अहमदनगर ते रामेश्वर (धनुषकुडी ) सायकल प्रवास - Ahmednagar to Rameshwar (Dhanushkudi) Cycle Journey
अहमदनगर ते रामेश्वर सायकल प्रवास
अहमदनगर ते रामेश्वर (धनुषकुडी) १५ ऑगस्ट २०२३ ते २३ ऑगस्ट
२०२३, १९० तास, १५५० किलोमीटर
दिवस पहिला अहमदनगर ते करमाळा – १०० किलोमीटर
११ ऑगस्ट
२०२३ रोजी मी आणि माझा मित्र सुनील फुलसावंगे सायंकाळी चहासाठी एकत्र जमलो. तेव्हा
त्याने मला सहज सांगितले तो स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यावर कन्याकुमारीला
सायकलवर जाणार आहे. ते ऐकून मला धक्काच बसला.
मी त्याला म्हटले अरे पावसाचे दिवस आहेत. प्रवासात प्रचंड हाल होतील. मात्र
तरीही तो आपल्या निर्धारावर ठाम होता. त्याने प्रवासाचा मार्ग आणि नियोजनही मला
दाखविले. तो कन्याकुमारीपर्यत सहाच दिवसांत (कागदावरील नियोजनाप्रमाणे) जाणार
होता. तो पहिल्यांदाच अशा दिर्घपल्ल्याच्या सायकल सफरीवर जात असल्याने त्याने
केलेले नियोजन आव्हानात्मक वाटले. मला मागील वर्षी कन्याकुमारीला जायला बारा दिवस
लागल्याने एवढ्या कमी वेळेत हा कसा जाईल याबाबत मनात शंका निर्माण झाली. नंतर
वाटले त्याने एकाच दिवशी ३६० किलोमीटरचा प्रवास सायकलवर केलेला असल्याने तो हे सहज
करू शकेल. त्याला मी शुभेच्छा दिल्या. मनात थोडी हूरहूरही झाली. हा एकटाच जाणार.
आपल्याला जाता येणार नाही. असा विचार करत असतानाच सहज विचार आला की याच्या
नियोजनाप्रमाणे आपण जर याच्यासोबत चार दिवस गेलो तरी एक हजार किलोमीटरचा पल्ला आपण
सहज पार करू शकतो. अनेक दिवस म्हैसूरला सायकलवर जाण्याचा विचार होता. ती संधी हीच
आहे, असे वाटले. मी तुझ्यासोबत
म्हैसूर-उटी पर्यत येईल, असे मी त्याला सांगितले. आज एक नवा धडा मिळाला होता की
विचार केला की आपल्याला अनेक पर्याय सुचतात. पर्यांयाचा शोध मात्र घेतला पाहिजे.
त्यानंतर मी महाविद्यालयात तीन दिवसांच्या
सुट्टीचा अर्ज केला.
मंगळवार
ते रविवार असा पाच दिवस प्रवास करून रविवारी रात्री बसने नगरला यायचे असे मी
नियोजन केले होते. जायचे ठरल्यानंतर फारच उत्साही वाटू लागले. जाण्यासाठी खरेदी
करायला सुरुवात केली. स्वातंत्र्यदिनाची तयारी महाविद्यालयात करायची असल्याने
त्यात खूप दमत होतो मात्र आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर जायचे असल्याने अनोखा उत्साह
शरिरात संचारला होता. त्यामुळे कामाचे काही वाटत नव्हते. कधी एकदा आपण प्रवासाला
निघतो असे झाले होते. शेवटी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाला. आणि दुपारी एकच्या
सुमारास आम्ही नगर सोडले. सायकल प्रवास करताना आपले प्रचंड हाल होणार हे माहित
असूनही त्या प्रवासाला सातत्याने का जावे वाटते असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला
होता.
स्वातंत्र्यादिनाच्या
तयारीसाठी आम्ही दोघेही सकाळी चार वाजता उठलो होतो. त्यामुळे थकवा जाणवत होता.
मात्र प्रवासाच्या उत्साहाने थकव्यावर मात केली होती. नगर-सोलापूर रोडवर आम्ही
दुपारी चार वाजता चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलो. तिथे जारच्या पाण्याची विक्री
केली जात होती. पाणी घेऊन तिथेच जेवन करावे असा विचार आम्ही केला. त्या व्यक्तिला
जेवनाबाबत विचारले. त्याने आनंदाने आम्हाला बसा असे सांगितले. तुम्ही आमच्या दारात
जेवतात म्हणजे आम्हीच तुम्हाला खाऊ घालतो असा त्याचा अर्थ आहे. अशी पुष्टी त्यांनी
जोडली. आम्हाला सायकलवरून बॅगा काढायच्या आत त्यांनी आमच्यासाठी एक जग भरून पाणी
आणून दिले. त्यांच्या या कृतीने आम्ही सद्दगदित झालो. त्यांच्या वागण्याचा फारच
चांगला परिणाम आमच्यावर झाला. घरून आणलेला डबा आम्ही तिथे खाल्ला. भरदुपारी सायकल
चालविल्यामुळे आलेला थकवा आता निघून गेला होता. शरिराला नव्याने उर्जा मिळाली
होती. त्यामुळे आमच्या सायकली आता जोरात पळू लागल्या.
दरम्यान
पुन्हा कन्याकुमारीला का जायचे असा प्रश्न मला पडत होता. यावेळी काहीतरी वेगळा
प्रयोग केला पाहिजे असा विचार केला. त्यातून असा विचार पुढे आला की यावेळी लॉजवर
नाही राहायचे. मित्रालाही तो मनोदय सांगितला. त्यानेही कबुली दिली. दरम्यान आम्ही
मजल-दरमजल करत करमाळा येथे पोहचलो. रात्रीचे सात वाजले होते. आज आम्हाला किमान
दिडशे किलोमीटर अंतर पार करायचे होते. आता मात्र शंभरच पूर्ण झाले. चहा पेऊन पुढे
निघायचा विचार असतानाच अचानक जोरात पाऊस सुरू झाला. आता थांबण्याशिवाय पर्याय
नव्हता. त्यामुळे आम्ही करमाळ्यात रात्रीचा मुक्काम करायचे ठरविले. करमाळ्यात
शासकीय विश्रामगृह आहे. तिथे जाऊन राहण्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले
की दोन्ही खोल्या आरक्षित आहेत. तुम्हाला जागा मिळणार नाही. सार्वजनिक बांधकाम
विभागात काम करणाऱ्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर तेथील चौकीदार आम्हाला खोली
देण्यास तयार झाला. त्याला तीनशे रुपये द्यायचे ठरले.
महाराष्ट्र
शासकीय कर्मचाऱ्यांशी ओळख असल्याशिवाय विश्रामगृहात राहता येत नाही. मागील वर्षी
कन्याकुमारीला जातानाही केरळमध्ये अशीच अवस्था झाली होती. मात्र तेथील विश्रामगृहात
कोणालाही राहता येते. केवळ ऑनलाईन बुकींग करायचे असते. दोन्ही राज्यातील
नागरिकांच्या सुविधांबाबतचा फरक जाणवला. आजचा दिवस तुलनेने समाधानकारक होता.
दुपारी निघूनही मोठा पल्ला गाठला होता. मात्र त्याचवेळी पावसामुळे पुढील प्रवासात
व्यत्यय येण्याची भीतीही मनात निर्माण झाली.
दिवस दुसरा करमाळा (जि सोलापूर )- बसगाव, (ता. जत जि. सांगली) १५७ किलोमीटर
पहाटे
लवकर उठूनही आम्हाला निघायला उशीर झाला. सहाच्या सुमारास आम्ही तिथून निघालो.
रस्ता चांगला होता. कालचा थकवाही निघून गेला होता. आज विजापूरपर्यत पोहचायचे असे
आम्ही ठरविले होते. टेंभूर्णीहून विजापूरला जायला तीन वेगवेगळे रस्ते होते. आम्ही
पंढरपूरमार्गे जायचे ठरविले. दुपारी बारा वाजता पंढरपूरला पोहचल्यावर तसेच पुढे
मंगळवेढ्याला जायचे. तिथेच दुपारचे जेवन करायचे ठरविले. रस्त्यांनी जाणाऱ्यांना
चांगले जेवन कुठे मिळते, असे विचारले असता त्यांनी ‘सुगरण’ नावाच्या एका हॉटेलचे नाव आम्हाला
सांगितले. ते हॉटेल अत्यंत सुंदर होते. तेथील वातावरण आल्हादायक होते, खाद्यपदार्थाच्या किंमती खूप होत्या मात्र जेवन काही फार रूजकर नव्हते. अतिरिक्त
पैसे देऊनही जेवनाचे समाधान मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा अशा रेस्टॉरंटस् मध्ये
जेवायचे नाही असे आम्ही ठरविले.
त्या
हॉटेलमध्ये आम्ही पाणी मागितल्यानंतर वेटरनी आम्हाला बॉटलीबंद पाणी आणून दिले. ते
आम्ही नाकारून साधे पाणी मागितले. तिथे आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या माथी ते
बाटलीतील पाणी मारत होते. काही वेळेनंतर त्या हॉटेलचा मालकच तिथे जेवायला बसला.
त्याने बाटलीतील पाणी न मागता साधेच पाणी तो पित होता. त्यावेळी जाणवले की केवळ
संकोचामुळे ग्राहक साधे पाणी मागत नाहीत. किंबहुना प्रत्येक उपहारगृहाची जबाबदारी
असते की त्यांनी स्वच्छ आणि शुद्ध पाणी ग्राहकास उपलब्ध करून देणे. मात्र ते न होता प्रत्येक जणाला बाटलीतील पाणी पाजले
जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टीकचा कचरा निर्माण होतो. आणि पर्यावरणाचे
प्रदूषण आणि विद्रपीकरण घडते.
दुपारी
ऊन भयंकर लागत होते. अशा ऊन्हात सायकल चालविणे शक्यच वाटत नव्हते. त्यामुळे तिथेच
आम्ही चार वाजेपर्यत आराम केला. सायंकाळी पाच वाजता आम्ही तेथून निघालो. त्यानंतर
मंगळवेढा गावातील एका चहाच्या टपरीवर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो. तिथे आम्हाला
काही स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भेटले. त्यांच्याशी चर्चा
केल्यानंतर ते सध्याच्या राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबाबत नाराज
असल्याचे जाणवले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत
असल्याचे त्यांनी सांगितले. ते शरद पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे त्यांनी
सांगितले. त्यांनी आम्हाला चहाचे बिल देऊ दिले नाही. त्यांच्याशी गप्पा
मारल्यानंतर उत्साह वाढला. सायकल चालविताना बऱ्याचदा नुसते कोणी भेटले, बोलले,
किंवा हात उंचावला तरी उत्साह वाढतो. सायकल चालवून आलेला थकवा निघून जातो.
सायंकाळी
उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर सायकलचा स्पीड वाढला होता. रात्री आठ वाजता आम्ही
एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलो. तेव्हा अचानक जोरात पाऊस सुरू झाला. आज
आम्हाला विजापूरला पोहचायचे होते. अजून पन्नास किलोमीटर अंतर राहिले होते. पाऊस
थांबल्यानंतर पुन्हा चालायचे असे आम्ही ठरविले होते. आठ वाजत आले तरी पाऊस थांबला
नव्हता. दरम्यान चहाच्या टपरीवर गप्पा मारताना तेथील दोन प्राथमिक शिक्षकांशी आमचे
बोलणे वाढले. त्यांनी आम्हाला गावातच मुक्काम करण्याचा सल्ला दिला.
त्या
गावात लॉज नसल्याने आम्हाला त्यांनी गावातील शाळेत राहण्यास सांगितले. राहण्याचा
प्रश्न सुटल्यावर जेवनाचा प्रश्न निर्माण झाला. गावात एकच धाबा होता. तोही आज
अमावस्या असल्याने बंद होता. त्यामुळे आमच्या जेवनाचे काय करायचे हा प्रश्न
आम्हाला आणि आमच्याशी टपरीवरील गप्पा मारणाऱ्यांपुढे पडला होता. गावातील
शिक्षकांनी त्या टपरी चालकाला आम्हाला भात-सांबार करून द्यायची विनंती केली. तो
त्याला नकार देत होता कारण त्याचा मुलगा आजारी होता. पण आमच्या जेवनाची सोय होत
नाही हे त्याला जाणवल्यावर त्याने आम्हाला जेवन देण्याचे कबूल केले. त्याने भात
आणि सांबर करून दिले. त्याने आमच्याकडून केवळ साठ रूपये घेतले. त्याने दिलेले जेवन
दुपारच्या महागड्या हॉटेलपेक्षा खूपच रूचकर आणि स्वस्त होते. आणि ते खाऊन कोणताही
त्रास होणार नव्हता. त्या व्यक्तीने अनपेक्षितपणे दिलेल्या जेवनाने आम्ही तृप्त
झालो. रोडवरील साध्या टपऱ्यांमध्ये किंवा खानावळींमध्ये चांगले जेवन मिळते. आणि
स्वस्तही. प्रवासात अशाच ठिकाणी जेवले तर शरिराला आणि खिश्यालाही त्रास होत नाही.
याचा अनुभव आज पुन्हा आला.
आमची
राहण्याची सोय एका प्राथमिक शाळेत करण्यात आली होती. तिथे रात्रभर डासांच्या
सहवासात आणि विनाफॅन काढली. पहाटे आम्ही सार्वजनिक ठिकाणच्या नळावर आंघोळ करून पाच
वाजता निघालो. पहाटे रस्त्यावर केवळ आम्ही दोघेच होतो. बसगावातील नागरिकांनी
सांगितल्या प्रमाणे पुढील पन्नास किलोमीटर कोणतेही हॉटेल किंवा राहण्याची व्यवस्था
नव्हती. रात्री त्या भागात जोरदार पाऊस पडल्याचे जाणवत होते. आम्ही केवळ
योगायोगाने त्या गावात चहासाठी थांबलो होतो. मात्र तेथील नागरिकांनी आम्हाला तिथेच
मुक्काम करण्याचे सुचवून आमच्यावर मोठा उपकार केला होता. तसेच पुढील मार्गात एका
ठिकाणी रात्री गाड्या अडवून लुटल्या जातात अशी माहितीही त्यांनी आम्हाला दिली.
त्यांनी वर्णन केलेले टिकाणही आम्हाला सकाळी दिसले. आम्हाला त्या नागरिकांच्या
स्वरूपात फरिश्तेच मिळाले होते. आम्ही तिथे न थांबता पुढे जर गेलो असतो तर आमच्या
हालांना पारावार उरला नसता. याची प्रकर्षाने जाणीव सकाळी सायकल चालविताना होत
होती. आम्ही मनोमन त्यांचे आभार मानले आणि पुढील प्रवास सुरू केला.
आम्ही
थांबलेले बसगाव हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कानडी भाषिकांचे गाव होते.
या तालुक्यातील चाळीस गावांतील बहुसंख्य नागरिकांची मातृभाषा ही कानडी आहे. या गावांतील
शाळाही कानडी भाषिक आहेत. ही गावे कानडी भाषिक असल्याने महाराष्ट्र शासनाचे
त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. तर
भौगोलिकदृष्या कर्नाटकाच्या समीप असूनही महाराष्ट्रात असल्याने त्यांना कर्नाटक
सरकारच्या जलसिंचनाच्या सुविधांचाही फायदा मिळत नाही. अलमट्टी धरण या गावांपासून
जवळ असूनही केवळ ही गावे महाराष्ट्रात असल्याने त्यांना नियमित जलसिंचनाच्या
सुविधा मिळत नाही. दोन्ही राज्यांच्या सीमासंर्घषात या गावांची मोठी ससेहोलपट होत
असल्याचे जाणवले. कर्नाटकात त्यांना सामाविष्ट करणे हे त्यांच्या सर्वागीण
विकासासाठी गरजेचे असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. भाषावार प्रांतरचना करूनही
भाषेचा प्रश्न अद्याप बाकी असल्याचे दिसते. सीमा भागातील अल्पसंख्यकांना त्यांची
मातृभाषा मराठी नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बहुभाषिक राष्ट्रांमधील
समस्या किती व्यामिश्र असतात याची चुणूक या गावातील नागरिकांशी झालेल्या संवादाने
आली.
दिवस तिसरा बसगाव (जत, सांगली) – इलकल – १५७ किलोमीटर
सकाळी
साडेआठच्या सुमारास आम्ही विजापूर शहरात पोहचलो. तिथे एका राजस्थानी धाब्यावर
नाष्टा केला. खूप भूक लागली होती. पराठा खाल्ल्यावर कळले की आपण दक्षिण भारतात
येऊन उत्तर भारतीय पदार्थ खातोय. स्वत:च्या मूर्खपणाचा खूप पश्चाताप झाला. तळलेल्या पुऱ्यांचे काळवट तेल पाहून
तर अजूनच वाईट वाटले. त्या राजस्थानी धाब्यावर जो आचारी होता तो महाराष्ट्रीय
होता. त्याचे मूळ गाव सोलापूर होते. एक मराठी माणूस कर्नाटकामध्ये राजस्थानी
धाब्यावर राजस्थानी पद्धतीचे जेवन बनवित होता. हे एकून विशेष वाटले. त्याला तसे
म्हणायला गेल्यावर त्याने मला शांत राहण्याची खून केली. तो म्हणाला त्या
धाब्याच्या मालकाला जर माहित झाले की तो राजस्थानी नाही तर ते त्याला कामावरून
काढून टाकतील. या धाब्यांवर केवळ राजस्थानींनाच ठेवले जाते. त्याला त्यांची भाषा
आणि पदार्थ बनविता येत असल्याने त्याने त्याला ते काम मिळाले होते. प्रादेशिकता
कशा प्रकारे काम करते हे त्याच्यावरून लक्षात येत होते.
विजापूरपासून
दहा किलोमीटर आलो असू तोच माझी सायकल पंक्चर झाली. दोन किलोमीटर पायी चालत
गेल्यानंतर एक पंक्चरचे दुकान मिळाले. तो पंक्चरवाला सायकलची पंक्चर काढत नाही असे
म्हणाला. माझ्याकडे असलेल्या साहित्याच्या आधारे त्याला ट्यूब काढून दिली. त्यानंतर
त्याने पंक्चर काढून दिली. विजापूर पार केल्याचा आनंद पंक्चरने हिरावून घेतला
होता. या घटनेचा नकळत शरिरावर नकारात्मक परिणाम जाणवू लागला. नाहक एक तास या
खटपटीत गेला.
पंक्चरचे साहित्य सोबत असल्याने पुढील प्रवास शक्य झाला
अन्यथा हिटीनहल्ली या ठिकाणापासूनच परतीचा प्रवास सुरू झाला असता.
अकराच्या
दरम्यान आम्हा दोघांनाही प्रचंड थकवा आला. आतापर्यत केवळ ३५० किलोमीटर अंतर पार
झाले होते. अजून हजार किलोमीटरच्यावर जायचे होते. एवढे अंतर कसे पार होणार या
विवंचनेत आम्ही दोघेही होतो. त्यात प्रचंड थकवा आला होता. पॅडेल मारणे जमतच
नव्हते. आमची यात्रा याच गावी संपते की काय अशी शंका येऊ लागली. सुनील तर येथून
परत कशा मार्गाने जाता येईल याबाबत पर्यायांची चाचपणी करत होता. असे बरेच विचार
चालू असताना आम्ही सायकलही चालवित होतो. बारा वाजता आम्ही एका धाब्यावर चहा घेतला.
तो धाबा महाराष्ट्रीय माणूस चालवित होता. तेथून जवळच अलमट्टी धरण होते.
दुपारी
जेवनासाठी आम्ही एका रस्त्यावरील खानावळीत थांबलो. तिथे आम्हाला अत्यंत रूचकर आणि
पौष्टिक आणि स्वस्त जेवन मिळाले. पोटभर खाऊनही दोघांचे केवळ १५५ रूपये बिल झाले.
तांदळाच्या भाकरी, भात, तीन-चार भाज्या, सॅलड हे सर्व अमर्यादित होते. मनात सहज
विचार आला यांना एवढे सर्व एवढ्या कमी किंमतीत द्यायला कसे काय परवडत असेल? जेवनाने मात्र आम्हाला ताजे तवाणे केले.
सकाळची मरगळ पूर्णपणे निघून गेली. नवा उत्साह पुन्हा शरिरात संचारला.
त्या
खानावळी शेजारीच दुचाकी वाहनांची दुरूस्ती करणारे एक दुकान होते. त्या दुकानाच्या
मालकाने आम्हाला आमच्या सायकली तिथे लावण्यास सांगितले. जेवनानंतर आम्हाला त्या
धुऊन मिळतील का अशी त्याला विचारणा केली. त्याने कोणतेही आढेवेढे न घेता आमच्या
सायकली धुऊन दिल्या. त्यासोबतच आम्ही दुकानातून डिझेल घेऊन चेनही स्वच्छ केल्या.
त्यामुळे सायकलीही आमच्या प्रमाणे ताज्यातवाण्या झाल्याचे वाटू लागले. त्या
दुकानदाराला जेव्हा पैसे द्यायला गेलो तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला. सोबत
हेही म्हणाला की येथे फक्त सर्व्हिसिंग केलेल्या गाड्याच धुतल्या जातात. अगदी
मुख्यमंत्री जरी म्हणाला माझी गाडी धुऊन द्या तरी मी ती देत नाही. त्याने आमच्या
सायकली मात्र सहजपणे आणि विनामूल्य धुऊन दिल्या. आम्ही एकमेकांना म्हटलो आज आपण
मुख्यमंत्र्यांपेक्षाही भारी आहोत. त्या व्यक्तीच्या मदतीने आमचा उत्साह पुन्हा
द्विगुणीत झाला.
दुपारी
ऊन फार असल्याने आम्ही एका सावलीच्या ठिकाणी थांबून आराम केला. चार वाजता उठून
पाहतो तर सुनीलची सायकल पंक्चर झाली होती. नशीबाने आमच्या समोरच पंक्चरचे दुकान
होते. मात्र त्या दुकानदाराने पंक्चर काढण्यास नकार दिला. पुन्हा आम्ही सायकलचे
चाक खोलून त्याला केवळ पंक्चर काढण्यास सांगितल्यावर तो तयार झाला. पुन्हा बराच
वेळ गेला आणि मन:स्ताप
झाला. दुपारी पाचच्या सुमारास आम्ही अलमट्टी गावात पोहचलो. ऊन जस जसे उतरत होते तस
तसे आमचा उत्साह वाढत होता. सहाच्या सुमारास आम्ही एका नाक्यावर चहापानासाठी
थांबलो. तिथे पुन्हा भरपेट नाष्टा केला. तेथून निघताना आम्ही आमच्या अंतिम
लक्ष्यापर्यत पोहचू की नाही याबाबत शंका येऊ लागल्या. मला रामेश्वरला जायचे होते
तर सुनीलला कन्याकुमारीला. आज आमच्या प्रवासाचा तिसरा दिवस होता आणि आम्ही केवळ
४०० किलोमीटर अंतर पार केले होते. मला तर रविवार पर्यतच सुट्ट्या होत्या. त्यामुळे
मी रामेश्वर ऐवजी चेन्नईला जावे का असा विचार करत होतो. माझा मनोदय मी सुनीलला
सांगितलाही. त्यानंतर आम्ही दोघांनीही वेगवेगळ्या पर्यांयाचा विचार केला. शेवटी
बँगलोर पर्यत पोहचायचे आणि तेथून पुढे बसने प्रवास करून कन्याकुमारी, रामेश्वर असा
प्रवास करून पुन्हा नगरला यायचे असे ठरले. सायकल चालवित असताना अनेक पर्याय सुचत
होते. आपण विचार करण्याच्या प्रक्रियेला संधी दिली तर अनेक उत्तमोत्तम पर्याय
उपलब्ध होऊ शकतात हे आज जाणवले. बऱ्याचदा आपण आपल्या गृहीत मतांवर ठाम राहत असतो.
अजून वेगवेगळे अधिक चांगले पर्याय उपलब्ध असू शकतात याचा विचारही करू शकत नाही.
थोडे थांबून घाई-गडबड न करता विचार केला की अधिक सुसह्य निर्णय आपण घेऊ शकतो, हे
आज जाणवले. त्या विचारासरशी या सायकल प्रवासाने एक नवा दृष्टीकोन दिल्याचे जाणवले.
१७ ऑगस्ट
२०२३ म्हणजेच प्रवासाच्या तिसरा मुक्काम आम्ही इलकल साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या
इलकल या गावी केला. लॉजवर न राहण्याचा आमचा संकल्प दोनच मुक्कामानंतर धुळीस
मिळाला. आज प्रचंड थकवा आलेला होता. त्यामुळे चांगल्या झोपेची आवश्यकता होती. तसेच
रात्री नऊ पर्यत आम्ही सायकल चालविल्याने दुसरे पर्याय शोधणेही शक्य नव्हते.
त्यामुळे आम्ही लॉजमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिथे सायकलिंग करणारा एक महाविद्यालयीन
विद्यार्थी भेटला. त्याला आम्ही खाण्याचे चांगले ठिकाण कोणते ते विचारून घेतले.
आमचे सर्व आवरून बाहेर पडेपर्यत साडेदहा वाजले होते. ते गाव छोटे असल्याने तेथील
खाण्याचे सर्व हॉटेलस् बंद झाले होते. आज आम्ही १६० किलोमीटर सायकल चालविली होती.
खूप भूक लागली होती. मात्र खायला काहीच मिळत नव्हते. थोडे अंतर पार केल्यानंतर एक
अंडा राईस देणारा गाडा सापडला. त्याच्याकडे जे जे होते ते खाऊन भूक भागविली आणि
रात्री उशीरा आम्ही निद्रिस्त झालो.
दिवस चौथा इलकल ते
बनाविकल्लू (Banavikallu) ( ता. कुडलिगी, जि. बेल्लारी)
१४६ किलोमीटर
गेल्या
तीन दिवसांच्या प्रवासाने प्रचंड थकवा आला होता. त्यामुळे सकाळी लवकर जाग येऊनही
आम्ही काही उठलो नाही. आजचा प्रवास सुरू करण्यास सकाळचे साडे आठ वाजले. सकाळी
हॉटेल सोडणार तर सुनीलची सायकल पंक्चर झालेली. जवळपास कुठेही सायकलचे दुकान
नसल्याने आम्ही ट्यूब बदलून सायकल चालविण्यायोग्य केली. मात्र आमच्याकडून टायर
व्यवस्थित न बसल्याने सायकल व्यवस्थित चालत नव्हती. बराच खटाटोप केल्यानंतर सायकल
शेवटी रस्त्यावर धावू लागली, तोपर्यत सकाळचे प्रसन्न वातावरण संपलेले होते.
उन्हाची तीव्रता हळूहळू वाढत चालली होती. मात्र अकरानंतर अचानक ढगाळ वातावरण झाले.
पावसाच्या हलक्या सरीही कोसळू लागल्या. दुपारी एकच्या सुमारास आम्ही हॉस्पेट या
शहराजवळ आलो होतो. या शहराजवळून तुंगभद्रा नदीवरील धरणातून सोडलेला कालवा वाहत
होता. कालव्यातील पाणी पाहून त्यात आंघोळ करण्याचा मोह आवरता आला नाही.
कालव्याच्या
काठावर बसून आंघोळ करायची होती. पाणी अंगावर घेण्यासाठी सोबत जग नव्हता. आता काय
करायचे? असा प्रश्न पडला. जवळपास कुठेतरी प्लास्टीक
बाटली हमखास मिळेल याची खात्री होती, ती अर्धी फोडून त्यातून पाणी घेता येईल, असा
विचार केला. सभोवताली अनेक प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. सोबत एक प्लास्टीकचा
ग्लासही दिसला. त्याने माझे काम भागले मात्र आपण प्लास्टीकला किती सर्वदूर
पोहचविले आहे, याचा प्रत्येय आला. त्यातही पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टीकच्या
बाटल्या तर रस्त्यांनी सर्रास आढळतात. या बाटल्या कोण उचलणार? प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शाश्वत अशी सोय करणे गरजेचे आहे,
मात्र बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे अर्थकारण एवढे मोठे आहे की त्याला अटकाव घालणे
कोणत्याही शासनाला शक्य होणार नाही. किंबहूना तशी इच्छाशक्ती तरी दाखविणे गरजेचे
आहे. मात्र ते काही होणार नाही. नागरिकांनीच अशा प्रकारे पाण्याचा वापर करू नये
किंवा राष्ट्रीय महामार्गावर, खाण्याच्या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय
उपलब्ध करून दिली पाहिजे. अन्यथा ज्या भागात सूर्यप्रकाशही पोहचत नाही तिथे
प्लास्टीकच्या बाटल्या दिसतील. आणि त्या हजारो वर्षे निसर्गाला विद्रूप आणि
प्रदूषित करतील. त्यामुळे सायकल प्रवासात बाटलीबंद पाणी घ्यायचे नाही असा निश्चय
केला आणि तो शेवटपर्यत पाळला.
कालव्यावर
आंघोळ करत असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. आता आपण पावसात अडकणार असे वाटत
असतानाच पाऊस पडायचे थांबला होता. तुंगभद्रा नदीचे खोरे असल्याने आजूबाजूचा परिसर
हिरवागार आणि मनमोहक दिसत होता. आम्ही दोन चार किलोमीटर अंतर पार केले नसेल तोच
अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही
महामार्गावरील एका राजस्थानी धाब्यावर जेवनासाठी थांबलो.
रस्त्याने
अनेकदा राजस्थानी धाबे पाहिले होते. एका छोट्याशा जागेत किचन आणि पत्र्याचे शेड
असलेले हे धाबे. बऱ्याचदा समोरील मोकळ्या जागेत चिखल आणि गाळ. या ठिकाणी कोण कशाला
थांबत असेल असा प्रश्न पडायचा. आज मात्र त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. हे
राजस्थानी धाबे उत्तर भारतीय वाहन चालकांसाठी उत्तर भारतीय पद्धतीचे जेवन देत
होते. या वाहनचालकांना त्यांच्या प्रांताबाहेरील जेवन आवडत नव्हते. त्यामुळे ते
अशा धाब्यांवर थांबत. तसेच त्याठिकाणी झोपण्यासाठी चारपाई आणि आंघोळीसाठी व्यवस्था
केलेली असायची. त्यामुळे आराम करण्यासाठी चालक तिथे थांबत असत.
त्या
धाब्यावरील एक मदतनीस हा मोदीभक्त होता. पंतप्रधान हे देशासाठी अठरा तास काम
करतात. त्यांच्यामुळेच देश सुरक्षित आहे. राहुल गांधीना जमिनीवरील काहीच वास्तव
माहित नाही. भात शेतीची लागवड करणारे शेतकरी पाहून राहुल गांधी म्हणाले की यांच्या
शेतात फरशी बसवा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही, असे तो म्हणाला. अशा
स्वरूपाच्या त्याच्या धारणा सोशल मिडीयाने तयार केल्या होत्या. त्याच्याशी
कोणत्याही प्रकारचा संवाद साधणे शक्य नव्हते. सोशल मिडियाच्या प्रभावाने त्याची
विचार करण्याची पद्धती प्रभावित झाली होती. तसेच वास्तव आणि प्रचार यांमधील अंतर
नाहिसे झाले होते, अशी जाणीव त्यावेळी होत होती. गोदी मिडीयाचा प्रचंड प्रभाव
देशभर पडलेला जाणवत होता.
त्या
धाब्यावर चार वाजेपर्यत आराम केल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली.
चित्रदुर्ग अजून १२० किलोमीटर दूर होते. आज जास्तीत जास्त अंतर कापण्याचा मनोदय
होता. रस्त्याने जाताना एका ठिकाणी एका दुचाकीस्वाराने आम्हाला थांबवून आमच्यासोबत
फोटो काढले. कुडलगी संपल्यानंतर एक गाव येईल तिथे आम्हाला थांबण्यास त्याने
सांगितले. कुडलगी अजून पंचवीस किलोमीटर दूर होते. त्याने सांगितलेल्या गावापर्यत
जाईपर्यत आम्हाला रात्रीचे दहा वाजले. त्यागावात काही तरूण रस्त्यावर थांबले होते.
त्यांना आम्ही राहण्याच्या जागेबाबत विचारले. त्यांनी गावातील एक घर आणि एक शाळा
दाखविली. जेवनासाठी मात्र गावाबाहेरील धाब्यावर जावे लागेल असे त्याने सांगितले.
जेवन झाल्यावर आम्ही राहण्याबाबत सांगू असे त्यांना सांगितले. गावाबाहेरील
धाब्यावर रात्री आम्ही जेवण्यास बसलो. तोपर्यत तिथे आम्हाला रस्त्यात भेटलेले
बसवेश्वर ही व्यक्ती भेटण्यास आली. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. तसेच
पत्रकारही होते. त्यांनी आमच्याशी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. ते आम्हाला जेवनाचे
पैसेही देऊ देत नव्हते. मात्र आम्ही त्यांचा आग्रह मान्य केला नाही. एवढ्या रात्री
ते आम्हाला भेटायला आले हीच मोठी गोष्ट आम्हास वाटली.
तो धाबा
एक उच्चशिक्षित तरूण चालवित होता. बरेच प्रयत्न करूनही त्याला नोकरी न मिळाल्याने
त्याने तो धाबा सुरू केला होता. तो चार जणांना रोजगार देत होता याचा त्याला अभिमान
वाटत होता. त्यानेही आमची अत्यंत आपुलकीने चौकशी केली. तसेच उत्तम जेवन दिले. जेवन
होईपर्यत रात्रीचे बारा वाजले होते. आता परत गावातील शाळेत झोपण्यासाठी जाणे
अत्यंत जीवावर आले होते. त्यामुळे आम्ही तिथेच झोपू का असे त्याला विचारले. त्याने
आम्हाला झोपण्यास परवानगी दिली. आम्ही धाब्याच्या बाहेर असलेल्या बाजेवर झोपलो.
मात्र रात्री जोरदार वारे वाहत असल्याने खूप थंडी वाटत होती, काही केल्या झोप येईना.
शेवटी रात्री दोन वाजता त्यांचे आचारी आणि मदतनीस जिथे झोपले होते, तेथील आतील बाजूस असलेल्या किचनमध्ये आम्ही
झोपलो. ऊबदार वातावरणामुळे लगेचच झोप आली.
तिथे
आचारी असलेला दिपक हा उत्तराखंडमधून आलेला होता. गेली चार वर्षे तो या भागात काम
करत होता. त्याने घरदार, कुटुंब सोडले होते. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत उत्तम
असल्याचे त्याने सांगितले. कौटुंबिक वादामुळे तो घर सोडून इकडे आला होता. तो तिथे
कोणताही पगार घेत नव्हता. त्याच्याकडे आधार कार्ड नव्हते की स्वत:ची ओळख पटविणारे इतर कोणताही कागदी पुरावा
नव्हता. जगाच्या दृष्टीने त्याचे अस्तित्त्व संपलेले होते. कागदपत्रे नसल्याने
त्याला बँक खाते खोलता येत नव्हते की पैसे साठविता येत होते. तो जिवंत असलेला
परंतु अस्तित्त्व नसलेला व्यक्ती बनला होता. भारतात त्याच्यासारख्या किती व्यक्ती
असाव्यात असा प्रश्न पडला. त्याच्याशी तुलना करता आपले जीवन किती सुरक्षित आणि
संपन्न आहे, याची जाणीव झाली. शिवाय त्याच्या बाबत वाईटही वाटले. त्याने सकाळी
लवकर उठून आम्हाला चहा करून दिला.
दिवस पाचवा बनाविकल्लू
ते टुमकरू १९ ऑगस्ट २०२३, १९६ किलोमीटर
सकाळच्या
प्रसन्न वातावरणात आम्ही आजूबाजूचा परिसर पाहत चाललो होतो. नऊच्य सुमारास
रस्त्यावरील एका टपरीवर आम्ही इडली आणि भात नाष्ट्याला खाल्ला. चित्रदुर्गकडे
जाणारा रस्ता घाटाचा आणि चढणीचा होता. त्यामुळे जीव मेटाकुटीला आला होता. एक एक
पॅडेल मारत आम्ही मार्गक्रमण करत चाललो होतो. घाट उतऱ्यानंतर एके ठिकाणी खानावळ
दिसली. तिथे आम्ही मासे आणि भात खाऊन थोडे ताजे तवाणे झालो. चित्रदुर्ग शहर आता
केवळ पाच किलोमीटर राहिले होते. शहरात जाऊन आमच्या सायकली दुरूस्त करून घेतल्या. तेव्हा
तिथे अचानक मोठा पाऊस सुरू झाला. त्यामुळे थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारणत: दुपारी दोन वाजता आम्ही तेथून निघालो.
चित्रदुर्ग सोडल्यानंतर काही वेळाने सुनीलची सायकल पुन्हा पंक्चर झाली. ट्यूब
बदलल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. पुन्हा तासभराच्या आतच पुन्हा एकदा
त्याची सायकल पंक्चर झाली. तेथील एका दुकानदाराने ती काढून दिली. पुन्हा रस्त्यावर
येईपर्यत सात वाजत आले होते. अंधार पडायला सुरुवात झाली. अशाच वातावरणात आमची
सायकल सफारी चालू होती.
सायंकाळ
झाल्यानंतर सायकल चालविण्याचा उत्साह वाढला होता. रस्ताही चांगला होता. त्यामुळे
अंतर वेगाने कापले जात होते. रात्री आठच्या सुमारास आम्ही सिरा येथे पोहचलो. आज मी
रामेश्वरच्या दिशेने जाणार असल्याने सुनीलचा आणि माझा रस्ता वेगळा होणार होता.
माझ्यात अजून उत्साह बाकी असल्याने मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सायकलवर आदल्या
दिवशी जास्तीत जास्त अंतर कापले की पुढच्या दिवसाचे लक्ष्य कमी होते. त्यामुळे मी
अजून चाळीस किलोमीटर जाण्याचा विचार करत होतो.
रात्री
आठ वाजता एका ठिकाणी चहापाणी घेतले. तिथे दोन ट्रक चालक भेटले. त्यांना रामेश्वरचा
रस्ता विचारला. त्यांनी मदुराई मार्गे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही (आता
मी आणि सायकल दोघेच उरलो होतो) पुढील प्रवास सुरू केला. रात्री अकराच्या दरम्यान
देवराहल्ली जवळील एका लॉजमध्ये मुक्काम केला. आवरून झोपायला बारा वाजले. जेवन
मिळणारे सर्व हॉटेल्स बंद झाले होते. भूकही फारशी नव्हती. त्यामुळे जेवन न करताच
झोपलो होतो. आज दिवसभरात सुमारे १९६ किलोमीटरचा पल्ला पार केल्याचे समाधान होते.
थकवाही प्रचंड आलेला होता. त्यामुळे बेडवर पडल्या पडल्या लगेचच झोप आली.
दिवस सहावा टुमकरू ते धर्मपुरी २० ऑगस्ट २०२३, २४६ किलोमीटर
कालचे मुक्कामाचे ठिकाण टुमकरू या ठिकाणापासून केवळ २५ किलोमीटर होते.
पहाटे लवकरच सायकलिंगला सुरुवात केली. पहाटे हायवे वरून सायकल चालवायला भीती वाटत
होती. त्यामुळे सर्व्हिस रोडवर चालवित होतो. दिवस उजाडेपर्यत कुठेच चहाच मिळाला
नाही. एके ठिकाणी दिसला मात्र त्यापासून थोडे पुढे आल्याने परत वापस जावे वाटेना.
त्यानंतर तासभर मात्र कुठेही दुकान उघडलेले नव्हते. तेव्हा गुजरातमध्ये भेटलेला एक
माणूस आठवला. त्याने सांगितले होते की गुजरातमध्ये एक म्हण आहे, जो पहले मिलता है,
उसको पकडलेना चाहिए. त्याचा अनुभव वारंवार येत होता. आता कशाला पुढच्या ठिकाणी थांबू
किंवा नंतर पाहू असे म्हणत आपण पुढे जातो
आणि योग्य वेळी हमखास ती गोष्ट मिळत नाही. तसेच आज काहिसे झाले होते. शेवटी एका
ठिकाणी एक चहाची टपरी दिसली.
आता
बंगलोर शहर ३५ किलोमीटर अंतरावर होते. सकाळपासून नाष्ट्यासाठी ठिकाण शोधत होतो.
एका रेस्टॉंरंटमकडे वळता वळता मी रोडच्या बाजूला असलेल्या खानावळीत शिरलो. आज
सकाळी वेगळ्याच पद्धतीच्या इडल्या खायला मिळाल्या. त्यांच्यासोबत सांबर नव्हते तर
चटणी होती. त्यांचा आकारही खूप मोठा होता. त्या अत्यंत मऊ आणि खाण्यास स्वादिष्ट
होत्या. आणि स्वस्तही. त्यामुळे रोडच्या बाजूला असणाऱ्या टपऱ्यांमध्ये जेवन किंवा
नाष्टा केला की तो ताजा आणि चविष्ट मिळतो, याची प्रचीती पुन्हा आली होती.
जसजसे
बंगलोर शहर जवळ येत होते तसे तशी ट्राफिक आणि प्रदूषण वाढत चालले होते.
रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रस्ता रूंदीकरणाची कामे वेगाने चालली होती. त्यासाठी
मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात होती. पूर्वी कुठेतरी वाचले होते की बंगलोर हे
तलावांचे शहर आहे. त्याची प्रचीती शहर सुरू झाल्यावरच येत होती. अनेक ठिकाणी
नैसर्गिकरित्या साचलेले पाणी आढळले. त्या तलावांमधूनही रस्त्यांचे कामे चालू
असल्याचे दिसले.
दहा
वाजेपर्यत आपण बंगलोरमध्ये पोहचू असे वाटत होते. मात्र सायकल प्रवासात तुम्हाला
काय वाटते आणि प्रत्यक्षात तुम्ही किती अंतर पार करता यामध्ये बऱ्याचदा तफावत
असते. नियोजनाप्रमाणे काहीच घडत नाही. सायकलवर अनेक नव्या अडचणी निर्माण होतात.
बंगलोर शहरात प्रवेश केल्याबरोबर एका उड्डानपुलाच्या मध्यावर असतानाच अचानक सायकल पंक्चर झाली. अकराच्या
सुमारास उड्डानपूल उतरून जवळपास दोन किलोमीटर चालत आल्यावर पंक्चरचे दुकान सापडले.
बायपासपेक्षा बंगलोर शहरातून बाहेर पडणे जवळ ठरेल असे काहींनी सांगितल्याने बंगलोर
शहरातून सायकलवर चाललो. बंगलोरमधील उड्डानपुलांवर दुचाकीसाठीसुद्धा टोल द्यावा
लागतो. अशाच एका पाच किलोमीटर लांबीच्या उड्डानपुलावरून बंगलोर शहरात मी उतरलो.
त्या उड्डानपुलावरून वाहने खूप वेगाने जात होते. त्यातला त्यात तर दुचाकीवाले तर
अगदी भीतीदायक अशा पद्धतीने वाहने चालवित होती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन चाललो
होतो. एखादा गाडीवाला आपल्याला धडकला तर आपला प्रवास येथेच संपेल अशी सतत भीती
वाटत होती. त्यामुळे सावधपणे सायकल चालवित तो उड्डानपुल संपविला.
त्यावरून
खाली उतऱ्यानंतर एके ठिकाणी रिक्षावाल्यांना शहराबाहेर जाण्याचा मार्ग विचारला.
रस्ता सांगत सांगत एक रिक्षावाला म्हणाला सायकल गाडीत टाका मी तुम्हाला शहराबाहेर
सोडतो. मी त्याला म्हटले मला फक्त रस्ता सांगा, रिक्षा नकोय. क्षणभर मात्र
त्याच्या प्रस्तावावर विचार केला. तो प्रस्ताव योग्य वाटला. भर उन्हात
बंगलोरसारख्या महाकाय शहरातून सायकलवर बाहेर पडणे कठीण झाले असते. प्रत्येक चौकात
रस्ता विचारत विचारत जावे लागले असते. रस्ता चुकलो तर अजून फजिती. त्याखेरीज
वेगाने चालणाऱ्या गाड्यांपासून धोकाही होताच. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून
शेवटी ठरविले की सायकल रिक्षात टाकायची. रिक्षावाला सहाशे रूपयात येण्यास तयार
झाला.
तो
रिक्षाचालक मुस्लिम होता. त्याच्यासोबत राजकारणावर बऱ्याच गप्पा झाल्या. सध्याच्या
राजवटीत मुस्लिमांना अत्यंत असुरक्षित वाटते, असे तो म्हणाला. मध्यमवयीन व्यक्ती
शांत आहेत मात्र युवक दिर्घकाळ शांत राहणार नाहीत, असे तो म्हणत होता. मुस्लिमांना
कुठेही लक्ष्य केले जाते, याचे त्याने अनेक दाखले दिले. मध्यतंरी तीन युवकांची
हत्या काही धार्मिक संघटनांचे कामे करणाऱ्या युवकांनी केली होती, असे त्याने
सांगितले. त्याला मी जेव्हा म्हटले तुमच्या मुलालाही असेच सायकल प्रवासावर देश
पाहण्यासाठी पाठवा तर तो म्हणाला त्याला रस्त्याने सुरक्षित वाटणार नाही.
सध्याच्या भारतात एखादा हिंदू बिनधास्तपणे देशभर फिरू शकतो मात्र त्याचवेळी
मुस्लिमांच्या मनामध्ये आपला प्रदेश सोडून बाहेर जाण्याची भीती असल्याचे त्याच्या
बोलण्यातून जाणवले. बहुसंख्यांकवाद्यांनी अल्पसंख्याकांना आपल्याच देशात असुरक्षित
करून टाकले आहे. अत्यंत भयावह मानसिकतेत ते जगत असल्याचे त्याने सांगितले. देशात
केवळ धर्माच्या नावाने गदारोळ निर्माण करून धार्मिक विद्वेश पसरविला जात आहे.
त्यातून देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे, असे तो रिक्षा चालक बोलता बोलता म्हणाला.
त्याने
मला शहराबाहेर सोडणाऱ्या एका उड्डानपुलावर आणून सोडले. त्याने ज्या उड्डान पुलाजवळ
सोडले तो पुल सलग अकरा किलोमीटर होता. त्यावर रिक्षा आणि सायकलस्वारांना प्रवेश
नव्हता. पूल संपल्यानंतर खाली एक टोल नाका होता. तिथे त्यांनी मला अडविले आणि या
रस्त्याने का आलास असा प्रश्न केला. मी त्यांना म्हटले सायकलला या रस्त्यावर
प्रवेश नाही हे मला माहितच नव्हते. बराच वेळ तिथे थांबल्यानंतर त्यांनी मला जाऊ
दिले. सायकलचा एक फायदा असतो. कोणी तुम्हाला अडवू शकत नाही. वाहतूक पोलिसांचीही
भीती मनात राहत नाही.
दुपारी साधारणत: दोन वाजता आम्ही बंगलोर शहराबाहेर
पडलो होतो. बंगलोर शहराची हद्द तमिळनाडू राज्याच्या सीमेपर्यत पोहचते. होसूर हे
तमिळनाडूमधील शहर सुरू झाले आणि त्या राज्यात प्रवेश झाला. आता रामेश्वर ५६०
किलोमीटर राहिले होते. प्रवासाचा आज रविवार आणि प्रवासाचा सहावा दिवस होता. सुट्टीही
संपलेली होती. त्यामुळे पुढे कसे जाणार याची धाकधूक मनामध्ये निर्माण झाली होती. त्यावेळी
आमच्या विभागप्रमुखांना सांगितले की अजून दोन दिवस सुट्टी वाढविण्याबाबत
प्राचार्यांशी बोला. त्यांनी होकार दिल्यानंतर उत्साह वाढला.
तमिळनाडूमध्येच
जेवन करायचे असा निर्धार करून बंगलोर पार केले होते. होसूरला पोहचल्यानंतर एका
ठिकाणी चायनिज गाडा दिसला. त्यावर मासेही होते. तिथे जेवण्याचा विचार करत होतो.
मात्र लगेचच विजापूरमध्ये नाष्ट्याबाबत केलेली चूक लक्षात आली. दक्षिण भारतात जाऊन
चायनिज खायचा विचारच अंगावर काटा आणणारा होता. थोडी चौकशी केली असता पुढच्या
चौकातच एक खानावळ आढळली. तिथे भरपेट जेवन केवळ पंचचाळीस रूपयांत झाले. दक्षिण भारत
खाण्याच्या बाबतीत फारच स्वस्त असल्याचे पदोपदी जाणवत होते. शिवाय त्या खाण्याला
पारंपारिक टचही कायम होता. महाराष्ट्रात जसे बाहेर खायचे म्हणजे पंजाबीच्या नावाने
दिले जाणारे पदार्थ खावे लागतात जे आरोग्यास हानीकारक आणि चवीने भयंकर असतात.
महाराष्ट्राचे खास असे खाद्यपदार्थ क्वचितच बाहेर गेल्यावर खायला मिळतात. दक्षिण
भारताने मात्र आपली खाद्यसंस्कृती अबाधित ठेवल्याचे जाणवत होते.
होसूर
सोडल्यानंतर बऱ्यापैकी उताराचा रस्ता सुरू झाला. त्यामुळे वेगाने अंतर कापले जात
होते. दुपारच्या उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर सायकल चालवायला छान वाटू लागले. कृष्णगिरी
जिल्ह्याकडे जाणारा रस्ता घाटाचा असल्याने सभोतालचे निसर्ग सौदर्य पाहतच आमची
सायकल सफर चालू होती. साडेसातच्या आसपास आम्ही कृष्णगिरी या शहरातून पार झालो.
सायकल चालविण्याचा उत्साह अजून अबाधित होता. त्यामुळे अजून वीस किलोमीटर जावे असा
निश्चय केला. त्यानुसार रात्री नऊ वाजता ज्या ठिकाणी लॉज मिळणार होते तिथे पोहचलो.
तिथे राहण्यासाठी जागा आहे का विचारले असता, त्यांनी सांगितले की गावात लग्न
असल्याने त्या गावातील सर्व लॉज आरक्षित झालेले आहेत. तसेच धर्मपुरीपर्यत मध्ये
कुठेही राहण्यास जागा नाही. त्यामुळे धर्मपुरीला जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
आतापर्यतचा उत्साह संपला होता. शरीर थकायला लागले होते. कसे बसे रात्री अकरा वाजता
धर्मपुरीजवळ पोहचलो. तिथे एका लॉजमध्ये राहण्याची चौकशी केली. मात्र स्वत:ला न पटणारे कारण सांगून तिथे न राहण्याचा
निर्णय घेतला.
आपण
पुढील ठिकाणचे हॉटेल पाहू असा विचार करत पुढे निघालो. ते हॉटेल सोडल्यानंतर माहित
झाले की अजून पाच किलोमीटरपर्यत कोणतेही राहण्याचे ठिकाण नाही. पुन्हा गुजरातच्या
म्हणीचा प्रत्यय आला आणि स्वत: च्या
मूर्खपणाची चीडही आली. आता पर्याय नव्हता कसेबसे धर्मपुरी पर्यत आलो. तिथे रूम
पाहिली आणि फ्रेश होऊन खाण्यासाठी बाहेर पडलो तर सर्व भोजनालये बंद असल्याचे
दिसले. आता उपाशीच झोपावे लागेल असे वाटत असतानाच एके ठिकाणी अर्धवट बंद केलेले
हॉटेल मिळाले. त्याला विचारले असता त्याने सांगितले की त्याच्याकडील सर्व पदार्थ
संपले आहेत. केवळ एक पराठा मिळेल. काहीही न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळणे कधीही
चांगले हा विचार करून तो पराठा खाल्ला. आज मुक्काम केलेल्या लॉजचे कामकाज दोन
वृद्ध पाहत होते. त्यांनी मोठ्या आस्थेवाईकपणे विचारणा केली की मला जेवन भेटले की
नाही. त्यांनी केलेल्या चौकशीने बरे वाटले. लॉजवर येऊन कपडे धुतले. रात्रीचे बारा
वाजले होते आणि थकवाही आला होता, त्यामुळे
क्षणार्धात झोप लागली.
आज २४६
किलोमीटरचा पल्ला नाईलाजाने का होईना पार केला होता. रामेश्वर अजून ४४० किलोमीटर
राहिले होते. रात्री प्राचार्यांना संदेश पाठवून सुट्टी अजून दोन दिवस वाढविण्याची
विनंती केली. त्या नकार देतील अशी भीती होती. मी अशा ठिकाणी होतो की ठरविले असते
तरी दोन दिवसांत नगरला पोहचू शकलो नसतो. आश्चर्य म्हणजे सकाळी प्राचार्यानी
परवानगी दिल्याचा संदेश आला. त्यामुळे उत्साह अधिक वाढला.
दिवस सातवा
धर्मपुरी ते मुसिरी २१ ऑगस्ट २०२३, १६२ किलोमीटर
पहाटे
पाचलाच प्रवासाला सुरुवात झाली. सकाळचे प्रसन्न वातावरण आणि घाटाचा रस्ता यांमुळे
प्रवास आनंददायी होत होता. त्यात दोनच दिवसांत आपण आपल्या उद्दिष्टापर्यत पोहचणार
असे वाटू लागल्याने उत्साह प्रचंड वाढला होता. सकाळी सात वाजता एका घाटातील टपरीवर
चहा घेतला आणि पुढचा प्रवास सुरू केला. सभोवतालचे निसर्ग सौदर्य पाहत असताना सहज
विचार आला की आपण सोबत गोप्रो कॅमेरा आणायला पाहिजे होता. तो नाही तर किमान
सायकलला फोन अडकविण्यासाठी एखादे मोबाईल सॉकेट तरी घ्यायला पाहिजे होते. असा विचार
करत चाललो असतानाच अचानक एके ठिकाणी एक दुचाकीस्वार माझ्याशी बोलायला लागला. कुठून
आलोय? कुठे चाललोय? वगैरे
त्याने चौकशी केली. गाडी थांबवून तो माझ्याशी बोलू लागला. तोही सायकलिस्ट होता.
त्याच्या गाडीला मोबाईल होल्डर लावलेले होते. त्याने ते ऑनलाईन मागविले होते.
त्याला म्हटले की मला ते हवे आहे. मात्र मी सध्या प्रवासात असल्याने घेऊ शकत नाही.
तुम्ही मला द्या मी तुम्हाला त्याचे पैसे देतो. तर त्याने क्षणभर विचार केला.
त्याची त्याला गरज आहे असे सांगितले. मात्र दुसऱ्याच क्षणी त्याने ते काढून मला
दिले. पैसे मात्र घेणार नाही असे म्हणाला. मी त्याला पैसे देण्याचा खूप प्रयत्न
केला मात्र त्याने नकार दिला. आणि तो म्हणाला मी तुला मदत केली करतो, तू दुसऱ्या
कोणाला तरी मदत कर.
त्यानंतर
आम्ही चहा पिण्यासाठी एका टपरीवर थांबलो. तिथे नाष्टा केला. नाष्टाचे पैसेही
त्याने मला देऊ दिले नाहीत. उलट म्हणाला पन्नास किलोमीटर पूर्वी भेटला असता तर
घरीच पाहुणचार केला असता. त्याच्याशी बोलल्यानंतर कळले की तो संगणक अभियंता असून
तो कॅनडाचा नागरिक आहे. त्याचे नाव मोहन आहे. भारतात तो आई-वडीलांना भेटायला आला होता. त्याचा
भाऊही कॅनडामध्येच नोकरी करीत आहे. त्याच्या बोलण्यामध्ये शेतकऱ्यांच्या दयनीय
अवस्थेबाबत चिंता व्यक्त होत होती. तसेच या देशातील व्यवस्था सर्वसामान्यांना कशा
पद्धतीने त्रास देते हे तो सांगत होता. महामार्गांच्या लगतची जमीन विकत घेऊन अनेक
राजकीय नेते त्याच्या खरेदी-विक्रीतून गब्बर झाले आहेत, असे तो म्हणाला. वरिष्ठ
अधिकारी आणि नेते हे सर्वसामान्यांपासून तुटलेले आहेत. त्यामुळे त्यांना
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची जाणच नाही. तो एकंदरित भारतीय प्रशासन आणि
राजकारण यांच्या कार्यपद्धतीमुळे उद्विग्न झाला होता.
मोहनला
सोडल्यानंतर सेलम या शहरात सकाळी अकराच्या सुमारास पोहचलो. तिथे पेरियार विद्यापीठ
पाहिले. सेलम हे तमिळनाडूमधील मोठे औद्योगिक शहर आहे. या शहरातून बाहेर पडत असताना
एके ठिकाणी एका व्यक्तीने सायकलवरील अहमदनगर हा फलक पाहून मला थांबविले. तो
व्यक्ती मूळचा सांगलीचा होता. त्याने सांगितले की सेलममध्ये जवळपास चार हजार मराठी
बांधव आहेत. ते फार वर्षापूर्वी तिथे आले होते. त्यांनी त्यांची मातृभाषा मराठी
आणि संस्कृती चारशे वर्षांपासून जतन केली होती. ते ऐकून आनंद वाटला. शिवाजी
महाराजांच्या काळात गेलेल्या मराठी
माणसांनी आजपर्यत आपली भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवली. भाषा व्यक्तींच्या जीवनात
किती महत्त्वाची असते ते दिसून येते. स्वातंत्र्योत्तर भारत अखंड राहण्यामध्ये
भाषावार प्रांतरचनेने मोठा हातभार लावला. अन्यथा पाकिस्तान सारखी जर एकच भाषा सर्व
देशभर लादली असती तर देश अखंड राहिला असता की नाही याबाबत शंका निर्माण झाली असती.
सेलम
सोडल्यानंतर उन्हाची तीव्रता खूपच वाढली. दुपारी एका टपरीवर तमिळनाडूमधील स्थानिक
पेय पिलो. तांदळापासून बनविलेले ते काहीतरी होते, ज्याच्यामुळे शरिराला थंड वाटत
होते. अर्धा लीटरच्या त्या पेयाचे त्यांनी केवळ वीस रूपये घेतले. किंमत फारच कमी
घेत असल्याचे जाणवले. थोडा वेळ चालविल्यानंतर ऊन्हामुळे चालणे अशक्यच झाले. त्यामुळे
एका बस स्थानकावर सावली पाहून झोपलो. तिथेच दुपारचे जेवन केले. सांबर आणि भात
जेवनात होते. चारपर्यत तिथेच आराम केला. त्यानंतर प्रवास सुरू केला. सायंकाळी सहा
वाजता नामक्कल या शहरात पोहचलो. तिथे अनेक व्यक्ती भेटल्या. त्यांच्याशी गप्पा
मारल्याने बराच वेळ गेला. नामक्कल सोडताना रात्रीचे आठ वाजले होते.
रामेश्वरला
जाताना दोन मार्ग होते. नामक्कल-मदुराई- रामेश्वर असा एक आणि तिरूचिरापल्ली –कराईकोडी-
रामेश्वर असा दुसरा मार्ग होता. काश्मिर ते कन्याकुमारीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग
४४ या महामार्गावर आता सायकल चालविण्याचा
कंटाळा आला होता. आता पुढील प्रवास तमिळनाडूमधील अंतर्गत रस्त्यांनी करावा असा
विचार करून राष्ट्रीय महामार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच दुसऱ्या मार्गाने
अंतरही कमी होत होते. त्यामुळे नामक्कलला राष्ट्रीय महामार्ग सोडला. आणि
राज्यमहामार्गाने प्रवास सुरू केला. नामक्कलपर्यत आज दिवसभरात १२० किलोमीटर पार
केले होते. रामेश्वरअजून तीनशे किलोमीटर राहिले होते. सायंकाळपर्यतचे अंतर
समाधानकारक झाले नव्हते. अजून ७० किलोमीटर जाण्याचा निर्धार करून नामक्कल सोडले
होते. नामक्कल सोडल्यानंतर अंधार पडू लागला. तिथेच एका टपरीवर अप्पम हा
तमिळनाडूमधील पदार्थ खाल्ला. वडापावच्या आकाराचा एक अप्पम होता. सहा अप्पमचे
त्यांनी केवळ वीस रूपये घेतले. ते अत्यंत चविष्ट होते. त्यातच रात्रीचे जेवन झाले.
दक्षिण भारतातील स्वस्तातील खाद्यसंस्कृतीचा अजून एक सुखद अनुभव आला होता.
नामक्कल
सोडल्यानंतरचा रस्ता अतिशय खराब होता. त्या रस्त्याचे काम चालू होते. त्यामुळे
उगाचच आपण राष्ट्रीय महामार्ग सोडला अशी भावना मनात निर्माण झाली. थोडे अंतर पार
केल्यानंतर संपूर्ण शरीर, सायकल धुळीने माखली गेली. त्यामुळे आता पुढील प्रवास
अत्यंत खडतर होणार याची जाणीव होऊ लागली. रस्त्याने अंधार असल्याने आणि बऱ्याच
ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने सायकल चालविणे धोकादायक वाटू लागले. कुठेतरी मुक्काम
करावा अशी मानसिक तयारी केली. मात्र रस्त्यात कुठेही लॉज नव्हते. राहण्याचे ठिकाण
थेट मुसरी येथे होते. ते ठिकाण तिथून जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर असल्याने
सायकल चालविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आतापर्यतचा सर्वात तापदायक प्रवास
त्यावेळी सुरू झाला होता. सातत्याने आपण राष्ट्रीय महामार्ग का सोडला याचेच शल्य
मनामध्ये निर्माण झाले.
रात्री
दहा वाजता रस्त्याने एक गाव लागले. तेथील पेट्रोलपंपावर राहण्याबाबत विचारले असता
त्यांनी कुठेही लॉज नाहीत असे सांगितले. पेट्रोलपंपावर हवे असल्यास झोपू शकता असे
ते म्हणाले. त्या पर्यायाचा विचार केला मात्र माझ्याकडे खाली अंथरण्यासाठी काहीही
नसल्याने तो पर्याय स्वीकारला नाही. त्याठिकाणापासून पुढे वीस किलोमीटरवरील मुसरी
या ठिकाणी जाण्याचे ठरविले नाही. आणि सायकल मारायला सुरुवात केली. धूळ आणि
दिवसभराचा थकवा यांमुळे शरिरात त्राणच उरले नव्हते. एक एक पॅडेल मारत प्रवास चालला
होता. त्यावेळी सहज मोजले असता कळले की एक किलोमीटर जाण्यासाठी साधारणत: तीनशे पॅडेल मारावे लागतात. पॅडेल मोज
किंवा गाणे ऐकत सायकलल चाललेली होती. एक एक किलोमीटर देखील मोठे अंतर वाटत होते.
शेवटी कसे बसे मुसरीकडे जाणाऱ्या जंक्शनजवळ आलो. त्या ठिकाणाहून कावेरी नदी वाहत
जात होती. तिच्यावर मोठा पूल बांधलेला होता. मी मुसरीकडे जाण्याचा रस्ता विचारला.
ते ठिकाण तेथून सात किलोमीटर असल्याचे सांगितले. रात्री कसेबसे त्या शहरात पोहचलो.
सर्व खाद्यपदार्थांचे दुकानं बंद झालेली होती. एका ठिकाणी चहाची टपरी चालू होती.
तिथे दूध आणि ब्रेड खाल्ले. एका ठिकाणी लॉज मिळाला. त्या लॉजवाल्यालाही हिंदी
किंवा इंग्रजी कळत नव्हती. सायकल तो बाहेर लावायला सांगत होता. मी त्याला म्हणालो
चोरी जाईल. तर तो रागाने मला पो पो म्हणत होता. पो पो म्हणजे निघून जा. त्या
लॉजच्या शेजारी असलेल्या एका मेडिकलवाल्याला त्याला समजावून सांगायला सांगितल्यावर
तो सायकल आत घेऊ देण्यास तयार झाला. सर्व
आवरून झोपायला बारा वाजले. आज दिवसभरात १६० किलोमीटरचा प्रवास केला होता.
नामक्कलमध्ये बराच वेळ वाया गेला. तसेच रस्त्यानेही धोका दिल्याने आज ठरविलेले
उद्दिष्ट्यं काही पूर्ण झाले नाही. एकाच दिवसात पुढील अंतर पार करणे आता शक्य
होणार नाही याची कल्पना आली. प्रचंड थकव्यामुळे झोप कधी लागली तेच कळले नाही.
दिवस आठवा मुसिरी ते देवाकुटाई २२ ऑगस्ट २०२३, १४७
किलोमीटर
पहाटे चार वाजताच जाग आली. आवरून पाचला प्रवास सुरू केला. जवळच
एका ठिकाणी दूध-ब्रेड घेतले. तिथे एक माध्यमिक शाळेतील शिक्षक चहा घेण्यासाठी आला
होता. त्याचे इंग्रजी उत्तम होते. तो माझेही बिल देत होता मात्र मी त्याला देऊ
दिले नाही. त्याला पुढील मार्ग विचारला.
काल चुकीचा रस्ता निवडल्याने खूप त्रास झाला होता. त्यामुळे त्याने सांगितलेल्या
रस्त्याची पुन्हा एकदा खात्री करून घेतली. कालच्या रस्त्यावर पुन्हा पाच किलोमीटर
मागे जावे लागले. कावेरी नदीवरील पुल ओलांडून पुढील रस्ता होता. तिथेच एक लॉज
दिसला. आपण काल किती मूर्खपणा केला याची प्रकर्षाने जाणीव झाली. रामेश्वरचा रस्ता
न विचारता त्रिचीचा रस्ता विचारल्याने हा सर्व गोंधळ झाला होता. कालच्या सारखा
रस्ता मिळू नये अशी आशा होती. थोडे अंतर पार केल्यानंतर मात्र सुखद धक्का बसला. जुन्या
काळातील रस्त्यांवर जसे दुतर्फा मोठी चिंचेची झाडे असत आणि त्यांच्या सावलीने
पूर्ण रस्ता झाकलेले असायचा, तसा तो मार्ग होता. बाजूला कठिण दगडाचे डोंगर होते.
परिसरात पाण्याचे दुर्भिष्य जाणवत होते. मात्र
त्या परिसराचेही एक वेगळे निसर्ग सौदर्य दिसत होते. सकाळच्या आल्हाददायक
वातावरणात आम्ही चाललो होतो. रामेश्वर आवाक्यात आल्याने खूपच प्रसन्न वाटत होते. एके
ठिकाणी चहा घेतला. तेथील व्यक्ती कुतूहलाने माझ्याकडे पाहत होत्या. त्यांना भाषा
येत नसल्याने ते काही विचारू शकले नाहीत.
मन्नपराईला नऊच्या सुमारास पोहचलो. तिथे दोन डोसे, सहा
इडल्या, एक ऑम्लेट खाल्ले. या सर्वाची किंमत केवळ सत्तर रूपये झाली. ती ऐकून अव्वाकच
झालो. त्यानंतर एके ठिकाणी चहा घेतला. त्यानंतरचा रस्ता तर खूपच सुंदर होता.
दोन्ही बाजूंनी सुंदर झाडी, चांगले डांबरी रस्ते आणि निर्मनुष्य परिसर यांमुळे
त्या प्रवासाची मजा काही वेगळीच वाटत होती. अकराच्या सुमारास एका बस स्थानकावर
थोडा वेळ झोप काढली. त्यानंतर प्रवास सुरू केला. ऊन्हाची तीव्रता वाढत चालली होती.
मात्र दोन्ही बाजूंना झाडी असल्याने ते काही जाचत नव्हते. एके ठिकाणी दगडाच्या
खाणी होत्या. तिथे पाणी साचलेले होते. तिथे आंघोळ केली. शरीराची दाहकता थोडी कमी
झाली. प्रसन्न वाटू लागले. तिथून पुढे प्रवास सुरू केला आणि रस्त्याने गाडीवर
जाणारे दोन युवक भेटले. त्यातील एकजण सिंगापूरला इलेक्ट्रिकची कामे करायचा. तो
भारतात सुट्टीवर आलेला होता. त्याने बळेच थांबवून थंडपेय घ्यायला भाग पाडले.
त्याच्याशी गप्पा मारताना त्याच्या बाबत अजून बरीच माहिती मिळाली. त्याला सांगितले
की कॅनडामध्ये प्रयत्न कर तिथे त्याच्याकडे असलेल्या कौशल्यांना खूप वाव आहे.
त्याचे बोलणे काल भेटलेल्या मोहनशी करून दिले. त्याला खूप बरे वाटले. त्याचा निरोप
घेऊन पुढे निघालो.
दुपारची वेळ झालेली होती. जेवायला पाहिजे म्हणून एका
स्थानिक हॉटेलमध्ये थांबलो. तिथे एक खेकडा, मासा, भात आणि सांबर घेतले. त्या
हॉटेलवाल्याने खेकडा निवडताना जो सर्वात मोठा होता तो मला दिला. या सर्वाचे बिल
केवळ एकशेदहा रूपये झाले. एवढे स्वस्त कसे काय असू शकते असा प्रश्न पडला. त्यानंतर
तिथून पाणी भरत असताना त्या हॉटेल मालकाने थांबविले आणि म्हणाला ते पाणी नको घेऊस.
त्याने त्याला पिण्यासाठी असलेल्या जारमधून बॉटल भरून दिली. मी सायकलवर आल्याचा
त्यांना फार हेवा वाटत होता. तेथील बऱ्याच जणांनी माझ्यासोबत फोटो काढले. त्यांनी
मला दिलेल्या आदराने मन अगदी भारावून गेले. ऊन खूपच वाढल्याने जवळच्याच एका
झाडाखाली थोडा वेळ आराम केला. चार वाजता प्रवासाला सुरूवात केली.
रस्त्याने जात असताना उत्तर प्रदेशातून सायकलवर चारधाम
यात्रेला निघालेला एक युवक भेटला. त्याने एप्रिलपासून हरिव्दारपासून यात्रा सुरू
केली होती. तो शाकाहारी होता. तो म्हणाला दक्षिणेतील लोक राक्षसीवृत्तीचे आहेत.
मांस-मच्छी खातात. त्यामुळे त्याची इथे जेवनाची आबाळ होते. तो कांदा-लसूण नसलेलेच
अन्न पदार्थ खातो. त्याच्या एकंदरित विचारांनी आणि कृतीने १९व्या शतकातील भारतीय
जातीयतेच्या मानसिकतेचे दर्शन घडत होते. धर्मानंद कोसंबी यांनी त्यांच्या निवेदन
या आत्मचरित्रात प्रवासात कशा पद्धतीने जातीय व्यवस्थेने घालून दिलेले बंधने
पाळावी लागतात आणि त्यामुळे प्रवाशांचे कसे हाल होतात हे सांगितले होते. त्या
व्यक्तीच्या वर्तनातूनही तीच भावना जाणवत होती. शुद्ध-अशुद्धतेची प्रचंड जाणीव
त्याच्या वर्तनातून झळकत होती. त्यात आत्मश्रेष्ठत्त्वाची प्रौंढीही झळकत होती.
त्यामुळे त्याला लवकरच मागे सोडून आम्ही वेगाने पुढे निघालो.
सायंकाळचे सहा वाजले होते. रामेश्वर आता फक्त १६० किलोमीटर
राहिले होते म्हणजेच १०० मैल. त्यावेळी इंग्रजीमधील एक गाणे आठवले, हंड्रेड माईल्स
अ हंड्रेड माईल्स.... त्याच वेळी बॉब डिलॉनचे हाऊ मेनी रोडस् अ मॅन मस्ट हॅव वॉक
डाऊन बीफोर यु कॉल हीम अ मॅन.. हे गाणे आठवत होते. प्रवासाने येणाऱ्या समृद्धीचा
नकळत विचार करत होतो. त्यातून मनोमनी सुखावला जात होतो. सायकल चालविल्याने शरिराला
खूप वेदना होत असल्या तरी मनाला प्रचंड आनंद होत होता. एखाद्या नशिल्या पदार्थाचे
सेवन केल्यानंतर जी ट्रांन्सची अवस्था प्राप्त होते ती सायकल चालविताना येत होती.
समुद्ग किनारा जवळ येत असल्याने निसर्गाचे स्वरूप बदलत होते. वेगळीच प्रसन्नता आली
होती. सूर्य मावळतीला चालला होता. ते विलोभनीय दृश्ये पाहून खूपच आल्हादायक भावना
मनामध्ये निर्माण झाल्या होत्या. दिवसभराचा थकवा दूर पळाला होता. नवी उर्जा शरिरात
निर्माण झाली होती.
कराईकोडी अजून वीस किलोमीटर होते. रस्त्याने एक दवाखान्यात
काम करणारा एक तमिळ व्यक्ती भेटला. त्याच्याशी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला असता
तो म्हणाला धिस इज तमिळनाडू, नो हिंदी. इंग्लिश ऑर तमिळ ओनली. त्याला हिंदी कळत
असावी परंतु त्याने तिच्यामध्ये बोलण्यास साफ नकार दिला. तमिळनाडूमध्ये हिंदीबाबत
असणारा तिटकारा त्याच्या बोलण्यातून जाणवत होता.
साडेसात पर्यत कराईकोडी येथे पोहचलो. तिथे एका मिठाईच्या
दुकानात नाष्टा करून पुढे निघालो. अजून पन्नास किलोमीटर जाण्याचा विचार होता. त्या
ठिकाणापासून थोडे पुढे गेल्यानंतर लगेचच जोरात वादळ सुरू झाले. समुद्रकिनारा जवळ
असल्याने वाऱ्याचा वेग प्रचंड होता. त्याला कशाचाही अडथळा नव्हता. त्या वाऱ्याची
तीव्रता पाहिली असता एखादे चक्री वादळ कसे असेल याची कल्पना आली. काही क्षणात
जोरात पाऊस सुरू झाला. रस्त्याने कोणताही आडोसा नव्हता. तो परिसर निर्मनुष्य होता.
तिथे थांबलो असतो तरी भिजलो असतो आणि पुढे गेलो असतो तरी भिजलो असतो. त्यामुळे
पुढे जाण्याचा विचार केला. पाऊस, जोराचा वारा, चमकणाऱ्या विजा यांमधून सायकल
प्रवास चालला होता. निर्सगाची ताकद आणि मानवाची हतबलता अनुभवत आम्ही चाललो होतो.
आता आपले काही खरे नाही असे वाटत असतानाच पाऊस थोडा उघडला. एका ठिकाणी चहाचे दुकान
होते तिथे थोडा वेळ थांबलो. त्यानंतर पुढील प्रवास सुरू केला.
पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे एका जंक्शनजवळ थांबलो.
तिथून पुढे राहण्यासाठी लॉज अजून सतरा किलोमीटर होता. आणि मागे पाच किलोमीटर. कुठे
जायचा असा प्रश्न होता. त्यावेळी मागे जायचे नाही असे ठरविले. पाऊस थांबण्याची
काही लक्षणे दिसेनात. त्यामुळे एखाद्या रिक्षात सायकल टाकून पुढे जावे असे ठरविले.
रिक्षा शोधण्याचा प्रयत्नही केला. तेथील स्थानिकांनीही प्रयत्नही केले. शेवटी
रिक्षा काही मिळाली नाही. पाऊस थोडा कमी झाला. दुकानातून बॅग झाकण्यासाठी एक
प्लास्टीकची पिशवी घेतली. पुढील प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात आकाश पूर्णपणे
निरभ्र झाले. पुढे पावसाचे कोणतेही लक्षणे नव्हती. रस्ताही चांगल्या प्रतीचा आणि
उताराचा होता, त्यामुळे विनासायास सायकल चालली होती. शेवटी रात्री अकरा वाजता
देवाकुटाई येथे पोहचलो. तिथे लॉज मिळाला. रात्री जेवायची इच्छा अजिबात
नव्हती. कधी आवरून झोपतो असे झाले होते.
बारा वाजता झोपलो.
दिवस नववा देवाकुटाई ते धनुषकुडी २३ ऑगस्ट २०२३, १८० किलोमीटर
पहाटे अडीच वाजताच जाग आली. काही केल्या झोप येईना. पहाटे
तीन वाजताच लॉज सोडला. मनात भीती वाटत होती की एवढ्या पहाटे एखाद्या चालकाला झोप
आली तर आपल्याला धडक मारून जाईल. मात्र पहाटे सहा पर्यत मोजून दहा वाहनांनी मला
क्रॉस केले असेल. त्यामुळे आपली भीती निरर्थक होती हे लक्षात आले. वाहने नव्हती
मात्र शरिरात अजिबात ताकद नव्हती. काही केल्या सायकल पळतच नव्हती. आपण
रामेश्वरपर्यत चालवू शकू की नाही याची खात्री वाटेना. रस्त्यात एखादे वाहन मिळाले
की सायकल त्याच्यात टाकून पुढील अंतरापर्यत जावे असा विचार करत होतो. पण वाहनेही
त्या रस्त्याने तुरळक येत होते. शेवटी एका ठिकाणी चहाची टपरी दिसली. तिथे चहा
घेतल्यानंतर शरिरात त्राण आले. मग लक्षात आले की रात्री काहीच न खाल्ल्याने शरिरात
उर्जेचा अभाव असल्याने थकवा जाणवत होता. नंतर मात्र उत्साह वाटू लागला. आता शेवटचे
१२० किलोमीटर अंतर राहिले होते. अजून पन्नास किलोमीटर चालविल्याशिवाय थांबायचे
नाही असे ठरवून सायकल जोरात पळवू लागलो. सकाळी सातपर्यत जवळपास पन्नास किलोमीटर
अंतर पार झाले होते.
आठ वाजता एका ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबलो. रामेश्वर जसे जसे
जवळ येत होते तस तसे ऊन जरी वाढत असले तरी
त्याचा त्रास न होता उलट शरिरातील उर्जा वाढत होती. अकरा वाजता रामेश्वर पंचवीस
किलोमीटरचा बोर्ड दिसला. आता आपण उद्दिष्टापर्यत पोहचणार हे पक्के वाटू लागले.
त्यानंतर समुद्रकिनारा सुरू झाला. नारळीचे झाडे आणि इतर झाडे दिसू लागली. वातावरण
अत्यंत रोमांचक बनले होते. त्यानंतर रामेश्वरला जोडणाऱ्या पंबन पुलावर पोहचलो. तो
पुल भारत आणि रामेश्वरचे बेट यांना जोडणारा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पूल होता.
त्या पुलाखालील सुमद्राचे पाणी अत्यंत नितळ होते. त्याखालचा तळही दिसत होता.
त्याठिकाणी तीन पूल बांधण्यात आले होते. दोन रेल्वेसाठी आणि एक वाहनांसाठी. तो परिसर आणि समुद्र अत्यंत
मनमोहक दिसत होता. ते दृश्य पाहून गेल्या आठ दिवसांच्या त्रासाचे चीज झाले अशी
भावना मनामध्ये निर्माण झाली. सर्व थकवा क्षणार्धात गायब झाला. तेथून रामेश्वर तेरा
किलोमीटर होते. एक किलोमीटर कमी कमी होत शेवटी रामेश्वरला दुपारी एक वाजता पोहचलो.
तेथे एका हॉटेलमध्ये जेवन केले. दक्षिण भारतातील स्वस्ताई रामेश्वरला संपलेली
होती. ते पर्यटक स्थळ असल्याने तेथील दर वेगळे होते.
दुपारी दोन वाजता लॉज मिळाला. तिथे चार पर्यत आराम करून
धनुषकुडीकडे निघालो. दहा किलोमीटर अंतर गेल्यानंतर दोन्ही बाजूंना समुद्रकिनारा
लागला. एका बाजूचा समुद्र उथळ होता. तर दुसऱ्या बाजूने समुद्रखोल असल्याचे दिसले.
या भागात प्लास्टीक बंदी असल्याने एरवी रस्त्याने आढळणाऱ्या रिकाम्या बाटल्या,
प्लास्टीकचे रॅपर्स कमी प्रमाणात होते. जसजसे धनुषकुडी जवळ येत होती तसेतसे
वाऱ्याचा वेग प्रचंड वाढत होता. सायकल चालविणे खूपच कठीण जात होते. रस्त्याच्या
दोन्ही बाजूंनी निळाशार समुद्र दिसत होता. लाटांचा आवेग प्रचंड होता. तेथील
समुद्रात प्रवेश करण्यास मनाई होती तसेच कोणी तसे धाडसही करू शकत नव्हते.
साडेपाचला धनुषकुडीला पोहचलो. तिथे फोटो काढले. त्यानंतर तेथून
पुढे अजून चार किलोमीटर अर्चिल मुनाल हे ठिकाण होते. ते काय आहे हे विचारल्यावर
एकाने सांगितले की तिथे बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम होतो. स्वर्ग
यापेक्षा अधिक काय सुंदर असू शकतो असा विचार आला. त्याचवेळी काहींना व्हिडीओ कॉल
करून ते ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे कोणत्याही कंपनीचे नेटवर्क
उपलब्ध नव्हते. त्यावेळी सहज मनात विचार आला की कोणालाही घरी बसून स्वर्ग पाहणे
शक्य नाही. त्यासाठी बाहेर पडावेच लागेल. सायकलने तो स्वर्ग आज आम्हाला दाखविला
होता. तो नजारा पाहून निर्माण झालेल्या भावना शब्दातीत आहेत. एखादा कवीच त्यांना
योग्य शब्दरूप देऊ शकतो.
ते ठिकाण सहा वाजता बंद करतात. सहाला पाच मिनिटे बाकी
असताना आम्ही तिथे पोहचलो. तोपर्यत पोलीस तेथील पर्यटकांना बाहेर जायला सांगत
होते. मी सायकलवर गेल्याने विशेष अतिथी होतो. त्यांनी मला तिथे फोटो काढू दिले. त्यानंतर
पोलीसांनी सर्वांना त्या ठिकाणापासून बाहेर जायला सांगितले. शेवटी मी आणि सायकलच
तिथे राहिलो होतो. बाकीचे पर्यटक वाहनांनी वेगाने निघून गेल्यानंतर धनुषकुडी ते
आर्चल मिनल या भागात कोणीच नव्हते. मनमुराद समुद्र दर्शनाचा आनंद घेत आम्ही चाललो
होतो. लाटांच्या आवाजाने वेगळेच संगीत तयार होत होते. अंधार पडू लागला होता.
निरभ्र आकाशातील सर्व तारे स्पष्टपणे दिसत होते. काय तो नजारा होता. गेल्या नऊ
दिवसांच्या खडतर प्रवासाची सांगता अप्रतिम नैसर्गिक सौदर्याने झाली. निसर्गात
राहण्याचा मनमुराद आनंद लुटता आला. समुद्राच्या दर्शनाने तर निसर्गाची भव्यता आणि
अफाटपणा लक्षात आला.
धनुषकुडीला आल्यानंतर तेथील एका टपरीवर प्रॉन्झ फ्राय
घेतले. त्यासोबत चपाती मिळेल का विचारले तर त्यांनी भात आणि फिशकरी दिली. सोबत
तळलेला अजून एक मासा दिला. बिल किती झाले
हे विचारले तर त्यांनी केवळ १५० रूपये झाले असे सांगितले. त्यांना दोनशे रूपये
दिले. ते अतिरिक्त पैसे घेत नव्हते. पर्यटकांना लुटण्याची मानसिकता अद्याप
त्यांच्यामध्ये निर्माण झालेली नव्हती. ती माणसे अतिशय साधी वाटली. रात्री जाताना
रस्त्याने मी एकटाच होतो. काही वेळेनंतर मी ज्या ठिकाणी जेवलो ते पती-पत्नी घरी
चालले होते. त्यांनी मला सोबत व्हावी म्हणून गाडी थोडी कमी वेगाने चालविली. मात्र
मीच त्यांना म्हटले की ते जाऊ शकतात. त्यानंतर मी रात्री दहा वाजता लॉजमध्ये
पोहचलो. आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील असाच होता.
धनुषकोटीला गेल्यानंतर बेळगावचे काही पर्यटक तिथे भेटले. ते
मराठी भाषिक होते. त्यांनी अहमदनगरचा फलक पाहून माझ्याशी बोलायला सुरुवात केली
होती. ते इतरांना सांगत होते की हे आमच्या भागातले आहेत. ते जरी बेळगावचे असले तरी
भाषेमुळे त्यांना महाराष्ट्राशी जास्त आपुलकी वाटते. त्यांनीही परभाषिक राज्यात
मराठी भाषा जतन केली होती. त्यांना भेटून फार बरे वाटले. रात्री अत्यानंदाने लवकर
झोपच आली नाही. पहाटे लवकर उठून रामेश्वर मंदिरात गेलो. मंदिर भव्य होते. तिथे
बारा कुंडांचे पाणी मिळत होते. त्यासाठी पन्नास रूपयांचे कूपन घ्यावे लागत होते.
प्रत्येक विहिरीवर पाणी टाकणारे उभे होते. त्यानंतर एका ठिकाणी पन्नास रूपये दिल्यानंतर
पूर्ण बाटली भरून दिली जात होती. भाविक कुंडातून काढलेल्या पाण्यातून आंघोळ करत
होते, तर बाटलीतील पाणी घरी नेण्यासाठी वापरण्यात येत होते. पाण्याचा धंदा केवळ
बहुराष्ट्रीय कंपन्याच करत नाहीत तर धार्मिक स्थळावर कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे
तो चालत होता. येथे भाविकांची धर्मश्रद्धा विकत घेतली जात होती. मंदिर खूप सुंदर
होते मात्र गर्दीही प्रचंड होती. त्यामुळे तेथे फार काळ राहावे वाटले नाही.
सकाळी सातच्या सुमारास रामेश्वर बसस्थानकावर आलो. तिथे
मदुराईला सायकल बसने नेण्याविषयी विचारले. एक बस वाहक तयार झाला. त्याने चारशे
रूपये घेतले. रामेश्वर ते मदुराई प्रवाशासाठी तिकीट १७० रूपये होते. मात्र सायकलचे
म्हणून त्याने बाकीचे पैसे घेतले. आणि शेवटी आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. दुपारी
एकच्या सुमारास बस मदुराईला पोहचली. तेथून रेल्वेस्थानकापर्यत सायकल चालवित गेलो.
सायकल रेल्वे पार्सल कार्यालयात जमा केली. तीनशे रूपयांत ती पुण्यापर्यत पोहचणार
होती. त्यानंतर मदुराईतील जिगरथंडा हे प्रसिद्ध शीतपेय पिलो आणि सोबत मदुराईचा
हलवा घेऊन विमानतळावर पोहचलो. मदुराई विमानतळावरील एकंदरित वातावरण आणि सायकल
चालविताना अनुभवायला आलेले वातावरण यांमध्ये जमीन-आस्मानचे अंतर होते.
विमानतळावरील विश्वच वेगळे वाटू लागले. रात्री साडेआठ वाजता विमानाने हैद्राबाद
विमानतळावर आणून सोडले. रात्री दिड वाजता पुण्याला विमान असल्याने तो पर्यत काय
करायचे म्हणून विमानतळाबाहेर पडलो. सर्वसामान्य परिसर आणि माणसे असलेल्या भागात
आलो. त्यानंतर रात्री पुन्हा विमानतळावर जाऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
साडेतीन वाजता विमान पुण्यात उतरले. वाघोलीपासून बस पकडून साडेसहा वाजता नगरच्या
बसस्थानकावर पोहचलो. तेथून घरी आणि सव्वासात वाजता महाविद्यालयात हजर झालो. अशा
पद्धतीने १५०० किलोमीटरचा हा प्रवास नऊ दिवसांत संपला.
अचानक आणि अपघाताने रामेश्वरला जायचे ठरले होते. सायकल
प्रवासाने काय दिले असा विचार केला असता अनेक मार्गांनी हा प्रवास फलदायी ठरला.
शेवटचे चार दिवस तर दररोज सोळा ते अठरा तास सायकल चालवावी लागली होतो. आपण एवढा
वेळ कार्यक्षम राहू शकतो याची जाणीव पुन्हा एकदा झाली. मनावर आणि शरिरावर आलेले
आळसाचे आवरण गळून पडले. या प्रवासामुळेच परतीचा प्रवास रात्रभर करूनही दुसऱ्या
दिवशी सहजपणे महाविद्यालयात हजर होऊ शकलो. ऐरवी आपण रात्रभर प्रवास केलेला आहे, या
नुसत्या जाणीवेने दिवसभर थकवा आला असता. शरिरापेक्षा मानसिक ताकद मोठी असते हे
प्रकर्षाने जाणवले.
दिर्घपल्ल्याच्या सायकल प्रवासाची सुरुवात एका एका पॅडेलने
होत असते. सुरुवातीला वाटत राहते आपण एवढे अंतर पार करू की नाही. प्रवासाच्या
मध्येही बऱ्याचदा नको नको होऊन माघारी फिरावे वाटते. एखाद्या दिवस खूप थकवा येतो
तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उर्जा मिळालेली असते. आपले विचारच आपली
कार्यक्षमता किंवा ऊत्साह कमी करत असतात. सायकल मात्र शिकविते की उर्जेचा स्त्रोत
शरीर नसून आपल्या विचारांमध्ये असतो. विचारांनी शरीर ताब्यात ठेवले तर आपण
शरिराकडून कोणत्याही प्रकारची कृत्ये करून घेऊ शकतो.
सायकल प्रवास हा विचार करायला खूप वेळ उपलब्ध करून देतो.
बऱ्याचदा पर्याय ठरविताना आपल्यासमोर हे किंवा ते असे दोनच पर्याय दिसतात. मात्र
प्रत्येक बाबींसाठी एकापेक्षा अधिक उत्तोमत्तम पर्याय आपण शोधू शकतो, जर आपण
आपल्या विचारांना थोडी मोकळीक दिली आणि पर्याय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले
तर. सायकलिंगमुळे प्रत्येक बाबीसाठी अनेक पर्याय असतात हे कळते. वयाच्या वाढीसोबत
विचारांची ताठरताही वाढत जाते, त्यातून परिस्थितीला दोष देत अडचणींचा बाऊ करण्याची
सवय लागून जाते. सायकलच्या प्रवासाने ती प्रवृत्ती आपल्यामध्ये वाढत नाही.
दिर्घपल्ल्याच्या सायकलिंगमध्ये अनेक अडचणी येतात. समोर
नव्याने आलेल्या अडचणींनी सायकलस्वार कमकुवत ठरत नाही तर तो त्यांना सामोरे
जाण्याची क्षमता स्वत:मध्ये
विकसित करतो. तोच मंत्र नंतर दैनंदिन जीवनातील अडचणींना सामारे जाण्यासाठीही
उपयोगी पडतो. शिवाय कोणतीही समस्या व्यक्तीला हतबल करू शकत नाही, याची जाणीवही होत
राहते. थोडक्यात अशी सायकलिंग आपला दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडते.
सायकल प्रवास हा सर्वसामान्यांशी जोडले जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. या प्रवासात अनेक ठिकाणी विविध कामे करणाऱ्या व्यक्तिंशी संपर्क आला. रोडवर आढणाऱ्या जेवनाच्या दुकानांमधील काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल तर हेवा वाटत होता. सूर्याचे तीव्र ऊन आणि भट्टीपुढील आगीच्या ज्वालांनी निर्माण केलेली उष्णता सहन करत त्याव्यक्ती अत्यंत निष्ठेने खाद्यपदार्थ बनवित होत्या. त्यांनी किती इडली किंवा डोसे किंवा चहा विकल्यावर त्यांना आपल्याएवढा पगार मिळेल असा विचार मनात येत होता. नफ्याचे प्रमाण अत्यल्प असूनही ते अत्यंत निष्ठेने आपली कामे करत होती. खाणाऱ्याला समाधान मिळावे आणि त्यांना लुटू नये असा त्यांचा प्रयत्न होता. वीस रूपयांत सहा अप्पे आणि अमर्यादित सांबर देणाऱ्या नामक्कलमधील त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर खूप पैसा मिळविला पाहिजे ही वखवख अजिबात नव्हती. त्याउलट आपल्या खाद्यपदार्थांनी खाणाऱ्यांना समाधान मिळावे हीच तिची तळमळ होती. अशा सर्वसामान्यांतील असामान्य व्यक्ती अशा प्रवासाने मिळतात.
रस्त्यावर धावणाऱ्या अनेक ट्रक आपण दररोज पाहतो. ते आपल्या
विविध गरजा पूर्ण करणाऱ्या साहित्याची
ने-आण करत असतात. मात्र त्यांच्या जीवनाबाबत आपण खूपच अनभिज्ञ असतो. सायकल
चालविताना आपण काहीतरी भव्यदिव्य करत आहोत असे वाटत होते. रस्त्यावरील अपघाताची
भीती मनात सतत असायची. मात्र हे ट्रक चालक रात्रंदिवस रस्त्यावर असतात. ते आपला
जीव सतत मुठीत घेऊनच गाडी चालवित असतात. कुठेही जेवन करायचे, तिथेच राहायचे,
रात्री-बेरात्री गाडी चालवायची. थोडक्यात जीवनाबाबतच्या कोणत्याही निश्चिततेचा आणि वेळापत्रकाचा अभाव.
पुन्हा रस्त्यावर गाडी बंद झाली, पंक्चर झाली किंवा पलटी झाली तर नवेच संकट. शिवाय
पोलीस, आरटीओच्या स्वरूपातही वावणारे संकटही पाठपुरावा करत असतात. एके दिवशी सायकल
पंक्चर झाली. अत्यंत निराश झालो. वैताग आला. पंक्चर काढून थोडे पुढे गेलो तर एक
कांदे भरलेला ट्रक पंक्चर झालेला. ट्रकमधील सर्व माल बाहेर काढून ते पंक्चर
काढण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहिल्यावर आपली समस्या किती किरकोळ होती हे
प्रकर्षाने जाणवले.
त्याखेरीज दक्षिण भारत नव्या मार्गाने पाहण्याचा पुन्हा योग
आला. खूप चांगले माणसं रस्त्यांनी भेटली. काहींनी तर ऐनवेळी देवदूतांसारखी येऊन
मदत केली. भारत खूप सुंदर आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली. सायकल चालवून कितीही
हाल होत असले तरी सायकलवरच पूर्ण देश फिरले पाहिजे, हा निर्धार पुन्हा एकदा ठाम
झाला.
अंकुश पाराजी आवारे
पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर
Email- ankushaware@gmail.com
7588359518


