोघेही बसलो. अशा रितीने नगर ते श्रीनगर अशा २२०० किलोमीटर सायकल प्रवासाचा सांगता झाली होती. आणि परतीचा प्रवास सुरू झाला होता. खूप वर्षापूर्वी भारतातील सर्व टोकांना सायकलवर जायचे स्वप्न पूर्ण झाले होते. त्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेत निवांतपणे गाडीत बसून आम्ही जन्मभूमीच्या दिशेने चाललो होतो. प्रवासाचा अजिबात थकवा जाणवत नव्हता. शरिरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. ज्या रस्त्याने सायकलवर गेलो होतो त्याच रस्ताने पुन्हा गाडीत बसून प्रवास चालला होता. त्यावेळी सायकल प्रवासाचा वेगळेपण लक्षात येत होते. सायकलवरून जाताना  अगदी बारकाईने सभोलताल पाहता येतो. हवा, वारा, ऊन, थंडीची प्रत्यक्ष अनुभूती तुम्ही घेऊ शकता. निसर्गाचा प्रत्यक्ष आस्वाद घेतल्यासारखी भावना मनामध्ये निर्माण होत राहते. एक वेगळीच तृप्ती यातून भासत राहते. सोबत एक विचारचक्रही चालू असते. गाडीत बसल्यावर मात्र अशा गोष्टी घडत नाहीत. वेगाने अंतर कापले जाते.  

    दुपारी दोनच्या सुमारास आम्ही जम्मूत उतरलो. आता जम्मूतील लाले दा बाग येथे तैनात असलेल्या बावीस महार बटालियनमध्ये जायचे होते. त्यापूर्वी सायकल रेल्वेस्थानकातील क्लॉक रूममध्ये ठेऊन आलो. त्यानंतर एका रिक्षाने तिकडे निघालो. रिक्षाचालक  हा सरदारजी होता. तो जम्मूचा रहिवाशी होता. त्याने तीनशे रूपये भाडे घेऊन तिथपर्यत यायचे कबूल केले. प्रवासादरम्यान आम्ही बोलत होतो. त्याला ३७० कलम रद्द केल्याचे काही फायदे झाले का? असे विचारले असता तो म्हणाला ते कलम रद्द केल्याचा तोटाच झाला. राज्याबाहेरील व्यक्तींचा लोंढा आता वाढला आहे. कोणी कुठेही कसलाही गाडा टाकून व्यवसाय सुरू करत आहे. राज्यात चोरीचे-दरोड्याचे प्रमाव वाढले आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे, असे तो म्हणत होता. ३७० कलम रद्द केल्याने राज्याचा तोटा झाला अशी त्याची भावना होती.  

    दुपारी चारवाजेपर्यत बटालियनमध्ये पोहचलो. पुन्हा सुखरूप परत आल्याचे पाहून तेथील सैनिकांना खूप आनंद झाला. कांबळे साहेबांकडे चहा घेऊन आम्ही अखनूरला ५७ महाराष्ट्र बटालियनमधून निवृत्त झालेल्या सुबेदार पदम सिंह यांच्याकडे जाणार होतो. मात्र कांबळे साहेब सुबेदार मेजरची जबाबदारी पार पाडत असल्याने त्यांनी माझ्यासोबत येण्यास असमर्थता दाखविली. त्यांनी ठरविले तर सहज येऊ शकले असते. मात्र सैन्यात एकदा वरिष्ठांनी जबाबदारी दिली की ती कोणतेही कारणे न सांगता पार पाडली जाते. कांबळे साहेबांनाही आपली जबाबदारी माहित असल्याने त्यांनी बटालियन सोडून येण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात रूजलेली कर्तव्यदक्षता दिसून येते. त्यांनी मला सोडविण्यासाठी एका सुबेदाराला पाठविले. आम्ही अखनूर जवळ पोहचल्यावर तिथे एका पुलावर मोठा ट्राफिक जॅम लागला. अंधार पडू लागला होता. माझ्यासोबत आलेल्या फौजीने सांगितले की या भागात अंधार पडल्यानंतर फौजींना धोका आहे. त्याठिकाणापासून पाकिस्तान सिमा केवळ चाळीस किलोमीटरच होती. त्यामुळे त्यांना माघारी जाण्यास सांगून मी तेथून पुढे पायी गेलो. पदमसिंह यांचे चिरंजीवांनी मला घेऊन त्यांच्या घरी नेले. पदम सिंह सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तिथेच राहू लागले होते. त्यांनी तिथे एक रिसॉर्ट सुरू केला होता. त्यांच्या घरी देशी-विदेशी दारूंचा मोठा बार होता.  

     त्यांचे वडील सैन्यात होते. त्यांचा लहाण भाऊ कारगील संघर्षात शहीद झाला होता. पदमसिंह याचे घर खूप मोठे होते. त्यांनी गावातील इतर फोजींचे घरेही दाखविली. घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्यांनी केली होती. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सर्वजण आयुष्याची सर्व कमाई घरामध्ये गुंतवतात. त्यामुळे त्या गावात मोठ मोठी घरे दिसत होती. त्यांचा पाहुणचार घेतल्यावर सोमवारी ४ डिसेंबर २०२३ ला पुन्हा बटालियमध्ये परत आलो.  

    दहा वाजता बटालियनच्या मुख्यालयात मला बोलविण्यात आले. मी श्रीनगरला गेल्यानंतर कांबळे साहेबांनी त्यांच्या कमांडिंग अधिकाऱ्याला सांगितले की त्यांचा एक मित्र महाराष्ट्रातून सायकलवरून थेट श्रीनगरला गेला आहे. त्यांना त्यांनी सांगितले की परत आल्यावर मला भेटायला सांग. त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी मी तिथे गेलो होतो. तिथे बटालियनची दैनंदिन कामे चालली होती. काही सैनिकांना सुट्टीवर जायचे होते. त्यांना परवानगी देण्यासाठी कमांडिंग अधिकाऱ्याने त्यांना बोलविले होते. त्या सर्वांची मुलाखत झाल्यानंतर त्यांना सुट्टी मंजूर करण्यात आली. सुट्टी मिळेल की नाही याची खात्री नसल्याने त्यांनी कोणीही रेल्वेचे तिकीट काढलेले नव्हते. अचानक सुट्टी मिळाल्याने जो तो मिळेल त्या मार्गाने तेथून बाहेर पडला. या बटालियनमध्ये असलेल्या सैनिकांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. कँम्पस सोडून ते बाहेर पडू शकत नाहीत. एक प्रकारे त्यांना नोकरीच्या ठिकाणी तुरूंगातच असल्याची भावना असते. शिवाय जम्मू-काश्मिरमध्ये तर सैनिकांच्या हालचालींवर सुरक्षिततेच्या कारणांने अनेक बंधने आहेत. त्यामुळे तिथे नोकरीला असणाऱ्याच्या मनात एका खुल्या तुरूंगातील कैदेत असल्याची भावना असते. त्यामुळे ज्यांना ज्यांना सुट्ट्या मिळाले ते सर्वजण लगेचच कँम्पसच्या बाहेर गेले. मिळेल त्या गाडीने त्यांनी जम्मूतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. काहींना रेल्वेचे आरक्षण मिळाले नाही. जमेल तसा प्रवास करून त्यांचा घर गाठण्याचा प्रयत्न केला. घरी गेल्यानंतर सैनिकांकडून प्रत्येकजण वेगवेगळ्या अपेक्षा करत असतो. घरच्यांना वाटते त्याने आपल्याला पैसे द्यावेत, कँन्टीनमधील सामान आणावे, बायकोला वाटते फिरायला घेऊन जावे, मित्रांना वाटते दारू पाजावी. त्याला कोणीही विचारत नाही की कशा पद्धतीने राहतोस, तिथे काय अडचणी आहेत. सुट्टीला आल्यानंतर सुट्टी त्याच्यासाठीही असते हे कुटुंबातील बहुदा सर्वच जण विसरतात.   

    त्यानंतर कमांडिग अधिकारी मला भेटायला आले. त्यांनी सायकल प्रवासाबाबत विचारले. त्यांना मी एकट्याने एवढा प्रवास केला याचे फार विशेष वाटत होते. त्यांनी कांबळे साहेबांना मला काही गिफ्ट द्यायला सांगितले. बटालियन एखाद्या व्यक्तीने विशेष कामगिरी केल्यानंतर त्याला जे बक्षीस देतात अशी पितळाची ट्रॉफी मला त्यांनी सन्मानपूर्वक दिली. माझी काळजी घ्यायला सांगितले. ते गडबडीत होते. त्यांना खूप बोलायचे होते, मात्र एका कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी माझा निरोप घेतला.  

 

जम्मूस्थित बावीस महार बटालियनचे कमांडिंग अधिकारी कर्नल अजय सिंग राना आणि सुबेदार मेजर दिपक कांबळे  

    त्यानंतर दिवसभर मी बटालियनचे कामकाज पाहत होतो. सकाळी साडेपाचला त्यांची पीटी सुरू होते. त्यानंतर आठपासून त्यांचे नियमित कामकाज चालू होते. एक वाजता जेवणासाठी सुट्टी होते. त्यानंतर तीन वाजता सर्व सैनिका वर्किंगसाठी एकत्र येतात. रात्री सात वाजता रिपोर्ट दिला जातो. त्यानंतर प्रत्येकाला नेमून दिलेल्या ठिकाणी ड्युटीसाठी जावे लागते. एखाद्याने रात्रभर ड्युटी केली असली तर त्याला पुन्हा पीटीला जावेच लागते. कांबळेसाहेबांना तर दररोज दुपारचे जेवण दुपारी चारनंतरच भेटत होते. रात्रीचे अकरानंतर. त्यांचे कमांडिंग अधिकारी गेल्यानंतरच ते जेवत होते. दिवसाचे चोवीस तास सैनिक कामावर असतो. त्याला कुठेही नकार द्याण्याचा किंवा आळस करण्याचा अधिकार नसतो. सैन्याच्या शिस्तिने त्यांच्यामध्ये नाही म्हणणे किंवा एखाद्या गोष्टीला वरिष्ठांना नकार देणे शक्यच नसते. काहीही झाले तरी आज्ञा पाळाव्यात लागतात.  

    मी कांबळे साहेबांच्या कार्यालयात बसून कामकाज पाहत होतो. ते त्यांच्या खालच्या पातळीवरील अधिकाऱ्याला सूचना देत होते. कामांचे वाटत करत होते. ज्याला काम दिले आहे तो त्याला काम सांगितलेल्या व्यक्तिला काही तरी कारणे सांगून ते काम दुसरा करेल की काय याची चाचपणी करत असे. मात्र तो जेव्हा कांबळे साहेबांकडे येत तेव्हा ते काम मुकाट्याने करण्याचे कबूल करत असे. सैन्यात वरिष्ठांचे आदेश पाळावेच लागतात. एकंदरित सैनिकी शिस्तित सर्व कारभार चालला होता.  

    त्या बटालियनमध्ये महाराष्ट्रातील अनेकजण नोकरीला होते. भारत दुन्गव, महेश खंदारे, अजय गिरी, विष्णू निंज यांची मेसमध्ये ड्युटी होती. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. दोन दिवस काहीही कमी पडू दिले नाही. त्यातील अनेकांनी आपले कुटुंबिय सोबत आणले होते. मात्र त्यांना घरी जाण्यास वेळच मिळत नसे. भारत दुन्गव हा बीडचा जवान होता. त्याची दोन वर्षापूर्वी अरूणाचलमध्ये पोस्टींग होती. तो सुट्टीवर येत असताना त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. त्या गाडीतील तीनजण जागच्या जागी ठार झाले. एकाचा मृतदेह तर अद्याप सापडलेला नाही. भारत त्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या वाचला होता. त्याची काही हाडे मोडली होती. मात्र आता तो ठिक ठाक झाला होता. त्या बटालियनमधील दोन जवानांची प्रतिनियुक्ती राष्ट्रीय रायफल्समध्ये झाली होती.  

    भारतीय लष्करातील जवानांना राष्ट्रीय रायफल्समध्ये दोन वर्षासाठी नियुक्तीवर जावे लागते. काश्मिरमधील दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी या दलाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी नोकरी करणे अत्यंत जोखमीचे असते. कांबळे साहेब त्यांना कारवाईला (अंम्बुशला) जाताना काय काळजी घ्यायची याचे मार्गदर्शन करत होते. नेहमी आड घेऊनच थांबायचे. हेल्मेट आणि चिलखत कधीच काढायचे नाही. अशा काही महत्त्वाच्या सूचना सांगत होते. त्यांनंतर त्यांच्यासोबत झालेली एक घटना त्यांनी सांगितली. ते एकदा दहशतवाद्यांच्या शोधमोहिमेवर गेले असता त्यांच्या गटातील एका सदस्याने अंधारात समोरून जाणाऱ्या व्यक्तीला विचारले, किस पार्टी के हो? कमांडर की टू आय सी के? तो व्यक्ती दहशतवादी होता. त्यांना लगेचच फायरिग सुरू केली. त्यात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला. कांबळे साहेब नशिबाने वाचले. ते सांगत होते की अंम्बुशला गेलो की आपल्या श्वासाचाही आवाज येऊ असे वाटत असते. खूप काळजी घ्यावी लागते नाही तर कोणत्या दिशेने मृत्यू येईल सांगता येत नाही. आपण अनेकदा दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचत असतो. त्याचे फारसे काही वाटत नाही. मात्र जेव्हा एखादा त्यात सहभागी झालेला आपल्या परिचयाचा किंवा जवळचा असतो तेव्हा त्याची दाहकता कळते. कांबळे साहेबांनी अशा अनेक घटना सांगितल्या. तेव्हा सहज वाटून गेले की आपण किती सुरक्षित आहोत. काश्मिरमध्ये नोकरीला असलेल्या सैनिकाला सतत भीतीच्या छायेत वावरावे लागत असते. कोठून, कधी, कसा हल्ला होईल हे सांगता येत नाही. त्याचा त्याच्यावर कसा आणि किती मानसिक तणाव येत असेल याचे मोजमाप करणे अवघड असते. शिवाय तेथे अत्यंत प्रतिकूल अशा थंडीत नोकरी करावी लागते. एकाच वेळी पर्यावरणाशी आणि दुसऱ्या वेळी दहशतवाद्यांशी लढा द्यावा लागतो. या तुलनेत आपले काम आणि जीवन किती सुरक्षित आहे याची जाणीव झाली. आपणास असलेल्या कामाचा बाऊ न करता ते अधिक चांगले करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवले. कारण आपण इतरांच्या तुलनेत फारच नशीबवान आहोत. हे समजत होते.  

    रात्री बारा वाजता झेलम रेल्वेने नगरला जायचे होते. अद्याप तिकीट कन्फर्म झाले नव्हते. सायंकाळी पाच वाजता रेल्वे स्थानकावर जाऊन सायकल पार्सलमध्ये टाकायची होती. सहावाजता तिथे गेलो तर ते म्हणाले की कन्फर्म तिकीट असल्याशिवाय सायकल पार्सलमध्ये टाकता येत नाही. झेलमचा चार्ट तयार झाला नव्हता. त्यामुळे तिकीट कन्फर्म होईल की नाही हे सांगता येत नव्हते. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की पाचशे रूपये द्या मी सायकल पाठविण्याची व्यवस्था करतो. चार्ट तयार होण्यापूर्वीच त्याने बहुदा आतून माहिती विचारून माझी सायकल बुक करून दिली. त्यांनी माझ्या घाईचा गैरफायदा घेतला होता.  

    पुन्हा बटालियनमध्ये गेलो. कांबळे साहेबांनी स्टेशनवर जाण्यासाठी माझ्यासोबत एका जवानाला दिले होते. रात्री आम्ही सोबत जेवण केले. अकराच्या सुमाराच्या बटालियनच्या जिप्सीमध्ये कांबळे साहेब, एक सुरक्षा रक्षक आणि मी स्टेशनपर्यत गेलो. त्यांनी मला रेल्वेत बसवून दिले. त्यांच्या आदरतिथ्याने अत्यंत भरून आले. फारशी ओळख नसतानाही बटालियनमधील प्रत्येकजण माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत होता. काळजी घेत होता. रेल्वेत चांगले जेवण मिळत नाही म्हणून दोन दिवस पुरेल एवढे जेवण तयार करून व्यवस्थित बांधून दिले होते. भारतने तर घरून चटणी आणि लोणचे आणून दिले. जाताना कांबळे साहेबांनी मला त्यांच्या बटालियनचा अधिकृत ट्रॅक सुट घेऊन दिला. त्यांच्या पाहुणचाराने मी भारावून गेलो. त्या बटालियनमध्ये मी केवळ दोन रात्री काढल्या होत्या. मात्र बटालियनमधील सर्वजण आपले कोणीतरी नात्यातले आहेत आणि त्यांचा आणि आपला वर्षानुवर्षांचा संबंध आहे असे वाटत होते. कांबळे साहेबांनी स्टेशनवर निरोप दिला.  

बटालियनमधील जवान भारत दुन्गव आणि  महेश खंदारे जम्मूतील मुक्कामात खूप मदत केली 

    टिकीट कन्फर्म झाले नव्हते. मात्र दोघांमध्ये एक सीट ज्याला आरएसी म्हणतात ते झाले होते. जम्मूत बसल्यावर दुसरा सहप्रवासी आला नव्हता. त्यामुळे रात्रभर एकट्याला झोपायला जागा मिळाली. सकाळी तो अंबाल्यातून बसला. त्यानंतर आम्हाला दोघांना त्या सिटवरून प्रवास करावा लागला. त्या डब्यामध्ये पार्थडीचा एक सीआरपीएफमधील एक जवान बसलेला होता. तो श्रीनगरहून सुट्टीवर चालला होता. त्यानेही सांगितले की काश्मिरमध्ये नोकरी करणे फार धोकादायक आहे. दुसऱ्या दिवस प्रवासात गेला. रात्री मात्र आम्हाला दोघांना एकाच सीटवर झोपावे लागले. झोप काही आली नाही. सहज विचार केला सायकल चालविण्यापेक्षा तर आराम भेटत आहे ना? मग कशाला त्रास करून घ्यायचा. ती ट्रेन पाच तास उशीरा चालली होती. नगरला तिने बारा वाजता पोहचणे अपेक्षित असताना ती सायंकाळी पाचला पोहचली.  

    रेल्वेस्थानकावर मला घ्यायला आमची एनसीसीचे छात्र आले होते. त्यांना येऊ नका असे सांगितले असूनही ते आले होते आणि काही तास वाट पाहत थांबले होते. त्यांचे प्रेम पाहून आपण खूपच नशीबवान आहोत अशी भावना मनामध्ये निर्माण झाली. सर्वांनी आमचे स्वागत केले. आणि मला ते आमच्या घरी घेऊन गेले. १८ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू झालेला अत्यंत समृद्ध करणारा सायकल प्रवास ६ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा घरी सुखरूप येऊन संपला होता.  


रेल्वेस्थानकावर घ्यायला आलेली आमची प्रिय छात्रं  

    सैन्यात कर्नल असलेला नगरचा नरेश वाबळे सतत सांगत असतो की नगरचे लोक स्वर्गात आहेत. हे तो का म्हणायचा याची जाणीव या प्रवासानंतर झाली. ऊन नाही, थंडी नाही, जास्त पाऊन नाही. निसर्गाशी लढा नाही. इतर ठिकाणच्या व्यक्तींना मात्र सतत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात राहावे लागते. जगण्यासाठी निसर्गाशी लढा द्यावा लागतो. त्या तुलनेत आपल्याकडे अनूकुल निसर्ग असल्याने तो संघर्ष नाही. त्यामुळे आपण खूपच भाग्यशाली आहोत असे वाटू लागले. तसेच नोकरीही ही सैन्यातील नोकरीसारखी आव्हानात्मक आणि जिविताला धोका असणारी नाही, त्यामुळे कोणत्याही कामाचा बाऊ न करता जेवढे काम करणे शक्य आहे तेवढे केले पाहिजे हे वाटू लागले. सैन्यात जसे जबाबदारी दिल्यावर ती पार पाडली जाते तसेच आपणही करायचे असा विचार पक्का झाला. दरवेळेप्रमाणे याही सायकल प्रवासाने आळसावर मात केली होती. जीवनाला समृद्ध करणारे अनेक नवे अनुभव दिले होते. अर्थपूर्ण जीवन जगण्याची नवी दृष्टी दिली होती. आणि भारताच्या चारही टोकांना सायकलवर जायचे स्वप्नही पूर्ण झाले. आता सायकल पर्यटन थांबणार का? घरी येताना भारतातील इतर अनेक नवे मार्ग खुणावत होते.  

आवडले असेल तर सायकल घ्या आणि शक्य असेल तिकडे जा. नक्कीच खूप आनंद आणि वेगवेगळे  अनुभव मिळतील, याची खात्री देतो. 

धन्यवाद.  


अंकुश पाराजी आवारे  

मो. 7588359518 

Email – ankushaware@gmail.com 

  







© All Rights Reserved by Editor: Vinod Khade (please Get Permission to Use)