श्रीनगर-लेह सायकलिंग - Srinagar-Leh Cycle Journey
Srinagar-Leh Cycle Journey
श्रीनगर-लेह सायकलिंग
महाविद्यालयाला सुट्ट्या लागल्या की सायकलवर फिरायचे वेध लागतात. उन्हाळ्यात मात्र केवळ उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मिर व लडाख या राज्यांमध्ये सायकलवर जाणे शक्य असते. नोव्हेबर २०२३ मध्ये नगर ते श्रीनगर असा प्रवास केला होता. तेव्हाच लेह पर्यंत जाण्याची इच्छा निर्माण झाली होती. त्यामुळे यावेळी श्रीनगर (Srinagar) ते लेह असा प्रवास करायचे निश्चित केले. पृथ्वीवरील नंदनवनात सायकलवर फिरणे हा एक सुखद अनुभव असेल अशी आशा होती. जम्मूपर्यत सायकल रेल्वेने न्यायची आणि तेथून पुढील प्रवास वाहनाने करून श्रीनगरपासून लेहपर्यंत सायकलिंग करायचे असे निश्चित केले.
मात्र, २२ एप्रिल २०२५ रोजी अचानक काश्मिरमधील पेहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवाद्यांनी २८ पर्यटकांची हत्या केली. त्यामुळे भारत-पाकमधील तणाव वाढला. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता होती. आता काश्मिरमध्ये जाऊ नये असा काळजीपोटी सल्ला अनेकांनी दिला. माझाही निश्चय डळमळीत झाला. तिकीट काढले आहे तर पठाणकोटहून हिमाचलमध्ये फिरायला जाता येईल का? त्या अनुषंगाने हिमाचलमधील मार्गाची चाचपणी केली. काश्मिर सोडून इतर ठिकाणी जाण्यास मन काही तयार होईना. एके दिवशी सैन्यात अधिकारी असलेल्या कर्नल नरेशला फोन करून काश्मिरबाबत विचारले. तो म्हणाला तेथील अनेक पर्यटनस्थळे सरकारने बंद केलेली आहेत. त्याला म्हटले मला फक्त महामार्गानेच श्रीनगर लेह असा प्रवास करायचा आहे. तेव्हा तो म्हणाला मग काही हरकत नाही. काश्मिरमध्ये कायमच धोका असतो. तसा तो यावेळीही आहे. त्यामुळे जाण्यास काही हरकत नाही. त्याचे सल्ले नेहमी संतुलित आणि विचारपूर्वक असतात. त्यामुळे अनेक पेचप्रसंगांमध्ये मी त्याचा सल्ला घेत असतो. त्याने दिलेल्या सहमतीने माझी द्विध्दा अवस्था संपुष्टात आली आणि आत्मविश्वास दुणावला.
३ मे २०२५ ला जम्मू तवी रेल्वेने
माझा आणि सायकलचा प्रवास सुरू झाला. जवळपास चाळीस तास प्रवास केल्यानंतर सोमवारी
दिनांक ५ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता गाडी जम्मूत रेल्वेस्थानकावर पोहचली.
सायकलचा बॉक्स आणि इतर साहित्य रेल्वेस्थानकाबाहेर काढेपर्यत खूप हाल झाले. ओझे
उचलून हात दुखायला लागले. स्थानकाबाहेरच श्रीनगरला जाणाऱ्या गाड्या थांबलेल्या होत्या.
त्यातील एकाने १३०० रूपये घेऊन श्रीनगरला सोडण्याचे कबूल केले. इतर प्रवासी भरणे
अजून बाकी असल्याने दरम्यानच्या काळात तेथील स्थानकावर असलेल्या एका हॉटेलमध्ये
जेवायला गेलो. तेथे जेवत असलेल्या एका व्यक्तीशी सहज संवाद साधला असता तो म्हणाला
सध्या पर्यटनाचा हंगाम आहे. मात्र पेहलगाम हल्यामुळे येथे पर्यटकांचा शुकशुकाट आहे, ऐरवी इथे बसायला जागा मिळत नाही एवढी गर्दी असते. दहशतवादी हल्ल्याचे
दृश्य परिणाम काश्मिरमध्ये दिसू लागले होते. अगदी तुरळक पर्यटक दिसत होते. मोठ्या
प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या स्थानकावर उभ्या केलेल्या होत्या. इतर
प्रवासी आल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला.
मागील वेळी जम्मू-श्रीनगर
रस्त्याने सायकलवरून गेलो होतो. तेव्हाचे प्रत्येक ठिकाण आठवत होते. गाडीत
माझ्यासोबत एक सीमा सुरक्षा दलाचा जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान
प्रवास करत होते. त्यांना विचारले तुम्हाला असे एकट्याने जाण्याला परवानगी आहे का? ते म्हणाले इथे परवानगी कशालाच नाही. मात्र वेळ वाचविण्यासाठी आम्ही
स्वत:च्या जबाबदारीवर जात आहोत. २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या
जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे हल्ला झाला होता. त्यानंतर अनेक सावधानीच्या
सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात तर जम्मुहून श्रीनगरला अनेक जवान
खाजगी वाहनांतून जाताना दिसत होते. माझ्यासोबतचा सीमा सुरक्षा दलाचा जवान हा उत्तर
प्रदेशचा होता. त्याच्याशी बोलताना जाणवले की त्याच्या मनात अल्पसंख्याक समुदायाबाबत
प्रचंड द्वेष होता. तो म्हणत होता ही जमात इथले खाते आणि पाकिस्तानचे गुणगान गाते.
त्यांना चांगला धडा शिकविला पाहिजे. पंतप्रधान मोदी मोठी कारवाई करून पाकिस्तानला
धडा शिकवतील, असा त्याचा गाढा विश्वास होता. त्याला
काश्मिरचे सौंदर्य पाहायचे होते म्हणून त्याने इथे बदली करून घेतली होती. मात्र तो
म्हणत होता ही नोकरी म्हणजे एक प्रकारची कैदच आहे. कुठेही जाता येत नाही. काश्मिर
त्याला आता नरक वाटायला लागले होते. दरम्यानच्या काळात भारताने देशातील सर्व
पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. तो म्हणत होता आमच्या
(उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री) योगींनी ताबडतोब पाकड्यांना बाहेर जाण्यास सांगितले
आहे. लखनऊ विमानतळावर त्यांची गर्दी झालेली आहे. सरकारच्या या कृत्याचा त्याला
प्रचंड अभिमान वाटत होता. तेव्हा लक्षात आले की या सरकारला जनमानसाची चांगली नस कळली
आहे. त्यामुळेच ते अस्मितादर्शक निर्णयांनी सर्वसामान्यांना खुश करतात. त्यांच्या
या निर्णयांतून भौतिक पातळीवर फारसा फरक पडत नसला तरी त्याचा त्यांना राजकीय फायदाच
होतो, कारण त्यांच्या समर्थक वर्गात हे निर्णय काही तरी
धाडसाचे आहेत असे मानले जाते. त्यामुळे पेहलगाम दहशतवादी हल्ल्यात सरकारचे अपयश
असूनही सरकारला त्याचे भांडवल बनवून त्यातून राष्ट्रभक्तीचा ज्वर निर्माण करता
आला. अपयशातही या सरकारचे नाक नेहमी वरच असते. त्यासाठी त्यांना प्रचारतंत्राची
आणि प्रसारमाध्यमांची खूप मदत होते. त्यामुळे या सरकारला कोणीही धारेवर धरू शकत
नाही. त्यांना प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरतात.
गाडीतील दुसरा जवान
महाराष्ट्रातील विदर्भातील होता. त्याचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते. तो म्हणत
होता विदर्भातील समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत जमीन
संपुष्टात आली. पूर्वी महामार्गांना विकासाच्या धमन्या म्हटले जात असे कारण
महामार्गाच्या अवतीभोवती उद्योग-व्यवसाय करण्याच्या संधी
निर्माण होत होत्या. आता मात्र महामार्ग बंदिस्त होत
असल्याने स्थानिकांना व्यवसाय निर्मितीतून होणारे फायदे मिळत नाहीत. त्याशिवाय राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अशा प्रकल्पाच्या जमिनी
आधीच घेऊन ठेवतात. या जवानाला समृद्धी मार्गांवरील थांब्यावर
जागा घ्यायची होती. त्याने विचारपूस केली तेव्हा त्याला कळले की तेथील जमिनीच्या
व्यवहारांवर सरकारने बंदी घातली आहे. ती जमीन फक्त समृद्धी महामंडळच घेऊ शकते.
जिथे व्यवसाय करण्याची संधी आहे तिथे त्यांना जागा घेता येत नाहीत. त्यामुळे
जमिनीच्या मोबदल्याशिवाय इतर कोणतेही फायदे या महामार्गाच्या निर्मितीमुळे
स्थानिकांना होत नाहीत. त्या जवानाच्या बोलण्यातून निसर्गाच्या होत असलेल्या हानी
बद्दल जागृती असल्याचे दिसले. तसेच केंद्र-राज्यातील सरकार
केवल धार्मिक विद्वेषाचे वातावरण निर्माण करत आहे. नागरिकांचे भौतिक प्रश्न
सोडविण्यात त्यांना रस नाही, असे तो म्हणत होता. प्रवासात
एकाच वेळी दोन भिन्न विचारांच्या व्यक्तींशी संवाद झाला. एकजण सत्ताधारी पक्षाच्या
प्रचारतंत्राला बळी पडून अंधभक्त झालेला तर दुसरा विवेकाने विचार करून सरकारच्या
कृतींवर, धोरणांकडे चिकित्सकपणे पाहणारा होता.
सायंकाळी सहाच्या सुमारास आमची गाडी श्रीनगरच्या स्थानकावर पोहचली. तिथे अनेक वाहनचालक व्यवसाय नसल्याने निराशपणे थांबलेले होते. मी गाडीतून सायकलचा बॉक्स खाली काढून ठेवला. त्यांनी मला कुठे जायचे ते विचारले. सायकलने लेहला जाणार आहे असे सांगितल्यानंतर पाच सहा चालक सायकल जोडून देण्यासाठी मदत करू लागले. दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांनी काश्मिरकडे पाट फिरविली होती. हंगाम असूनही श्रीनगरमध्ये शुकशुकाट होता. तेथील वाहनचालक खूप दुःखी होते. त्यातील एकजण म्हणाला जेवन तयार होते, फक्त वाढणे बाकी होते. तोच आमचे ताट हिरावले गेले. अगदी तोंडघशी आलेला घास हिरावला गेला. आमची गुंतवणूक, रोजगार सर्व काही हिरावले गेले आहे. पर्यटनाशिवाय आमच्याकडे रोजगाराच इतर कोणताही मार्ग नाही. माझ्या बॅगा रस्त्यावरच होत्या. एकजण म्हणाला लक्ष ठेव, तर दुसरा म्हणाला काश्मिरमध्ये कोणीही चोर नाही. आमच्यासाठी पर्यटक हे देवासमान आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. त्यांनी सायकलचा बॉक्ससही ठेवून घेतला. मी जर पुन्हा तिकडे आलो तर मला सोबत नेता येईल यासाठी.
सायकल जोडण्यासाठी मदत करणारे काश्मिरी वाहनचालक
मनात धाकधूक असताना श्रीनगरमध्ये
आलेल्या पहिल्या अनुभवाने खूप बरे वाटले. काश्मिरींच्या मदतीचा अचंबा वाटला. सायकल
जोडली मात्र ती व्यवस्थित जोडली न गेल्याने ब्रेक आणि अलाईमेंटमध्ये अडचणी निर्माण
झाल्या होत्या. त्यांनीच सांगितले की लाल चौकात सायकल दुरूस्त करून मिळेल.
त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्रित फोटो काढला. त्यांनी व्हिडीओ बनविण्याचा आग्रह
धरला. ते म्हणाले काश्मिरी लोक दहशतवादी नाहीत. पर्यटक त्यांच्यासाठी देव आहेत.
मला ही बाब इतर भारतीयांना कळविण्यास सांगितले. त्यातील एकाने मला त्याचा मोबाईल नंबरही
दिला. काही अडचण आल्यास संपर्क साधण्यास सांगितले. त्यांनी मला केलेल्या मदतीने मी
अचंबित झालो. सायकलवर लाल चौकात दुरूस्तीसाठी आलो. तिथे एका
सायकलवाल्याने सायकल दुरूस्त करून दिली. किती पैसे देऊ असे विचारले असता तो
म्हणाला मी फारसे काही केलेले नाही, त्यामुळे काही नको देऊस.
श्रीनगरमध्ये राहण्यासाठी ठिकाण शोधत असताना एका व्यक्तीने मला बळेच
थांबवून घेतले. कुठून आलास? कुठे चाललास? असे विचारले. त्याने पाण्याची बाटली आणून दिली. चहा पिण्याबाबत विचारले.
माझ्या अंगात स्वेटर नव्हते. मी जेव्हा त्याला म्हणालो की मी लेहला चाललो आहे,
तेव्हा तो म्हणाला तुला जॅकेट देऊ का? काहीही
ओळख नसताना आणि कोणतीही अपेक्षा नसताना त्याने मला मदत देऊ केली होती.
तेथून पुढे मोबाईलसाठी सीम कार्ड
शोधू लागलो. एक दुकान मिळाले परंतु तिथे कार्डसाठी स्थानिक संपर्क हवा होता.
त्याला म्हणालो जम्मू स्थानकावर कोणत्याही स्थानिक संदर्भाशिवाय देत होते. मग
तुम्हाला काय अडचण आहे. तो म्हणाला ते जम्मू आहे. तिथे काहीही चालू शकते. इथे
आमच्यावर अनेक बंधने आहेत. काही अडचण झाल्यास आम्हाला तुरूंगात जावे लागेल.
त्यामुळे मी सीम देऊ शकत नाही. जम्मूत का नाही घेतले असा विचार करत तेथून बाहेर
पडलो. त्याच वेळी दुसरा असाही विचार आला की नाही मिळाले सीम तर हरकत नाही काही
दिवस आपण मोबाईलशिवाय राहण्याचा प्रयत्न करू. आज दिवसभर नेटवर्क नसल्याने मोबाईल
फारसा हाताळला गेला नव्हता. सारखे त्यात पाहण्याची गरजही वाटत नव्हती. बॅगेत तसाच
पडून होता. त्यामुळे एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवता आले होते. असेच पुढचे काही
दिवस काढूयात असा विचार केला आणि सीम न मिळाल्यामुळे झालेला त्रागा कमी झाला.
त्यानंतर मुक्कामासाठीचे ठिकाण शोधू लागलो. दल लेक जवळ एका व्यक्तीने रूम पाहिजे
का? असे विचारले. त्याने मला एका हॉटेलमध्ये नेले. तो
सांगत होता दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटक या वर्षी काश्मिरमध्ये आलेच नाहीत. आमचे
खूप नुकसान झाले आहे. पर्यटनाशिवाय आम्हाला रोजगाराचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध
नाही. फार वाईट अवस्था यावर्षी झाली आहे. त्याने मला दाखविलेले हॉटेल चांगले होते.
ऐरवी त्याचा दर तीन हजार रूपये होता मात्र मला ते केवळ सातशे रूपयांमध्ये मिळाले.
शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये काश्मिरी पद्धतीचे जेवन केले. अशा रितीने काश्मिरमधील
पहिला दिवस संपला होता. दिवसभरात आलेल्या सकारात्मक अनुभवांनी मनातील भीती आणि
साशंकता कमी होण्यास मदत झाली. प्रवासाची सुरुवात चांगली झाली होती.
या प्रवासाला सुरुवात
करण्यापूर्वी एका मित्राने मला एक व्हिडीओ पाठविला होता. त्यात एक सायकलवाला असे
म्हणत होता की त्याला काश्मिरमध्ये आधी धर्म विचारला. त्याने जेव्हा हिंदू असे
सांगितले तेव्हा त्याची सायकल दुरूस्त करायला नकार दिला. मला आलेला अनुभव मात्र
त्याच्या अगदी विरोधी होता. स्वतःहून सायकल जोडणीसाठी पुढे आलेले चालक, सायकल दुरुस्तीचे पैसे न घेणारा कारागीर, रस्त्यात
थांबवून चहापाणी आणि जॅकेट देऊ करणारा काश्मिरी या बाबी मात्र वास्तव काही वेगळेच
असल्याचे सुचवित होते. त्यामुळे त्या व्हिडीओमधील माहिती बहुदा जाणीवपूर्वक काश्मिरींबद्दल
द्वेष पसरविणारी असावी, असे वाटले.
दुसऱ्या दिवशी, ६ मे २०२५ रोजी सायकलने प्रवास सुरू होणार होता. सकाळीच उठून आवरायला
सुरुवात केली. शहरात फारशी वर्दळ नव्हती. चहासाठीही कुठेही दुकानं दिसत नव्हते.
बराच अंतर पार केल्यानंतर एका दुकानात चहा मिळाला. त्या दुकानदाराने पर्यटकांसाठी
घरामध्ये अतिथी निवास बांधले होते. तो म्हणाला जून पर्यतच्या सर्व खोल्या
पर्यटकांनी बुक केल्या होत्या. मात्र हल्ल्यानंतर सर्व बुकिंग रद्द झाले. त्यांचा
या वर्षीचा हंगाम बुडाला. खूप नुकसान झाले. तो राजकीय प्रश्नांवरही बरीच मते मांडत
होता. तो म्हणाला हा हल्ला जाणूनबुजून काश्मिरी लोकांना आर्थिकदृष्ट्या उध्वस्त
करण्यासाठी केलेला आहे. आधी आमची फुलशेती नष्ट केली, त्यानंतर
हस्तकला, कंत्राटी पद्धत आणून शासकीय नोकऱ्यांही कमी केल्या,
आणि रोजगाराचा शेवटचा राहिलेला पर्यटनाचा मार्गही आता धोक्यात आला
आहे. गेल्या पस्तीस वर्षांच्या अशांततेच्या काळात
काश्मिरमध्ये कधीही पर्यटकांवर हल्ले झाले नाहीत. केवळ काश्मिरी अर्थव्यवस्था
संपुष्टात आणण्यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आलेला आहे, अशी
त्याची ठाम धारणा होती. त्यामध्ये काश्मिरींचा काहीही संबंध नाही. भारतातील
निवडणुकांचे राजकारण प्रभावित करण्यासाठी काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यांचा वापर
केला जातो असे त्याचे मत तयार झाले होते.
काश्मिरमध्ये आलेल्या कोणत्याही
भारतीय नागरिकासोबत गैरव्यवहार केले जात नाहीत. त्याने सांगितले की त्याच्या
घरातही काही बिहारी मजूर राहतात. त्याने त्यांना कधीही धर्म विचारला नाही.
किंबहुना थंडीच्या दिवसांत त्यांना गरम कपडे दिले. आम्ही इतरांशी भेदभाव करत
नाहीत. मात्र पेहलगाम हल्ल्यानंतर देशभर शिकत असलेल्या
काश्मिरी विद्यार्थ्यांना ताबडतोब राज्य सोडून जाण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी
त्यांना मारहाणही झाली. त्यामुळे काश्मिरी युवकांना आपल्याच देशात परके असल्याचे
वाटले. प्रत्येक जणाला आजकाल रोजीरोटीचे पडलेले आहे. त्यामुळे कोणीही
दहशतवाद्यांच्या भानगडीत पडत नाही. तो हेही म्हणत होता की प्रत्येकाला स्वतःचा
धर्म आहे आणि तो धर्म त्याला त्याच्या देवांची पूजा करायचे शिकवतो. मात्र आम्हाला
प्रसारमाध्यमे आमची राष्ट्रनिष्टा सिद्ध करून दाखवायला लावतात. प्रसारमाध्यमे
मोठ्या प्रमाणात काश्मिरींबाबत गैरसमज पसरवित असून त्याचा फटका काश्मिरींना बसत
आहे. प्रसारमाध्यमांची भूमिका खूपच धोकादायक आणि द्वेष पसरविणारी आहे, असे तो म्हणाला. तसेच तो हेही म्हणाला की वर्तमानातील केंद्रातील सरकार हे
धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे समाज धर्माच्या आधारावर
विभागला जात आहे. एकंदरीत त्याच्या बोलण्यातून हे जाणवत होते की काश्मिरींना
शांतपणे जगणे आता अशक्यप्राय झाले आहे. त्यांना सातत्याने
देशद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागते.
चहापाणी केल्यानंतर पुढील
प्रवासाची सुरुवात झाली. साधारणातः दहा किलोमीटर गेल्यानंतर डोंगररांगा आणि सिंधू
नदीचे पात्र दिसू लागले. सभोवताली हिरवीगार डोंगरं, रस्त्याच्या
बाजूने पांढरी शुभ्र वेगाने वाहणारी सिंधू नदी पाहून मन अगदी प्रसन्न झाले.
निसर्गाचा आस्वाद घेत घेत सायकल प्रवास चालला होता. सभोवतालचा परिसर युरोपमधील
ठिकाणांशी साध्यर्म्य असणारा होता. गेल्या तीन दिवसांच्या प्रवासाचा सारा शिणवटा
निघून गेला होता. सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहून खूपच आल्हाददायक वाटत होते. भर
उन्हात प्रवास चालू होता तरीही वातावरणातील थंडाव्याने प्रवास त्रासदायक वाटत
नव्हता. लेह चारशे किलोमीटर दर्शविणारा फलक दिसला आणि सायकल चालविण्याचा उत्साह
आणखी वाढला.
सिंधू नदी काठी
तास दीड तास प्रवास केल्यानंतर
एका व्यक्तीने चहासाठी थांबविले. त्याने माझे नदीकाठी काही फोटो काढले. एका गावात
सायकल दुरूस्त करून घेतली. त्यानेही दुरूस्तीचे काही पैसे घेतले नाहीत. ते सायकलचे
शेवटचे दुकान होते. दुपारी दीडच्या सुमारास एका घराजवळ आरामासाठी थांबलो. नंतर
माहित झाले की ती मशीद होती. तिथे एक केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान पहारा देत
होता. त्याने माझी बॅग तपासून पाहिली. तो म्हणाला सध्या काश्मिरला बदनाम
करण्यासाठी कोणी काहीही करू शकतो. तिथे नमाज पढण्यासाठी काही वृद्ध व्यक्ती आले
होते. त्यांनीही समकालीन घटनांबाबत चर्चा केली. ते म्हणाले आम्ही काश्मिरी लोक
बाहेरच्यांना कधीही त्रास देत नाहीत. मात्र आमच्या मुलांवर भारतात हल्ले होतात.
त्यांना देशद्रोही म्हणून हिणवले जाते. जाताना त्यांनी मला विचारले की काही मदत
हवी आहे का? एकाने तर पैसेही देऊ केले. एकंदरीत पेहलगामच्या
हल्ल्यानंतर काश्मिरी लोक खूपच व्यथित झाले होते. हा हल्ला कोणीतरी हेतुपुरस्सर
काश्मिरींच्या विरोधात घडवून आणला आहे, अशी त्यांची ठाम
धारणा होती.
सिंधूच्या बाजूने, पर्वतांच्या पायथ्याने स्वप्नवत प्रवास चालला होता. प्रत्येक ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करावे वाटत होते. अनेक फोटो आणि व्हिडीओ काढूनही मन भरत नव्हते. एवढी नैसर्गिक सौदर्यांची उधळण इथे झालेली होती. प्रवासाला येऊन कृतकृत झाल्यासारखे वाटत होते. अनोखे आंतरिक समाधान सभोवताल पाहून मिळत होते. रस्त्यावरील चढउतारांनी शरीर थकले होते मात्र बर्फाच्छित हिमशिखरे आणि प्रचंड आवाज करत वाहणाऱ्या नदीच्या सहवसोनमार्गजवळील एका ठिकाणी
सोनमार्ग जवळ येत असतानाच दुपारी
श्रीनगरचा एक सायकलस्वार रस्त्याने भेटला. त्याने या प्रवासात काय काळजी घ्यायची
याच्या सूचना दिल्या. परतीच्या प्रवासात तो माझी सायकल ट्रान्सपोर्टने माघारी
पाठविण्यासाठी मदत करणार होता. त्याबाबत त्याने लेहमध्ये चौकशी केली होती.
त्याच्या मदतीच्या शब्दांमुळे मी निर्धास्त झालो होतो. जसजसे सोनमार्ग जवळ येत
होते तसतसे नैसर्गिक सौदर्याची उधळण जोरात होत होती. अप्रतिम असे नैसर्गिक देखावे
अवतीभोवती दिसत होते. बर्फाच्या नैसर्गिक लाद्या डोंगरांच्या कपाऱ्यांवर अडकलेल्या
होत्या. बर्फाच्छित कड्यांच्या खालून पाणी वाहत होते. ते पांढरेशुभ्र पाणी खाली
सिंधू नदीला मिळत होते. तिचा प्रवाह खडकांमधून वाट काढत अत्यंत वेगाने वाहत
होता. त्या प्रवाहाचा प्रचंड आवाज येत होता. गुडघाभर पाणी असेल परंतु त्यात पाय
ठेवण्याची हिंम्मत होत नव्हती. समोरचा महाकाय हिमालय पर्वत, त्याच्या
पायथ्याशी वाहणारी सिंधू नदी यांचे अस्तित्व स्वतःला अगदी नगन्य ठरवित होते. आपले
अस्तित्व निसर्गापुढे अगदी शून्यवत आहे ही भावना प्रकर्षाने जाणवत होती. स्वतःमधील
राग, लोभ, मत्सर यांचा नकळत निचरा होत
होता. हिमालयातील शुद्ध पाण्यासारखे मनातील गढुळता निवळून एक प्रकारची नीरव शांतता
या प्रवासात अनुभवास येत होती. अद्भूत मनःशांती मिळत होती. मनातील
सर्व कोलाहल शांत होऊन निसर्गाशी तादात्म्य पावल्याची भावना अनुभवास येत होती.
असे प्रवास करण्याची आपल्याला संधी मिळत असल्याने आपण किती सुदैवी
आहोत ही जाणीव प्रत्येक क्षणाला होत होती. भारत किती सुंदर आहे हेही दिसत होते.
सायंकाळी सहा वाजले होते.
सोनमार्ग अजून वीस किलोमीटर दूर होते. आपण हे अंतर सहज पार करू असे सुरुवातीला
वाटले होते. मात्र काही वेळाने वेगाने वारे वाहू लागले. रस्ता
चढाचा सुरू झाला होता. शरीरही थकले होते. अंतर काही केल्या
संपत नव्हते. मोबाईलची बॅटरीही संपत आली होती. अंधार पडू लागला. सभोवतालचे
हिरवेगार डोंगर संपून आता बर्फाच्छित डोंगर दिसू लागले. थंडीडी वाढू लागली.
सोनमार्ग अजून चार किलोमीटर राहिले होते. शेवटी साडेआठच्या सुमारास सोनमार्गला
पोहोचलो. तिथे एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. थकवा प्रचंड आलेला होता. थोड्याही
चढावर सायकल चालविणे जवळपास अशक्यप्राय झाले होते. समुद्रसपाटीपासूनची उंची वाढत
असल्याने थोडेही चालले तरी दम लागत होता. श्वासोच्छवास वेगाने होत होता. छातीतही
दुखल्यासारखे वाटत होते. बऱ्याच जणांनी सांगितले होते की समुद्र सपाटीपासून जस जसे
अधिक उंच जाऊ तसे सायकल चालविताना त्रास होतो. त्यामुळे मनात धाकधूक वाढली होती.
आपल्याला नेमका काय त्रास होत आहे हे कळत नव्हते. झोपही येत नव्हती. कशीबशी रात्र
गेली. सकाळी सहा वाजता उठून आवरले. हॉटेलच्या समोरच चहा घेऊन पुढील प्रवासाला
सुरुवात केली.
दरम्यान सकाळी बहुतेकांच्या
मोबाईल स्टेटसवर ऑपरेशन सिंदूरची माहिती होती. मध्यरात्री भारत सरकारने पाक
व्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक केला
होता. त्यामुळे भारत-पाकमध्ये तणाव निर्माण झाला. दोघांमध्ये कधीही युद्ध होऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली होती. एका मित्राने या तणावाचा माहिती दिली.
पुढील प्रवास करणे टाळावे असेही सुचविले.
अशा मानसिकतेत असताना, तिसऱ्या दिवशी ७ मे २०२५ ला पुढील प्रवास करण्याचे ठरविले. सोनमार्गनंतर
काही अंतरावर पोलीस तपासणी नाका आहे. तेथून वाहतूक नियंत्रित केली जाते. आज
लेहकडून येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य असल्याने तो रस्ता काही काळ वर जाणाऱ्या
गाड्यांसाठी बंद होता. जोजीला पासमध्ये गाड्या अडकू नयेत म्हणून १२.३० पर्यंत
कोणतेही वाहन लेहकडे सोडणार नव्हते. त्यांनी मलाही अडविले. एकजण म्हणाला कशाला
पुढे जातोस, सध्या तणावाची परिस्थिती आहे. दुपारी दोनपर्यत
सोडणार नाहीत. त्याला खूप विनंती केली पण तो काही सोडण्यास तयार नव्हता. मागे
फिरावे की काय असा विचार आला. तेथील एका चालकाला याबाबत विचारले. तो म्हणाला थोडा
वेळ थांबा सोडतील. मग त्या पोलीसाच्या वरिष्ठाला विचारले. तो म्हणाला अकरा वाजता
सोडतो. त्याला म्हणालो जोजीला पास होणार नाही. तेव्हा तो म्हणाला चिंता नको करू
आमच्या गाडीतून तुला सोडवू. त्याच्या त्या आश्वासनाने धीर आला. थोडावेळ बसून
राहिलो. अर्धा तासांने त्याने मला जाण्याचा इशारा केला. आणि त्यानंतर पुढील प्रवास
सुरू झाला.
थोडे अंतर पार केल्यानंतर सर्व
चढाईचा प्रदेश सुरू झाला. प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंचीही वाढत चालली होती.
हिरवीगार गवताची कुरणे दिसत होती. बर्फाच्छित डोंगरांचे प्रमाण वाढत चालले होते.
काल रस्ता सिंधूसोबत होता. नदीच्या प्रवाहाने खळखळणारे मधुर संगीत निर्माण केले
होते. ते कानावर पडतच प्रवास चालला होता. आज रस्ता नदीपेक्षा वर चालला होता आणि नदी खाली खाली जात होती. परिसरात जोजीला भुयाराचे काम चालले होते. सभोवताल खूपच मनमोहक आणि सुंदर
दिसत होता. रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. परिसर जवळपास निर्जन होता. मनुष्यवस्ती
कुठेही दिसत नव्हती. समुद्रसपाटीपासून ९६०० फुटांवर एक बॉर्डर रोड ऑरगॅनाझेशनचे (BRO)
चे युनिट दिसले. BRO मध्ये काम करणारे काही
मजूर दिसले. तिथेच एक चहाची टपरी होती. तिथे चहापाणी केल्यानंतर पुढील प्रवासाला
सुरुवात केली. नकळतपणे आता समुद्रसपाटीपासून दहा हजार फुटांपेक्षा अधिक वर आलो
होतो. नदीचे खोरे दूर दूर चालले होते. आणि रस्ता मात्र उंच उंच होत होता.
अवतीभोवतीचा परिसरही नैसर्गिक सौदर्याची उधळण करत होता. वर हिमाच्छिदित पर्वत
शिखरे आणि खाली संथपणे वाहणारी नदी असा रम्य नजारा सभोवताली होता. तो नजारा पाहून
हिंदी चित्रपटातील दृश्य आठवत होते.
या नैसर्गिक सौंदर्याने देशात
निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणाचा आणि त्यामुळे प्रवासाबाबत निर्माण झालेल्या
भीतीचा विसर पडत होता. आपण कुणातरी वेगळ्याच विश्वात आलो आहोत असे जाणवत होते.
ऐहिक प्रश्नांपासून दूर गेल्यासारखे वाटत होते. अकराच्या सुमारास रस्त्यावर सायकल
उभी करून थोडावेळ आराम करण्यासाठी पडलो. झोप मात्र येत नव्हती. काही वेळानंतर
पुढील प्रवासाला सुरुवात केली. स्वप्नवत चाललेल्या या प्रवासाला अचानक धक्का बसला.
सायकल पंक्चर झाली. काही अंतरावर BRO चे कामगार काम
करत होते. एका ठिकाणी सायकलवरील बॅगा उतरून ठेवल्या आणि सायकलची ट्यूब बदलण्यास
सुरुवात केली. हा पहिलाच प्रयत्न होता. सायकल पुन्हा व्यवस्थित होईल की नाही याची
धाकधूक होती. मात्र सुदैवाने सर्व काही सुरळीत पार पडले.
मी सायकल पंक्चर काढत असताना
तेथील कामगारांचा एक मुकादम तिथे आला. त्याने मला दुरूस्तीसाठी मदत केली. जाताना
तो म्हणाला सर्व सामान व्यवस्थित तपासून घे. त्याने सोबत पिण्यासाठी पाणी भरून
घेण्यासही सांगितले. तिथे जवळच डोंगरातून बर्फाच्या खालून एक पाईप टाकला होता.
त्यातून तेथील सर्वजण पिण्यास पाणी घेत होते. कोणत्याही मानवी स्पर्शाशिवायचे
हिमालयातील शुद्ध पाणी पिण्यास मिळत होते. त्या पाण्याची चवही नैसर्गिक होती आणि
त्यात नैसर्गिक खनिजद्रव्ये होती.
या भागात वर्षातील सहा महिने खूप
थंडी असल्याने हवामान राहण्यास प्रतिकूल असते. पाणी आणि हवा मात्र शुद्ध स्वरूपात
मिळते. त्या अनुषंगाने शहरी लोकांसाठी या दोन्ही गोष्टी येथे पर्वणीच आहेत. पुढील
सर्व प्रवासात कुठेही पाणी विकत घ्यावे लागले नाही. सर्व ठिकाणी नैसर्गिक झऱ्यातील
पाणी दिले जायचे. येथील नागरिकांनाही या पाण्याचा अभिमान होता. तरीही अनेक ठिकाणी
दुकानामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीस होत्या कारण आलेले पर्यटक त्या
बाटलीबंद पाण्याचाच आग्रह धरत होते. असे पर्यटक या भागात येऊन नैसर्गिक पाण्याला
मुकत होते. शिवाय तेथील निसर्ग सौदर्यांचा प्लास्टिकच्या बाटल्या टाकून खराबा करत
होते.
सायकल दुरुस्तीस बराच वेळ गेल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. आता जोजीला खिंडीचे चढाईवर वळणदार टप्पे लागले होते. सायकल चालवित जाणे जवळपास अशक्य झाले होते. त्यामुळे चालतच पुढील प्रवास सुरू होता. जोजीला खिंडीचे टप्प्यावर टप्पे खालून दिसत होते. एक चढाई पूर्ण केल्यानंतर काही रस्ते दुरूस्ती करणारे कामगार बसलेले होते. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांची जेवणाची सुट्टी झाली होती. त्यांनी मलाही जेवणाचा आग्रह केला. पुढे जेवायला काही मिळणार नाही त्यामुळे थोडे खा, असे ते म्हणाले. त्यांनी दिलेला भात आणि भाजी खाऊन त्यांचे आभार मानले. ते म्हणाले काश्मिरी लोक पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहेत. आम्ही पर्यटकांची खूप काळजी घेतो. ते सर्वजण शिकलेले स्थानिक युवक होते. त्यांना रस्ते दुरुस्तीसाठी दरमहा अठरा हजार रूपये दिले जात होते. मात्र काश्मिरची दहशतवादी म्हणून निर्माण झालेली प्रतिमा त्यांना खटकत होती. ते म्हणत होते प्रसारमाध्यमांनी त्यांच्या राज्याला बदनाम केले आहे.
जोजीला खिंडीत काश्मिरी कामगारांनी जेवण दिले
त्या सर्वांना निरोप दिल्यानंतर
पुढील प्रवासाला सुरुवात केली. मजल दरमजल करत एक एक टप्पा पार करत होतो. जोजीला
खिंडीचा एक फोटो पाहिला होता. जसजसे वर जात होतो तसतसे रस्त्यांचे मजले खालून दिसत
होते. सभोवतालची बर्फाच्छित शिखरे अगदी हात लावून स्पर्श करता येतील एवढी जवळ दिसत
होती. रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. काही ठिकाणी पाणी पडत होते.
त्यामुळे रस्त्यावर धूळ, चिखल झाला होता. या रस्त्यावरून येणाऱ्या सर्व
गाड्या धुळीने, चिखलाने माखलेल्या होत्या. रस्त्यावरचा रेंदा
अंगावर उडाल्याने मीही तसाच झाला होतो. जोजीलाच्या सर्वोच्च
ठिकाणी आल्यावर तिथे काही फोटो काढले. त्यानंतर घाटाचा उतार सुरू झाला. मात्र
बऱ्याच ठिकाणी छोटेसे चढही लागत होते. तिथे सायकलवरून उतरून चालावे लागत होते.
समुद्रसपाटीपासून जवळपास बारा हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर पोहोचलो होतो.
त्यामुळे दम खूप लागत होता. ऑक्सिजनची कमतरताही जाणवत होती. श्वास जोराने घ्यावा
लागत होता. त्यामुळे थोडे अंतर सायकल चालविली तर खूप दम लागत होता. त्यामुळे पायी
चालण्याशिवाय पर्याय नव्हता.
जोजीला खिंडीत
सकाळी अकरापासून जोजीला पार करत
होतो. दुपारचे चार वाजले होते. सोबत असलेले पाणी संपले होते. जवळपास वीस किलोमीटर
कोणतेही खाद्यपदार्थाचे दुकान किंवा कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती. एके ठिकाणी
रस्त्यावरून वाहून जाणाऱ्या पाण्याने बाटली भरून घेतली. काही वेळाने तिही संपली.
आता हिमाच्छिदित शिखरे अगदी जवळ दिसत होती. एका ठिकाणी साचलेले बर्फ बाटलीत भरून
घेतले. त्याचे पाणी करून पितो. थंडीही वाढली होती. आता कोणतेही पाणी सोबत नव्हते.
दम तर खूप लागला होता. तोंडही कोरडे पडले होते. शरीरातील त्राण जवळपास गेले होते.
त्या निर्जन स्थळी थंडीत थांबणेही शक्य नव्हते. आता काय करायचे असा प्रश्न पडला.
तेवढ्यात एका गाडीवाल्याने मला हात दाखवून प्रोत्साहन दिले आणि दाद दिली.
रस्त्याने अनेकजण गाडीतून सायकलवर चाललो आहे म्हणून हात दाखवितात, प्रेरणा देतात. तोही हाच प्रकार होता. मी मात्र त्याला हात दाखविण्याऐवजी
हातानेच पिण्यासाठी पाणी मागितले. त्याने गाडी थांबवून मला पिण्यासाठी पाणी दिले.
त्याच्या या कृत्याने गलितगात्र झालेल्या शरीराला थोडेसे त्राण मिळाले.
जोजीलाच्या सर्वोच्च चढावर
एका वळणावर चढ आल्याने पायी चालत
होतो. एक ट्रँकवाला जेसीबी घेऊन चालला होता. त्याने गाडी थांबवून मला म्हटले की
गाडीत सायकल टाक. मी चालवित जाणार आहे, असे त्याला
सांगितले. आता मोठा उतार सुरू झाला होता. बर्फाच्छिदित हिमशिखरे आणि रस्ता एकाच
उंचीला आले होते. सायंकाळी पाचवाजता जोजीला खिंडींतील झिरो पॉँईंट या ठिकाणी
पोहोचलो. तिथे काहीतरी खायला प्यायला मिळेल अशी आशा होती. मात्र भ्रमनिरास झाला.
अजून पुढे वीस किलोमीटर अंतरावर कोणतेही दुकाने नव्हती. हा परिसर अगदी निर्जन
होता. अजून खाली दहा किलोमीटर उतरल्यानंतर आर्मीचा एक बेस कँम्प दिसला. पुढे
दृष्टीक्षेपात काहीच दिसत नव्हते.
समुद्रसपाटीपासून उंची ११६४९ फुट
वितळणाऱ्या बर्फाचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे तिथे रस्ता उखडलेला होता. अनेक ठिकाणी पेव्हर्स ब्लॉकचा रस्ता असल्याने त्यावरून सायकल चालवित जाणे जिकिरीचे झाले होते. रस्त्यावर पाणी, खड्डे यांतून मार्ग काढत सायकल आदळत-आपटत चालली होती. जवळून जाणाऱ्या गाड्या अंगावर पाणी उडवून जात होत्या. हवेत प्रचंड गारवा, खराब रस्ता, पोटात भूख, जोरात वाहणारा वारा आणि त्यात अंगावर पाणी उडून ओले झालेले शरीर यामुळे जीव अगदी मेटाकुटीला आला होता. तिथे थांबून आराम घेणेही शक्य नव्हते. त्यामुळे रडतकढत प्रवास चालला होता. अजून वीस किलोमीटर प्रवास कसा करायचा हे काही सुचत नव्हते. सायकल चालवायला शरीर साथ देत नव्हते आणि थांबणेही शक्य नव्हते. आज दिवसभरात जवळपास ३० ते ३५ किलोमीटर अंतर सायकल लोटत पायीच कापले होते. शरीराचा रोम न रोम दुखत होता. तिथे थांबणेही शक्य नव्हते आणि पुढे सायकल चालवित जाणेही अशक्य, त्यात अंधार पडायला लागलेला. शेवटी सायकल लोटत कसेबसे चालत निघालो. अशात एक BRO चा एक टेम्पो माझ्याजवळ येऊन थांबला. त्यांनी मला सायकल गाडीत टाकायला सांगितली. ट्रकवाल्याला जसा नकार दिला तसा देण्यासाठी माझ्या शरीरात त्राण उरले नव्हते. त्यामुळे सायकल मुकाट्याने गाडीत टाकली. सायकल सोबत बसलो. त्यांनी मला आतमध्ये बसण्याचा आग्रह केला. बाहेर वारा आणि थंडी लागेल असे ते म्हणाले, मात्र मी सायकल धरून मागच्या बाजूलाच बसलो. सायकलपेक्षा हा प्रवास खूपच आल्हाददायक वाटत होता. मनोमन वाटले आपण जेव्हा प्रचंड थकलो, निराश झालो, तेव्हाच अचानक आपल्याला कोणीतरी मदतीसाठी गाडी पाठविली आणि आपला प्रवास निर्विघ्न पार पडला. अन्यथा त्या भयंकर जोरात वाहणाऱ्या वाऱ्यात, प्रचंड थंडीत आपले काय झाले असते याचा अंदाज लावणे कठीण झाले होते. आणि मनोमन आनंदीत झालो. ते गाडीवाले अगदी अकस्मितपणे मदतीला अचानक आले होते. बरेच अंतर पार केल्यानंतर त्यांनी मला एका ठिकाणी सोडले. तेथून पुढे पाच किलोमीटर अंतरावर जम्मू-काश्मिर आणि लडाखची सीमा होती.
काश्मिरमधील कोणत्याही हॉटेलमध्ये
पिण्यास गरम पाणी मागितल्याने लगेच देत होते. शिवाय सोबतीचं बाटलीही भरून देत
होते. नव्याने निर्माण केलेल्या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या सीमारेषेवर
खाण्यासाठी थांबलो. तेथील हॉटेल मैदानी प्रदेशातील व्यक्ती चालवित होता. तिथे
मागितल्यावर त्याने गरम पाणी देण्यास नकार दिला. इथे काश्मिरी आणि इतरांमधील फरक
जाणवला. काश्मिरींचे अजून एवढे धंदेवाईकीकरण झालेले नव्हते. पैसा अद्याप त्यांचा
सर्वस्व बनला नव्हता, असे जाणवत होते. पर्यटकांकडे ते केवळ पैसे देणारे
मशिन म्हणून पाहत नव्हते. पर्यटकांचाही पाहुणचार ते आनंदाने
करत होते. इतरांना मदत करण्याचा स्वभावगुणही त्यांच्या ठायी
होता.
या सीमेवरही राहण्याची सोय
नव्हती. तेथून पुढे पाच किलोमीटर अंतरावर मतायन नावाचे गाव आहे, तिथे राहण्याची सोय असल्याचे सांगण्यात आले. तेथपर्यंत सायकल चालवित
जाण्याचे त्राण शरीरात आहे की नाही हे कळत नव्हते. मात्र रस्ता उताराचा असल्याने
तिथपर्यंत सहज जाऊ शकलो. पहिल्यांदा दिसलेल्या हॉटेलमध्ये थांबलो. त्यांनी दोन
हजार रूपये भाडे सांगितले. मात्र. शेवटी एक हजारामध्ये त्यांनी खोली दिली.
कालच्या रात्री
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याने रात्री तिथे अंधार करण्यास सांगण्यात आले होते.
त्यामुळे हॉटेलमध्ये अंधार होता. दिवसभर जोजीला मधून प्रवास केल्याने नुसता
शारिरीक थकवाच आला नव्हता तर शरीरही धुळीने भरल्याने अजून अधिक थकवा जाणवत होता.
फारच आग्रह केल्यानंतर शेवटी आठ वाजता त्यांनी गरम पाणी आणून दिले. आंघोळ केल्याने
जरा बरे वाटले. जेवणासाठी तुम्ही जे खाणार तेच मला द्या असे त्यांना सांगितले. दरम्यान
युद्धाची शक्यता वाढल्याने मनात धाकधूक वाढत होती. त्यांना विचारले तर ते म्हणाले
चिंता नका करू काही होणार नाही. शिवाय हा डोंगराळ प्रदेश असल्याने पाकिस्तान आपले
शस्त्रास्र विनाकारण या भागात वाया घालविणार नाही, अशी
स्वतःची समज करून मी मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी मला राजमा, भात आणि चपाती खाण्यास दिली. त्यांनी दिलेल्या पदार्थांचे प्रमाण खूप
जास्त होते. तेवढे मी खाऊ शकणार नव्हतो. ते म्हणाले जेवढे खायचे तेवढे खा.
इथे बॉम्ब वगैरे पडला तर काय? शिवाय सगळीकडे
अंधार केल्याने अधिकच भीती वाटू लागली. त्यामुळे प्रचंड थकलेले शरीर, अस्वस्थ मन, नवीन जागा, युद्धजन्य
परिस्थितीतील अनिश्चितता यांमुळे काही केल्या झोप येईना. सकाळी लवकर उठून आवरले.
ते हॉटेल डोंगरात असल्याने अवतीभोवतीचा परिसर खूपच मनमोहक दिसत होता. शिवाय तिथे
मानवी अस्तित्त्व जवळपास नगन्य होते. कालचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता.
नव्या दिवसाची नव्या उर्जेने सुरुवात झाली. हॉटेलचे बिल देताना पाहिले की त्यांनी केवळ
अर्धा भात आणि अर्धी दाळ यांचेच बिल लावले. ते पूर्ण रक्कमही घेऊ शकले असते. हा
प्रकार आजच्या काळात अचंबित करणाराच होता. शिवाय काश्मिरमध्ये सध्या पर्यटक
नसल्याने जे आहेत त्यांची लूट करावी ही भावनाही तिथे आढळली नाही. त्यांच्या
एकंदरीत व्यवहारावरून ते अद्याप धंदेवाईक किंवा व्यावसायिक झाल्याचे दिसत नव्हते.
संधीचे किंमत वसूल करावी ही भावना त्यांच्या व्यवहारामध्ये अद्याप उमठत नव्हती.
द्रासजवळील मतायन या गावातील परिसर
८ मेला प्रवासाचा चौथा दिवस होता. आज सकाळी निघताना हॉटेल मालकाने सांगितले की सकाळी काही सायकलिस्ट
इथपर्यंत गाडीने आले होते आणि इथून त्यांनी सायकल प्रवासाला सुरूवात केली. श्रीनगर
ते सोनमार्ग हा सायकलिंगसाठी चांगला मार्ग आहे. मात्र सोनमार्ग ते मतायन पर्यंत
सायकल चालवित येणे फारच जिकिरीचे आहे. त्यामुळे या टप्प्यात सायकल गाडीत टाकून
आणली तर वेळ आणि श्रम दोन्हीही वाचतील. शिवाय जोजीलाची त्रासदायक चढाईही टळेल.
तेथून पुढचा प्रवास अगदीच आल्हाददायक होईल. कालच द्रासला पोहचणे अपेक्षित होते.
मात्र ते काही शक्य झाले नाही.
काश्मिरमधील प्रत्येक डोंगरराचा रंग वेगळा भासतो, द्रासजवळील परिसर
सकाळी सायकलच्या हॅन्डेलमध्ये अडचण निर्माण झाली होती. मराठा
सायकलवाल्याला फोन करून ती दुरूस्त केली. आता एका बाजूला नदी अन् दुसऱ्या बाजूला
बर्फाच्छिदित पर्वतरांगा दिसत होत्या. येथे नदीचा प्रवाह मंद झाला होता. सिंधू
नदीपेक्षा ही नदी वेगळ्या रंगाची होती. तिचे पाणीही वेगळेच दिसत होते. सभोवतालचा
परिसरही कालच्या पेक्षा वेगळा वाटत होता. त्यामुळे या परिसरातून जाताना अगदी
प्रसन्न वाटत होते. काही अंतर पार केल्यानंतर द्रास हे गाव लागले. तिथे सायकलमध्ये
तेल टाकले आणि पोटातही पेट्रोल टाकले. पुन्हा एक टेकडी लागली. रस्त्याने जाणारा एक
व्यक्ती भेटला, त्याने माझे स्वागत केले आणि शुभेच्छाही
दिल्या. तो म्हणाला की हा शेवटचा चढ आहे. त्यानंतर उतारच
लागणार आहे. द्रासमध्ये गेल्यानंतर कारगील युद्धात प्रसिद्ध झालेले टायगर हिल्स हे
ठिकाण एकाने मला दाखविले. थोड्या वेळाने मला कारगील वार मेमोरियल दिसले. तिथे
थांबून तो परिसर पाहिला. ते ठिकाणं सैन्यानं खूपच चांगल्या पद्धतीने सुस्थितीत
ठेवले होते. मात्र जेव्हा तिथे शहीद झालेल्या सैनिकांची नावे आणि संख्या पाहिली
तेव्हा खूपच वाईट वाटले. युद्ध ही भयंकर गोष्ट आहे. तिचे खूप वाईट परिणाम होतात.
अनेक युवकांना त्यामध्ये प्राण द्यावे लागतात. त्यामुळे अशा स्वरूपाची स्मारके
कोणत्याही देशाला उभे करण्याची वेळ येऊ नये असे वाटले. सध्या प्रसारमाध्यामांनी
निर्माण केलेला युद्ध ज्वर पाहता असे वाटते की मि़डीया स्टुडीओमध्ये बसून युध्दाची
भाषा करणे सोपे आहे. मात्र त्यासाठी लागणारे बलिदान आणि त्याग दुसरा कोणीतरी देईल
अशी बहुतेकांची धारणा असते. मला त्याची झळ बसत नाही ना मग होऊ दे युद्ध. मी फक्त
मोबाईल वर स्टेटस ठेऊन त्याला पाठिंबा दर्शविल. त्याची दाहकता सीमाप्रदेशात
आल्यानंतरच कळते. येथील कोणत्याही व्यक्तीला युद्ध नको आहे. त्याचे दुष्परिणाम
त्यांनी भोगलेले आहेत. आधीच निसर्गाशी लढण्यात निम्मी उर्जा खर्च होते. उरलेली अशा
अशांत वातावरणात जाते.
पेहलगाम हल्ल्यानंतर भारतातील
प्रसारमाध्यमांनी देशात युद्धज्वर निर्माण केला. अनेकांना घरात बसून वाटते की
पाकिस्तानला एकदा धडा शिकविला पाहिजे. सैनिक आणि सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांची
भावना मात्र वेगळी आहे. त्यांना युद्धाची प्रत्यक्ष झळ बसत असल्याने ते युद्धाचे
समर्थन करत नाहीत. मात्र गोदी मिडिया आणि सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या भारतीयांना
मात्र युद्ध हवे आहे. जे दुसऱ्यांनी त्यांच्यासाठी लढले पाहिजे, अशी त्यांची धारणा असते. युद्ध स्मारकाने युद्धाची
भीषणता अजून दृढ केली. तिथे काही वेळ थांबल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली.
दरम्यान तेथील एका हॉटेलमध्ये मोमोस खाल्ले. त्या हॉटेलचा मालक हा नेपाळी होता. तो
म्हणाला या भागात केवळ सहा महिने व्यवसाय करता येतो. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे हा
भाग बंद असतो. यावर्षी अजिबात पर्यटक आले नाहीत. अन्यथा इथे थांबण्यास जागा मिळत
नाही. एकंदरीत पर्यटनावर अवलंबून असलेल्या या राज्यातील लोकांची दहशतवादी
हल्ल्यामुळे प्रचंड वाताहत झालेली दिसली. अनेकांचे रोजगार बुडाले. व्यवसायाची
साधने बुडाली. प्रत्येक काश्मिरी चिंतेत होता. पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा ते
मनस्वी विरोध करत होता.
प्रवास सुरू केल्यानंतर
रस्त्याच्या बाजूने अत्यंत वेगाने वाहणारी द्रास नदी लागली. तिच्या वाहण्याच्या
वेगाची कल्पनानाही करू शकत नाही अशा वेगाने ती वाहत होती. तिच्यात कोणी पडले तर
सापडणार देखील नाही असा तिचा वेग होता. हाही परिसर बऱ्यापैकी निर्जन होता.
रस्त्यानेही फारशी वर्दळ नव्हती. एके ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी मला थांबवून
विचारपूस केली. तेव्हा तिथे एक मध्यमवयीन बाई आली. ती म्हणाली यावर्षी पर्यटक
नाहीत त्यामुळे आम्हाला करमत नाही. पर्यटक नाही आले तर वाईट वाटते. एकंदरीत सर्वच
घटक पर्यटकांच्या अभावाने प्रभावित झाले होते.
बरेच अंतर गेल्यानंतर द्रास
नदीच्या काठी चहा घेण्यासाठी थांबलो. तिथे अत्यंत वेगाने नदी वाहत होती. काही
वेळाने नदीकाठच्या रस्ता हळूहळू वर चढत गेला आणि नदी खोल खोल होत गेली. असे दोन
तीनदा झाले. दरम्यान मजल दर मजल करत कारगील गाठले. द्रास नदीकाठाने कारगील पर्यंत
झालेला प्रवास खूपच अविस्मरणीय होता. या भागातील भौगोलिक रचना कालच्या पेक्षा
वेगळी होती. द्रासनदीचे पाणी आणि तिचा वाहण्याचा वेगही अचंबित करणारा होता. शिवाय
हा रस्ता उताराचा असल्याने सायकल चालविण्यासाठी फारशी मेहनत लागत नव्हती.
कारगिलच्या अलीकडेच द्रास नदीला एक उपनदी येऊन मिळते. दोन्हींचा संगमही अत्यंत
वेगाने होतो. तिथे पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक वाढत जातो. तो नजारा बघण्यासारखा
होता.
अत्यंत वेगाने वाहणाऱ्या द्रास नदीच्या काठी
अंधार पडायला सुरुवात झाली होती.
कारगीलला पोहचल्याबरोबर एक हॉटेलमध्ये थांबलो. ते हॉटेल नदीकाठीच होते. त्याने
भाडे एक हजार सांगितले. त्याला म्हटले की फक्त रात्रीच थांबवायचे आहे. कमी कर, तर तो म्हणाला रूम तर बघून घ्या. रूम न बघताच तो सहाशे रूपयांत कबूल
झाला. फ्रेश झाल्यानंतर कारगिल शहरात फेरफटका मारण्यासाठी गेलो. तेथील एका
हॉटेलमध्ये जेवण केले. रात्री नऊच्या सुमारास कारगिल शहरात अंधार करायला सांगण्यात
आला. हॉटेलमध्ये अशी चर्चा होती की कारगिलवर हल्ला होणार आहे. त्यामुळे तिथे सगळे
दिवे बंद करण्यास सांगण्यात आले होते. एकाला विचारले पाकिस्तान येथून किती लांब
आहे? तो म्हणाला चार किलोमीटर. आता मात्र मी घाबरलो.
हॉटेलमध्ये जाईपर्यंत सगळीकडे अंधार झाला होता. युद्धाच्या शक्यतेने सगळीकडे
शांतता होती. हॉटेलमध्ये अंधार होता. तेथील हॉटेलमालकाने मी गेल्यावर सांगितले की
आज रात्रभर वीज येणार नाही. मोबाईल चार्ज आहे का? मी नाही
म्हटल्यावर त्याने माझा मोबाईल त्याच्या गाडीमध्ये चार्ज करायला नेला. मी नदीचा
प्रवाह पाहता यावा म्हणून तिसऱ्या मजल्यावर खोली घेतली होती. त्या मालकाने रात्री
मला पहिल्या मजल्यावर यायला सांगितले. तो म्हणाला जर पाकिस्तानकडून काही शेल आलेच
तर धोका नसावा. आता मात्र मनातून प्रचंड घाबरलो होतो. आता आपले काही खरे नाही अशीच
भावना मनात निर्माण झाली. हॉटेलमधील इतरही तणावात दिसत होते. कारण पाकिस्तानने
भारतातील बऱ्याचशा शहरांवर हल्ले केले होते. आता आपण युद्धात अडकलो अशीच भावना
मनात तयार झाली. भीतीमुळे रात्री अजिबात झोप आली नाही. त्यात मध्यरात्री तिथे
सायरन वाजला. मग तर अजूनच भीती वाटू लागली. दोन देशांतील तणावाचे रूपांतर कशात
होईल याची कुणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे पुढील प्रवासाबाबत अनिश्चितता निर्माण
झाली होती. त्यातच हॉटेल मालकाने सांगितले की लेहला न जाता सुंकू मार्गे मी
मनालीला जावे. लेहला गाड्या बंद असल्याने नाहक अडकण्याची शक्यता निर्माण झाली
होती. शिवाय रात्री आमच्या एनसीसी बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल रैना यांनीही
पुढे प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. त्यांना मी सांगितले की मी परतीचा प्रवास
करत आहे. त्या हॉटेल मालकाने सुचविलेला पर्यायी रस्ता आणि प्रशासकीय अधिकाऱ्याचा
सल्ला याबाबी माझ्यासाठी पुढे न जाण्याचा इशारा आहेत, असे वाटू
लागले. पुढे काहीतरी अनिष्ट घडू शकते, याचे कदाचित ते संकेत
असावेत, असे मनोमन वाटले. आपले लेहला जाण्याचे स्वप्न काही
पूर्ण होत नाही असे रात्री वाटू लागले. आतापर्यंत केलेला प्रवास एवढा खडतर होता की
पुन्हा त्या वाटेने यायची हिंम्मत कधीही झाली नसती. सायकल प्रवासात आधीच माहित
असेल की पुढे खूप मोठा घाट आहे तर उर्जा नष्ट होते. मात्र रस्त्याची माहिती नसेल
आणि तो पार केल्यानंतर कळते की किती मोठा पल्ला आपण पार केला. पुन्हा त्यावर जायची
मात्र हिंमत होत नाही. त्यामुळे आपले लेहचे स्वप्न संपुष्टात येत आहे याची हुरहूर
एका बाजूला होती तर दुसऱ्या बाजूला काही संकेतांनी सुरक्षिततेसाठी आपल्याला इशारे
दिले असे वाटत होते. अशा दोलायमान स्थितीत रात्री काही झोपच आली नाही. शिवाय एखादा
बॉम्ब पडून आपला मृत्यू झाला तर काय? असेही अनेक विचार मनात
येत होते. कुटुंबातील सदस्य आणि मित्र टिव्ही पाहत असल्याने त्यांना युद्धाची
दाहकता जास्त दिसत होती. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी सारखे फोन करून परत फिरण्याचा
घोषा लावला होता. त्यामुळे मोबाईल बंद करून ठेवायचा निर्णय घेतला.
पाचव्या दिवशी ९ मेला लेहला जायचे
की झंस्कार मार्गे परत यायचे याचा विचार करत होतो. आता लेहला नाही गेलो तर परत
कधीच जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे मन तिकडे जायला पाहिजे म्हणत होते मात्र
आपल्याला दोन जणांनी नकळतपणे तिकडे न जाण्याचा इशारा दिला होता. तो धुडकाऊन लेहला
जाणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण करणे तर नव्हे ना, असा विचार
येत होता. मात्र मन सांगत होते आपण लेहलाच गेले पाहिजे. त्यामुळे सकाळी उठल्यावर
सुंकू खोऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने न जाता सरळ लेहकडे जाणाऱ्या रस्त्याने निघालो.
रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. लेहकडे जाणारा रस्ताही घाटाचा होता. त्यामुळे चालतच
जाणे भाग होते. अनेक वळणे पार केल्यानंतर शेवटी उताराचा रस्ता सुरू झाला. दरम्यान
सतत आपण योग्य पर्याय निवडला की नाही हे मनात येत असताना अरविंदला विचारले असता तो
म्हणाला लेह श्रीनगर हा रस्ता सतत रहदारीचा आहे. त्यामुळे त्यावरच प्रवास करणे
योग्य आहे. त्याच्या पाठिंब्यामुळे मनातील द्विधा अवस्था संपुष्टात आली. आतापर्यंत
चालतानाही खूप त्रास होत होता. दम लागत होता. शरीरात त्राण नसल्यासारखे वाटत होते.
डोकेही दुःखायला लागले होते. खूपच अस्वस्थ वाटत होते. एकेठिकाणी नाष्टा केल्यानंतर
थोडे बरे वाटू लागले. आपण पाकिस्तान सिमेपासून दूर जात आहोत या भावनेनेही जरा
सुरक्षित झाल्यासारखे वाटत होते. कळत नकळत मनातील भीती थोडीशी दूर झाली होती.
त्यामुळे शरीरात नव्याने उत्साह संचारल्यासारखे झाले होते.
कारगील शहर एका दृष्टीक्षेपात
कारगिल पार केल्यानंतर वेगळ्याच
रंगांचे पर्वत दिसायला लागले. बहुतेक डोंगर माथ्यांवर झाडेही नव्हते. काल हॉटेल
मालकाने सांगितले होते की लेहकडे जाताना नद्या लागत नाहीत. छोटे नाले आहेत. सुंकू
खोऱ्याकडे जाताना मात्र मोठ्या नद्या आहेत. त्यामुळे लेह कडे जावे की न जावे हा
प्रश्न निर्माण झाला होता. कारण नदीच्या किनाऱ्याने सायकल प्रवास करण्यात एक
वेगळाच आनंद असतो. शिवाय नदीला जीवन का म्हणातात तेही यावेळी प्रकर्षाने जाणवते.
तिचे प्रवाही असणे, सतत पुढे जात राहण्याची आस, कर्णमधुर
पाण्याचा खळखळणारा आवाज, यांमुळे तो प्रवास अगदी स्वप्नवत
वाटतो. त्यामुळे आता नदीनसलेल्या मार्गाने प्रवास करायचा म्हणजे कालपर्यंत
प्रवासात जो आनंद मिळत होता तो आता मिळणार नाही, अशी मनात
भीती होती. मात्र प्रवास सुरू केल्यानंतर रस्त्याच्या बाजूने नदी जात होती.
त्यामुळे नदीशिवायचा प्रवासाची शक्यता नव्हती. सोबत वाहणारी नदी स्थानिकांच्या
दृष्टीने नाला जरी असला तरी तो खूप मोठा होता. आणि त्यातून वाहणारे पाणी अगदी
शुद्ध होते. येथील डोंगर वेगळे असल्याने नदीच्या पाण्याचा रंगही वेगळा होता.
कारगिलपासून जसे जसे दूर जात होतो तसे तशी मनातील भीती कमी होत होती. मोकळ्या
आकाशाचा आणि निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत प्रवास चालला होता.
एके ठिकाणी ट्रक नादुरूस्त
झाल्याने उभा होता. चालकाला एक फोटो काढण्याची विनंती केली. तो म्हणाला एक काय
शंभर फोटो काढतो. या प्रवासात बहुतेक वेळा निर्मनुष्य परिसर लागत असल्याने फोटो
कोढण्यासाठी कोणीही भेटत नव्हते. जेव्हा एखादा व्यक्ती भेटला की त्याच्याकडून पटकन
एखादा फोटो काढावा वाटायचा. फोटो काढल्यानंतर या ट्रक चालकाने मला चहासाठी गाडीत
बोलाविले. तो काश्मिरचा तिशीतील चालक होता. तो म्हणाला आम्ही ट्रक चालकही खरे
देशभक्त आहोत. आमच्यामुळे सर्वांना वस्तू, खाद्यपदार्थ
वेळेवर मिळतात. एवढी युद्धजन्य परिस्थिती असूनही आम्ही मालवाहतूक थांबवित नाहीत.
आमचा जीव धोक्यात घालून माल वेळेवर पोहचवितो. त्याच्या बोलण्यात तर्क होता. त्याचे
म्हणणेही पटत होते. आपला समाज मात्र ट्रक चालकांना फारशी किंमत देत नाही. त्यांचे
बहुमूल्य योगदान कोणीच स्वीकारत नाही. त्याने गाडीतच चहा करून दिला. त्याने
गाडीतील स्वयंपाक करण्याची व्यवस्था दाखविली. गेल्या दोन दिवसांपासून गाडी बंद
पडल्याने जागेवर उभी होती. त्या निर्जन स्थळी त्याने एकट्याने दोन दिवस काढले
होते. त्या गाडीची पाहणी करण्यासाठी कंपनीने एक मेकॅनिक पाठविला होता. तोही
काश्मिरी होता. त्यानंतर दोघेही काश्मिरमधील राजकीय परिस्थिती बाबत बोलू लागले.
त्या दोघांनीही पेहलगाम हल्ल्यामध्ये काश्मिरींचा काहीही हात नसल्याचे वाटत होते.
दुसरा मेकॅनिक म्हणत होता मी सैन्याच्याही गाड्या दुरूस्त करून देतो. मग मी
देशद्रोही कसा. चालकाने सांगितले ते इतर राज्यांत गेल्यावर जेव्हा कोणाला सांगतात
की आम्ही काश्मिरचे तेव्हा लोक त्यांना आतंकवादी म्हणून हाकलून देतात. मानहानी
करतात. असे अनेक अपमानास्पद अनुभव त्याने सांगितले. तो म्हणत होता आम्ही आतंकवादी
कसे. आम्ही आमचे काम करून जीवन जगतो. कष्ट करून उपजिवीका भागवितो. मात्र आम्हाला
सतत दहशतवादी म्हणूनच पाहिले जाते. तो सांगत होता पेहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरमधील
तीन हजार युवकांवर जन सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या कायद्यानुसार
जामीन मिळत नाही. सुरक्षा यंत्रणांच्या अतिरेकामुळे आणि सततच्या हिंसक
वातावरणामुळे काश्मिरींना आता मृत्यूचे भय वाटत नाही. ते निडर झाले आहेत. त्यांनी
सुरक्षा दलाकडून होणाऱ्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे अनेक व्यक्तिगत अनुभव
सांगितले.
ट्रकमध्येच सर्वकाही
त्यांचा प्रश्न होता की
पेहलगामधील सुरक्षा कोणी हटविण्याचा आदेश दिला. अद्यापही चार दहशतवादी का नाही
मिळाले. ते म्हणत होते तेथील सुरक्षा यंत्रणांना कोण कुठे आहे याची दररोज माहिती
असते. कोणत्याही स्थानिक नागरिकाचे दरदिवशीचे ठिकाण सरकारला माहित असते. ते हेही
सांगत होते की कोणत्या आईवडीलांना आपला मुलगा दहशतवादी व्हावा असे वाटेल. त्याची
दोन वर्षाची मुलगी होती. ती फोन करून त्याला सांगत होती की येथे मोठ्या प्रमाणात
धमाके होत आहेत, तू लवकर घरी ये. त्यांची मुले त्यांना प्रश्न
विचारतात की तुमच्याही काळात अशीच अशांतता होती का? तो म्हणत
होता आमची मुले अशा अशांत वातावरणात वाढत आहेत. याचा त्यांच्या जीवनावर परिणाम
होतो. पेहलगाम हल्ल्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. तेही म्हणाले गेल्या पस्तीस
वर्षाच्या अशांततेच्या काळात कधीही कोणत्याही पर्यटकांवर हल्ले झाले नव्हते. मात्र
यावेळी झालेले हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे त्यांना वाटत होते. चहापाणी
झाल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. पुन्हा सैन्यातील एका मित्राचे वाक्य आठवले की
आपण महाराष्ट्रात स्वर्गात असल्यासारखे आहोत. ना निसर्गाशी लढाई ना अशांततेशी.
काश्मिरबाबत मात्र वाईट वाटू लागले. पृथ्वीवरील नंदनवन हे नरकापेक्षाही भयानक झाले
होते.
इकडे फारसे वृक्ष रस्त्याने दिसत
नाहीत. एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला काही झाडे दिसली. दुपारचे बारा वाजले होते.
ऊन वाढले होते. त्यामुळे थोडा आराम करण्यासाठी तिथे थांबलो. बाजूलाच BRO चे काही मजूर स्वयंपाक करत होते. त्यांना विचारले डबा नाही आणत का तर ते
म्हणाले आज त्यांची पार्टी आहे. त्यामुळे ते तिथेच जेवण बनवित होते. मी आराम करत
असतानाच त्यांनी मला एका ताटात भात आणि भाजी आणून दिली. मी नको म्हणत असतानाही
त्यांनी दिले. काहीही ओळख नसताना, संबंध नसताना त्यांनी मला
जेवण दिल्याचे पाहून मला थक्क झाल्यासारखे वाटत होते. त्यांच्या पाहुणचाराने मी
भारावून गेलो. अनेकदा ऐकले होते की काश्मिरी पाहुणचारासाठी खूप प्रसिद्ध आहेत.
त्याचा अनुभव या प्रवासात वेळोवेळी येत होता.
BRO च्या कामगारांसोबत वनभोजन
जेवण झाल्यावर पुन्हा नदी काठाने
आणि पर्वतांच्या सान्निध्यात रमत गमत सायकल प्रवास चालला होता. प्रत्येक डोंगर
दुसऱ्या पेक्षा रंगाने वेगळा आणि आकर्षक वाटत होता. या रस्त्यांवर फारशी
खाद्यपदार्थाची दुकाने नव्हती. दुपारी दोनच्या सुमारास एक चहाचे दुकान दिसले. तिथे
चहापाणी घेतले. त्याचा मालक हा कारगिल युध्दाच्या वेळी सैन्यासोबत वस्तू
वाहण्यासाठी पोटर म्हणून काम करत होता. सैनिकांचे साहित्य डोंगरावर चढवून नेण्याचे
काम त्याच्याकडे होते. तो म्हणत होता युध्द हे फार भयंकर असते. त्यातून खूप नुकसान
होते. त्याने स्वतः अनुभवलेल्या भयानक गोष्टी मला सांगितल्या. युध्दामुळे त्याच्या
चंदीग़डमध्ये शिकत असलेल्या मुलीला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे तिचे शैक्षणिक
नुकसान होणार होते. त्यामुळे युध्द टाळायला हवे, अशी
त्याची भूमिका होती.
त्यानंतर काही वेळाने लडाखमधील
बुद्धिस्ट गावे दिसायला लागली. आता मनातील युध्दाबाबतची भीती पूर्णपणे निघून गेली.
नवा वेगळाच प्रदेश आणि अनेक ठिकाणी बुद्ध विहारं दिसू लागली. काही ठिकाणी गोल
फिरवून वाजवायच्या घंटाही दिसत होत्या. चारच्या सुमारास मूलबेख गावात पोहोचलो.
तिथे चहा पाणी घेतल्यानंतर गावात थांबावे की पुढे जावे हा प्रश्न होता. इकडे आठपर्यत
उजेड असतो. त्यामुळे एवढा वेळ काय करायचे हा प्रश्न होता. पुढे नमिकला १२ किलोमीटर
हा फलक दिसत होता. वाटले नमिकला गावात थांबूयात. म्हणून पुढील प्रवासाला सुरूवात
केली. हा परिसर पूर्णपणे वेगळाच दिसत होता. इथे एकही झाड नव्हते. या भागाला मुनलँड
असेही म्हटले जाते. चंद्रावरील परिसरासारखा हा भाग दिसत होता. त्यामुळे आपण
वेगळ्याच ग्रहावर आल्याची भावना होत होती. अवती भोवती वालुकामय पर्वतांचा
वृक्षविहीन भागाचे अद्भूत सौंदर्य पाहण्यास मिळत होते. हा रस्ता चढाईचा असल्याने
त्यावर सायकल चालविणे जवळपास अशक्यच होते. त्यामुळे सायकल लोटतच चाललो होतो.
सभोवताल पाहून खूपच समाधानकारक वाटत होते. शिवाय तो परिसर अगदी निर्मनुष्य होता.
एखादे दुसरे वाहन रस्त्याने दिसत होते. एक एक वळण पार करत शेवटी नमिकला चार
किलोमीटर राहिल्याचा फलक दिसला. मात्र अजूनही त्या पर्वतांचा सर्वोच्च भाग येत
नव्हता. उतार काही सुरू होत नव्हता. सात वाजण्याचा सुमारास नमिकला अजून दोन
किलोमीटर दूर असताना अचानक वेगाने वारे वाहू लागले. पाऊसही पडू लागला. वातावरण
अंधारून आले. थंडीही अचानक वाढली. त्यामुळे चालणेही जिकिरीचे होऊ लागले.
नमिकला जवळील मुनलँडवर
काही वेळाने एक पिकअप व्हॅन
बाजूला येऊन थांबली. चालकाने मला सायकल गाडीत टाकायला सांगितली. तो म्हणाला
संपूर्ण राज्यात चोरीची काही भीती नाही. तुमची वस्तू चार दिवसांनीही त्याच जागेवर
दिसेल. मात्र या परिसरात रात्री जंगली प्राणी एकट्या माणसावर हल्ले करतात.
त्यामुळे असा रात्री प्रवास करू नये. त्याला म्हणालो मी नमिकलाला थांबणार होतो.
तेव्हा तो म्हणाला नमिकलाला थांबण्याचे कोणतेही ठिकाण नाही. त्याने नमिकला आल्यावर
मला फोटो काढण्यासाठी तिथे गाडी थांबविली. तेव्हा लक्षात आले ते बुद्धिस्ट
धर्मियांचे डोंगर माथ्यावरील एक पवित्र स्थळ आहे. तिथे मनुष्यवस्ती अजिबात नाही.
त्या ठिकाणापासून पुढे वीस किलोमीटर पर्यतही कोणतेही राहण्याचे ठिकाण नाही. तेव्हा
लक्षात आले की आपण खूप मोठ्या संकटात सापडलो होते. राहण्याचे ठिकाण मिळाले नसते.
थांबणेही शक्य नव्हते आणि सायकल चालविणेही. त्यामुळे मोठ्या अडचणीतून या
गाडीवाल्याने वाचविले होते. पुन्हा एकदा संकटात कोणीतरी हमखास मदतीला येत असल्याची
भावना निर्माण झाली. आणि आपण थोडक्यात वाचलो, हेही जाणवले. त्या
गाडीवाल्याने फोटीला खिंडही पार करून दिल्यानंतर मला लामायेरू या गावात सोडले.
त्या वाहनचालकाने दोन पर्वतरांगा पास करून दिल्याने सायकल प्रवासाची एक दिवस वाचला
होता. लेह केवळ १३५ किलोमीटर राहिले होते. पुढील दोन दिवसांत हमखास लेहला पोहचणे
शक्य होणार होते.
तो वाहनचालक जम्मुचा होता.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने तो खूष होता. मात्र त्याच्याही मनात शंका
होती की पेहलगाम मधील हल्ल्यामागे काहीतरी मोठे षडयंत्र आहे. तो काश्मिरींना
शिव्या घालत होता मात्र सुरक्षा दलाबाबतही त्याची मते फारशी चांगली नव्हती. हल्ल्यामुळे
पर्यटनाला बसलेल्या धक्क्याने तो व्यथित झाला होता. त्याने जेव्हा मला सोडले
तेव्हा त्याला मी काही पैसे देऊ केले. तो म्हणाला माझा टेम्पो तसाही खालीच जाणार
होता. त्यामुळे पैसे देण्याची काही गरज नाही. तेव्हा आश्चर्यच वाटले. त्याला दोन
पैसे मिळण्याची संधी होती. तरीही त्याने ते नाकारले. तो एक वाहनचालक होता. त्याची
आर्थिक परिस्थिती काही फार उत्तम होती अशातला भाग नव्हता. मात्र तरीही त्याने पैसे
नाकारणे हे विशेष होते. पुन्हा जाणीव झाली की शहरातील व्यक्तींप्रमाणे पहाडातील या
लोकांना अद्याप हव्यासाने ग्रासले नाही. ते अजून पैसा पैसा करत नाहीत. त्याच्या
दृष्टीने रूपया अद्याप सबसे बडा झालेला नव्हता. त्याचे आभार मानून एका हॉटेलमध्ये
मी मुक्कामासाठी गेलो. त्यांचे किचन बंद झाले होते. त्यामुळे तिथे
जेवणासाठी काहीही नव्हते. शेवटी त्यांना फार विनंती केल्यानंतर त्यांनी मॅगी बनवून
दिली. येथेही रात्री अंधार करणार असल्याने अंधारातच झोपावे लागले.
अचानक मदतीला आलेले वाहनचालक
आज १० मे २०२५ होता आणि प्रवासाचा
एकूण सहावा दिवस. सकाळी आठच्या सुमारास आवरून निघालो. त्या हॉटेलमध्ये हरियाणाहून
दुचाकीवर आलेले एक शेतकरी भेटले. ते गाडीवर लेहला जाणार होते. आपण दोघेही सोबत जाऊ
असे ते म्हणाले. मात्र मला निघण्यास उशीर झाल्याने ते पुढे गेले. त्यानंतर आमची
लेहमध्येच भेट झाली. लयामारू पार केल्यानंतर पुन्हा एकदा डोंगररांगा लागल्या.
मात्र आता तीव्र उतार सुरू झाला होता. त्यामुळे सायकल चालविण्यासाठी फारसे कष्ट
लागत नव्हते. सायकलचा वेग कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत होते. या
रस्त्यावरही कुठेही दुकाने किंवा मनुष्यवस्ती नव्हती. खूप अंतर पार केल्यानंतर एके
ठिकाणी एक धाबा दिसला. तिथे जेवण केले. तोही धाबा मालक पर्यटकांच्या अभावी त्रस्त
झाला होता. यावर्षी खूपच धंद्याला फटका बसला असे तो म्हणत होता. त्याने खूपच चवदार
जेवण दिले.
लयामारूतील डोंगरातील एक ठिकाण
आता पुन्हा नव्या रंगाचे डोंगर
दिसू लागले. नदीच्या पाण्याचाही रंग वेगळा होता. रस्ताही चांगला सुरू झाला होता.
मात्र या रस्त्यावरही मनुष्यवस्ती अजिबात नव्हती. तुरळक ठिकाणं काही सैन्याच्या
छावण्या होत्या. रस्ता अगदीच सामसूम होता. चिटपाखरूही दिसत नव्हते. नदीच्या
वाहण्याचा आवाज मात्र जोरात येत होता. परिसराचे रंगरूप पुन्हा बदलेले होते. वेगळेच
सौंदर्य अनुभवायास येत होते. त्यामुळे मन प्रसन्न झाले होते. दुपारी चारच्या
सुमारास सासपोल या गावी थांबलो. कालच्या सारखी चूक पुन्हा नको व्हायला म्हणून वेळ
असतानाही मुक्काम लवकरच केला. गावातील एका होमस्टे मध्ये राहिलो. घरातच वेगळ्या
दोन खोल्या काढून त्यांनी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली होती. ते स्थानिक
बुद्धिस्ट होते. त्यांचे लेहमध्ये हॉटेल होते. बराच वेळ हाताशी असल्याने त्या
गावात फेरफटका मारला. गाव तसे एकदम शांत आणि निवांत होते. कुठलीही गडबड किंवा
गोंधळ तिथे नव्हता. त्या गावात राजस्थानमधील व्यक्तीने किराणा दुकान टाकलेले होते.
काही मजूर बिहार आणि उत्तरप्रदेशातीलही होते. बाकी स्थानिक नागरिकांचा शेती आणि BRO च्या सहाय्याने उदरनिर्वाह चालला होता. सोबत पर्यटनही होते. रात्री
त्यांच्याच घरी बनविलेले जेवण केले. थंडीपासून संरक्षणासाठी त्यांनी घरात पारंपरिक
तंत्रज्ञान वापरले होते. घरात त्यांच्याकडे लग्नात दिल्या जाणाऱ्या वस्तू रचून
ठेवल्या होत्या. त्यामध्ये बरीचशी नक्षीकाम केलेली भांडी होती. त्यांनी अत्यंत
उत्तम जेवण दिले. राहण्याचे किती द्यायचे म्हटल्यावर ते म्हणाले जे द्यायचे ते
द्या. ह्याही व्यक्ती अत्यंत समाधानी वाटल्यास. कुठल्याही प्रकारची वखवख किंवा
हाव त्यांच्या वर्तनातून जाणवली नाही. दहशतवादी हल्ल्याने दुष्परिणाम तेही भोगत
होते. त्याचा फटका त्यांच्याही व्यवसायाला बसला होता. सकाळी लवकर उठून आवरून पुढील
प्रवासाची सुरुवात केली.
सोपसोलमध्ये मुक्काम केलेल्या घरातील दृश्य
११ मे ला प्रवासाचा सातवा दिवस
होता. सापसोल गाव सोडल्यानंतर मोठी पहाडी लागली. रस्ताही चढाचा होता. त्यामुळे
पायी चालण्याशिवाय पर्यायच नव्हता. अनेक तास चालल्यानंतर शेवटी ती रांग संपली आणि
उताराचा रस्ता सुरू झाला. चढ संपल्यानंतर एका हॉटेलमध्ये नाष्टा केला. त्यानंतर
लेहकडे प्रस्थान सुरू झाले. आता उताराचा रस्ता होता. त्यामुळे सायकल चालविना फारशी
कसरत करावी लागत नव्हती. विनासायास सायकल वेगाने पळत होती. पुढे एक गाव आले तिथे
चहापाणी घेतल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली. लवकरच संगम हे ठिकाण आले. तिथे
झंस्कार आणि सिंधू नदीचा संगम होतो. सिंधुचे पाणी निळे तर झंस्कारचे काळे पाणी
स्पष्टपणे दिसते. निसर्गाची किमया आणि जादूगरीचे अजब दर्शन त्या ठिकाणी झाले. तो
संगम पॉँईन्ट मला वरून दिसत होता. तिथे खाली जाण्यास अजून श्रम लागले असते म्हणून
तिकडे जाणे टाळले. त्या ठिकाणाहून मनालीकडे एक रस्ता जातो. तो रस्ता झंस्कार
नदीच्या खोऱ्यातून जात असल्याचे कळले. त्यातून पुढील वर्षासाठी एक नवा मार्गही
खुला झाला. परिसर पाहून खूपच धन्य वाटत होते. डोंगरावर चढ असल्याने पायीच चालत
होतो. एक कारवाला अचानक जवळ येऊन थांबला. त्याने विचारले काही अडचण आहे का? स्वतःहून मदत करण्याची लडाखी लोकांची वृत्ती पाहून त्यांच्याबद्दल आदर
अजून वाढला. काही अंतर गेल्यावर लडाखमधील प्रसिद्ध मॅग्नेटिक हिल लागली. तिथे
गुरूत्वाकर्षण काम करत नसल्याची भावना गाडीवाल्यांना होते. मी तो अनुभवण्याचा
प्रयत्न केला मात्र सायकलवर तो अनुभव काही आला नाही.
लेहमधील मॅग्नेटीक हिल परिसरात
सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम
या हिलपासून पुढे गेल्यानंतर काही
अंतरावर पत्थरसिंह गुरूद्वारा लागला. हे श्रीनगर-लेह रोडवरील खूप प्रसिद्ध ठिकाण
आहे. येथे गुरूनानकजी यांचा गुरूद्वारा आहे. तिथे भारतीय सैन्यातर्फे सर्वांसाठी
कायम लंगर चालू असतो. तसेच राहण्याचीही सोय असते. सैन्याचे एक युनिट हा
गुरूद्वाऱ्याची कारभार पाहतात. लेह अजून २५ किलोमीटर राहिलेले होते. फारशी भूख
नव्हती. मात्र तरीही तिथे थोडे जेवावे असे वाटले. थोडे म्हणता म्हणता भरपूर
खाल्ले. तिथे थोडा आराम केल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात केली.
पत्थरसाहीब गुरूद्वारा जवळ
आता लेहकडे जाणारा रोड पूर्णपणे
उताराचा होता. त्यामुळे विशेष प्रयत्न न करता सहजरित्या लेहमध्ये आपले स्वागत आहे, या फलकापर्यत पोहोचलो. तिथे काही फोटो काढले. फोटो काढल्यानंतर कळाले की
लेह अजून दहा किलोमीटर दूर आहे आणि पुढील रस्ता हा चढाचा आहे. सायंकाळ होत आल्याने
अंधार पडायला लागला होता. त्यामुळे लवकर लेहला पोहचणे गरजेचे होते. सुरुवातीला
लेहमधील लष्करी छावणी लागली. त्यानंतर लेहचे विमानतळ दिसले. हळूहळू लेह शहरात
प्रवेश झाला. लेहच्या मागे कोल्हापूरमधून दुचाकीवर लेहला आलेले काहीजण भेटले होते.
त्यांनी लेहमध्ये जिथे मुक्काम केला होता त्या हॉटेलचा नंबर त्यांनी दिला होता.
तिथेच जाऊन थांबलो. दरम्यानच्या काळात लेह बसस्थानकावर जाऊन शहराचा फेरफटका मारला.
जागेच्या अभावाने दाटीवाटीने घरे बांधलेली दिसली. फारसे पर्यटक नसल्याने शहरात
फारशी गर्दी नव्हती.
आपल्या या प्रवासाच्या अंतिम
ठिकाणी पोहचल्या आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक अडथळ्यांनतर, प्रतिकूल परिस्थिती व वातावरण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास
पूर्ण झाला होता. त्यामुळे त्या उद्दिष्ट्यपूर्तीची मजा काही वेगळीच होती. शरीर
थकले होते मात्र मन प्रवासाने, सभोवतालच्या निसर्ग सौदर्यांने
प्रसन्न झाले होते. जीवनाला अधिक समृद्ध करणारा एक अविस्मरणीय सायकल प्रवास आज
संपला होता. पुढील प्रवासासाठी पुन्हा नवे रस्ते आणि ठिकाणं खुणावू लागली होती.
अनेकदा शाळेत असताना ऐकले होते, वाचले होते की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ती विविधता प्रत्यक्षात
अनुभवण्याची संधी विविध सायकलप्रवासांनी दिली. कन्याकुमारीपासून ते लेह आणि
नगरपासून ते पेट्रापोल पर्यंतची विविधता प्रत्यक्षात संथगतीने सायकलमुळे पाहता
आली. आपला देश किती संपन्न आणि समृद्ध आहे, याची चुणूक या
प्रवासांनी दिली. आपणच आपल्या देशाच्या प्रेमात पडावे, अशी
सुंदर भूमी, प्रदेश, माणसे या देशात
आढळली. देशाबद्दलचा आदर आणि प्रेम द्विगुणीत झाले. या देशाला समजून घेण्यासाठी
अजून किती प्रवास करावे लागतील याचा नुसता विचार केला. आपण खरेच भाग्यवान आहोत की
या समृद्ध देशात आपल्याला जगण्याची संधी मिळाली.
शेवटी एकदा पोहचलो लेहमध्ये
श्रीनगर-लेह या प्रवासाची कल्पना
ज्याच्यामुळे सुचली तो कर्नल विवेक हा लडाख मधील प्रतापपूर या ठिकाणी सध्या तैनात
होता. त्यालाही निसर्गाची खूपच ओढ आणि आस्था आहे. आसामची नैसर्गिक विविधता
अनुभवल्यानंतर तो लेहमध्ये आला होता. या ठिकाणची शांतता आणि शुद्धता त्याला सतत
आकर्षित करत राहते. येथील प्रतिकूल वातावरणाच्या नावाने खडे फोडत न बसता तो येथील
सौदर्यांचा आनंद घेतो. त्याला भेटण्यासाठी दुसऱ्या दिवशी प्रतापपूरला बसने
जाण्याचे ठरविले. सकाळी आठ वाजता बस लेहहून निघाली. ती बस भारतातील सर्वात उंच रोड
असलेल्या खार्दुंगला पासमधून जात होती. तिथे बर्षवृच्छी झालेली होती. त्यामुळे
रस्ता निसरडा झालेला होता. आम्ही ज्या बसमध्ये बसलो होतो ती अचानक एका कड्यावर
घसरू लागली. खूप भीती वाटायला लागली. असे वाटले सायकलने आपण जीवंत आलो परंतु आता
मात्र आपले काही खरे नाही. त्यामुळे डोळे झाकून शांतपणे गाडीत बसून राहिलो.
गाडीचालकाने चाकांना चेन बांधून ती गाडी चालवायला सुरुवात केली. आम्ही कसेबसे तो
डोंगर उतरून खाली आलो. आता नुब्रा खोरे सुरू झाले होते. लेहमधील प्रसिद्ध पर्यटन
स्थळांपैकी नुब्रा खोरे हे एक आहे. मित्राला भेटायला जात असताना अनायसे तो परिसर
पाहणे झाले. तोही खूपच सुंदर आणि देखणा परिसर होता. आतापर्यंत दिसलेल्या
डोंगररांगांपेक्षा या रांगा भिन्न होत्या. त्यांचेही सौंदर्यही अलग होते.
खार्दुंगला खिंड समुद्रसपाटीपासून उंची १७९८२ फूट
गाडी चहापाणासाठी एका छोट्याशा हॉटेलमध्ये
थांबली. तो एकटाच मालक होता. गर्दी खूप होती. त्यामुळे गाडीतील अनेक प्रवाशी
त्याला पदार्थ बनविण्यात मदत करत होता. प्रत्येकजण हवे ते स्वतः घेऊन प्रामाणिकपणे
पैसे देत होता. कोणी कोणाला फसविण्याचा किंवा लुबाडण्याचा प्रयत्न करत नव्हते.
एकमेकांच्या विश्वासावर तिथे व्यवहार चाललेला होता. हे चित्र शहरी भागातून
आलेल्यांना आश्चर्यकारक वाटत होते. मात्र तेथील लोकांच्या एकंदरीत वागण्यातील
प्रामाणिकपणा आणि दुसऱ्यांना न फसविण्याची वृत्ती त्यातून दिसून येत होती. गाडीतील
एकजण म्हणाला पूर्वी या भागात घरांना कुलूपं देखील नव्हती. चोरी-दरोडा हा प्रकार
नव्हता. फसवणूक नव्हती. तेव्हा जाणवले निसर्गाच्या जवळ राहणाऱ्या माणसांना लालच, हव्यास कमी असतो. सहकार्याची भावना अधिक असते. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या
समूहांमध्ये तर समूहभावना आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती अधिक आढळली. कदाचित
त्यांचा जगण्यासाठी निसर्गाशी संघर्ष चालू असल्याने त्यांना आपआपसांत भांडणे
करण्यात वेळ नसावा. नाहीतर महाराष्ट्र सारख्या राज्यात जिथे जगण्यात निसर्गाशी कोणताही
संघर्ष नाही तिथे माणसे एकमेकांशी लढण्यात, एकमेकांची
जिरवण्यात, रस्ते-बांधांवरून कोर्टकचेऱ्या करून वेळ, श्रम आणि उर्जेचा अपव्यय करताना दिसतात. शहरांत आले की हव्यास, अतृप्तता वाढायला लागते की काय? चंगळवादी- भोगवादी वृत्तीचा
मनुष्य वर्तनावर प्रभाव वाढतो की काय ?
असे वाटू लागले. या सर्वाच्या प्रभावाचा परिणाम म्हणजे मनःशांती बिघडणे
होय.
दुपारी तीनच्या सुमारास
प्रतापपूरला गाडी थांबली. लेहकडून या भागात दिवसातून केवळ ही एकच बस चालते. विवेकच्या
छावणीमध्ये मुक्कामाला थांबलो. रात्री त्याने तेथील नीरभ्र आकाश दाखविले.
पौर्णिमेची रात्र होती, चंद्र स्वयंप्रकाशाने झळाळून निघाला होता. त्याची
चमक ही वेगळीच दिसत होती. आपल्याकडे न दिसणारी चंद्राची प्रतिमा तिथे दिसत होती.
तारेही प्रदूषण नसल्याने स्पष्ट दिसत होते. शहरीकरणाने कोणत्या कोणत्या गोष्टींना
आपण मुकत होतो याची प्रकर्षाने जाणीव तिथे होत होती. प्रतापपूर हे सियाचीन या
ठिकाणी तैनातीसाठी जाणाऱ्या सैनिकांचे केंद्र होते. एव्हरेस्ट शिखर २४००० फुटांवर
आहे. सियाचीनमधील काही चौक्या या २१००० फुटांपेक्षा उंच आहेत. तिथे सैन्याचा
संघर्ष हा पाकिस्तान किंवा चीनच्या सैन्याशी नसून तो निसर्गाशी आहे. अनेक ठिकाणी चढून
जाणेही आवाहानात्मक असते. अनेकदा जिवीताला धोकाही निर्माण होतो. येथे नोकरी
करणाऱ्या सैनिकांच्या शरीरावर उंच प्रदेशातील वातावरणाचे खूप दुष्परिणाम होतात.
बाहेरून शरीर धडधाकट दिसत असले तरी उंचीवर कमी तापमानात काम केल्यामुळे अंतर्गत
भाग खराब होतो. तेथे नोकरी करून आल्यानंतर अनेकांना अनेक व्याधी जडतात.
आपण अनेकदा ऐकून असतो की
सियाचीनला नोकरी करून आलाय. मात्र त्या वातावरणाची आणि त्याची दाहकता तिथे
गेल्यानंतर अनुभवली. सैन्यातील नोकरी खरेच किती आवाहानात्मक आहे हे जाणवले. अत्यंत
प्रतिकूल परिस्थिती आपले सैन्य काम करते याचीही जाणीव झाली. आपल्या सीमांचे रक्षण
करणे किती आवाहानात्मक आहे हेही त्यावेळी जाणवले.
१४ मे ला सकाळी पुन्हा लेहकडे
जाणाऱ्या बसने प्रवास सुरू झाला. दुपारी दोनच्या सुमारास ती बस लेहला पोहचली.
रस्त्याने पुन्हा नवे डोंगर, नद्या दिसल्या. लेहला
पोहचल्यानंतर तिथे परतीच्या प्रवासाची चौकशी केली. एका एनोव्हा गाडीवाल्याने चार
हजार रूपयांमध्ये मनालीला सोडण्याने मान्य केले. गाडी बुक करून निश्चिंतपणे पुन्हा
हॉटेलकडे परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता परतीचा प्रवास सुरू होणार होता. एनसीसीचे
माजी अधिकारी कर्नल प्रमोद यांनी मला लेहमध्ये काही गरज लागल्यास कर्नल राहुल
यांच्याशी संपर्क साधला होता. ते तेथील लष्करी रूग्णालयात डॉक्टर होते. त्यांनी
मला काही मदत हवी आहे का ते विचारले. सायंकाळी त्यांना भेटायला रूग्णालयात गेलो.
तिथे त्यांचे संशोधन केंद्र होते. उंच ठिकाणी राहणाऱ्या लोकांना होणाऱ्या
व्याधींवर ते संशोधन करत होते. तेथील नागरिकांना होणाऱ्या आजारांवर तिथे काम
चाललेले होते. त्यांना माझा रक्तदाब मोजण्याबाबत विचारले. त्यांनी तो मोजल्यावर
लक्षात आले की वाढलेला आहे. त्यामुळे सतत दम लागत होता. श्वास घेण्यास त्रास होत
होता. मात्र ते म्हणाले उंच ठिकाणी रक्तदाब वाढतो, त्यामुळे
चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे निश्चिंत झालो. ते डॉक्टर मला अत्यंत निगर्वी
वाटले. त्यांच्या वागण्यात साधेपणा होता. त्यांना भेटून एका चांगल्या माणसाला
भेटल्याचे समाधान झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा परतीचा
प्रवास सुरू झाला. लेहृ-मनाली या अजून एका सायकलस्वारांच्या स्वप्न असलेल्या
रस्त्याने आम्ही जाणार होतो. पुन्हा एकदा लडाखचा वेगळा प्रांत, डोंगर, नद्या पाहण्याची संधी मिळाली. हा रस्ता
नुकताच खुला झाल्याने ठिकठिकाणी बर्फ साचलेले होते. गाडीचा चालकही कधीकाळी सायकल
चालवायचा, त्यामुळे तोही अनेक गोष्टी सांगत होता. या
रस्त्याने सायकल चालवू शकतो याची खात्री देत होता. या रस्त्यावर सर्वात उंच असलेला
टंगला पास (समुद्रसपाटीपासून १७४८० फूट उंच) लागला. ते ठिकाण पूर्णपणे
बर्फाच्छिदित होते. तो डोंगर झाल्यानंतर आम्ही उताराला लागलो. लडाख आणि हिमाचल
प्रदेशाच्या सीमेवर डोक्याएवढ्या उंचीचा बर्फ साचलेले होते. बर्फ फोडणाऱ्या मशीनने
रस्ता खुला केला होता. दोन्ही बाजूंना बर्फाचे कडे आणि त्यातून चाललेली गाडी असा
तो नजारा होता. पाढरेशुभ्र बर्फ उन्हाने चमकत होते. धार्मिक चित्रपटांमध्ये
दाखविल्या जाणाऱ्या स्वर्गातील दृश्याप्रमाणे सभोवतालचा प्रदेश होता. कुठल्याही
प्रकारचे प्रदूषण तिथे नव्हते. परतीचा प्रवासही तितकाच अविस्मरणीय आणि लोभसवाणा
होत होता. पुन्हा एकदा नवे डोंगर, नद्या पहावयास मिळाल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी मनालीहून
मंडीकडे सायकलवर प्रवास सुरू केला. रस्ता उताराचा असल्याने सायकल चालविण्यास फारसे
कष्ट पडत नव्हते. हा परिसर मात्र लेहमधील हिमालयीन पर्वत रांगांपेक्षा वेगळा होता.
येथील डोंगर हिरवेगार होते. पायथ्याने बियास नदी वाहत होती. आणखी वेगळ्या
प्रदेशातून प्रवास करण्याची संधी मिळाली होती. सायंकाळपर्यत मंडी येथे पोहोचलो.
तेथून एका बसने दिल्लीपर्यंत आम्ही आलो. दुसऱ्या दिवशी दिल्लीत नोकरीला असलेल्या
नरेशच्या गाडीत आम्ही तीन दिवसांमध्ये नगरला पोहोचलो.
अशा रितीने एका दिर्ध प्रवासाची
सांगता झाली. या प्रवासात पायी, सायकल, बस,
रेल्वे, कार अशा जवळपास रस्त्याने वाहतूक
होणाऱ्या सर्व साधनांचा वापर झाला. देशाचे सौंदर्य, विविधता
अनुभवता आली. हिमालयातील अध्यात्मिक शांततेचा आणि भव्यतेचा अनुभव घेता आला.
निसर्गापुढील आपले शुद्रत्व लक्षात आले. अनेक माणसे देवदूतासारखी संकटाच्या वेळी
मदतीला आली. अनेकांच्या चांगुलपणाचा, मोठेपणाचा, दर्यादिलीचा अनुभव आला. जगात खूप चांगले माणसे आहेत आणि आपल्यालाही अधिक
सुधारण्याची गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवले. या प्रवासाने
काय दिले तर मनःशांती दिली. हिमालयातून जाऊन आल्यावर मिळणारे आत्मिक समाधान दिले.
आपल्या देशाचा अभिमान वाटला आणि देशावरील आणि नागरिकांवरील प्रेम अजून वाढले. आपला
देश एक गूढ आहे तो समजून घेण्यासाठी अनेक प्रवास करावे लागतील याची जाणीव झाली.


























