अहमदनगर ते कन्याकुमारी - Ahmednagar to Kanyakumari Cycle Journey
अहमदनगर ते कन्याकुमारी (दि. २५ ऑक्टोबर ५ नोव्हेंबर २०२२)
व्यायामचा
प्रकार म्हणून सुरू केलेल्या सायकलींगचे नकळत व्यसन लागले. सायकलवर दूरच्या
अंतरावर जाण्याची इच्छा निर्माण होऊ लागली. मग एकदा हिम्मत करून सायकलने
कोल्हापूरपर्यत गेलो. प्रवासात शारिरीक थकवा खूप आला होता मात्र कोल्हापूरला
पोहचल्यानंतर मन प्रसन्न झाले होते. त्यातून असे लक्षात आले की सायकल चालविताना
विचारांची एक वेगळीच प्रक्रिया घडत असते. मनातील अनेक गुंते सुटत जातात. जीवनाकडे
बघण्याचा दृष्टीकोन व्यापक होतो. त्या सायकल प्रवासा दरम्यान सहज एक विचार आला की
आपण एके दिवशी न थांबता सलग अकरा तास सायकल चालविली. त्या तुलनेत टेबल-खुर्चीवर
बसून अभ्यास करणे तर किती सोपे. ज्या ज्या
वेळी अभ्यास करताना कंटाळा येत होता त्या त्या वेळी कोल्हापूरची सायकल सफर आठवत
होती आणि स्वत:ला बजावत होतो की
अभ्यास करणे सायकल चालविण्यापेक्षा सोपे आहे. तीन दिवसांच्या सायकल सफरीने आळसावर
मात करण्यासाठी एक विचार दिला होता.
त्यानंतर
ऑक्टोबर २०१९ मध्ये गुजरातमधील दांडी येथे सायकलवर गेलो. त्या प्रवासात जाणवले की
जसे सायकलवर दिर्घ पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी एक एक पायडल मारावे लागते तसेच स्वत:च्या क्षमता विकसित करण्यासाठीही प्रत्येक
क्षणाला काम करावे लागेल. अंतर कितीही असू देत सातत्याने चालले तर ते पूर्ण होते
हा विश्वास निर्माण झाला. दुसऱ्या सायकल प्रवासानेही दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील
असे नव-नवे दृष्टीकोन दिले.
तिसऱ्यांदा
सायकलवर गोव्याला गेलो. या प्रवासात जाणवले की आपण बऱ्याचदा कपोलकल्पित भयांना
घाबरतच जीवन जगत असतो. सतत कोणते ना कोणते भय आपल्याला पछाडत असते. त्या भयातून
नकारात्मकता निर्माण होते आणि ती नकारात्मकता दैनंदिन जीवनात निराशा निर्माण करते.
त्यामुळे विनाकारण घाबरण्याचे काही कारण नाही. आपल्याला वाटणाऱ्या भीतींच्या
मुळाशी जाऊन त्यांचे व्यवच्छेदन केले पाहिजे. मग लक्षात येते की आपल्याला वाटणारी
भीती ही निरर्थक आहे. या जाणीवेसरशी मनातील भय कुठल्या कुठे पळून गेले. मग त्यातून
लक्षात येत गेले की सायकलींग आणि दैनंदिन जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे.
दैनंदिन
जीवनातील तोचतोचपणा, सातत्य आणि निरर्थकता घालविण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे
सायकलींग होय. सायकलींग केल्याने शरीराबरोबर मनाचाही व्यायाम होतो. बाह्य शरिराबरोबरच
मनाचा कणखरपणा आणि ताकद वाढत जाते. त्यामुळे दरवर्षी सुट्ट्यांमध्ये कुठेतरी दूरवर
सायकलवर जायला पाहिजे ही असे वाटू लागले. त्यातून २०२१ मध्ये अपघाताने अहमदनगर ते
नौखाली ( बांगलादेश) असा सद्भावना सायकल यात्रेत सहभागी होण्याचा योग आला. ४०००
किलोमीटरच्या त्या सायकल यात्रेत आडवा भारत पाहून झाला. देशातील पाच मोठ्या
राज्यातून प्रवास करत ही यात्रा बांग्लादेशात पोहचली. प्रवासा दरम्यान पुस्तकात
वाचलेले भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, हे वास्तव प्रत्यक्षात अनुभवता आले.
आपला देश किती संपन्न आणि मोठा आहे याची जाणीव झाली. आणि सायकलवरून होणारा प्रवास
हा संथगतीने असल्याने निसर्गातील नयमरम्य दृश्ये पाहत पाहत आम्ही मार्गक्रमण करत
होतो. विविधता पाहत, अनुभवत पुढे जात होतो.
संपूर्ण
देश सायकलने फिरले पाहिजे ही जाणीव प्रकर्षाने होत होती. तसेही सायकल
चालविणाऱ्यांसाठी त्यांच्या ठिकाणापासून कन्याकुमारीला आणि श्रीनगरला जाणे हे
त्यांचे स्वप्न असते. प्रत्येक सायकलस्वार ती संधी मिळण्याची वाट पाहत असतो. ते
स्वप्न साकार करण्याची संधी ऑक्टोबर २०२२ मध्येच मिळेल असे जर कोणी म्हटले असते तर
ते खरे वाटले नसते. मात्र सायकलींगने अजून एक गोष्ट शिकविली की संधींची वाट पाहत
बसायचे नसते तर त्या निर्माण करायच्या असतात.
महाविद्यालयाने
आम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सात दिवस दिल्या. त्या
दिवसांत एक मित्र म्हणाला की सुट्ट्यांत आपण जाऊयात सायकलींगला. मी यापूर्वी अनेक
ठिकाणी सायकलवर जाऊन आल्यामुळे त्या मित्राला वाटले असावे की सायकलवर प्रवास
म्हणजे काहीतरी रोमांचक अनुभव असावा. त्यामुळे त्याने येण्याचा आग्रह धरला. सायकलींगमुळे
झालेले बदल त्या मित्राने अनुभवल्यामुळे त्यालाही वाटत होते की सायकलींग ही खरोखरच
काही तरी विलक्षण गोष्ट आहे आणि आपणही अशा
दिर्घपल्ल्यांच्या सफरींना जायला पाहिजे. अजून तिसराही मित्र तयार झाला.
वाटले बरे झाले दरवेळीस एकटाच गेलास का? कोणी सोबत का नाही आले? अशा प्रश्नांना उत्तरे
द्यावी लागणार नाहीत.
आम्ही
सुरुवातीला ठरविले की कोल्हापूर पर्यत सायकली गाडीत टाकून न्यायच्या आणि तेथून
पुढे पाच दिवस केरळच्या सीमेपर्यत सायकलवर जायचे. परतीचा प्रवास रेल्वेने करायचा. त्यामुळे दिर्घपल्ल्यांच्या सायकलींगसाठी
लागणारी साधनसामग्री आम्ही विकत घेतली. आणि क्षणाक्षणाला नियोजन आणि मुक्कामाचे
ठिकाण यांबाबत आम्ही चर्चा करत असू. मनात धाकधूक होती की खरेच हे दोघे येतील का? निघण्याच्या आदल्या दिवशी आम्ही पुन्हा
प्रवास मार्गात बदल केला. सायकलने कोल्हापूरपर्यत जाण्यात काय मजा आहे? असे म्हणणारा मित्र म्हणाला की आपण नगरपासूनच सायकलने गोव्यापर्यत जाऊ.
त्याच्या नियोजनाला आम्ही होकार दिला. म्हटले सोबत यायला तयार आहे तर कशाला विरोध
करायचा. त्या मित्रांची येण्याबाबत मनात शंका होती. ते येतील की नाही? अशी सतत धाकधूक वाटत होती. मनाशी निर्धार केला कोणी येवो अथवा न येवो आपण
जाणारच. निघण्याच्या दिवशी अचानक एक जण आलाच नाही. दुसरा मात्र म्हणाला तुम्ही
नाही आला तरी मी जाणारच.
२५
ऑक्टोबरला आमचा सायकलने सफर (Suffering) सुरू झाला. पहाटे पाचलाच आम्ही नगरहून निघालो. सकाळच्या शांत वातावरणात
सायकल चालवायला आल्हादायक वाटत होते. आम्ही सकाळी दहाच्या आसपास थांबून घरून
आणलेला नाष्टा केला. सुरुवातीचे काही तास सायकल चालविल्यानंतर सायकलने खरे रूप
दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर ऊन्हाची तीव्रता वाढायला लागली होती. आम्ही
दौंडपर्यत अकरा वाजता पोहचलो. तिथे कोल्हापूरचा रस्ता स्थानिकांना विचारला.
अनेकांनी बारामतीमार्गे जाण्याचा सल्ला दिला. किंबहुना दुसऱ्या मार्गाने जाणे
सोयीचे आणि कमी अंतराचे होते. मात्र स्थानिकांना विचारून आम्ही स्वत:चीच फसगत केली होती. येथे आम्हाला लक्षात आले की बऱ्याच जणांना दुसऱ्या
शहराचे अंतर फारसे माहित नसते. ते अंदाजच बांधत असतात. त्यात गुगलची अडचण म्हणजे
ते वेगवेगळे रस्ते दाखविते. त्यातही अनेकदा गफलती होतात. येथे आम्हाला ऐकावे जणाचे
करावे मनाचे या म्हणीची प्रचीती आली.
लांबच्या
रस्त्याने साधारणत: १२ च्या
सुमारास आम्ही कुरकुम येथे पोहचलो. तिथे थोडे थंडपेय घेऊन आम्ही १ वाजेपर्यत सायकल
चालवून जेवणासाठी थांबायचे ठरविले. आतापर्यतचा प्रवास आमच्या नियोजनाप्रमाणे आणि
सोयीप्रमाणे चालला होता. दौंड ते कुरकुंभ हा अत्यंत खराब रस्ता पार केल्यानंतर
आम्ही पुणे-सोलापूर हायवेला मिळालो. आता रस्ता चांगला होता. आपण आता वेगाने पुढे
जाऊ असा विश्वास निर्माण झाला होता. मात्र ठरविल्याप्रमाणे झाले तर त्याला प्रवास
कसे म्हणणार? अचानक आमची एक सायकल पंक्चर झाली. मित्राला
थांबवून मी पुन्हा गावात पंक्चर काढण्यासाठी आलो. १५ मिनिटांत सर्व व्यवस्थित होईल
असा विश्वास होता. मात्र त्या गावात सायकलचे एकच दुकान होते. तो व्यक्तीही
बाहेरगावी गेलेला होता. दुचाकीचे पंक्चर काढणारे सायकलची पंक्चर काढायला तयार
नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीची वाट पाहत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. येथून मागील
प्रवासात सायकल पंक्चर झालेली नव्हती. त्यामुळे कशाला अतिरिक्त ट्यूब न्या, पंप
न्या असे म्हणत पंक्चरचे साहित्य घेण्याचे टाळले होते. अतिआत्मविश्वास पहिल्याच
दिवशी आडवा आला होता. आपला प्रवास कुठपर्यत जाणार याची काही खात्री वाटेना. त्यात
ऊन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली. आम्ही शरीरापेक्षा मनाने अधिक थकलो होतो. आता कुठपर्यत
हा प्रवास होणार याबाबत शंका निर्माण होऊ लागली. शेवटी अथक प्रयासानंतर आम्ही
सायकल पंक्चर काढून घेतली. तिथेच दुपारचे जेवन करून विश्रांतीसाठी जवळच्या एका
झाडाखाली आम्ही थांबलो.
साधारणत: चारच्या सुमारास आम्ही पुन्हा आमचा प्रवास
सुरू केला. साडेपाचच्या सुमारास आम्ही बारामती येथे पोहचलो. तिथे चहापाणी
घेतल्यानंतर आम्ही मुक्कामाच्या विचार करू लागलो. ऊन कमी झालेले होते. आता सायकल
चालविणे सोपे जाणार म्हणून आम्ही बारामतीला न थांबता फलटणला जायचे निश्चित केले.
आम्हाला अजून २५ किलोमीटरचा प्रवास करायचा होता. त्यामुळे आम्ही वेगाने निघालो.
सायकलच्या वेगाबरोबरच अंधारही वेगाने वाढत होता. फलटणला पोहचण्याशिवाय आमच्याकडे
पर्याय नव्हता. शेवटी एकदाचे आम्ही फलटनला ८ च्या सुमारास पोहचलो. रस्त्याने एकाने
विचारले कुठे चालतात? आम्ही सांगितले की गोव्याला चाललोय. तो
व्यक्ती आम्हाला फलटणमधील एक डॉक्टरांच्या घरी घेऊन गेला. त्या डॉक्टरांनी एप्रिल
मध्ये फलटन ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास केला होता. त्याच्याशी भेटून छान
वाटले. सायकलने आपण केवळ हिवाळ्यातच जाऊ शकतो हा जो समज होता तो नष्ट झाला. ते
पहाटे तीन ते सकाळी नऊ आणि दुपारी चार ते रात्री ८ अशा वेळी सायकल चालवायचे. ऊन्हाळ्यातही
आपण दिर्घपल्ल्याच्या सायकलींगला जाऊ शकतो ही जाणीव आणि शक्यता त्या भेटीमुळे समजली.
वेळेमुळे सायकलींगवर येणारे बंधने क्षणात नष्ट झाली. आपण आपल्याच धारणांचे कसे
कैदी असतो आणि त्यातून बाहेर पडणे कसे सोपे आणि सहजशक्य असते ही जाणीव त्या दिवशी
झाली. अनेकदा विचार करताना काळे किंवा पांढरे या दोन शक्यातांमध्येच निर्णयप्रक्रिया
बंदिस्त असते. मात्र त्या दिवशी जाणवले की तिसरा किंवा अधिकचा पर्यायही असतो. आपण
मात्र ते असू शकतात याचा साधा विचारही करत नाही. त्यामुळे समस्याधीन होऊन नवे
पर्याय शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. आजच्या प्रवासाने आम्हाला शिकविले की
प्रश्नांना किंवा समस्यांना अधिक चांगले पर्याय असतात. ते शोधण्याच्या दिशेने आपण
प्रयत्न केले पाहिजेत. या विचारासरशी एकदम प्रसन्न वाटू लागले. दिवसभराचा थकवा
क्षणार्धात नाहिसा झाला. एक नवा धडा १५० किलोमीटरच्या सायकलींगने आज दिला होता.
विचार करण्याची क्षमता कमविली तर समस्यांच्या निराकरणाच्या दृष्टीने प्रयत्न होतात
अन्यथा समस्येवर मार्गच नाही ही भावना दृढ होऊन साचेबद्ध चौकटीतच स्वत:ला अडकवून ठेवतो. त्यातून निराशा वाढते.
फलटणच्या
शासकीय विश्रामगृहात आम्ही मुक्काम केला. रात्री जेवनानंतर साधारणत: साडे दहाच्या सुमारास आम्ही झोपी गेलो
होतो. आजचा दिर्घपल्ल्याचा प्रवास आम्ही संपविला होता. शरीर श्रमाने (ऐच्छिक)
शिणले होते. दुसऱ्या दिवशी सायकल चालवू की नाही याची खात्री वाटत नव्हती. निद्रेच्या
कधी अधीन झालो कळलेच नाही. सकाळी पाचला जाग आली. कालचा थकवा गायब झालेला होता
नव्या उमेदीने आणि नव्या दमाने आम्ही पुन्हा स्वत:ला शिणून
घेण्यासाठी चाललो होतो.
फलटन ते
नीरा असा प्रवास करत आम्ही दुपारी साधारणत: १२ च्या सुमारास सातारा येथे पोहचलो. तिथे दुपारचे जेवण केल्यानंतर आम्ही
एका शेतात विश्रांतीसाठी गेलो. जाताना तेथील शेतकरी आम्हाला म्हणाले की बाटल्या
घेऊन जाऊ नका. आम्ही आरामासाठी चाललोय हे सांगितल्यावर त्यांनी फारशी हरकत घेतली
नाही. बाटल्याचा काय प्रकार आहे हे आम्हाला कळलेच नाही. झाडाखाली गेल्यावर सर्व
प्रकार लक्षात आला. त्या ठिकाणी अनेक जणांनी मदिरापान केलेले होते. तिथे अनेक
फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पडल्या होत्या. तेव्हा कुठे लक्षात आले तो शेतकरी काय
म्हणत होता. मग आठवले की एक मित्र दिवसभर दारूड्यांनी शेतात दारू पिऊन फोडलेल्या
बाटल्यांच्या काचा वेचत होता. आपल्या कृतीचा कोणालातरी त्रास होऊ शकतो याची
किंचितही पर्वा न करता अनेकजण वर्तन करत असतात. पुढील पूर्ण प्रवासात रस्त्यांच्या
दोन्ही बाजूंना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, दारूच्या रिकाम्या आणि फोडलेल्या
बाटल्या, वेफर्स, कुरकरे, बिस्किटांचे प्लास्टीकचे कागदं यांनी विद्रूपीकरण केलेले
दिसले. आपण केलेला कचरा इस्तव्यस्त न फेकता, कचरा कुंडीतच टाकला तरी अवतीभोवतीचा
परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. हा कचरा कोणतीही महापालिका किंवा ग्रामपंचायत
स्वच्छ करू शकणार नाही. नागरिकांनीच थोडे प्रयत्न केले तर आजूबाजूचा परिसर स्वच्छ
राहण्यास मदत होईल. पर्यटनासाठी, विरंगुळ्यासाठी म्हणून निसर्गात जाऊन त्या
परिसराचे विद्रुपीकरण करण्यात या नागरिकांचाही लक्षणीय वाटा आहे.
दुपारनंतर
आम्ही कराडपर्यत ७ च्या सुमारास पोहचलो. आज साधारणत: आम्ही १२४ किलोमीटर सायकल चालविली. रात्री मनसोक्त जेवण करून
आम्ही तिसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या दिशेने निघालो. आज दुसरा मित्र पुढील प्रवास
करणार नव्हता. त्याला एवढा जीवतोडून सायकल चालविण्यात काही रस वाटत नव्हता. कदाचित
मी अनेकदा सायकलींगचे फायदे सांगितल्यामुळे तो या प्रवासाला आला होता. जे अंतर
तास-दोन तासांत पार करायचे त्यासाठी दिवस का घालवायचा हा त्याचा प्रश्न होता.
प्रश्न विवेकी आणि रास्त होता. मात्र सायकलिंग करताना विचारांची जी प्रक्रिया सुरू
होते आणि त्यातून अनेक प्रश्नांची उकल होत जाते, त्याखेरीज निसर्ग, शहरं, रस्ते
अगदी जवळून बघायला मिळतात, अवतीभोवतीची सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली जातात, नवे नवे
अनुभव प्रवासात येतात, असे अनेक फायदे सायकलींगमुळे झाल्याचे मी अनुभवले होते.
मात्र मित्राला त्यात काही अर्थ वाटेना. त्यामुळे कोल्हापूरपासून पुढे मी आणि
सायकल यांनीच प्रवास सुरू केला.
……………………..
कोल्हापूर
सोडताना मनाशी ठरविले होते की दुपारचे जेवन निपाणी आणि मुक्काम बेळगावला करायचा.
त्यादृष्टीने आम्ही वेगात जाऊ लागलो. साधारणत: एकच्या सुमारास आम्ही (मी आणि सायकल) निपाणीला पोहचलो. तिथे
बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये जेवण केले. उडपी पद्धतीचे जेवन अत्यंत स्वादिष्ठ
आणि आरोग्यदायक होते. आणि जेवनाचा एकूण खर्चही केवळ दोन आकडी. बाहेरचे
खाल्ल्यानंतर अपवादानेच मिळणारे समाधान आज
मिळाले होते. स्वादुपिंड तृप्त झाल्यासारखे वाटत होते. सर्व काही नियोजनाप्रमाणे
झाल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. निपाणीमध्ये सायकलला लावण्यासाठी
अहमदनगर ते कन्याकुमारी असा एक फलक तयार करून घेतला. आता ही मोहीम
कन्याकुमारीपर्यत पोहचलीच पाहिजे, कितीही वाटले, काहीही झाले तरी मागे फिरायचे
नाही असे स्वत:ला बजावण्यासाठी तो फलक मुद्दामहून तयार करून
घेतला. दुसरा हेतू हा त्या निमित्ताने कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आणि स्थानिक
माहिती मिळते. अन्यथा सायकलने प्रवास करणाऱ्याला सध्या फारशी प्रतिष्ठा नाही. रस्त्याने
देखील अपवादानेच सायकली आढळत होत्या.
गोव्याला
जाताना आम्ही निपाणी-बेळगाव हा प्रवास केलेला होता. त्यावेळी मात्र हे अंतर आम्ही
सकाळच्या वातावरणात कापत चाललो होतो. आज मात्र भर उन्हात ते अंतर पार करायचे होते.
निपाणीनंतर एका झाडाखाली थोडा आराम करून पुढे प्रवास सुरू केला. भर ऊन्हात तवंदी
घाटातून चाललो होतो. सायकल चालविणे नको नको झाले होते. ऊन्हाचा तीव्रता आणि घाटाची
चढाई यांनी शरिरातील त्राण हिरावून घेतले होते. पण मन म्हणत होते घाटाच्या चढानंतर
उतार येणार आहे. तेव्हा एका विद्यार्थ्याची गोष्ट आठवली. आम्ही एका डोंगरावर
सायकलींगला गेलो होतो. त्याची सायकल साधी होती तेव्हा त्याला म्हणालो तू सायकल
खालीच ठेव तर तो म्हणाला मला येताना उतारावर सायकल चालविण्याचा आनंद घ्यायचा आहे.
चढ जरी त्रासदायक असला तरी त्यानंतर येणारा उतार आल्हादायक असणार आहे. त्याघटनेने
संगती आयुष्याशीही लावता येते. जीवनात अनेक चढ असतात (त्रास) त्यानंतर उतारही
(आनंद) येतात. त्यामुळे चढ आल्यानंतर हतबल न होता चिवटपणे त्यांचा सामना करायचा,
कितीही नको वाटत असले तरी सातत्यपूर्ण वाटचाल करायची असे सायकलने शिकविले होते.
त्यातच आजच घाट चढतानाही वाटत होते की कधीतरी हा घाट संपेलच. त्यामुळे फार वर न
पाहता धीम्यागतीने आम्ही चाललो होतो. त्यानंतर ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण
आला. घाट संपला. आणि तीव्र उताराचा रस्ता सुरू झाला.
मुंबई-बंगलोर रस्त्यावर जरा ऊन लागत होते. या रस्त्याच्या बाजूने जो
हमरस्ता ( सर्व्हिस रोड) होता त्यावरून सायकल चालवायचे ठरविले. अपघाताची शक्यताही
कमी होणार होती. त्यामुळे मी हमरस्ता पकडला. महाराष्ट्र ओलांडल्यावर रस्त्याच्या
बाबतीत फरक प्रकर्षाने जाणवू लागला होता. कर्नाटकातील महामार्गाच्या बाजूला
सगळीकडे सर्व्हिस रोड होता. तो ही विनाखड्ड्याचा होता. त्याखेरीज प्रत्येक गावातील
बसस्थानकावर प्रवाशांसाठी थांब्यांची व्यवस्था. तीही अत्यंत स्वच्छ आणि बसण्यालायक
असलेली. मनात सहज विचार आला की हा रस्ता बांधतानाच्या अटी आणि नियम दोन्ही
राज्यांत सारख्याच असाव्यात. महाराष्ट्रातील सर्व्हिस रोड एवढे खराब का? काही ठिकाणी ते बांधलेलेच नाहीत? महाराष्ट्रात एकाही
बसस्थानकावर हायवेला प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्थानक का उभारलेले नाही? महाराष्ट्रात अनेक गावांत या हायवेवर नागरिक महामार्गावर उभे राहून बसची
वाट पाहताना आढळले. तेच कर्नाटकात तर प्रवाशी निवांत या बसस्थानकांमध्ये बसलेले
आढळले. एवढा फरक का? असे अनेक प्रश्न या प्रवासा दरम्यान पडू
लागले. कर्नाटकमध्ये भ्रष्टाचार नसेल असे नाही मात्र महाराष्ट्रात
भ्रष्टाचाराच्या सर्वच सीमा ओलांडल्या की
काय असे वाटू लागले. अन्यथा रस्ते बांधतानाच्या ज्या किमान बाबी आहेत त्या तरी
पाळणे आवश्यक होते. त्या क्षेत्रातील बारकावे माहित नसल्याने केवळ अंदाज बांधणेच
शक्य होते. एक मात्र जाणवत होते की महाराष्ट्रात रस्ते बांधताना काहीतरी गडबड आहे.
कदाचित त्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना कोणाचाच धाक न राहिल्याने असे झाले
असावे. राज्य नावाची जी नियामक यंत्रणा आहे ती कदाचित ठेकेदारांशी मिळालेली असावी
त्यामुळे करारातील अटींची प्रत्यक्षात पूर्तता झाली की नाही हे न पाहताच कागदावरील
पूर्णत्वाच्या दाखल्यावर निधी मंजूर केला जात असावा. कर्नाटकात मात्र जनाची नाही
मनाची लाज ठेवून कामे उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसला. महाराष्ट्रात नागरी
समाज क्षीण झाल्याने आणि राज्यकर्ते आणि ठेकेदार यांच्यातील अंतर नाहीसे झाल्याने
मोठा गैरप्रकार होत असावा अशी शंका वाटू लागली.
नदीचे
पात्र सोडले तर बेळगावपर्यत जाताना या हायवेवर आम्ही सर्विस रोडनेच प्रवास केला. अजून
एक फरक जाणवला की सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजूंना झाडे लावलेली होती आणि त्यांची
काळजी घेतल्याने ती मोठी झालेली होती. महाराष्ट्रात सर्व्हिस रोडही धड नव्हते आणि
त्यावर झाडे तर अजिबातच आढळली नाहीत. धोरण ठरविणारी आणि राबविणाऱ्या यंत्रणेने जर
थोडी जर सक्रियता किंवा कार्यतत्परता दाखविली तरी अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात.
याची प्रकर्षाने जाणीव होत होती. राज्यातील कर्तेच मात्र लुटीत सामील होत असतील तर
कुंपनंच शेत खाते आहे अशी अवस्था महाराष्ट्रात दिसत होती.
गर्द
झाडी आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर डोळ्याची पारणे फेडणारा होता. आपण खरेच
भारतातून प्रवास करत आहोत का? असा भ्रम होत होता. कोल्हापूरपर्यत आलेला थकवा
कुठे पळाला कळलेच नाही. एकंदरीत आल्हादायक प्रवासाला सुरुवात झाली होती. दोन
वर्षापूर्वी याच रस्त्याने प्रवास केला असल्याने सर्व ठिकाणं आठवत होती. मागील
वेळी बेळगावमध्येच सायकल खराब झाली होती. मोठ्या महत्प्रयासाने ती दुरूस्त करून
मिळाली होती. त्यावेळी बेळगावची प्रसिद्ध नियाझ बिर्याणी खाल्लाचे आठवत होते. आज
मात्र रात्री साडे आठच्या सुमारास आम्ही बेळगावला पोहचलो. बेळगाव शहर कर्नाटकातील
मोठ्या शहरांपैकी एक आहे. कर्नाटकामध्ये पोहचल्यावर महाराष्ट्र आणि तेथील काही फरक
जाणवायला लागला होता. या प्रदेशात बऱ्यापैकी मराठी भाषा बोलली जात होती किंवा
समजली जात होती. त्यामुळे हा भाग मराठी भाषिकच आहे हे जाणवत होते.
आपण
अनेकदा वर्तमानपत्रात बेळगाव, निपाणी, कारवार हे कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश
महाराष्ट्रात जोडण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेली वाचतो. पूर्वी
वाटायचे की ही केवळ काही गावे असतील आता मात्र लक्षात आले की साधारणत: दोनशेपेक्षा अधिक चौरस किलोमीटरचा तो परिसर
होता. अनेक राष्ट्रीय अभयारण्ये, घनदाट जंगले आणि नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या
या परिसराचे नैसर्गिक वैभव अमूल्य असेच आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार एवढा संपन्न
प्रदेश महाराष्ट्राला देईल याची शक्यता फार कमीच वाटली. बेळगाव शहरात प्रवेश
केल्यानंतर एखाद्या महानगरात प्रवेश केल्याचा अनुभव येत होता. मोठं-मोठी
कपड्यांची, गाड्यांची दुकाने, पंचतारांकित दवाखाने, मॉल्स् या नजरेत पडल्या.
पुन्हा शहर म्हटले चकचकीत रस्ते होते मात्र इतर कोणत्याही शहरात आढळते अशी
वाहतूकीची कोंडी आणि इतर सारख्याच समस्या या शहरात आढळत होत्या.
रात्री
आम्ही बेळगाव मराठा लाईट इंफन्ट्रीमध्ये मुक्काम केला. त्याठिकाणी आमच्या गावचे एक
सुबेदार नियुक्तीवर होते. त्यांच्या विश्रामगृहात मुक्काम केला. सैनिकी पद्धतीने
त्यांनी पाहुणचार केला. गप्पा मारता मारता महाराष्ट्र आणि कर्नाटकाची तुलना झाली.
सुभेदार मेजर मला म्हणाले आपण केवळ वैयक्तिक स्वास्थ्याचा विचार करतो. सामाजिक
स्वास्थ्याबद्दल आपण दक्ष नाहीत. त्यामुळे आपल्या सार्वजनिक जीवनाचा पोत खराब झाला
आहे. तसेच बोलताना ते असेही म्हणाले सैन्याचे जेवण चविष्ट नसेल मात्र पौष्टिक
असते. क्षणभर मनात विचार आला की जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आपण अनेकदा रूचकर
पदार्थ खातो, भलेही ते पौष्टीक नसोत. आणि त्यातून व्याधी जडून घेतो. त्यामुळे अन्न
शरीरासाठी घ्यायचे असते चवीसाठी नाही, ही बाब पुन्हा अधोरेखित झाली होती. तसेच ते
सुभेदार असेही म्हणाले शरीराचे विविध शौक पूर्ण करायला गेले की माणूस अडचणीत येतो.
मर्यादा पाळून जगले तर जीवनात अडचणी कमी येतात. चंगळ करायला गेले की संकटं पिच्छा
सोडत नाहीत. एक दहावी पास जवानाने प्रदिर्घ काळ सेनेत विविध ठिकाणी नोकरी
केल्यानंतर त्यांना आलेले शहाणपण त्यांनी मला सांगितले. त्यांच्याशी गप्पा मारताना
आपण काहीतरी शिकतोय किंवा विस्मरणात गेलेल्या गोष्टींची पुन्हा उजळणी होत आहे, ही
जाणीव होत होती. आपण एका शहाण्या व्यक्तीशी संपर्कात एक दिवस राहिलो याचे समाधान
होत होते. बेळगावला पोहचण्यास उशीर झाला होता. त्यामुळे जेवण करून झोपेपर्यत
रात्रीचे बारा वाजले होते. सायकलवर गेल्याचे पाहून तेथील अनेकांना आश्चर्य वाटले
होते. त्यांनी केलेल्या कौतुकामुळे मन प्रसन्न झाले होते. शारिरीक थकवा कमी झाला
होता. पहाटे चारलाच जाग आली. सर्व आवरून
पाच वाजता आम्ही बेळगाव सोडले.
पहाटेच्या
वेळी रस्त्यावर तुरळक वाहने होती. राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याचा दर्जा
उत्तम होता. त्यामुळे सायकलींगचा आनंद लुटत आम्ही चाललो होतो. आपण काल केवळ चारच
तास झोपलो होतो, त्यामुळे झोप पूर्ण झाली नाही, अशी नकारात्मक भावना काही मनामध्ये
निर्माण झाली नाही. लक्षात येत होते की बऱ्याचदा आपले शरीर तक्रारी करते आणि
त्यानुसार आपल्या भावना निर्माण होतात. आज मात्र अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न
असल्याने कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा कंटाळा जाणवत नव्हता. आज आम्ही सह्याद्री
रांगा ओलांडून अरबी महासागराच्या किनार पट्टीला म्हणजेच कारवारला पोहचणार होतो. तेथून
पुढे समुद्रकिनारी महामार्गाने (कोस्टल) थेट कन्याकुमारीपर्यत जाणार होतो. रस्ता
सरळ, सोपा आणि चांगला असला तरी सायकलला प्रवेगक (Accelerator) नसल्याने पायडल मारतच जावे लागत होते. सभोवतालचे
वातावरण निसर्गरम्य असल्याने थोडे श्रम कमी लागत होते. खानापूरचे भाग सोडल्यानंतर
दांडेली अभियारण्याचा प्रदेश सुरू झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तुरळक
वाहने ये-जा करत होती. त्यांचा आवाज सोडला तर काही बिलकूल शांतता होती. आमची
सायकलवर जंगल सफारी चालली आहे असा भास होत होता. जंगलातील पक्ष्यांचे, प्राण्यांचे
आवाज ऐकत सायकलचा थकवा दूर होत होत प्रवास चालला होता. अशात एका ठिकाणी अचानक
रस्त्याच्या लगत झाडीतून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. तिकडे पाहिले तर एक
मोठ्या प्राण्याने रस्त्यावर येण्याचा त्याचा मार्ग बदलून जंगलात पुन्हा उडी मारली
होती. क्षणभर कळलेच नाही काय झाले पुढे आल्यावर मागे वळून पाहिले असता लक्षात आले
की ते अस्वल होते. अरे बापरे जंगलात आपण अस्वल पाहिले. भीती, रोमांच, आणि अजून काय
काय व्यक्त होणारे भाव मनात उमटले. त्यानंतर काही छोटे मोठे प्राणी-पक्षी पाहत
प्रवास चालला होता. ५४ किलोमीटर सायकल चालविल्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास
रामनगरला पोहचलो. तिथून तीन रस्ते वेगवेगळ्या दिशेला जात होते. पणजी आणि कारवारला
तेथून वेगवेगळ्या दिशेने रस्ते जात होते. तेथे भरपेट नाष्टा करून आम्ही कारवारच्या
दिशेने प्रवास सुरू केला. मला सांगण्यात आले की पुढे ४० किलोमीटर जंगल आहे.
त्यानंतर उताराचा रस्ता सुरू होईल. पण कशाचे काय पुढे कित्येक किलोमीटर जंगल संपता
संपेना. या रस्त्यावर मला दोन व्याघ्र प्रकल्प
दिसले. काली नदीवर गणेशगुडी येथे सुपा नावाचे एक मोठे धरण बांधण्यात आले
होते. त्यातून सोडलेल्या उत्सर्गामध्ये रिव्हर राफ्टींग केली जात होती. ते ठिकाणी
दांडेली या गावाजवळ होते. तिथे मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले होते.
सकाळपासून
सायकल चालविल्यामुळे प्रचंड थकवा आलेला होता. सुपा धरणापासून कारवार अजून ९०
किलोमीटर होते. आपण कारवारला आज पोहचू की नाही याबाबत मनात शंका होती. या शंकेवर
फारसा विचार न करता त्या धरणाच्या प्रवेशद्वाराजवळ झोपून घेतले. काही काळानंतर जाग
आली. थकव्यामुळे गाढ झोप आली होती. आता थोडी उर्जा आल्यासारखे झाले. तेथून पुढील
प्रवास सुरू केला. जाताना एका बाजूला काली नदी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराच्या
झाडांनी भरलेल्या रांगा. त्यामुळे भरदुपारी देखील रस्त्यावर ऊन पडत नव्हते.
झाडांच्या शीतल छायेत सायकलचा मनमुराद आनंद घेत आम्ही चाललो होतो. या किर्द घनदाट
जंगलात निसर्गाने संसाधनांची प्रचंड उधळण केलेली होती. तिथे काय नव्हते. नदी होती.
जंगल होते. प्राणी होते. पक्षी होते. धबधबे होते. पर्यटकांसाठी नंदनवनच होता हा
परिसर. मात्र या जंगलात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पर्यटकांनी बेजाबदारपणे
टाकलेल्या पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांचे
प्लास्टीकचे कव्हर्स पडलेले होते. ते चित्र अत्यंत विद्रूप आणि भयानक दिसत होते.
या परिसराचे संवर्धन करणे दूरचे मात्र प्रवाशांनी आणि पर्यटकांनी थोडी काळजी घेतली
तर या दिसले.
दुपारचे
साडे चार वाजले तरी जंगल संपेना. तिथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने अजून कारवार किती राहिले हे कळत नव्हते. कोणी तीस किलोमीटर
तर कोणी पन्नास किलोमीटर सांगत होते. एका धबधब्यावर थांबून थोडा ताजेतवाणे झालो.
कन्याकुमारीला चाललोय हे माहित झाल्यावर इतरांना कुतूहल वाटत असे. कोणी दोन शब्द
बोलले तरी बरे वाटायचे. तेथून प्रवास सुरू केल्यानंतर पुढे एका ठिकाणी अचानक एक
कार जवळ येऊन थांबली. तिच्यात पनवेलचे दोन कुटुंबं कारवारला चालले होते. त्यांनी
थांबून विचारले कुठे चालला आहे? कशासाठी
चालला आहे? मी म्हटले काही नाही सहजच भारत बघायला म्हणून
कन्याकुमारीपर्यत चाललो आहे. त्यांनी गाडीतूल मला दोन सफरचंद आणि लाडू दिले. पुढील
प्रवासाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या त्या शब्दांनी शरीरात अचानक उत्साह संचारला.
त्यानंतर आम्ही वेगाने जाऊ लागलो. रस्त्यात एके ठिकाणी मोठा धबधबा होता. तिथे काही
तरूण पर्यटनासाठी आलेले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या. आता थकवा अजून कमी
झालेला होता. रस्त्याने जाणारे अनेकजण काळजी घ्या, तुमचा प्रवास सुखाचा होवो अशा
शुभेच्छा देत होते. आता उताराचा रस्ता सुरू झाला होता. त्यामुळे सायकल
चालविण्यासाठी विशेष श्रम घ्यावे लागत नव्हते. अंतर वेगाने कापले जात होते.
सकाळी
जेव्हा दांडेली अभियारण्यात प्रवेश केला तेव्हा मागील वर्षीचा गोव्याचा प्रवास
आठवत होता. तेव्हा रात्री जंगलातून जाण्याची वेळ आली होती. त्यामुळे जंगल पाहणे
शक्य झाले नव्हते. आज मात्र मी दिवसभर जंगलातून जाणार होतो. त्यामुळे त्या
निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेणे शक्य होणार होते. त्यामुळे आज चांगले वाटत होते.
तसेच रात्रीतून जंगलात प्रवास करण्याचा धोकाही टळलेला आहे असे वाटत होते. आज
इतिहासाची पुनरावृत्ती चांगली आणि सुखद होत आहे असे सकाळी वाटत होते. सकाळचा विचार
मात्र जसजसा अंधार पडू लागला तस तसा बदलू लागला. आता गोव्याच्या प्रवासाची पुनरावृत्ती
होत आहे असे जाणवू लागले. त्यातून साडेसहा वाजता घनघोर अंधार पडला होता. कारवार अजून २६ किलोमीटर दूर होते. आतापर्यत
दिवसभरात १६० पेक्षा अधिक अंतर पार केलेले होते. अंतराचा फलक पाहून उरलीसुरलेली
ताकदही कमी झाली. तिथे आसपास राहण्याचे ठिकाणही नव्हते. त्यामुळे सायकल चालवित
जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एका ठिकाणी चहापाणी घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात
केली. त्या वाटसरूने दिलेल्या सफरचंदाने देखील चांगलीच उर्जा दिली होती. फारसा इतर
विचार न करता आम्ही पुढे चाललो होतो. वेग वाढला होता. शरिराच्या विविध अवयवांनी
तक्रारी सुरू केल्या होत्या. त्या तक्रारींकडे लक्ष न देता केवळ पुढे चालत राहणे
एवढाच ध्यास आम्ही घेतला होता. मजल दरमजल करत अंतर कापले जात होते. शेवटी कारवार
शहराचे उपनगर सुरू झाले. तेथून कारवार शहर अजून दहा किलोमीटर होते. आता मात्र
उत्साह संचारला होता. थकवा दूर पळाला होता. शेवटी समुद्राच्या खाडीवर बांधलेल्या
एका पुलावर पोहचल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला. कारवार दृष्टीक्षेपात आले होते. प्रवासाला सुरुवात होऊन आज
चार दिवस झाले होते. आतापर्यत ६३४ किलोमीटर चे अंतर आम्ही पार केले होते. कारवारमध्ये
प्रवेश करताच कन्याकुमारी ९८४ किलोमीटर असल्याचे दर्शविणारा फलक दिसला. आपले
उद्दिष्ट्ये जरी दूर असले तरी आपल्या मार्गावर आले होते. त्यामुळे मनातून बरे वाटत
होते. त्याचवेळी एवढे अंतर आपण पार करून जाऊ का याबद्दल शंकाही होती. आज मात्र
आम्ही खूश होतो. कोणताही अडथळा न येता आजचे उद्दिष्टं आम्ही पार केले होते.
जंगलात
एक छोटी दुर्घटना (तिचा परिणाम नगन्य झाला म्हणून नाही तर प्रवास तिथेच संपुष्टात
आला असता) घडली. जंगलातील मनमोहक दृश्यांचे चित्रीकरण करण्याचा मोह झाला. हे माहित
होते की सायकलवरून पडण्याची शक्यता उतारावरच असते. तेही जर तुम्ही दुर्लक्ष केले
किंवा हॅन्डलवरून हात सोडला तर पडण्याची दाट शक्यता असते. अशा प्रकारे आमचे दोन
सायकलस्वार पडून त्यांनी हात मोडून घेतले होते. ही बाब सातत्याने स्वत:ला बिंबविलेली होती तरीही आज तोच मूर्खपणा
झाला होता. चित्रीकरण करण्याच्या नादात सायकलवरील पकड सुटली आणि आम्ही दोघेही
पडलो. क्षणात सर्व घडले. उठताना हात-पाय तपासले, कुठे काही मोडले तर नाही ना, याची
खातरजमा करून घेतली. थोडेफार हाताला आणि पायाला खरचटले होते. आपण सुरक्षित आहेत हे
पाहून सुटकेचा निश्वास सोडला. आपण तर ठिक आहोत तिचे काय झाले ते पाहिले तर तिलाही
काही नव्हते झाले. तिला काही झाले असते तर आमचा प्रवास तिथेच संपला असता.
कन्याकुमारीला जाण्यासाठी आणखी एका वर्षाची वाट पाहावी लागली असती. मात्र आमचे दैव
बलवत्तर होते. त्यामुळे दोघांनाही काही झाले नाही. मोबाईलही शाबूत होता. कोणतेही
नुकसान झाले नव्हते. आम्हाला वाटले अतिआत्मविश्वास न ठेवता शिस्तीत चालले पाहिजे
यासाठीचा तो एखादा संकेत असावा.
पडून
उठल्यानंतर विचार केला की आपल्याला माहित होते की आपण मोबाईलचा वापर चालू
सायकलमध्ये केला तर पडू शकतो. तरीही तो मूर्खपणा पुन्हा केला होता. तेव्हा लक्षात
येऊ लागले की मानवी स्वभाव दुसऱ्यांच्या चुकांपासून फार काही शिकत नाही. व्यक्ती
असो किंवा समाज की राष्ट्र हे भूतकाळातल्या इतरांच्या चुकांपासून अपवादानेच
शिकतात. त्यामुळे त्या चुकांची पुनरावृत्ती होत राहते. माझ्याकडूनही आज ती चूक
झाली होती. थोडक्यात बचावलो नाही तर मिशन अधुरे सोडून परतीचा प्रवास करावा लागला
असता. आज समजले की प्रवासात थोडाही हलगर्जीपणा कमालीचा महागात पडू शकतो. प्रत्येक
क्षण आणि प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकले पाहिजे नाहीतर अनर्थ अटळ आहे. हा धडा
आजच्या सायकलींगने दिला होता. एखाद्याला दिवसभर सायकल चालविणे केवळ कंटाळवाणे वाटत असेल मात्र ती वेळोवेळी
दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे अनेक धडे देत असते. धड्यांतून धडा घेणे हे मात्र
व्यक्तीवर अवलंबून असते. अन्यथा त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती अटळ असते.
कोल्हापूरपर्यत
आलेल्या मित्राला सायकलींग काही रोमांचक वाटली नाही. विनाकारण शरिराला त्रास का
द्यायचा अशा विचाराने त्याने पुढील प्रवासातून माघार घेतली होती. त्याची भूमिका
मलाही रास्त वाटत होती. मात्र तरीही मी पुढे जाण्याचा माझा अट्टाहास सोडत नव्हतो.
सायकलने एवढ्या दूरवर का प्रवास करायचा या प्रश्नाचे उत्तर मलाही शोधावे वाटत
होते. त्यादृष्टीने मी विचार करत होतो. मग आजचा पूर्ण दिवसाचा प्रवास आठवला. आज
१८० पेक्षा अधिक अंतर आम्ही पार केले होते. बेळगावहून सुरुवात करताना एवढेच माहित
होते की आजचे लक्ष्य १८० किलोमीटर आहे. असे वाटत होते आपण घाटमाथ्यावरून खाली
समुद्रकिनाऱ्यावर चाललो आहोत, साहजिकच उतार असेल त्यामुळे सहजरित्या आपण पोहचू,
अशी ढोबळमानाने सर्वसामान्य ज्ञानावर (की अज्ञानावर माहित नाही) आधारित आकलन होते.
प्रत्यक्षात रस्ता मात्र अनेक चढउतारांचा होता. त्यात सायकल चालविताना खूप श्रम
लागत होते. कारवारपूर्वी जर राहण्याची व्यवस्था झाली असती तर कदाचित आम्ही
तिथपर्यत गेलोच नसतो. थांबण्याचा पर्याय नसेल तर आपण ठरविलेले उद्दिष्टं सहजरित्या
पूर्ण करू शकतो. लक्ष्य कितीही मोठे असले तरी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला तर
ते सहजसाध्य होऊ शकते, याची जाणीव आज होत होती. हीच जाणीव जर वयाच्या विशीमध्ये
झाली असती तर त्यावेळी सहजसाध्य लक्ष्य केवळ आळसामुळे मध्यात सोडले होते, ते झाले
नसते. आपल्यात खूप क्षमता असतात त्या क्षमतांवर सातत्याने काम केले तर त्या अधिक
उंचीवर आयुष्याला नेता येते हा बोध बेळगाव ते कारवार या प्रवासात झाला. त्यामुळे
सायकलवरील दूरचा प्रवास हा जरी शारिरीकदृष्ट्या कष्टप्रद असला तरी मानसिकरित्या तो
अधिक सक्षम करणारा असतो, ही जाणीव झाली. आणि आपला प्रवास व्यर्थ नाही हे जाणवत
होते. समुद्रमंथनातून जसे वेगवेगळे रत्न बाहेर पडत होते तसेच सायकलवरच्या या
मंथनातून जीवन जगण्यासाठी बहुमूल्ये अशी एक एक विचाररत्ने विचाराच्या सागरातून
बाहेर पडत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे आजही गलितगात्र शरिरातील मन मात्र
प्रफुल्लित होते.
आठच्या
सुमारास कारवारला पोहचलो. निवास आणि भोजनाची व्यवस्था शोधपर्यत रात्रीचे दहा
वाजले. स्थानिक भोजनालयात जाऊन खाण्याचा निर्धार आजही उपयोगी ठरला. स्वस्तात
अत्यंत पौष्टीक आणि रूचकर जेवण मिळाले. त्या भोजनालयात बंगलोरहून गोव्याला चाललेले
दोन सायकलस्वार भेटले. त्यातील एकाच्या सायकलची ट्यूब खराब झाल्यामुळे त्यांनी
गोकर्णवरून सायकली बसमध्ये टाकून आणल्या होत्या. कारवारमध्ये ते ट्यूब मिळते का ते
शोधणार होते. आम्हालाही वाटू लागले आपला प्रवास अजून कुठपर्यत चालणार? कारण आपणही सोबत अतिरिक्त ट्यूब आणलेली
नव्हती. ती आणायला हवी होती हे आता प्रकर्षाने जाणवू लागले. जिथपर्यत जाऊ तिथपर्यत,
असे ठरवून हॉटेलात जाऊन झोपलो. आज शरीर विचित्र प्रकारे दुखत होते. आज सलग सायकल
चालविण्याचा सर्वोच्च पल्ला गाठलेला होता. यापूर्वी गोव्याचा ६०० किलोमीटरचा पल्ला
चार दिवसांत पूर्ण केला होता. आज मात्र तो टप्पाही पार केलेला होता. त्यामुळे
वाटले कदाचित शरीर दुखत असेल. नंतर लक्षात आले की दुपारी पडल्यानंतर दर्शनी भागात
काहीही लागले नसले तरी मुक्कामार बराच बसला होता. तो मार आता व्यक्त होऊ लागला
होता. उद्या अजिबात सायकल चालविणे शक्य होणार नाही असे सातत्याने वाटत होते.
त्यामुळे रात्री झोपताना सर्व अलार्म बंद करून झोपलो. जेव्हा जाग येईल तेव्हाच
उठायचे असे ठरविले. त्यामुळे पाचव्या दिवशी सर्व आवरून निघायला साडेनऊ वाजले. दोन
शल्ये सातत्याने बोचत होतो. आपण सकाळच्या प्रहरी सायकल चालविण्याचे सुख गमावले आणि
यावेळेपर्यत ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले असते. मात्र आता भर उन्हात
सायकल चालवित जावी लागणार.
सकाळी
एका ठिकाणी नाष्टा करून सायकलिंगला सुरुवात केली. दक्षिणेकडील राज्यांमध्ये
नाष्ट्यांचे पदार्थ सायकलिंगसाठी चांगले. कितीही खाल्ले तरी त्रास नाही. शिवाय
स्वस्तही आणि विविधताही. जिल्हागणिक खाद्य पदार्थांचे प्रकार बदलत होते. त्यामुळे
मनमुराद खात खात आम्ही चाललो होतो. कारवारपासून थोडे अंतर पार केल्यावर एकेरी
रस्ता संपला. दुहेरी महामार्ग सुरू झाला. उजव्या बाजूला विशाल अरबी सागर तर
डावीकडे झाडांमध्ये लपलेला डोंगर आणि त्या दोघांच्या मधून जाणारा रस्ता आणि त्या
रस्त्यावर आम्ही. नजरांना तृप्त करत करत आमचा प्रवास सुरू होता. सूर्य मध्यान्हीला
आला होता. कालचा थकवा आणि शिणलेले शरीर यामुळे सायकल चालविणे खूपच त्रासदायक वाटत
होते. त्यामुळे थोडे थांबून आराम करावा असे ठरविले. एका ठिकाणी नदीकाठी मंदिर होते
आणि त्यामंदिरा समोर मोठे झाड होते. मग तिथे सायकल लावून थोडा वेळ झोपले. काही
वेळानंतर अचानक कानावर वेगळ्या भाषेतील शब्द पडले. जागा होऊन पाहतो तर दोन जोडपे
हे तिथे बुलेटवर थांबलेली होती. त्यांच्या शरीरयष्टीवरून ते विदेशातून आलेली होती
हे लक्षात आले. त्यांच्याशी बोलले असता कळले की ते युक्रेनहून आले होते. दोन महिला
आणि दोन पुरूष रूषिकेशवरून दोन गाड्या घेऊन कन्याकुमारीपर्यत प्रवास करणार होते.
त्यांचा प्रवासाचा संकल्प ऐकून मी चकाकलोच. अरे दुसऱ्या देशातून येऊन आपला देश
बिनधास्तपणे फिरतात. ते सर्व साधारणत: त्यांच्यी विशीतील असतील. आपण चाळीशीत आलो, आपल्याकडे वेळ आहे, पैसा आहे,
बुलेट आहे तरीही अद्याप आपण असा प्रवास का नाही केला? हा
प्रश्न मला सतावू लागला. त्याक्षणापर्यत सायकल चालविण्याचा उत्साह आणि उर्जा
पूर्णपणे संपलेली होती. त्यांना भेटल्यानंतर मात्र अचानक उत्साह जाणवू लागला. आपण
कोणत्याही परिस्थितीत कन्याकुमारीला गेलेच पाहिजे, हे प्रकर्षाने वाटू लागले.
पुढील प्रवास करावा की नाही हे द्वंद्व तिथेच संपले. आपणही आपला देश पिंजून काढला
पाहिजे. असे तीव्रतेने जाणवू लागले. त्यामुळे आलेल्या कंटाळ्याला, थकव्याला राम
राम केला. त्या व्यक्तींशी भेट केवळ काही क्षणच झाली मात्र त्यांच्या प्रवासाने एक
वेगळीच उर्जा आम्हाला दिली. आज पुन्हा प्रकर्षाने जाणवले की शारिरीक थकवा केवळ
शारिरीक नसतो तर त्याला इतरही घटक प्रोत्साहन देत असतात, त्यात प्रामुख्याने तुमची
विचार करण्याची पद्घती प्रमुख असते. तिला योग्य दिशा दिली तर आपण सकारात्मक उर्जा
निर्माण करून आपल्या क्षमतेपेक्षा अधिक काम करू शकतो. थकवा प्रामुख्याने शारिरीक
नसून मानसिक असतो हे जाणवले.
ते युक्रेनीयन
बाय बाय करून गेल्यानंतर विचार करू लागलो की कदाचित आपल्या प्रवासाला आलेली मरगळ
हटविण्यासाठीच तर त्या परदेशी नागरिकांची भेट झालेली नसेल ना. अलकेमिस्ट प्रमाणे
आपल्या उद्दिष्टपर्यत पोहचविण्यासाठी रस्त्यात आपणाला भेटलेले हे फरिश्ते तर
नव्हेत ना. एक मात्र खरे की त्यांना भेटल्यानंतर पुढील प्रवासासाठी एक वेगळाच
उत्साह शरीरात संचारला होता. कर्नाटकातील कोडसनीमधील नद्यांचे स्वच्छ प्रवाह पाहत
पाहत पुढे चाललो होतो. कोडसनीपासून गोकर्ण हे प्रसिद्ध ठिकाण केवळ १५ किलोमीटर
होते. मात्र महामार्गापासून ते ठिकाण आत असल्याने तिथे जाण्याचे टाळले.
समुद्रकिनाऱ्यावरूनच प्रवास चालल्यामुळे अशा पर्यटनस्थळी जाऊन कुंभमेळ्यासारख्या
गर्दीचा अनुभव घ्यायची इच्छा नव्हती. त्यात आजचा प्रवास उशीरा सुरू झाल्याने किमान
दिवसभरात १०० किलोमीटर तरी अंतर पार करण्याचा हेतू होता. त्यामुळे सरळ प्रवास
करायचे ठरविले. दुपारी दोन सुमारास एका उडपी भोजनालयात शाकाहारी थाळी खाल्ली. ते
जेवनही तृप्त करणारे होते आणि स्वस्तही. दुपारनंतर उन्हाची दाहकता काहीशी कमी झाली
होती. शरिरात उत्साह संचारला होता. एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो. तिथे महाराष्ट्रात
काम करणारा एक कांद्याचा तमिळ व्यापारी भेटला. त्याने पहिल्यांदा नाव विचारले.
हिंदू नाव असल्याचे कळल्यानंतर तो म्हणाला की तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा
कार्यकर्ता आहे. त्याने त्याचा संपर्क क्रमांक दिला. प्रवासात काही अडचण आल्यास
संपर्क साधण्यास सांगितला. पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. पाच वाजत आले होते.
लवकरच अंधार पडेल त्यापूर्वी थांबण्याचे ठिकाण निश्चित केले पाहिजे असे वाटले.
मैलाचे
दगड कन्याकुमारीपासून अंतर कमी कमी होत असल्याचे दाखवित होते. किती कमी तर आज
पाचवाजेपर्यत ते केवळ साठच किलोमीटर कमी झाले होते. अजून लक्ष्य ९५० किलोमीटर दूर
होते. कन्याकुमारी जवळ येत होती मात्र अत्यंत धीम्या गतीने. मुरूडेश्वरपर्यत
प्रवास करून तिथे थांबायचे असे ठरविले होते. ते ठिकाण ३५ किलोमीटर दूर होते. दोन
तासांत सात वाजेपर्यत तिथे पोहचता येईल याची खात्री वाटत होती. थोडे ताजे तवाणे
होऊन पुढचा प्रवास सुरू केला. सातच्या सुमारास मुरूडेश्वरकडे जाणारा फाटा दिसला.
मुख्य महामार्गापासून ते ठिकाण चार किलोमीटर आत होते. जायचे यायचे दहा किलोमीटर
अतिरिक्त झाले असते. त्यापेक्षा सरळ महामार्गाने पुढील ठिकाणी मुक्काम करायचे
ठरविले. सायकल चालविताना अजून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे आजच्या दिवसात जेवढे शक्य
आहे तेवढे काम केले पाहिजे म्हणजे उद्याच्या दिवसाचे ताण कमी होतो किंवा अधिकचा
वेळ आपल्याला मिळतो. त्यामुळे मुरूडेश्वरला न थांबता सरळ पुढे भटकलला थांबायचे
ठरविले.
भटकलमधील
घराघरातील व्यक्ती या विदेशात काम करतात. अलीकडे दहशतवादी संघटनांशी निगडीत काही
व्यक्ती या शहरात आढळल्या होत्या. त्यातून हे शहर अनेक दिवस चर्चेच्या ठिकाणी
होते. द हिंदू दैनिकामध्ये या शहराची ऐतिहासिक जडणघडण उलगडविणारा लेख मी वाचला
होता, त्यामुळे या शहराबद्दल कुतूहल होते. शहरात प्रवेश केल्यानंतर राहण्याची
व्यवस्था कुठे होऊ शकते याची विचारणा केली. बसस्थानकाजवळील एका हॉटेलचे नाव कळले.
शहरातून जाताना तेथील श्रीमंतीचे प्रदर्शन करणाऱ्या भव्य निवासस्थाने,
श्रीमंतांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध मॉल्स् आढळली. तेथील एकंदरीत
वातावरणातून ते शहर श्रीमंतांचे असावे असे वाटत होते. तिथे पोहचल्यावर एका
निवासस्थानात आश्रय घेतला. खोलीचे भाडे पाचशे रूपये होते मात्र सायकलमुळे त्यांनी
ते कमी केले. त्यानंतर स्थानिकांना विचारले येथे स्थानिक पदार्थ मिळणारे कोणते
भोजनालय आहे. त्यांनी एका भोजनालयाचे नाव सांगितले. तिथे खरेच अत्यंत रूचकर मासांहारी
जेवण मिळाले.
आजचा
दिवस समाधानकारक होता. उशिरा सुरुवात
करूनही आज १३० किलोमीटरचे अंतर पार केले होते. आमची अपेक्षा केवळ १००
किलोमीटरचीच होती. त्याशिवाय रस्त्याने नयनतृप्त करणारे निसर्गसौदर्य पाहत आलो
होतो. आणि शिवाय कन्याकुमारी अजून जवळ आली होती. त्यामुळे रात्री समाधानाने झोप
आली. आज प्रवासाला पाच दिवस पूर्ण झाले होते. अहमदनगर ते कन्याकुमारी या
टप्प्यातील निम्मे अंतर आज पार झाले होते. त्यामुळे एक वेगळेच समाधान वाटत होते.
जवळपास ७६५ किलोमीटरचा टप्पा गेल्या पाच दिवसांत आम्ही पार केला होता. तोही
कोणत्याही अडथळ्यांशिवाय. आणि आजपर्यत केवल चारच हजार रूपये खर्च झाले होते. एवढा
स्वस्त, निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत आणि व्यक्तिश: स्वत:ला समृद्ध करणारा प्रवास क्वचितच
कोणी केला असेल असे वाटू लागले. एखाद्या प्रियसीला भेटायला चाललेल्य प्रियकराच्या
आवेगाने आम्हाला कन्याकुमारीला आता जावे वाटत होते. यावेळी प्रवास पूर्ण करणे शक्य
आहे अशी खात्री मनोमन पटत होती. गेल्या पाच दिवसांच्या खडतर प्रवासाने प्रवासाच्या
मध्यावर आणले होते. येथे प्रचंड समाधानकारक वाटत होते. एखाद्या चांगले जेवण
केल्यानंतर जी तृप्ती मिळते ती तृप्ती या प्रवासातून मिळत होती. आजपर्यतची वाटचाल
समाधानकारक ठरली होती. अशा समाधानातच रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही.
सहाव्या
दिवसाची सुरुवात सकाळी सहालाच सुरू झाली. भटकळ बसस्थानकावर चहा घेऊन पुढील प्रवास
सुरू केला. या प्रवासाला निघताना सर्वानी सायकलने जातोय म्हणून काळजी व्यक्त केली
होती. ज्यांनी कधीही सायकल चालविली नाही त्यांना वाटत होते की सायकलचा प्रवास महामार्गांवर
धोकादायक असेल. आम्हाला मात्र चिंता नव्हती कारण सायकलचा प्रवास अत्यंत सुरक्षित
असतो. उतारावर तुम्ही काही गडबड केली नाही तर सायकलवरून पडण्याची शक्यता कमी.
चढावर तर पडले तरी फार लागत नाही. दिवसभर सायकल चालविताना सायकलचा सरासरी वेग २०
पेक्षा अधिक असणार नाही. त्यामुळे अन्य वाहने तुम्हाला धडकली नाहीत तर तुम्ही
सुरक्षितच आहात असे मानायला हरकत नाही. दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालक स्वत: देखील अपघातग्रस्त होऊ शकतात. किंवा स्पीड
थ्रीलस् बट इट किल्स याचीही अनुभूती घेऊ शकतात. मात्र सायकलवर या सर्व
शक्यता कमी असतात. तसेच पडले तर उठून सायकल चालवू शकता मात्र मोठी वाहने
उचलण्यासाठी क्रेन किंवा इतरांची मदत लागते. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सकाळीच
एक ट्रक रस्त्यावर उलटा झाल्याचे दिसले. त्याला सुलटा करण्यासाठी दोन क्रेन
प्रयत्न करत होते. तेव्हा सायकलवरून पडलं तर अशा काही भानगडी नाहीत, याचे समाधान
वाटत होते. महामार्गावरील बाजूच्या पांढऱ्या पट्ट्याला धरून चालले तर इतर
वाहनांचाही धोका कमी संभवतो. प्रवास म्हटले तर धोके असतातच त्यातल्या त्यात
सायकलच्या प्रवासात इतर वाहनांपेक्षा कमी धोके जाणवतात. त्यामुळे अनेकदा अनेकजण
माहितीच्या किंवा अनुभवाच्या अभावानेच दुसऱ्यांना सल्ले देत असतात. त्यांनी दिलेले
सल्ले आणि प्रत्यक्ष वास्तव यांमध्ये तफावत असू शकते.
…………………………………………………………………………………………………...
आज
केरळमध्येच प्रवेश करायचा या निर्धाराने सायकल चालवायला सुरुवात केली होती. साधारणत: साडेआठच्या सुमारास रस्त्याच्या उजव्या
बाजूला सागर क्षितिजाला मिळालेले दिसले. डोळ्यांचे पांग फेडणारा तो नजारा पाहून मन
अगदी प्रसन्न झाले. महामार्गापासून केवळ दहा-बारा मीटरवर तो समुद्र असेल. एखाद्या हिंदी
चित्रपटात जसे विदेशातील सुंदर समुद्र किनारे दाखवितात त्याच्याच प्रतिमा तिथे
दिसत होत्या. नित्तळ, निळेशार, स्वच्छ समुद्राचे पाणी पाहून तिथे बरेच प्रवासी
थांबले होते. काही बाईकर्सही होते. त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर पुढील प्रवासाला
सुरुवात केली. कर्नाटकातील आतापर्यत बेळगाव आणि उत्तर कन्नडा हे दोन जिल्हे पार केले
होते. आज तिसरा जिल्हा उडपी लागला होता. उडपी पद्धतीचे जेवण असते हे आपणास माहित
असते मात्र त्या पद्धतीच्या जेवणाचा उगम या जिल्ह्यातून झालेला आहे आणि या
जिल्ह्यातील घराघरातील व्यक्ती या देशभर हॉटेल व्यावसायात आहेत, ही माहिती येथे
आल्यावर मिळाली. येथील जेवणाला एक वेगळाच स्वाद होता. रस्त्यानी जाताना अनेक
प्राचीन तसेच नव्याने बांधलेली मोठी मंदिरे दिसली. एकंदरित हा भाग चांगलाच समृद्ध
वाटला. उडपी गाव महामार्गापासून आत असल्याने आम्ही सरळ प्रवास सुरू केला.
महामार्गापासून
अर्धा किलोमीटर अंतरावर एक छोटेसे भोजनालय होते, तिथे खूप चांगले जेवण मिळते असे
कळले. तिथे गेलो असता दिसले की एका छोट्याशा जागेत खवय्ये दाटीवाटीने जेवत होती.
अवतीभोवतीच्या व्यक्तीही तिथे जेवायला येत होत्या. जेवायला सुरुवात केल्यानंतर
कळले की एवढी गर्दी तिथे का आहे? जेवण
खरेच सुरेख होते. अगदी समाधानकारक जेवण आणि तेही खूप कमी खर्चात झाल्याने आनंद
द्विगुणीत झाला होता. गेल्या सहा दिवसांत प्रत्येक ठिकाणी मिळालेले जेवण उत्तम आणि
रूचकर होते. आम्ही एकाही महामार्गावरील रेस्टॉरंटमध्ये जेवलेलो नव्हतो. स्थानिक
नागरिक जिथे जेवायला येतात तिथेच आम्ही स्थानिक पदार्थ खाल्ले होते. त्यामुळे
देशभरातील चवीतील आणि खाद्यपदार्थातील विविधता अनुभवता आली होती. तसेच स्थानिक
पदार्थ तेथील वातावरणाला पूरक असल्याने त्याचा शरिराला कोणताही त्रास झाला नाही.
शिवाय खाद्यपदार्थातील ही विविधता एकदम स्वस्तात अनुभवता आली होती. प्रवासासाठी एक
नवा मंत्र सापडला होता. जिथे जायचे तिथले स्थानिक जिथे आणि जे खातात ते खायचे.
त्यामुळे खाद्यपदार्थातील विविधता अनुभवता येते आणि उगीच काहीतरी खाऊन पश्चाताप
होत नाही.
उडपीपासून
मंगलोर साठ किलोमीटर राहिले होते. दुपारी दोनच्या आसपास जेवण झाल्यानंतर एका
ठिकाणी आरामासाठी थांबलो. तेथील मालकाने ही जागा खाजगी आहे इथे थांबू नका असे
सांगितले. तसेही त्याबागेत खूप मुंग्या आणि इतर किटक होते, त्यामुळे तिथे झोपणे
शक्यच नव्हते. तेव्हा तेथून उठलो. निघताना विचार केला यापेक्षा चांगली जागा आपल्या
झोपायला मिळेल. एक-दोन किलोमीटर गेल्यानंतर एके ठिकाणी बंद केलेले दुकान आढळले.
तेथील पढवित निवांत झोपलो. फरशी थंड होती आणि बाहेर ऊन होते. त्यामुळे तिथे खूप
छान वाटत होते. सकाळपासून ९० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले होते. थकव्याने
गाढ झोप केव्हा लागली ते कळलेच नाही. सायकल चालविल्यानंतर अशी झोप लागते की
सभोवताल विसरून व्यक्ती निद्राधीन होते. तास-दिड तास झोपल्यानंतर अचानक जाग आली.
पाहतो तर तेथील दुकान चालू केलेले होते. ती एक दूध डेअरी होती. खडबडून जागा झालो.
आवरून निघायला लागलो तोच त्या दूध डेअरीचा मालक कन्नडमध्ये म्हणाला चहा घेणार का? मी त्याला सांगितले की मला कन्नड येत नाही
तर त्याने इशाऱ्याने विचारले. नको नको म्हटले तरी त्याने चहा बनवून दिला. तिथे
मुंबईत राहून आलेला व्यक्ती भेटला तो माझ्याशी मराठीत बोलत होता. तो मुंबईतील एका
कंपनीत काम करत होता. ती बंद पडल्यानंतर तो गावी परतला होता. तिथे तो टेम्पो
चालवित होता. त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये काय फरक आहे? असे विचारले तर तो म्हणाला कर्नाटकातील लोक शांत आहेत मात्र
महाराष्ट्रातील लोक एकमेकांना मदत करतात. नंतर कळले की डेअरीवाल्याने त्याला चहा
होईपर्यत माझ्याशी बोलायला सांगितले होते. त्या व्यक्तीने केलेला चहा खूपच चवदार
लागला. कदाचित ज्या प्रेमाने आणि आपुलकीने तो बनविला त्याने त्याची चव अधिक
वाढविली असेल. जाताना त्याने सोबत स्थानिक डेअरीमध्ये तयार केला जाणारा एक
उर्जावर्धक पदार्थ दिला. त्याच्या कृतीने एक वेगळीच उर्जा दिली. दिवसभर आलेला
पूर्ण थकवा निघून गेला होता. खेरीज सायकल चालवायला नवा उत्साह आणि उर्जा मिळत
होती.
त्या
व्यक्तीच्या एका छोट्याशा चांगुलपणाच्या कृतीने आम्हाला खूपच उत्साहित केले होते.
आपल्या कोणत्या गोष्टी कधी प्रेरित करतील याची काही खात्री देता येत नाही. कोणत्या
गोष्टींनी अड्रेलेनची पातळी वाढेल काही सांगता येत नाही. कोणी केवळ विचारपूस केली,
नुसता अंगठा जरी दाखविला तरी उत्साह वाढत होता. महाराष्ट्रातून कन्याकुमारीला जात
आहे याचे अनेकांना कौतुक वाटत होते. त्या कौतुकातून ते आदरतिथ्य करत होते. तासभर
सायकल चालविल्यानंतर तीन युवक गाडीवर जात असताना माझ्याशी बोलायला थांबले.
प्रवासाबद्दल त्यांनी विचारले. त्यांनी काही काळ माझे सायकल चालवितानाचे
चित्रीकरणही केले.
आता
सायंकाळचे सहा वाजत आले होते. मंगलोर अजून २५ किलोमीटर दूर होते. एका
पेट्रोलपंपावर थांबून थोडा फ्रेश झालो. त्यानंतर मार्गक्रमण सुरू केले.
मंगळोरमध्ये पोहचेपर्यत अंधार पडला होता. त्याबरोबर शरीरातील उर्जाही संपत चालली
होती. त्याच दोन किशोरवयीन मुलांनी थांबवून आमच्या प्रवासाबाबत विचारले. तेही
भविष्यात अशा स्वरूपाचा प्रवास करतील असे त्यांनी सांगितले. मंगळोर शहर संपता संपत
नव्हते. शहरात दम कोंडायला लागला होता. कधी एकदाचे शहराबाहेर पडेल असे झाले होते.
या प्रवासात अनेक शहरांतून जाण्याचा योग आला. शहर आले की प्रदूषित हवा, शहरातील
सांडपाण्याने काळ्या झालेल्या नद्या, गर्दी, वाहतूक कोंडी आणि वाहन चालकांची त्यातून
सुटण्यासाठी चाललेली धडपड मग ती कारण नसताना हॉर्न वाजविणे असो की सिग्नल न संपताच
प्रवास सुरू करणे असो, टोलेजंग इमारती, उड्डानपूल, महागड्या वस्तूंची परकीय
कंपन्यांची दुकाने, पंचतारांकित दवाखाने असेच समान चित्र दृष्टीस पडायचे. नकळत
मनात शहरे नसलेला परिसर आणि शहरं यांची तुलना होत होती. शहरापासून दूर असलेल्या
ठिकाणी हवा स्वच्छ आणि आरोग्यदायी तर समुद्र आणि नद्या नित्तळ आणि स्वच्छ, वातावरण
प्रसन्न आणि आल्हादायक तर शहरांमध्ये याउलट परिस्थिती. शहारापासून दूर निसर्गात
विविधता आढळली तर मुंबईपासून मंगलोरपर्यतच्या शहरात तोच सारखेपणा आणि त्याच समान
समस्या आढळल्या. निसर्गातील विविधता नष्ट करून शहरं सगळीकडे एक साचेबद्ध
प्रतिमांचीच प्रतिकृती निर्माण करताना दिसतात. या नव्याने निर्माण केलेल्या
प्रतिमांमध्येही या ज्याच्यांवर आधारलेल्या असतात त्याच शहरांच्या समस्याही त्याच
असतात आणि त्या सोडविण्याचे मार्गही तेच असतात. त्यामुळे एक समस्या सोडविण्यासाठी
वापरलेला मार्ग नवीन समस्यांना जन्म देतो. आणि ही शहरे टिकविण्यासाठी अगदी सीमांत
पातळीवर जगण्यासाठी अनेकजण गावांकडून शहरांकडे ऐच्छिक किंवा सक्तीने स्थलांतर
करतात.
कसे बसे
मंगलोर शहराच्या बाहेर पडलो. बाहेर पडल्याबरोबर हवेतील गारवा आणि प्रसन्नता जाणवू
लागली. एके ठिकाणी केळी खाऊन शरीरात पेट्रोल भरले. त्यानंतर पुढील प्रवासाला
सुरुवात केली. आज केरळात जाण्याचा मानस होता मात्र ते काही शक्य झाले नाही.
मंगलोरपासून तेरा किलोमीटर आल्यानंतर उलाल या गावात थांबण्याचे ठरविले. तिथे जवळच
एक मंदिर होते. तिथे विचारपूस केली असता त्यांनी आधारकार्ड घेऊन थांबण्यास परवानगी
दिली. जास्त काही भूक नव्हती. मात्र जेवलो नाही तर झोप लागणार या भीतीने काहीतरी
खाल्ले पाहिजे असा विचार करून बाहेर पडलो. तिथे काही स्थानिक भोजनालय नव्हती. दूर
जाण्याचा कंटाळा आला होता. त्यामुळे
महामार्गावरील एक चायनिज रेस्टॉरंटमध्येच नूडल्स खायचे ठरविले. त्या नूडल्स खाऊन
खूपच पश्चाताप झाला. गेल्या सहा दिवसांत कुठेही खाण्याची फसगत झाली नव्हती. आज मात्र
पैसेही गेले आणि त्या खाण्याला चवही नव्हती. गरज नसतानाचे ते सेवन होते, त्यामुळे
लक्षात आले की भूक नसताना काहीही खाणे हे शरीरास चांगले नाही. अतिरिक्त सेवन हे
त्रासदायक ठरते. विचारल्या शिवाय सल्ला देऊ नये तसेच भूक लागल्याशिवाय खाऊ नये
हेही पटले.
आज
मुद्दामहून मंदिरात राहायचे ठरविले होते. गेले पाच दिवस चांगल्या ठिकाणी राहिलो
होतो. मागील वर्षीच्या सद्भावना सायकल यात्रेत जागा मिळेल तिथे झोपलो होतो. एक
सायकल यात्री म्हणाला होता की तो या सायकल यात्रेत हाल भोगायला शिकला होता.
त्यामुळे म्हटले चला आज जरा हाल भोगूयात. त्या मंदिरात त्यांनी एक मोठ्या हॉलमध्ये
झोपायला जागा दिली. रात्री तिथे काही झोपच आली नाही. काहीतरी रात्रभर चावत होते.
त्या रात्री हाल भोगले मात्र झोप काही आलीच नाही. पहाटे चारलाच उठून आवरायला
सुरुवात केली. पाच वाजता तेथून बाहेर पडलो. काही किलोमीटर गेल्यानंतर केरळची सीमा
सुरु झाली.
........................................
आज
प्रवासाचा सातवा दिवस होता. आजपर्यत ९२० किलोमीटरचा पल्ला गाठला होता.
ठरविल्याप्रमाणे सरासरी प्रत्येक दिवशी १५० किलोमीटरचा पल्ला गाठला होता. त्यामुळे
स्वत:च्या कामगिरीवर खुश होतो. आता कन्याकुमारी
अवाक्यात (७०० किलोमीटर) आली होती. पुढील चार दिवसांत आपण कन्याकुमारीत असू असे
वाटत होते. मात्र जेव्हा केरळमध्ये प्रवेश केला तेव्हा सागरी मार्गाचे काम
ठिकठिकाणी चालू असल्याचे दिसले. त्यामुळे वाहतूक कोंडी, बांधकामाचा आणि पाडकामाचा
रस्त्यावर धुराळा, खड्डेमय रस्ते अशातून सायकल चालली होती. त्यामुळे नियोजन
केल्याप्रमाणे काही घडेनासे झाले. कासारगोडला पोहचेपर्यत साडेआठ वाजले होते. रस्त्यातील
धुळीने प्रचंड थकवा आला होता. शहर सोडल्यानंतर एका ठिकाणी नाष्टा करण्यासाठी
थांबलो. डोसा आणि सांबर मागविले. दोन्ही पदार्थ पूर्वीही खाल्ले होते. मात्र
केरळात प्रवेश केल्यानंतर या पदार्थांची चवच वेगळी लागली. भरपेट खाल्ल्यानंतर
केरळातील चहा पिलो. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आता केरळमध्ये चहा पित पित आलो होतो.
मात्र प्रत्येक ठिकाणी चहा हा समान घटक होता मात्र त्याची बनविण्याची पद्धती आणि
चव वेगळी होती. लहाणपणापासून ऐकत होतो की भारतात विविधतेत एकता आहे. या शब्दांचा शब्दश:
अर्थ माहित होता मात्र ती संकल्पना स्पष्ट होत नव्हती. आज मात्र
विविधतेत एकता काय असते याचा अंदाज येत होता. चहा या साध्या पेयाने भारतातील
विविधता आणि त्यांना जोडणारी एकता कशी आहे हे स्पष्ट केले होते. प्रवास नुसता अंतर
कापत नव्हता तर भारताला समजूनही देत होता. आणि आपला देशाचा विस्तार किती मोठा आहे
याची जाणीवही करून देत होता.
रस्त्यांच्या
कामामुळे रस्ता पटपट उरकत नव्हता. अकराच्या
सुमारास एका मंदिरात थोडी झोप घेतली. त्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. दिडच्या
सुमारास चेरूवतूर या गावात दुपारचे जेवन केले. येथेही राईस प्लेट मागविली होती.
तिच्यात आणि कर्नाटकातील राईस प्लेटमध्ये फरक जाणवत होता. भात, सांभर, भाज्या,
मासे, लोणचे, पापड सर्व काही समान पदार्थ होते मात्र त्यांची चव कर्नाटकातील
पदार्थांपेक्षा वेगळी होती. पुन्हा विविधतेतील एकतेचा अनुभव येत होता. केरळचा
कासारगोड जिल्हा सोडून आता कन्नूरमध्ये प्रवेश केला होता. कन्नूरकडे जाताना
राष्ट्रीय महामार्ग ६६ सोडून केरळच्या राज्यमार्गाने प्रवास केला होता. तो राज्य
मार्ग असूनही कुठेही दर्जाबाबत कमीपणा दिसत नव्हता. गावागावातील रस्तेदेखील उत्तम
दर्जाचे आणि खड्डेमुक्त होते. रस्त्यांवर एकही खड्डा आढळला नाही. महाराष्ट्रात असे
मार्ग का निर्माण केले जात नाहीत, असा प्रश्न पडला. आपल्या राज्यात राज्यमार्ग असो
की जिल्हा रस्ता तो खड्ड्यांशिवाय आढळत नाही.
पाचच्या
सुमारास कन्नपुरम येथील एका रस्त्यावर ऊसाचा रस घेण्यासाठी थांबलो होतो. केरळमध्ये
ऊसाचा रस कसा असा प्रश्न पडला. त्या रसावाल्याशी बोलल्यावर कळले की तो उत्तर
प्रदेशचा होता. त्याचे भाऊ आणि इतर नातेवाईक यांनी तिथे रसाचा गाडा सुरू केला
होता. शिक्षणाचा, भांडवलाचा आणि भाषेचा अभाव असूनही त्या उत्तर भारतीयांनी त्यावर
कल्पक असा मार्ग काढला होता. त्यातून स्वयंरोजगाराचा मार्ग शोधला होता. भाषिक,
धार्मिक, सांस्कृतिक विविधता असलेल्या या देशात स्वातंत्र्योत्तर काळात ज्या अनेक
ऐहिक संस्थांनी ( सैन्य, सार्वजनिक उपक्रम, केंद्रिय संस्था आणि सेवा, अखिल भारतीय
संस्था) एकत्रित जोडून ठेवले तसेच काही समूहांनी देखील ही अखिल भारतीय अस्मीता
वृद्धिंगत होण्यास मदत केली. उत्तर भारतीय कामगार वर्ग देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील
निर्माण कार्यामध्ये योगदान देत आहे. भलेही ते नाईलाजास्तव त्या राज्यांतून
स्थलांतर करत आहे तरीही त्यांच्या उपस्थितीमुळे अखिल भारतीय अस्मीता निर्माण
होण्यास मदत होत आहे. त्याखेरीज या वर्गाच्या शोषणावर आणि श्रमावरच त्या राज्यातील
नागरिकांना सेवा आणि सुविधा स्वस्तात मिळत आहेत. राष्ट्रनिर्मितीत या समूहांचा
लक्षणीय वाटा आहे.
अरबी
समुद्राला मिळणाऱ्या अनेक पश्चिम वाहिन्या हिरव्यागार नद्या पाहत पाहत प्रवास
चालला होता. त्या नद्यांच्या भोवतालची हिरवाई आणि नारळांच्या बागांनी वाढवलेले
निसर्गसौदर्य यांनी डोळे तृप्त होत होते. यापेक्षा अधिक सुंदर काय असू शकते? असा प्रश्न पडत प्रवास चालला होता. देशात
अडतीस वर्षे राहून पहिल्यांदाच त्याची नव्याने ओळख होत होती. निसर्ग खरोखरच
अद्भभूत आहे. त्याच्या सहवासात मन अगदी प्रसन्न होत होते. दिवसभराचा थकवा नाहिसा
होत होता. नवा उत्साह मिळत होता. कन्नूरला सहा वाजता पोहचल्यावर तिथे न थांबता
पुढे प्रवास करायचे ठरविले. आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. तिथे न थांबता
अजून थोडे पुढे जावे असा विचार करत प्रवासाला सुरुवात केली. वीस किलोमीटर
आल्यानंतर एका गावात एक मोठे मंदिर होते. तिथे राहण्याचा विचार केला.
त्यानिमित्ताने त्या गावात प्रवेश करून केरळमधील गावपण पाहून घेतले. गावातील रस्ते
एकदम चांगले होते. संपूर्ण गाव हिरवेगार होते. घरांची रचना आकर्षक आणि सुंदर होती.
प्रत्येक घराची रचना वेगवेगळी होती आणि ते एकमेकांपासून दूर होते. भौतिक आणि नैसर्गिक
सुबत्ता तिथे जाणवत होती. तेथील मंदिरात राहण्यासाठीची व्यवस्था नव्हती त्यामुळे
पुढे जाण्याचा विचार केला.
रस्त्याने
जाताना एडक्कड पोलीस स्टेशन दिसले. सहज विचार केला तिथे जावे. तिथे गेल्यावर तेथील
पोलीसांनी बरीच माहिती दिली. ते म्हणाले की या ठिकाणी आशियातील समुद्रकिनाऱ्यावर
गाडी चालविण्याचा सर्वात लांब रस्ता मझापिंलगड येथे आहे. रात्र झाल्याने आता तिथे
जाणे शक्य नव्हते. पोलीस हा उच्चशिक्षित होता. त्याचे इंग्रजी चांगले होते.
केरळमधील एकंदरित गुन्हेगारीबाबत त्याच्याशी चर्चा केली. तो म्हणाला केरळमध्ये गुन्हेगारी
कमी आहे. मात्र राष्ट्रीय गुन्हे अहवालात केरळ राज्य अव्वल आहे. केरळमध्ये
प्रत्येक गुन्ह्याची नोंद केली जाते. इतर राज्यांमध्ये पोलीस गुन्ह्यांची नोंद
करायला टाळतात, त्यामुळे त्यांचा गुन्हेगारी दर हा प्रत्यक्षात होणाऱ्या
गुन्ह्यांपेक्षा कमी दिसतो. केरळमध्ये मात्र प्रत्येक गुन्ह्याची नोंद होत
असल्याने तेथील गुन्हेगारीचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा अधिक आढळते, असे तेथील
पोलीसांनी सांगितले. तेथील एका पोलीसाला सायकलिंगचा छंद होता. त्याला सायकलिंगचे
बारकावे माहित होते. त्याला विचारले की सायकलिंग करता का? तो म्हणाला नाही. मी म्हणालो घ्या की एक.
तर तो म्हणाला तो सध्या पस्तीस लाखाचे घर बांधत आहे. त्यामुळे त्याच्याकडे सध्या
पैसे नाहीत. त्याला म्हटले घरात किती वेळ असणार आहेस? घराचा
थोडा दिखावा कमी कर आणि वाचलेल्या पैशातून सायकल घे. त्याच्यावरून लक्षात आले की
त्याचा प्राधान्यक्रम चुकत आहे. घरापेक्षा सायकल त्याला आरोग्य, संपत्ती आणि
मानसिक स्वास्थ अधिक देऊ शकेल मात्र त्याचा अट्टाहास आधी घर बांधण्यासाठी होता. घर
त्याला पुढील वीस वर्षे हर्बट मर्क्यूज चा वन डामेंशनल मॅन बनविणार आहे. घराचे
हप्ते, त्यासाठी नोकरी आणि त्यासाठी अत्यावश्यक गोष्टींमध्ये काटकसर असे त्याचे
जीवनक्रम होणार होते. त्याशिवाय त्याचे स्वातंत्र्य हिरावले जाणार होते. त्याखेरीज
घराच्या हप्त्यांमुळे नोकरीतून मिळणाऱ्या शाश्वत पगाराची हमी आणि आनंद हिरावला
जाणार होता. त्याची नोकरी केवळ घराचे हप्ते फेडणारे साधन बनणार होती. तो स्वत:हून त्याचे स्वातंत्र्य गहाण ठेवणार होता. तो पोलीस वर्तमानात आढळणाऱ्या
बहुतांशी व्यक्तींचे एक प्रातिनिधिक उदाहरण होते. घरासोबत त्याने सायकल घेतली असती
तर कदाचित त्याला आरोग्य, आनंदही मिळाला असता. मात्र वीस हजाराची सायकल घेताना तो
हजारदा केवळ विचार करत होता मात्र पस्तीस लाखाचे घर बांधताना त्याला त्यातील
संभाव्य धोके दिसत असूनही तो ते धाडस करत होता. कुठेतरी प्राधान्यक्रम चुकत
असल्याचे जाणवत होते.
तिथे काही वेळ थांबल्यानंतर पुढे थलसरीच्या
दिशेने प्रवास सुरू केला. रात्री नऊच्या सुमारास थलसरीला पोहचलो. तेथील एका
हॉटेलमध्ये मुक्काम केला. रात्री इंडियन कॉफी हाऊसमध्ये जेवण केले. ती हॉटेलची चेन
सहकारी तत्त्वावर चालविली जात होती. तेथील जेवण फार काही भावले नाही. आजचा प्रवास
जवळपास १५० किलोमीटर झाला होता. गेल्या सात दिवसांत जवळपास १०६६ किलोमीटरचा प्रवास
झाला होता. आता शरीर थोड्या तक्रारी करू लागले होते. वेगवेगळे अवयव बरेच त्रस्त
झाले होते. सायकलिंग करताना बऱ्याच जखमा झाल्या होत्या. आता पुढील प्रवास करणे
शक्य होणार नाही असे वाटू लागले होते. पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी एखाद्या
दिवसाची सुट्टी गरजेची वाटत होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फार अंतर न जाता
थलसरीपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या कालीकत (इंग्रजी नाव) किंवा कोझीकोळ
(मल्याळी नाव) या शहरात थांबायचे ठरविले. काल रात्रीचा थकवा आणि जखमा सकाळी
बऱ्या झाल्या होत्या. काल आलेली मरगळ गेली आणि नवा उत्साह शरिरात संचारला होता. आपले
शरीरही अजब असते. कधी काय घडेल ते सांगता येत नाही. त्याची स्वत:ला पुर्नउर्जित करण्याची क्षमता असामान्य
असते हेच त्यादिवशी जाणवले. सकाळी निवांत उठून सहा वाजता प्रवास सुरू केला. थलसरी
गाव गेल्यानंतर अचानक उजव्या बाजूला सागरी किनारा दिसला. तिथे बराच वेळ बसून त्या
सुंदर समुद्र किनाऱ्याला डोळ्यांनी भरून घेत होतो. आज सुट्टीचा दिवस असल्याने
तिथेच बराच वेळ घालविला. माहेमधील तो समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ होता. शिवाय एरवी
किनाऱ्यावर आढळणारी गर्दीही तिथे नव्हती. आम्ही दोघेच त्या किनाऱ्यावर होतो.
त्याचा आनंद काही अवर्णनीय असा होता. नैसर्गिक सौदर्याची मुक्तहस्ते झालेली उधळण
मन तृप्त होईपर्यत घेत होतो. समोर सगळीकडे विशाल अरबी समुद्रच दिसत होता. त्यात
तरंगणाऱ्या काही नावा सोडल्या तर निळेशार पाणी थेट क्षितिजापर्यत पोहचलेले होते. ते
दृश्य पाहून मोजता येणार नाही आणि लिहता येणार नाही असे समाधान मिळत होते.
आतापर्यत केलेल्या प्रवासाचे ते दृश्य म्हणजे फळ आहे की काय असे वाटत होते. एखादा
तास तिथे थांबल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली.
पुढे
माहे नावाचे पॉन्डेचेरीतील एक गाव लागले. पॉन्डेचेरी ही पूर्व किनाऱ्यावर आहे.
फ्रेंचांची वसाहत असलेल्या माहेदेखील तिचाच भाग होता. हे काहीसे पूर्व पाकिस्तान
आणि पश्चिम पाकिस्तान सारखा प्रकार होता. केंद्र शासित प्रदेश पूर्वेकडे तर त्याचा
एक भाग पश्चिमेकडे. शहर स्वच्छ आणि सुंदर होते. माहेमधील एका छोट्याशा भोजनालयात
अल्पोहार घेतला. त्यांच्याकडे असलेले सर्व पदार्थांची चव घेतली. कासारगोडमधील
पदार्थांपेक्षा ते वेगळे होते. तिथे उपस्थित असलेल्या गिऱ्हाईंकामध्ये राहुल
गांधींच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख आला. बरेच जण सध्याच्या सरकारवर नाराज होते.
भोजनालयाचा मालक मात्र मोदी भक्त होता. राजकीय मतांचे ध्रुवीकरण झालेले दिसले.
तेथून निघाल्यानंतर कालीकतच्या दिशेने प्रवास सुरू केला. रस्त्यांच्या दुतर्फा
नव्या सहापदरी महामार्गाचे काम चालू होते. त्यासाठी जमीन अधिग्रहीत केली होती.
त्याने अनेक ठिकाणी सुंदर अशी घरे, दुकाने अर्धवट पाडलेली दिसली. अनेक मोठाली झाडे
उन्मळून पडलेली दिसली. मनात सहज विचार आला नव्या रस्त्याचे बांधकाम हे निसर्गाच्या
आणि तेथील स्थानिकांच्या उद्ध्वंसावर रचलेले आहे. या रस्त्याच्या खाली किती जणांचा
इतिहास, अनुभव गाडले गेलेले असतील. हे सर्व रस्ते वाहतूक वेगाने होण्यासाठी होते.
मात्र जिथे अशा स्वरूपाच्या रस्त्यांचे विस्तारीकरण झाले आहे, तिथे देखील
वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे निसर्गाचा विनाश करून केवळ विकासाच्या
पाश्चात्य प्रारूपाचे अंधानुकरण चाललेले आहे. हा प्रवास चालू असताना अहमदनगरमधील
उड्डान पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे वाचण्यात आले. नगरकर फार खुश असल्याचे दिसत
होते. सहज प्रश्न पडला हजारभर कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या रस्त्याचा
स्थानिकांना काय फायदा? तेवढ्या
पैशात तर शहरातील सर्व रस्ते चांगल्या दर्जाचे झाले असते. म्हणजे देशात, शासनाकडे
पैसा आहे मात्र त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. वाटले की जसे त्या पोलीसाचे जसे प्राधान्यक्रम चुकत आहेत
तसेच शासनाचेही चुकत असावेत. समस्यांचे निराकरण करणे हा धोरण कर्त्यांचा ध्यास असल्याचे
दिसत नाही. जेवढे मोठे काम तेवढी जास्त लाच किंवा भ्रष्टाचाराला संधी मिळत असावी, त्यामुळे त्या प्रकल्पांनाच
प्राधान्य दिले जात असावे.
दुपारचे
जेवण पुन्हा एका स्थानिक भोजनालयात घेतले. तिथे फिशथाळी आणि वेगवेगळे सांभार नेहमीच्याच
संतुष्टीची पुनरावृत्ती झाली. तेथून पुढे कालीकत केवळ सात किलोमीटर राहिले होते. कालीकतमध्ये
प्रवेश केल्यानंतर आपण भारतात आहोत का? असा प्रश्न पडला. एवढे नीटनेटके, स्वच्छ
आणि सुंदर शहर मी अद्याप पाहिले नव्हते. सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात तेवढेच
सुंदर शहर कालीकत वाटत होते. कालीकतमध्येच मुक्काम करण्याचा विचार होता. त्याचवेळी
आठवले की कालीकतमध्ये एनसीसीचे ग्रुप मुख्यालय आहे. तिथे जाऊन कोणी भेटले तर
भेटावे असा विचार करून तिकडे गेलो. तिथे तर आश्चर्याचा धक्काच बसला. तेथील ग्रुप
कमांडर ब्रिगेडीअर ई गोविंदच भेटले. त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यांना
सायकलवर एवढ्या दूर एकटाच आल्याचे फार कौतुक वाटले. त्यांनी तिथे राहण्यासाठी
व्यवस्था केली. तेही सायकलिस्ट होते. त्यांना मागील वर्षीच्या सद्भभावना सायकल
यात्रेचाही अनुभव सांगितला. ते म्हणाले एनसीसी चा कॅंम्प चालू असता तर तुझे
व्याख्यान ठेवले असते. त्यांच्या छात्रापर्यत पाठविण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि
फोटो माझ्याकडून घेतले. त्यांनी आमच्या कमांडींग अधिकाऱ्यालाही फोन करून मी
आल्याचे सांगितले. त्यांना भेटून खूप छान वाटले. प्रवासाचा थकवा गळून गेला. नवा
जोम आणि उत्साह शरिरात संचारला.
दुपारी थोडा आराम केल्यानंतर कालीकत समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तेथील किनारा
खूपच स्वच्छ आणि नितळ होता. तीनही बाजूंनी सागराने वेढलेला तो परिसर होता. त्या
किनाऱ्यावर घालवलेली ती सायंकाळ अविस्मरणीय अशीच आहे. लाटांचे ते संगीत, सागराची
अथांगता आणि सागराला भेटलेल्या अवकाशाची उंची सर्वच काही अचंबित करणारे होते.
कोणत्याही ध्यानाशिवाय आणि तपश्चर्येशिवाय आत्मिक समाधान आणि मन:शांती त्या ठिकाणी लाभत होती. गेले आठ दिवस सातत्याने प्रवास करून ११५०
किलोमीटर केलेल्या सायकल प्रवासाचे कदाचित ते बक्षीस असावे. त्याक्षणी वाटणाऱ्या
भावना केवळ अद्भभूत अशाच होत्या. असा सुंदर अनुभव दिल्याबद्दल सायकल आणि सर्वांचेच
मनोमन आभार मानावे वाटले.
आज प्रवासाचा नववा दिवस सुरू झाला होता. सकाळी बरोबर पाच वाजता कालीकत
सोडले होते. येथून कोचीन १८० किलोमीटर होते. आजचा दिवस बरोबर वेळी सुरू झाला होता.
त्यामुळे आज सहज आपण कोचीनला पोहचू असे वाटत होते. सकाळी आठपर्यत जवळपास ५०
किलोमीटरचा टप्पा पार केला होता. एका ठिकाणी चहासाठी थांबल्यावर सहज विचारले की
कोचीन रोड कुठे आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की मी रस्ता
चुकलो आहे. पस्तीस किलोमीटरपूर्वीच मी कोचीनचा रस्ता चुकलो होतो. ते ऐकून धक्काच
बसला. कधीनव्हे ते आज पहाटे सायकलींग सुरू झाली होती. आणि त्यात विनाकारण चाळीस
किलोमीटर अंतर आपण कापले या विचाराने निराश वाटले. तेथील लोकांना कोचीनचा रस्ता
विचारला. एकजण म्हणाला मागे वीस किलोमीटर जा. दुसरा म्हणाला पुढे मल्लपुरमपासून
कोचीनला जाणारा रस्ता मिळेल. मागे जाण्यापेक्षा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. विचार
केला चला तेवढाच केरळचा एक नवा भाग पाहता येईल. सकाळी साडेनऊच्या सुमारास
मल्लपुरमला नाष्टा करून पुढील प्रवास सुरू केला. त्याठिकाणी इजिप्तला जाणारा एक
सायकलस्वार भेटला. तो पुढील २०० दिवसांत कैरोला जाणार होता. तो युट्युबर होता.
त्याचे अनेक व्हिडीओ ऑनलाईन होते. तो सोबत जवळपास ८० किलो वजन घेऊन चालला होता.
सायकलला चार बॅगा अडकवून तो चालला होता. इस्लाम धर्माचे शिक्षण घेण्यासाठी तो
चालला होता. त्याला भेटून आनंद वाटला.
मल्लपुरम
सोडल्यानंतर बराच वेळ रस्ता घाटाचा होता. अगदी दमछाक झाली होती. रस्ता चुकल्याचा
मनस्ताप आणि त्यात चढ यामुळे जीव अगदी मेटाकुटीस आला होता. तरीही सायकल चालली
होती. मध्ये मध्ये रस्त्याचे काम आणि काही ठिकाणी जंगल आणि नद्या लागत होत्या.
त्यामुळे तो परिसर अत्यंत विलोभनीय वाटत होता. असे चालले असताना दुपारी तीन वाजता
अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे एका ठिकाणी थांबावे लागले. तास दोन तास पाऊस काही
उघडला नाही. पूर्ण पाऊस थांबण्याची लक्षणे काही दिसत नव्हती. त्यामुळे पाऊस थोडा
कमी झाल्यावर प्रवास सुरू केला. एका चहाच्या टपरीवरून एका अनोळख्या व्यक्तीने आवाज
देऊन थांबण्यास सांगितले. थांबल्यावर त्याने चहा घेण्याचा आग्रह केला. तो बाईक
रायडर होता. त्यानेही केरळ ते काश्मिर असा प्रवास गाडीवर केला होता. तो कतारमध्ये
कामाला होता. सध्या सुट्टीवर आलेला होता. त्याला भेटून छान वाटले. कोणतीही ओळख
नसताना केवळ सायकलमुळे त्याने आपले आदरतिथ्य केले होते. त्या आदरतिथ्याने शरिराचा
थकवा घालविला. नव्या उमेदीने आणि उत्साहाने सायकल चालवू लागलो. ढगाळ वातावरणामुळे
सहाच्या दरम्यानच अंधार पडू लागला. त्यामुळे मल्लपुरमधील वलयकुलम या गावी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह पाहताच तिथे थांबायचे ठरविले. शासकीय
विश्रामगृहात आपल्याला जागा मिळेल का अशी शंका होती मात्र विचारून पाहण्यास काय
हरकत आहे, असा विचार करून तिथे थांबलो. तिथे स्टुडंस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या
कार्यकर्त्यांची बैठक चाललेली होती. त्यांनी सांगितले की विश्रामगृहात राहण्यासाठी
ऑनलाईन अर्ज करावा लागतो. लगेच तो अर्ज भरून तिथे जागा मिळाली. हा जरा आश्चर्याचा
धक्काच होता. महाराष्ट्रात ओळख असल्याशिवाय सर्वसामान्यांना विश्रामगृहात प्रवेश
मिळत नाही. इथे मात्र परराज्यातील व्यक्तीलाही सहजासहजी प्रवेश मिळाला होता.
साम्यवादी शासनाची जनताभिमुख धोरणांचा आणि भूमिकेचा कदाचित तो परिपाक असावा. ते
काहीही असो केवळ ४०० रूपयांमध्ये राहण्याची चांगली सोय झाली होती. बरेच दिवस
स्थानिक भोजनालयातच जेवण करत होतो. आज वेळ होता आणि समोरच मोठे रेस्टॉरंट होते.
विचार केला चला आज तिथे खाऊयात. तेथील जेवण केल्यानंतर पश्चातापच झाला. केवळ पैसेच
जास्त लागले नाहीत तर त्या खाण्याला काही चवही नव्हती. छोट्या ठिकाणी स्थानिक
पदार्थच खाणे कसे योग्य आहे हे प्रकर्षाने जाणवले.
काल तुलनेने कमी सायकलिंग झाल्याने थकवा थोडा कमी झाला
होता. त्यामुळे सकाळी निघताना प्रसन्न वाटत होते. आजचा प्रवास राष्ट्रीय
महामार्गाने नसल्याने रस्ता चांगला होता. सभोवतालचा परिसरही नयनरम्य होता.
त्यामुळे तिथे खूपच आल्हादायक वाटत होते. नऊच्या दरम्यान त्रिशूरला पोहचलो. शहर
स्वच्छ आणि सुंदर होते. तिथे अनेक ब्रिटीशकालीन
चर्च होते. त्यांची रचना सुंदर आणि भव्य होती. त्रिशूरमधून जाताना एक दुचाकीस्वार
अचानक वळून मागे आला. तोही सायकलिस्ट होते. त्याने पुढील ठिकाणच्या सायकलिस्टचे नंबर
दिले. तसेच त्यांच्या ग्रुपवर माहिती टाकली. कोचीला एक सायकलिस्ट आहे जो अशा
स्वरूपाच्या यात्रेकरूंना मदत करतो असे त्याने सांगितले.
प्रवास मध्येच संपणार याची जी धाकधूक होती ती आता संपली
होती. काही सायकलपटूंचे संपर्क क्रमांक मिळाल्याने काही अडचण आल्यास मदत होऊ शकते
याची खात्री वाटू लागली. आता हा प्रवास पूर्ण होणार याची खात्री वाटू लागली.
त्रिशूरच्या बाहेरच नाष्टा करून पुढे निघालो. ऊन्हाच्या झळा वाढू लागल्या होत्या.
सकाळचा आल्हादायक वातावरण आता कठोर व्हायला लागले होते. त्यामुळे सायकलचा वेग कमी
झाला होता. एके ठिकाणी दुपारच्या सुमारास थांबून विविध प्रकारचे सरबतं घेतले. तिथे
थोडा रेंगाळलो तोच अचानक पाऊस सुरू झाला. एका बसस्थानकावर थोडा वेळ थांबल्यावर
पुढील प्रवास सुरू केला. कोची केवळ तीस किलोमीटर राहिली होती. त्यामुळे एक वेगळाच
उत्साह संचारला होता. त्यातच कोचीतील दोन सायकलस्वारांच्या संपर्कात होतो.
त्यामुळे आता अपघाताची भीती राहिलेली नव्हती.
पाऊस
थांबल्यानंतर अचानक सायकल चालविण्याचा उत्साह वाढला. साधारणत: पाचच्या सुमारास कोचीमध्ये पोहचलो. तिथे एक
सायकलिस्ट शागझील खान हे आमची वाट पाहत होते. त्यांचे सायकलचे एक शोरूम होते.
त्याच्यासोबत चहापाणी झाल्यानंतर अल्लेपीला जाणे योग्य राहिल असे वाटले. त्यामुळे
तिथून निघण्याचा विचार केला. अन्यथा खान यांनी कोचीला राहण्याची व्यवस्था केली
होती. जाताना त्यांनी सायकलला लावण्यासाठी एक पाऊच दिला. तो मी हो नाही हो नाही
करत स्वीकारला. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांनी हाताला घालण्यासाठी म्हणून मोजे दिले.
त्यानंतर थोडा वेळ झाल्यानंतर ते म्हणाले सायकलला बॅक लाईट नाही. दुकानात गेले आणि
तो घेऊन आले. मी म्हणालो त्याचे आता पैसे घ्यावे लागतील. त्यांना पाचशे रूपये
दिले. ते थोडा वेळ दुकानात गेले आणि परत पैसे घेऊन आले. म्हणाले त्यांच्याकडे
सुट्टे पैसे नाहीत. ते खोटे बोलत होते हे मला कळत होते. मी म्हणाले मी आणून देतो,
तर त्यांनी ते घेण्यास नकार दिला. त्यांची
आणि माझी कोणतीही ओळख नव्हती. तरीही त्यांनी हजार रूपयांपेक्षा अधिक रकमेच्या
वस्तू दिल्या होत्या. त्यांची दानत पाहून आश्चर्य वाटले. त्यांनाही सायकल
चालविण्याची हौस होती. मात्र त्यांनी एकट्याने प्रवास केलेला नव्हता. मी एकटाच जात
आहे त्याचे त्यांना विशेष कौतुक वाटत होते. ते एक भले गृहस्त वाटले. त्यांचा निरोप
घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. तिथे आणखी एक सायकलिस्ट थांबला होता. त्याने
माझ्यासोबत दहा किलोमीटर सायकल चालविली. त्यानंतर मी एकटा अलेप्पीच्या दिशेने
निघालो. कोची ते अलेप्पी हे अंतर पन्नास किलोमीटर होते. शागझील खान यांना
भेटल्यावर पुन्हा उत्साह वाढला होता. त्यामुळे वेगाने अंतर कापले जात होते. या
प्रवासात असे अनेकदा झाले की अचानक उत्साह वाढत होता. कितीही थकलेले असलो तरी काही
तरी घडायचे आणि अचानक उत्साह वाढायचा. शरीराच्या थकव्यावर मात करणारी यंत्रणा
मेंदूमध्ये असावी याची जाणीव होऊ लागली. एनसीसीमुळे अनेकदा सैन्यातील अधिकाऱ्यांशी
संपर्क येतो. ते म्हणतात प्रत्येक गोष्ट मानसिक असते. मनाने ठरविले तर आपण काहीही करू शकतो. मन आणि मेंदू यांचे
शरिरावर नियंत्रण असते. शरीराला मनावर ताबा नाही मिळवू दिला तर काहीही असाध्य
नाही. असे मतं ते सातत्याने सांगायचे. आज त्याचा प्रत्यय आला होता. आपण ठरविले तर
शरीर काहीही करू शकते. फक्त मानसिक पातळीवर येणारे निर्बध झुगारून देता आले
पाहिजेत. याची प्रचीती या प्रवासाने आली होती. मनावर ताबा ठेवायला शिकविले.
शरिराने कितीही तक्रारी केल्या तरी त्याची पर्वा नाही करायची अशी शिकवणीचाच जणू हा
प्रवास परिपाठ ठरला होता.
रात्री अलेप्पीला साडेआठ वाजता पोहचलो. आज दिवसभरात १६५
किलोमीटर अंतर पार केले होते. आज प्रवासाचा दहावा दिवस होता आणि १४१२ किलोमीटर
अंतर पूर्ण झाले होते. अलेप्पी पासून कन्याकुमारी एक किंवा दिड दिवसाच्या
प्रवासाएवढी राहिली होती. एका स्वप्नाची अनपेक्षित पूर्तता होण्याच्या नजीक आलो
होतो. त्यामुळे खुप बरे वाटत होते. शरिराच्या विविध तक्रारी सुरू झाल्या होत्या.
हॉटेल शोधता शोधता आणि जेवण पूर्ण करेपर्यत रात्रीचे बारा वाजून गेले होते. पहाटे
लवकर उठून निघायची शक्यता धूसर वाटू लागली होती.
रात्री
आंघोळ करताना ओटीपोटात एक गाठ आल्याचे लक्षात आले. वाटले की ती गाठ हर्नियाची आहे.
त्यामुळे हातापायातील शक्तीच गळून गेली. हर्नियाची गाठ आहे म्हणून नव्हे तर आता
आपल्याला यापुढे सायकल चालविता येणार नाही याचे जास्त दु:ख होत होते. हर्निया काय नीट होईल पण सायकल
सुटेल अशी भीती वाटली. मात्र क्षणभर विचार केला सुटली सायकल तर सुटली. आपण
फिरण्याचा दुसरा मार्ग शोधू. या विचार सरशी सर्व निराशा संपुष्टात आली. त्यानंतर
पुन्हा त्या पाच मिनिटे मनात उमटलेल्या भावनाकल्लोळाचा विचार केला तर लक्षात आले
की बऱ्याचदा विचारच आपली मन:स्थिती ठरवित असतात. त्यामुळे
त्यांच्यावर ताबा मिळविला तर जीवनात येणारे सुख किंवा दु:ख
पचविण्याची आपली क्षमता निर्माण होते. मला सायकलचे धन्यवाद द्यावे वाटले कारण तिने
तो विचार करायला शिकविले होते. क्षणात पर्याय देऊन भविष्याच्या चिंतेने ग्रस्त
मनाला उभारी आणि विश्वास दिला होता. अधिक चांगल्या पर्याय शोधण्याची आणि त्यातून
निवड करून निराशा घालविण्याची शैली दिली होती. काही वेळाने एका डॉक्टरला फोन केला
तो म्हणाला ही हर्निया नसून अवधानाची गाठ आहे. त्यामुळे सर्व मनोरथच गळून पडले.
पुन्हा जाणवले वास्तव वेगळे असते आणि मन काहीही मनोरथ रचत असते.
रात्री
झोपायला उशिर होऊनही सकाळी लवकरच जाग आली. पहाटे पाचलाच प्रवास सुरू झाला. एका
ठिकाणी चहा घेऊन पुढील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर पन्नास किलोमीटर
गेल्यानंतर एका ठिकाणी भरपेट नाष्टा केला. रस्त्यांच्या उजव्या बाजूला अरबी सागर
मध्येमध्ये दर्शन देत होता. बऱ्याच ठिकाणी खोदकाम केलेले होते. त्यामुळे उन्मळून
पाडलेली झाडे, अर्धवट कापलेल्या इमारती एका बाजूला तर नजर क्षितिजाला पोहचलेला
सागर दुसरीकडे. निसर्गाने केरळला अगदी भरभरून दिल्याचे दिसत होते. या प्रवासाने
अगदी तृप्त करून टाकले होते.
दुपारी परीपल्ली या गावात जेवायला थांबलो. महामार्गापासून
थोडे आतमध्ये असलेल्या एका भोजनालयात शाकाहारी जेवण केले. जेवण झाल्यानंतर अचानक
जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे बराच वेळ तिथेच थांबावे लागले. आजच कन्याकुमारीला
पोहचण्याचा जो मानस होता त्यावर पावसाचे पाणी पडत होते. शेवटी चार वाजता प्रवासाला
सुरुवात केली. सायंकाळी सहाच्या सुमारास त्रिवेंद्रम या शहरात पोहचलो. शहर खूपच
सुंदर आणि स्वच्छ होते. एनसीसी मुख्यालयात जायचा विचार होता मात्र ते दूर असल्याने
तिकडे जाणे टाळले. बायपासने शहराच्या बाहेर पडलो. पाच-दहा किलोमीटरचा एका
उड्डानपूलावरून चाललो होतो. अचानक पाऊस सुरू झाला. पुलावर थांबाण्यास जागा नव्हती.
त्यामुळे तो पूल क्रॉस करून जोडरस्त्यावरील एका फर्शीच्या दुकानात थांबलो. तास-दोन
तासांनी पाऊस थांबला. त्यानंतर पुढील प्रवास सुरू केला. त्रिवेद्रमपासून वीस
किलोमीटर अंतरावर कोलावम नावाचे एक पर्यटनस्थळ होते. तिथे मुक्काम केला. सर्व
आवरून झोपायला रात्रीचे अकरा वाजले होते.
आज प्रवासाचा शेवटचा दिवस होता. खूप दमल्यामुळे की
उद्दिष्टं जवळ आल्याने माहित नाही परंतु रात्री झोपच आली नाही. प्रयत्न करूनही झोप
येईना त्यामुळे रात्री दोन वाजताच उठून आवरायला सुरुवात केली. पहाटे अडीच वाजता तर
सायकलसह रस्त्यावर निघालो. त्रिवेद्रम ते कन्याकुमारी नव्या महामार्गाने न
जाण्याचे एकाने सांगितले होते. त्या रस्त्याचे काम चालू होते आणि ठिकठिकाण तीव्र
चढ होते. मात्र तो संदेश बरेच पुढे आल्यावर पाहिला होता. त्या रस्त्यावर आम्ही
दोघेच होतो. जवळपास तीन तास तिकडे एखादे दुसरी दुचाकी वगळता इतर कोणतेही वाहन फिरकत
नव्हते. कोणाची तरी सोबत असावी म्हणून मोबाईल वर गाणे लावले. झोप न झाल्याने थकवा
आलेला होता. गाण्यांमुळे उत्साह वाटेल असे वाटत होते मात्र कशानेच काही होईना.
त्यामुळे शेवटी कसे बसे सायकल चालवित होते. ऐरवी सोबत खायला काहीतरी असायचे. मात्र
आज खूप गरज असताना खायला मात्र काहीही नव्हते. त्या रस्ता वाहतुकीसाठी अद्याप खुला
नसल्याने तिथे कुठेही चहा-पाण्याची सोय असणारी ठिकाणं नव्हती. त्यामुळे
चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. असे बराच वेळ गेल्यानंतर अचानक तमिळनाडूमध्ये आपले
स्वागत आहे, असा फलक पाहिला. थोडा उत्साह वाटला. थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की
पुढेच रस्ताच नव्हता. पुन्हा माघारी फिरलो. एवढ्या पहाटे रस्ता विचारायला तिथे
कोणीच नव्हते. बरेच मागे आल्यानंतर एका ठिकाणी एक व्यक्ती दिसला. त्याने रस्ता
सांगितला. त्यावर थोडे अंतर चालल्यानंतर एक चहाचे दुकान दिसले. तिथे थांबून चहा
घेतला. हा चहा केरळचा नव्हता हे
तो बनविण्याची पद्धती पाहिल्यावर आणि चव घेतल्यावर कळले. राज्य बदलल्याबरोबर चहा
करण्याची पद्धतीदेखील बदलली होती. विविधतेत एकता काय असते याची प्रचीती चहावरून
आली होती. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये चहा घेतला होता. प्रत्येक
ठिकाणी ती बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरायचे भांडेदेखील भिन्न होते. चवही
भिन्न होती. मात्र सर्वामध्ये चहा हा समान घटक होता. जो पदार्थ भारतीयांचा नव्हता
मात्र तो आज बहुतांशी भारतीयांच्या आवश्यक पेयांमध्ये त्याचा सामावेश होतो. मात्र
भारतातील विविधतेने या पेयाला देखील बदलून टाकले. विविधतेत एकता काय असते हे
अनेकदा वाचले होते मात्र ती चहाच्या रूपकामधून समजली आणि अनुभवली होती. तोच प्रकार
खाद्यपदार्थाच्या बाबतीतही जाणवत होता. नावे बऱ्याच ठिकाणी सारखी होती मात्र ते
बनविण्याची पद्धती आणि चवही भिन्न होती.
आता
कन्याकुमारी केवळ चाळीस किलोमीटर राहिली होती. कन्याकुमारीकडे जाताना नागरकॉईल
नावाचे एक शेवटचे शहर लागते. तेथील ११ तमिळनाडू एनसीसीच्या बटालियनला भेट दिली.
तेथील कार्यालय बंद असल्याने कोणी भेटू शकले नाही. साडेनऊच्या सुमारास कन्याकुमारी
चार किलोमीटर आहे असे दाखविणारा फलक पाहिला आणि एका स्वप्नपूर्तीच्या नजिक आपण
पोहचलो याचे समाधान जाणवू लागले. त्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंचा परिसरावर
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली दिसली. तेथील नैसर्गिक सौदर्याचा मनमुराद आनंद
लुटत प्रवास चालला होता. असे करत करत शेवटी सकाळी दहा वाजता कन्याकुमारीला पोहचलो.
तीन महासागरांचा त्रिवेणी संगम पाहून मन तृप्त झाले होते. एकूण प्रवासच मनाला
शांती आणि समाधान देणारा ठरला होता. शरिराला जरी खूप त्रास झाला असला तरी मन मात्र
प्रचंड उल्हासित झाले होते. एवढा प्रवास करून मिळालेले समाधान काही शब्दांत मांडता
येणार नाही. किनाऱ्यावर फोटो काढून आणि ते सर्वाना पाठवून झाल्यावर तिथे हॉटेल
शोधायला सुरुवात केली. जागा शोधल्यावर जेनण करून झोपावे असे वाटत होते. काल दिवसभर
प्रवास केलेला होता. झोप झालेली नाही. आजही रात्री अडीचपासून प्रवास सुरू केलेला
होता. त्यामुळे थोडा आराम करून सायंकाळी किनाऱ्यावर जावे असा विचार करत होतो.
त्याच क्षणी दुसरा विचार मनात आला. आपण येथे वारंवार येणार आहोत का? आराम तर कधीही करू शकतो. समुद्राच्या
सान्निध्यात राहण्याचा योग पुन्हा येणार का? हा विचार
केल्याबरोबर सर्व थकवा क्षणात निघून गेला. आंघोळकरून ताबडतोब समुद्रकिनाऱ्यावर
निघालो. दिवसभर तिथे सागराच्या लाटा अनुभवत बसलो. रात्री जेवन करून पुन्हा तिथे
काही काळ समुद्राचा आस्वाद घेत होतो. गेल्या बारा दिवसांचा शिणवटा घालविणारे ते
क्षण होते. प्रचंड मेहनतीनंतर मिळणारे अप्रतीम असे ते सुख होते.
सहा नोव्हेंबरला पहाटे चारलाच आवरून पुन्हा किनाऱ्यावर गेलो. तिथे एक
फटाकड्याच्या दुकानात काम करणारा मजूराशी भेट झाली. त्याच्या एतद्देशीय शहाणपणाने
त्याने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. गर्दीत वस्तूंची काळजी कशी घ्यायची त्याने
सांगितले. विशेष म्हणजे त्याला हिंदी
किंवा इंग्लिश भाषा येत नव्हती आणि मलाही तमिळ. तरीही आम्ही एकमेकांशी दोन तास
गप्पा मारल्या. संवादात भाषा ही अडसर ठरली नाही. त्याच्याशी झालेली भेट या
प्रवासातील एक विशेष बाब वाटली. कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर सूर्योदय पाहिल्यानंतर
परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. रेल्वेस्थानकावर सायकल जमा करून कन्याकुमारी
एक्सप्रेसणे परतीचा प्रवास सुरू झाला.
रेल्वेत बसल्यानंतर गेल्या बारा दिवसांचा १७०० किलोमीटरचा प्रवासातून आपण
काय मिळविले? वर्तमानकाळात एकापेक्षा एक अधिक वेगाने आणि कमी
श्रमात प्रवास करण्याचे अनेक साधने उपलब्ध असताना सायकलने जाण्याची खरेच गरज होती
का? असा प्रश्न मी स्वत:ला विचारले. तर
त्याचे उत्तर होय असे मिळाले. सायकलने प्रवास आणि पर्यटन करण्याचे वेगळे फायदे
आहेत. तो प्रवास शारिरीकदृष्ट्या कष्टप्रद असला तरी त्याचे वेगळेपण आहे. सायकल
चालविताना गाडी चालविण्या इतपत सावध राहावे लागत नाही. आजूबाजूचा परिसराचे सूक्ष्म
निरीक्षण करत आपण जाऊ शकतो. विचारांची गती आणि निरीक्षण यांचा समतोल साधला जातो.
त्यामुळे सभोवताल वेगळ्याच पद्धतीने जाणवायला लागतो.
बेळगाव
ते कारवार या टापूत संपूर्ण दिवस जंगलातून सायकल चालविण्याची मजा काही औरच होती.
त्यावेळी जंगलाचा मनसोक्त आनंद लुटत प्रवास चालला होता. पक्षी, प्राणी, वेगवेगळ्या
वनस्पती, असंख्य नद्या, धबधबे पाहवयास मिळाले. जंगलातील निरभ्र आकाश आणि शांतता
यांमुळे वेगळीच अनुभूती येत होती. त्यांनतर जवळपास १००० किलोमीटरपेक्षा अधिक
समुद्रकिनाऱ्यावरून प्रवासाची संधी मिळाली. ऐरवी आपण प्रसिद्ध अशा
समुद्रकिनाऱ्यावर जात असतो. जिथे पर्यटकांच्या गर्दीमुळे तो भाग एखाद्या कुंभमेळ्यासारखा
गजबजलेला वाटतो. तिथे सागराच्या विशालतेची आणि अथांगतेची अनुभूती घ्यायला मर्यादा
येते. मात्र या प्रवासात असे अनेक किनारे दिसले की जिथे आम्ही दोघेच होतो. जंगल
आणि सागराचा सहवास या प्रवासात मनसोक्त लाभला. असंख्य नद्या पाहवयास मिळाल्या.
निसर्ग का महत्त्वाचा असतो आणि त्याचे रक्षण का केले पाहिजे हे प्रकर्षाने जाणवू
लागले. जस जसे शहर जवळ येत असे तस तसे नद्यांचा रंग बदलत होता. झाडांचे प्रमाण कमी
होत होते. निसर्गातील नीरव शांतते ऐवजी वाहनांची वर्दळ, गोंगाट हाच कानावर पडत
होता. जागोजागी वाहतूक कोंडी झालेली दिसत होती. शहरं सुरू झाले की वायू प्रदूषण,
जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण जाणवत होते. निसर्गातील भिन्नता मानवी हस्तक्षेपाने
नष्ट होत असून त्या ठिकाणी कृत्रिम समानता आणली जात आहे. कोणत्याही शहरात प्रवेश
केल्यानंतर वाहतूकीची कोंडी ठरलेलीच होती. त्या कोंडीवर उड्डान पुलाचा उतारा
वापरूनही समस्याचे निराकरण झालेले दिसले नाही. शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांना
गटाराचे स्वरूप सर्वत राज्यांमध्ये दिसले. दुसरी एक समान बाब आढळली ती म्हणजे
बिगरशेती प्लॉट विकणे आहे, असे फलक सर्व शहरांजवळच्या गावांमध्ये दिसले. एक प्लॉट
किंवा एका फ्लॅटच्या मालकीहक्कासाठी रात्रंदिवस अट्टापिट्टा करावा लागतो. नोकरी ही
जगण्याचे साधनं न राहता ती या भौतिक गोष्टींचा मालकी हक्क मिळविण्याचे एक मार्ग
राहतो. त्यातून स्वत: साठी
जगणे बाजूला राहते आणि चंगळ आणि अतिरिक्त सेवनासाठी जगणे व्हायला लागते.
खरे
सांगायचे म्हणजे भारतातील विविधतेतील एकतेबाबत लहाणपणापासून नुसते ऐकत आलो होतो.
ही संकल्पना कोणी समजावून सांग म्हटले असते तर भंबेरी उडाली असती. मात्र या
प्रवासाने ती विविधता नुसती समजली नाही तर तिला एकत्र जोडणारे सूत्रही समजू लागले.
नुसत्या चहाच्या उदाहरणावरून ही विविधतेतील एकता लक्षात येते. प्रवास केलेल्या
प्रत्येक राज्यातील चहा बनविण्याची पद्धती आणि चव वेगवेगळी होती. तोच प्रकार
खाद्यपदार्थांच्या बाबतीतही होता. जिल्हा बदलला की खाद्यपदार्थ आणि त्यांची चव
बदलत होती. दक्षिणेकडील तीनही राज्यांत सांबर आणि मासे समान होते मात्र ते
बनविण्याची पद्धती भिन्न होती. या राज्यांमध्ये लुंगी हे पेहरावाचे समान वस्त्र
दक्षिण भारतात वापरले जाते. मात्र ते घालण्याची पद्धती प्रत्येक राज्यात भिन्न
आढळली. खाद्यपदार्थ, निसर्ग, पेहराव याबाबतची भिन्नता दिसत होती. मात्र त्यातही
काही समान धागे आढळत होते.
भारताचा आणि स्वत:चाही शोध घ्यायचा असेल तर सायकलवरून होणारी भ्रमंती हा एक उत्तम मार्ग
आहे. या भ्रमंतीतून स्वत:चेही अनेक गुंते सुटत जातात. विशाल
आणि अफाट निसर्गाकडे पाहिल्यानंतर कळते की स्वत:चा अहंभाव
स्वत:ला हिमालयापेक्षाही मोठा समजतो. असे निसर्ग पर्यटन
केल्यास लक्षात येते आपण निसर्गापुढे किती क्षुद्र आणि शुल्लक आहोत. आपल्यातील
हिंमत किती तोकडी आहे. आपल्या सवयींनी आपणास प्रचंड हतबल केलेले आहे. एकही रात्र
आपण निसर्गात इतरांच्या मदतीशिवाय घालवू शकत नाही. शिवाय सायकल तुम्हाला कमीत कमी
साधनांमध्ये प्रवास करायला शिकविते. खेरीज गरज आणि चंगळ यांमध्ये भेद करायलाही
सायकलमुळे मदत होते. एवढा मोठा देश आहे त्यात एक किंवा दोन गुंठे खरेदी करून
आयुष्य खर्ची घालण्यात काही शहाणपण नाही ही जाणीव झाली. भौतिक संपत्ती
कमविण्यापेक्षा देशभर फिरून आलेली अनुभवाची श्रीमंती अधिक मूल्यवान आहे, हे
परतीच्या प्रवासात प्रकर्षाने जाणवत होते. आणि हा प्रवासही अगदी स्वस्तात
होतो. प्रवासाला निघताना ही शेवटची सायकल
सफर असेल ही जी भूमिका होती ती बदलून आता जोपर्यत शक्य आहे तोपर्यत देशभर सायकलने
फिरले पाहिजे हा निर्धार आपोआप तयार झाला.